Monday, March 26, 2018

दिव्यत्वाचा मार्ग | Divine Pathखरे युद्ध, संघर्ष बाहेर नसून आपल्या आतच आहे.  भगवंतांनी अर्जुनाला घरामध्ये, अरण्यामध्ये अथवा हिमालयामध्ये उपदेश दिलेला नसून युद्धास सज्ज असणाऱ्या अर्जुनाला रणभूमीवर आत्मज्ञानाचा, श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे.  युद्धभूमीवर अर्जुन भगवंतांना दोन सैन्यांच्यामध्ये रथ नेण्यास सांगतो.  त्यावेळी तो आपल्यासमोर युद्धासाठी आपल्याविरुद्ध उभे असणारे आदरणीय पितामह भीष्माचार्य, पूजनीय कुलगुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, स्वतःचे बांधव, सगे-सोयरे या सर्वांना पाहातो.  त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक भयंकर मोठा संघर्ष निर्माण होतो. त्याची बुद्धि भ्रष्ट होते.  विचारशक्ति कुंठित होते.  

त्यावेळी अर्जुनाचा कर्तुं-अकर्तुं अहंकार भगवंतांना पूर्णपणे शरण जातो.  तो भगवंतांना म्हणतो, “हे भगवन्, आज माझे मन पूर्णतः भ्रमिष्ट झालेले आहे. काय करावे आणि काय करू नये, हे मला समजत नाही.  मी अत्यंत व्याकूळ, अगतिक झालो आहे.  शरण आलेल्या माझ्यावर आपण कृपा करा आणि जे मला श्रेयस्कर, हितकारक असेल ते सांगा.”  

याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये रणभूमि आहे.  रणभूमीमध्ये १) कौरव – आसुरीगुणसंपत्ति आणि २) पांडव – दैवीगुणसंपत्ति असे दोन पक्ष आहेत.  कौरव संख्येने जास्त असून पांडव मात्र कमी आहेत.  म्हणजेच जास्त असणारे दुर्गुण आणि कमी असणारे सद्गुण यांच्यामध्ये सतत द्वंद्व, संघर्ष चालू आहे.  या जीवनाच्या संघर्षामधून, सर्व द्वंद्वांच्यामधून मुक्त व्हावयाचे असेल तर आत्मज्ञानाची आवश्यकता आहे आणि ज्ञानप्राप्तीसाठी अंतःकरण योग्य व अधिकारी बनविले पाहिजे.  

यासाठी भगवंतांनी येथे क्षेत्रज्ञाचे ज्ञान प्रतिपादन करण्यापूर्वी दैवीगुणसंपत्तीचे वर्णन केलेले आहे.  साधनं विना साध्यं न सिध्यति |  या न्यायाने अंतःकरणाच्या शुद्धिशिवाय ज्ञानप्राप्ति होत नाही.  त्यासाठीच प्रत्येक साधकाने प्रथम दैवीगुणसंपत्ति आत्मसात करावी.  दैवी गुण म्हणजेच दिव्य गुण होय.  दिव्य म्हणजेच अत्यंत पवित्र, मंगलकारक होय. किंवा दिव्य म्हणजे अत्यंत कठिण.  म्हणून हे दिव्य गुण प्राप्त करणे हे अत्यंत कठिण आहे.  या मार्गाला “दिव्यत्वाचा मार्ग” (Divine Path) असे म्हणतात.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010


- हरी ॐ

Tuesday, March 20, 2018

अज्ञानामुळे बौद्धिक अधःपतन | Intellectual Degradation due to Ignorance

अज्ञानी पुरुषाला ज्ञाननिष्ठा, ज्ञान, आत्माकार वृत्ति, सजातीय वृत्तिप्रवाह, समाधिअभ्यास या सर्व गोष्टी अशक्यप्राय असल्यामुळे काल्पनिक वाटतात.  रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रवृत्तीमुळे त्याचे मन कधीही शास्त्रश्रवणामध्ये तन्मय, एकाग्र होऊ शकत नाही. तो एका बाजूला कानाने शास्त्र श्रवण करतो, परंतु मनाने मात्र काल्पनिक विषय निर्माण करून काल्पनिक उपभोग घेतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या अंतःकरणामध्ये काम-क्रोध-मद-मोह-मत्सर-स्वार्थ-असूया-द्वेष-कपट असे विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येतात.  त्यामुळे श्रवण करूनही त्याच्या मनावर शास्त्राचा परिणाम होत नाही.  

कामना करून आणि कर्म करून करून त्याची बुद्धि इतकी जड आणि तमोगुणप्रधान झालेली असते की, त्या बुद्धीला दृश्य विषय, भोग याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही.  रात्रंदिवस कसे मी जास्तीत जास्त भोग आणि विषय मिळवेन, कसे मी उच्छृंखल भोग घेईन, याचेच सतत चिंतन केल्यामुळे त्याची बुद्धि अत्यंत जड, मंद झालेली असते.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे दिसते म्हणजेच जे माझ्या पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहे, तेवढेच सत्य असे झाल्यामुळे ती बुद्धि अत्यंत स्थूल, प्राकृत आणि वैषयिक असते.  

म्हणून आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीला एक ठराविक आकलन शक्ति आहे.  प्रत्येकाची ग्रहणशक्ति कमीजास्त फरकाने आहे.  एखाद्याला पटकन समजते आणि एखाद्याला दहादहा वेळेला सांगूनही साध्या गोष्टीही समजू शकत नाहीत.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे या बुद्धीला आज जड विषयांचे ज्ञान घेण्याची आणि निकृष्ट विषय भोगण्याचीच सवय लागलेली आहे.  

कामना करणे, विषय प्राप्त करणे, विषयांचा संग्रह करणे आणि इंद्रियांच्या साहाय्याने स्वैर उपभोग घेणे याव्यतिरिक्त आपण आपल्या जीवनात काहीही केलेले नाही.  आयुष्याच्या संध्याकाळी तर विषयांचा विचार करून करून बुद्धि इतकी थकते की, त्या बुद्धीला साध्या साध्या गोष्टीही जमत नाहीत.  बुद्धीला आयुष्यभर ताणच न दिल्यामुळे बुद्धीवर गंज चढतो.  बुद्धीने सारासार विचार केला नाही तर बुद्धीवर तमोगुणाचे आवरण येते.  म्हणून रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव कमी करून मन सत्वगुणप्रधान करण्यासाठीच निष्काम कर्मयोग हे साधन आहे.  
  
    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

Tuesday, March 13, 2018

कर्माची खरी कुशलता | The Real Skill in Work
मोक्षाच्या प्राप्तीसाठी क्रमाने पाहिले तर सर्वप्रथम निष्कामकर्मयोग हेच साधन आहे.  मग येथे शंका येईल की, कर्म हेच मोक्षाचे साधन असेल तर सर्वच माणसे रात्रंदिवस कर्मरत आहेत.  त्यामुळे सर्वच जण मुक्त झाले पाहिजेत.  परंतु असे होत नाही.  तर उलट कर्म करून मनुष्य बद्ध होतो.  म्हणूनच भगवान सांगतात की, कर्म करताना अशा कुशलतेने कर्म करावे की, ज्यामुळे कर्म करूनही मनुष्य कर्मापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहू शकेल. यालाच भगवान गीतेमध्ये ‘योग’ असा शब्द वापरतात.

योगः कर्मसु कौशलम्  |   (गीता अ. २-५०)
केवळ नाकतोंड दाबणे, दोन वेळेला प्राणायाम करणे म्हणजे योग नव्हे, तर कर्मामधील कुशलता म्हणजेच योग आहे आणि ही कुशलता म्हणजेच कर्मामधील निष्काम सेवावृत्ति होय.  अशा प्रकारे कर्म करूनच क्रमाने नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते.  

जसे, व्यवहारामध्ये आपण पाहतो की, काट्यानेच काटा काढावा.  काटा पायात गेला की खूप यातना होतात.  त्यामुळे त्याठिकाणी कितीही चिंध्या बांधल्या, मलमपट्टी केली तरी सुद्धा जोपर्यंत काटा आत आहे, तोपर्यंत यातना या होणारच !  या यातनांच्यामधून कायमचे मुक्त व्हावयाचे असेल तर उपाय एकच आहे आणि तो म्हणजे दुसरा टोकदार काटा घ्यावा आणि त्याच्या साहाय्याने पहिला काटा काढावा आणि नंतर दोन्हीही काटे फेकून द्यावेत.  

तसेच निष्काम कर्माच्या साहाय्याने कर्मबंधनाचा नाश केला पाहिजे.  दुष्कर्मांचा त्याग करावा आणि सत्कर्म करीत असताना सुद्धा त्या कर्मामागील कामनांचा, वासनांचा त्याग करावा.  म्हणजेच कर्मामागील दृष्टि बदलावी.  कर्मे तीच करावयाची आहेत.  जर तीच कर्मे सकाम केली, कामना ठेवून केली तर जीवाला ती बद्ध करतात.  जसे, ज्योतिष्टोमेन यजेत् स्वर्गकामः |  स्वर्गकामनेने प्रेरित होऊन जर अग्निहोत्रादि कर्म केले तर मनुष्याला स्वर्गप्राप्ति होते, परंतु – क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति |  या न्यायाने तो मनुष्य पुन्हा मर्त्यलोकात येऊन कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकतो.  परंतु तेच कर्म निष्काम भावनेने केले, आसक्तीचा त्याग केला तर अंतःकरणशुद्धीसाठी ते साधन होते आणि क्रमाने मनुष्य कर्म-कर्मफळाच्या जंजाळामधून मुक्त होतो.  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
                              

- हरी ॐ
Tuesday, March 6, 2018

धर्माचे महत्व | Importance of Dharma


वेद आज्ञा देतात –
सत्यं वद | धर्मं चर | मातृदेवो भव |
पितृदेवो भव | आचार्यदेवो भव |  (तैत्ति. उप. १-११)

धर्मनिष्ठ जीवन जगणारा पुरुषच आत्मनिष्ठा प्राप्त करू शकतो.  म्हणून पूर्वीच्या काळी आई-वडील पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना नियमावली देत.  आजकालची मुले ते सर्व नियम खुंटीला अडकवून ठेवतात.  “यात काय आणि त्यात काय?”  अशा वृत्तीने वडीलधाऱ्या मंडळींचा अपमान करतात.  हेच चित्र आपण समाजात पाहत आहोत.  जी जी नीतिमूल्ये या पिढीने झुगारून दिली, त्या सर्वांचे भयंकर परिणाम म्हणजेच विस्कळीत कुटुंबसंस्था, मोठ्यांच्या विषयी अनादर, जीवनामध्ये जाणवणारी पोकळी, नैराश्य, वैफल्य, द्वंद्व, वाढणाऱ्या आत्महत्या, वाढणारे वृद्धाश्रम, स्वैर भोगवाद, घटस्फोटांचे वाढते प्रमाण, आधुनिकतेच्या नावावर आपल्या हिंदु संस्कृतीच्या परंपरांना दिलेली तिलांजली हे सर्व आजची पिढी भोगत आहे.

म्हणून दोष आपल्या आई-वडिलांचा, परंपरेचा किंवा धर्माचा नाही तर आपल्या स्वतःमध्येच दोष आहे.  ज्या क्षणी आपल्या जीवनामधील धर्माचे उच्चाटन होते, त्याचक्षणी आपल्या अधःपतनास प्रारंभ होतो.  यासाठीच श्रुति कर्माचे म्हणजेच धर्माचे विधान देते.  कार्मानुष्ठानामुळे अंतःकरण शुद्ध होऊन विवेकवैराग्यादि दैवीगुणांनी मन संपन्न होईल आणि तेच मन शास्त्राच्या श्रवणासाठी अधिकारी होईल.  हा श्रुतीचा कर्मानुष्ठान सांगण्यामागे अभिप्राय आहे.  

इतकेच नव्हे, तर श्रुति यापुढे जाऊन सांगते – अन्यथा इतः नास्ति |  याशिवाय दुसरा मार्गच नाही.  शुभ म्हणजेच चांगली कर्मे केल्यामुळे मनुष्य आपोआपच अशुभ कर्मांपासून, अधर्मापासून परावृत्त होतो आणि सत्कर्मांच्या अनुष्ठानामुळे त्याचे मन क्रमाक्रमाने शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, रागद्वेषरहित, अंतर्मुख होते.  अशा कर्माने मनुष्य लिप्त, बद्ध होत नाही, तर तेच कर्म त्याला मुक्तीचे साधन होते.  

    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ