Tuesday, May 25, 2021

भोगप्रवृत्तीमुळे सर्वनाश | Sense Gratification Leads to Destruction



 

आजपर्यंत विश्वामध्ये विषयांचे स्वैर, उच्छृंखल उपभोग घेऊन कोणीही मनुष्य सुखी, आनंदी, कृतकृत्य झाला नाही.  तर उलट भोगांच्यामुळे मनुष्यजीवन अधःपतित झाल्याचे दिसते.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी भोगप्रवृत्ति निर्माण होते, त्यावेळी मनुष्य प्रथम त्या विषयांची प्राप्ति करतो आणि येथेच्छ उपभोग घेतो.  त्यानंतर दुसरी कामना निर्माण करून तीही पूर्ण करतो.  याप्रमाणे सतत एकामधून दुसरी, तिसरी अशा अनंत कामना निर्माण करतो.  

 

जर सरळ मार्गाने आपली कामना पूर्ण झाली नाही तर मनुष्य वाममार्गाचे, अधर्माचरणाचे अनुसरण करतो.  त्याचवेळी त्याच्या मनात स्वार्थ, असूया, द्वेष, कपट, मत्सर वगैरे वृत्ति, कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर येतात.  तो स्वतःची कामना पूर्ण करण्यासाठी, स्वार्थ पूर्ण करण्यासाठी धर्म, सदाचार, न्याय, नीति झुगारून देतो.  विकारवश होऊन निंद्य, निषिद्ध कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रकारे विषयभोग मनुष्यामधील न्यायनिष्ठा, धर्मनिष्ठा, आचार-विचार-उच्चार यांचा नाश करून त्याला अधःपतित, स्वैर, पशुतुल्य बनवितात.  

 

म्हणूनच आज भोगवादी, चंगळवादी असणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्यामध्ये एका बाजुला प्रचंड मोठी, बुद्धीला थक्क करणारी वैज्ञानिक प्रगति आहे.  एका बाजूला डोळे दीपवणारी भोगसाधने आहेत.  बटन दाबले की, हातात सर्वकाही मिळते.  परंतु दुसऱ्या बाजूला सर्वांचे अंतरंग कामक्रोधादि भस्मासुरांनी पोखरून काढले आहे.  भोगवाद मनुष्याला कधीच शांति देऊ शकत नाही.  भोगवादाची परिणती युद्धांच्यामध्ये व महायुद्धांच्यामध्ये होऊन अंतिम दुःखामध्ये, अशांतीमध्ये होते.  हेच जगाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाने सिद्ध केलेले आहे.  

 

म्हणूनच हे यमराजा !  तू कितीही उपभोग दिलेस तरी ते अनित्य व दुःखस्वरूप आहेत.  भोग भोगण्यासाठी कितीही दीर्घायुष्य दिलेस तरी ते मुळातच नाशवान असल्यामुळे अल्पच आहे.  भोग भोगून इंद्रियेही गलितगात्र, तेजोहीन होतात.  परलोकही नाशवान आहे.  पुण्यसंचयाने ब्रह्मलोकापर्यंत गेले तरी पुण्यक्षयानंतर पुन्हा मर्त्यलोकातच यावे लागणार, हे निश्चित आहे.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ





Tuesday, May 18, 2021

भोगांची निरर्थकता | Futility of Sense Gratification

 



यमराजाकडून ऐहिक व स्वर्गीय भोगांचे रसाळ वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा नचिकेत्याच्या मनामध्ये कामनेने लेशमात्र प्रवेश केला नाही.  त्याचे मन एखाद्या सरोवराप्रमाणे धीरगंभीर, शांत, तरंगरहित, कामनारहित, क्षोभरहित, उद्रेगरहित, अविचल राहिले.  असा हा प्रखर वैराग्यशील असणारा नचिकेत यमराजाला म्हणतो – हे यमराजा !  तू आता ज्या ज्या भोगांचे वर्णन केलेस, ते सर्व भोग उद्या असतील की नसतील याबद्दल काहीच सांगू शकत नाही.  त्यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होते, कारण हे सर्व भोग कर्मामधून निर्माण झालेले असल्यामुळे नाशवान आहेत.  

 

जे जे जन्माला येते, ते सर्व काळाच्या ओघात निश्चितपणे नाश पावते.  हा विश्वाचा नियम आहे.  हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  विश्वामध्ये कोणतीही वस्तु शाश्वत, चिरंतन नाही.  या सर्व भोगांना भोगणारा भोक्ता मनुष्यही मर्त्य आहे.  तूच या सर्व मनुष्यांचा मृत्युरूपाने नाश करतोस.  कितीही दीर्घायुष्य मिळाले तरी एक ना एक दिवस या शरीराचा मृत्यु अटळ, अपरिहार्य आहे.  

 

ज्यावेळी मनुष्य इंद्रियांच्या साहाय्याने विश्वामधील सुंदर, मोहक, आकर्षक विषयांचा, कनक-कांचन-कामिनी यांचा उपभोग घेतो, तेव्हा इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते.  भोगून-भोगून शेवटी इंद्रिये शक्तिहीन, गलितगात्र होतात. इंद्रियांचे तेज, सामर्थ्य कमी होते.  या स्वैर इंद्रियभोगांच्यामुळे मनुष्यामधील धर्मप्रवृत्ति, वीर्य, प्रज्ञाशक्ति, तेज, यश या सर्वांचा ऱ्हास होतो.  इंद्रिय व विषय यांच्या संयोगामधून सुखाचा क्षणिक आभास निर्माण होतो, परंतु ते सुख मनुष्याला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत नाही.  तृप्त करू शकत नाही.  

 

भर्तृहरि वर्णन करतात –    

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः |  तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ||

तपो न तप्तं वयमेव तप्ताः |  कालो न यातो वयमेव याताः ||            (वैराग्यशतक)

आपण जीवनभर भोग भोगले नाहीत, तर उलट भोगांनीच आपल्याला भोगले.  आपली तृष्णा जीर्ण झाली नाही, तर आपणच जीर्ण झालो.  आपण तपाचरण केले नाही, तर आपण तप्त झालो, काळ पुढे गेला नाही तर आपणच काळाच्या ओघात पुढे गेलो.  

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ




Tuesday, May 11, 2021

आत्मस्वरूप दाखविता येत नाही | “Showing” Self-Knowledge

 



अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर शिष्याच्या गुरूंच्याकडून खूप अपेक्षा असतात.  गुरुंच्याकडे आल्याबरोबर गुरूंनी काहीतरी चमत्कार करावा.  अनेक साधकही आश्रमामध्ये येतात.  गुरूंच्यासमोर बसतात व विचारतात, “हे गुरो !  आत्म्याचे दर्शन घडवून द्या. काहीतरी करा.  देव कोठे आहे, दाखवा”.  काही साधकांना तर फोनवरून आत्मज्ञान हवे असते.  काहींना इंटरनेटवरून हवे असते.  या कलियुगात साधकांचे सुद्धा विविध प्रकार आहेत.  साधकांच्या अशा प्रश्नांना उत्तरेच नाहीत, कारण श्रुति येथे सांगते – न तत्र चक्षुः गच्छति...|

 

आपण व्यवहाराप्रमाणे अध्यात्माचे फळ दृश्य रूपात पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करतो.  वर्षानुवर्षे आत्मसाक्षात्काराची वाट पाहतो.  दुर्दैवाने बहिरंगाने काहीही मिळत नाही.  त्यावेळी मात्र साधक निराश, भकास होतो.  आपल्या नैराश्याचे खापर शास्त्रावर, गुरुंच्यावर फोडतो.  या मार्गापासून च्युत होतो.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे साधकाने आत्मस्वरूपाविषयी केलेल्या चुकीच्या कल्पना !

 

म्हणुनच येथे श्रुति स्पष्टपणे सांगते की, यथैतदनुशिष्यात् |’  श्रुतीच्या या विधानाचा येथे विशेष अर्थ आहे.  “आत्मस्वरूपामध्ये चक्षुरादि इंद्रिये व मन पोहोचू शकत नसल्यामुळे शिष्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे द्यावे, हे आम्ही जाणत नाही.  त्याला कसे शिकवावे ?  हे आम्हाला समजत नाही.”  असे येथे गुरूंचे विधान आहे.

 

यावरून समजते की, येथे गुरु कोणत्याही प्रकारे शिष्याला घटादि दृश्य पदार्थाप्रमाणे किंवा सुखदुःखादि अनुभवांच्याप्रमाणे आत्म्याचे ज्ञान देण्यास तयार नाहीत.  याचे कारण आत्मा हा ज्ञानाचा दृश्य, इंद्रियगोचर, ज्ञेय विषय कदापि होऊ शकत नाही.  असा गुरूंचा, श्रुतीचा, शास्त्राचा ठाम निर्णय आहे.  त्यामुळे आत्म्याला कोणत्याही घटादिवत् किंवा विश्वामधील एखाद्या दृश्य विषयाप्रमाणे जाणण्याचा प्रयत्न करू नये, हेच श्रुतीने येथे सूचित केलेले आहे.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, May 4, 2021

संसार हा अनर्थकारी का आहे ? | Why Manifestation is Meaningless?

 



संसाराचे वर्णन करीत असताना आचार्यांनी शब्द वापरला आहे – अनेकानर्थसंकुलः संसारः |  संसार हा अनेक अनर्थांचे संकुल आहे.  संसारामध्ये एकामागून एक अशी अनेक संकटे येत राहतात.  आचार्य संसाराचे स्वरूप समजावून देण्यासाठी अनेक दृष्टान्त देतात.  संसार हा मरुमरीचिकावत् |  आहे.  वाळवंटामध्ये उन्हामध्ये वाळू चमकल्यावर वाळूवर जसे भासात्मक पाणी दिसते, तसेच हा संसार भासात्मक, मिथ्या आहे.  दुरून पाहिल्यावर संसारामध्ये, विषयांच्यामध्ये, भोगांच्यामध्ये सुखाचा भास निर्माण होतो.  परंतु जवळ गेल्यावर, प्रत्यक्ष अनुभवत असताना मात्र सुखाची प्राप्ति होत नाही.  मृगजळ जसे आपली तहान भागवू शकत नाही, तसेच सांसारिक भोग मनुष्याला अंतरिक शांति व सुख देऊ शकत नाही.

 

हाच संसार – कदलिस्तम्बवत् |  निःसार आहे.  केळीचा खुंटा जसा बाहेरून हिरवागार, गुबगुबीत दिसतो.  त्याच्या आत काहीतरी असेल असे वाटते.  परुंतु बाहेरून एकेक साल काढत गेले की, आतमध्ये काहीही शिल्लक राहत नाही.  तसेच संसार, विषय, भोग हे सर्व बाहेरून दिसायला छान दिसते.  परंतु संसाराच्या आत काहीही सार किंवा तथ्य नसते.  परंतु हे खूप उशीरा, वयाची अर्धी वर्षे उलटून गेल्यावर समजते.

 

संसार हा गन्धर्वपत्तनवत् |  आहे.  आकाशामध्ये जसे अनेक प्रकारचे ढग दिसतात, त्यामधून विविध आकार निर्माण होतात.  जणु काही आकाशात गंधर्वनगरी तयार होते.  परंतु पाहता-पाहता क्षणार्धात सर्व आकार बदलतात.  गंधर्वनगरी नाहीशी होते.  याप्रमाणेच, संसार क्षणाक्षणाला बदलणारा व गतिमान आहे.  आज आहे, तर उद्या नाही, असे सर्व विश्व आहे.  विषय, मनुष्याचे जीवन, उपभोग, माणसांचे एकत्र येणे हे सर्वच क्षणभंगुर, अनित्य आहे.

 

हा संसार रज्जुसर्पवत् |  मिथ्या आहे.  म्हणजेच दोरीवर भासमान होणाऱ्या सर्पाप्रमाणे अध्यस्त आहे.  तसेच, हा संसार ‘स्वप्नवत्’ आहे.  जसे स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न हे सत्यच भासते.  मात्र जागृत झाल्यानंतर स्वप्नामधील सत्यत्व बुद्धीचा निरास होतो.  तसेच दोरीचे, अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर आरोपित केलेल्या अध्यस्त सर्पाचा व त्यामधून निर्माण झालेला भीतीचा निरास होतो.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ