Tuesday, November 25, 2014

भक्ति आणि तृप्ति | Devotion and Contentment


सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात अतृप्तीचा अग्नि पेटलेला असल्यामुळे तो पूर्ण करण्यासाठीच मनुष्य अनेक प्रकारच्या कामना निर्माण करतो.  रात्रंदिवस त्याची घोडदौड चालूच आहे.  परंतु विषयांचा संग्रह करून किंवा उपभोगून विश्वामध्ये आजपर्यंत कोणीही तृप्त झालेले नाही.  कामाग्नि कधीही संतुष्ट झालेला नाही.  उलट तो अधिक वाढतच आहे.  हिरण्यकाश्यपु, सम्राट ययाति, त्रिभुवन जिंकणारा अजिंक्य रावण सुद्धा सुद्धा तृप्त झालेले नाहीत.

ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन किंवा तूप सतत हवन केले तरी अग्नि कधीही शांत न होता अधिकच प्रज्वलित होतो.  त्याचा भडका, दाह, उष्णता वाढते.  त्याचप्रमाणे कितीही कामनांचा उपभोग घेतला तरी मनुष्य नित्य अतृप्तच राहातो.  तो असंतुष्टच राहातो.

भक्ताला मात्र परमप्रेमस्वरूप भक्ति प्राप्त झाल्यावर त्याचे फळ म्हणजे तो तृप्त होतो.  त्याचा हव्यास संपतो.  तृष्णा संपतात कारण परमात्मप्राप्तीमुळे त्याच्या सर्व कामना गळून पडतात.  अशी ही परमप्रेमस्वरूप भक्ति भक्ताला आनंदस्वरूप करते, परमात्मस्वरूप बनविते.  त्याव्यतिरिक्त सर्व प्राप्ति अपूर्ण, मर्यादित, नाशवान, क्षणभंगुर आहे.

ज्या स्वरूपामध्ये दृक्-दृश्य-दर्शन, ज्ञाता-ज्ञेय-ज्ञानदि त्रिपुटींचा व्यवहार, द्वैताचा व्यवहार संपतो म्हणजे त्रिपुटीरहित जे स्वरूप आहे ते अद्वैत, अखंड, देशकालवस्तुपरिच्छेदशून्य, स्वयंसिद्ध, निरतिशय आनंदस्वरूप आहे तेच भूमा (अमर्याद) आहे.  हे जीवाचे स्वरूप आहे. याचाच अर्थ प्रत्येक जीव ज्या आनंदस्वरूपाचा शोध घेत असतो तोच हा आनंद आहे.  म्हणून या निरतिशय आनंदाच्या अनुभूतीने भक्त सर्व विषयांच्यापासून निवृत्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो.  तो तृप्त होतो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Sunday, November 16, 2014

अमृत आणि भक्ति | Nectar and Devotion




‘अमृत’ हे भक्तीचे अंतरंगस्वरूप आहे.  अमृत अनेक प्रकारचे आहे.  एक अमृत समुद्रमंथनामधून निर्माण झालेले आहे.  ते स्वर्गामध्ये असून देवभोग्य आहे.  ते अमृत जरारोगनाशक आहे.  पुण्यसंचयाने जीव स्वर्गलोकामध्ये जाऊन स्वर्गीय अमृत प्राप्त करतो.  परंतु ते उपभोगत असताना पुण्यक्षय होऊन जीव पुन्हा मर्त्य लोकात प्रवेश करतो.  म्हणून हे अमृत चिरंतन नाही.  ते नाशवान आहे.  त्यामुळे भक्तीचे हे अमृतस्वरूप नाही.

दुसरे अमृत चंद्रामध्ये आहे.  ते अमृत चंद्राच्या किरणांमधून वनस्पतींच्यामध्ये येते.  त्यामुळे वनस्पतींचे, गहू, तांदूळ वगैरे धान्याचे पोषण होते.  हे अमृत प्राणिभोग्य असून देह पोषण करणारे, क्षुधा निवारण करणारे आहे.  परंतु जरामरणशोकादि निवारण करणारे नाही.  भक्तीचे स्वरूप या अमृताप्रमाणे नाही.  

नारदमहर्षींना भक्तीचे हे अमृतस्वरूप अभिप्रेत नसून ज्यामध्ये भक्त आणि भगवंताचे एकत्व होते त्यावेळी परमोच्च प्रेम-भक्ति निर्माण होते.  म्हणून ते प्रेम अमृतस्वरूप आहे.  म्हणजेच परमप्रेम भक्ति हीच अमृतस्वरूप असून भगवत्स्वरूप आहे.  तीच मोक्षदायिनी आहे.

हीच भक्ति गीतेमध्ये अनन्य, अखंड, अव्यभिचारिणी म्हणून ज्ञात आहे.  या भक्तीचे वैशिष्ठ्य म्हणजे भक्ताच्या मनामध्ये फक्त अंतर्बाह्य एकच विषय असतो.  अन्य सर्व विषयांच्या वृत्तींना थाराच नसतो.  अशी ही पराकोटीची परमप्रेमस्वरूप भक्ति नारदमहर्षींच्या मते अमृतस्वरूपच आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ

Tuesday, November 11, 2014

परमप्रेम | Supreme Love




‘परमप्रेमरूप’ या शब्दाने नारदमहर्षि कामुक प्रेमापलीकडील अर्थ निर्देशित करतात, कारण प्रेम हा शब्द व्यवहारात अत्यंत प्रसिद्ध आहे.  तो सर्व ठिकाणी सोपाधिक आहे.  त्या प्रेमाला विषय आहे.  मग तो विषय इंद्रियगोचर असेल, अगर सौंदर्य, स्त्री, पुत्र, धन, संपत्ति असेल, सगेसोयरे असतील, निसर्ग असेल किंवा कोणताही बाह्य विषय असेल. त्यावर मनुष्य प्रेम करतो.

परंतु हे प्रेम मर्यादित आहे. ते मनुष्याला क्षणिक सुखाचा अनुभव देते; परंतु सतत अतृप्त ठेवते.  त्यामुळे पुन्हा पुन्हा उपभोगून सुख वृद्धिंगत करावे हीच इच्छा प्रबळ होते.  परंतु कितीही प्रयत्न केला तरी ते प्रेम तात्कालिक राहाते.  काळाच्या ओघात ते कमी झाल्यावर तेच प्रेमाचे विषय चिंता, दुःख देणारे होतात.  म्हणून हे परम प्रेम नाही आणि त्यामुळे वैषयिक प्रेम म्हणजे भक्ति नव्हे.  परमप्रेम हे अत्यंत उच्चकोटीचे, अत्युत्तम, अनन्यसाधारण असे आहे.

विश्व आणि विश्वातील विषय परमप्रेमाचा विषय होऊ शकत नाहीत, तर स्वभावतः सर्वव्यापक, परिपूर्ण असणारा परमात्मा हाच परमप्रेमाचा विषय आहे.  तो आनंदस्वरूप परमात्मा ‘मी’ च्या स्वस्वरूपापासून भिन्न नाही.  तोच परमप्रेमाचा विषय आहे.  निरतिशय आनंद हाच प्रेमाचा विषय आहे.

आनंद ही वस्तु नाही.  त्याला रंग-रूप नाही किंवा कोणताही पंथ, धर्म, जात वगैरे नाही.  तरी सुद्धा प्रत्येक मनुष्य कळत-नकळत आनंदस्वरूप परमात्म्यावर प्रेम करतो म्हणजेच तो स्वतःच्या स्वरूपावर प्रेम करतो.  म्हणून नारदमहर्षि सर्व विश्व प्रेमाच्या बाबतीत व्यर्थ ठरवितात आणि प्रेमाचा विषय प्रत्यगभिन्नस्वरूप परमात्माच आहे हे सिद्ध करतात.  व्यावहारिक प्रेमात द्वैतभाव आहे.  परंतु परमप्रेमात जीव आणि परमात्मा वेगळे असूच शकत नाहीत.  ते एकरूप होतात.  

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006

- हरी ॐ

Tuesday, November 4, 2014

पंचयज्ञ | Five Sacrifices

गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात.
१) कण्डनं – कांडणे, २) पेषणी – दळणे, ३) चुल्ली – चूल पेटविणे, ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे , ५) मार्जनी – झाडलोट वगैरेदि.
 
वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक जीवाणूंची हिंसा करीत असतो.  त्यासाठी प्रत्येक गृहस्थाश्रमीने पाच यज्ञ करावेत.
 
१. भूतयज्ञ – आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातील एक भाग चिमण्या वगैरेदि पक्ष्यांना द्यावा, कारण आपले जीवन समृद्ध करण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांचा सहभाग असतो.
२. अतिथियज्ञ – जो कोणी आपल्याकडे येईल त्याला श्रद्धेने अन्नदान करावे.  शास्त्र सांगते – अतिथिदेवो भाव |
३. पितृयज्ञ – पितरांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध होत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक भाग द्यावा.
४. देवयज्ञ – देवांसाठी एक भाग अर्पण करावा.
५. वैश्वदेव यज्ञ – एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देवून विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.
 
याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.  अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.  म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.  ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.  म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.  मन शुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ