Showing posts with label Intellect. Show all posts
Showing posts with label Intellect. Show all posts

Tuesday, December 24, 2024

उदारबुद्धि | Generous Intellect

 



हे उदारबुद्धि रामा !  ज्ञानी पुरुष अनेक युक्तींच्या साहाय्याने जे ज्ञान देतात, त्याची अवहेलना करणे अयोग्य आहे.  युक्तिवादाचा अनादर करून जे लोक युक्तिरहित गोष्टींचा आग्रह धरतात, त्यांना ज्ञाते लोक अज्ञानी समजतात.  याठिकाणी श्रीवसिष्ठ मुनि श्रीरामांना 'उदारबुद्धे' असे संबोधन वापरतात.  "हे रामा ! तुझी बुद्धि निश्चितच संकुचित नसून उदार आहे."

 

केवळ तर्कट बुद्धीने युक्तिवाद ऐकता येत नाही.  कारण अशा वेळी तर्कट बुद्धीमुळे युक्तिवादाचे रूपांतर कुतर्कामध्ये होऊ शकते.  म्हणून ज्ञानी पुरुषांच्याकडून युक्तिवाद ऐकावयाचा असेल तर आपली बुद्धि उदार व शुद्ध पाहिजे.  शास्त्रामध्ये, पुराणांच्यामध्ये सांगितलेल्या सर्व कथा आणि आख्याने ही युक्तियुक्त आहेत.  ज्या कथांच्यामध्ये काही युक्ती, सार, तथ्य असते, त्याच गोष्टी ऐकायला आपल्याला बरे वाटते.  अन्यथा युक्तिरहित असणाऱ्या गोष्टी केवळ भाकडकथा ठरतात.  म्हणून ज्या गोष्टींमध्ये शास्त्र नाही,  युक्ति नाही, श्रुति-स्मृति प्रमाण नाही, केवळ श्रोत्यांना हसवायचे म्हणून किंवा रडवायचे म्हणून लालित्यपूर्ण पद्धतीने कथा रंगविल्या जातात, अशा गोष्टी व्यर्थ आहेत.

 

म्हणून श्रीवसिष्ठ मुनि येथे सांगतात की, श्रुतिसंमत युक्तिवादाचा अनादर करू नये.  साधकाने दुस्तर्कापासून, दुराग्रहापासून मात्र दूर राहावे.  थोडक्यात, ज्ञान घेताना केवळ भावनावश होऊन अंधतेने ज्ञान घेऊ नये.  अथवा खूप तर्कट बुद्धीने ज्ञान घेऊ नये.  तर श्रुतीला, वेदांना शास्त्राला संमत असणाऱ्या तर्काचे ग्रहण करावे, असाच येथे अभिप्राय आहे.

 

म्हणून येथे श्रीवशिष्ठ मुनि सांगतात की, "रामा !  आता यापुढे मी तुला युक्तियुक्त असणारी सुंदर आख्याने-उपाख्याने सांगेन आणि त्यामधून सिद्ध करेन की, हे सर्व दृश्य विश्व भासमान आहे.  रामा !  तुला आता मी पोकळ कोरडे शाब्दिक ज्ञान न देता अतिशय रसाळ वाणीने कथा सांगेन.  त्यामधून गुह्य ज्ञान उलगडून दाखवेन.  ते तू मनापासून श्रवण करावेस."

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, November 19, 2024

मयि बुद्धिं निवेशय | Invest Your Intellect in Me

 




मयि बुद्धिं निवेशय |  जी अंतःकरणाची वृत्ति वस्तूच्या स्वरूपाचा निश्चितपणे, संशयविपर्यरहित निर्णय घेते अशा निश्चयात्मक वृत्तीलाच बुद्धि असे म्हणतात.  अशी बुद्धि परमेश्वरामध्ये स्थिर करावी.  म्हणजेच या बुद्धीच्या साहाय्याने सतत परमेश्वराचेच अनुसंधान करावे.

 

येथे भगवान साधकांना अंतरंग साधनेचा उपदेश देत आहेत.  बाह्य कोणतीही कर्मप्रधान, शरीरप्रधान साधना न सांगता मन आणि बुद्धीलाच येथे साधना दिलेली आहे.  याप्रकारे मनाने व बुद्धीने परमेश्वराचे अखंड चिंतन केल्यामुळे काय फळ मिळते ?  भगवान स्वतःच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात – निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः |  मन आणि बुद्धि परमेश्वरामध्ये ठेवल्यामुळे मनामधील इतर विषयवृत्तींचा निरास होईल.  अंतःकरणामधील भोगवासनांचा प्रभाव कमी होऊन वृत्ति अत्यंत शुद्ध, सात्त्विक होईल.  यामुळे तो भक्त माझ्या स्वरूपामध्येच निवास करेल.

 

याचा अर्थ अंतःकरणशुद्धि झाल्यामुळे या साधकाला गुरुप्राप्ति होऊन श्रवणादि साधनेच्या साहाय्याने आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ति होईल.  देहात्मबुद्धि गळून पडेल आणि तो साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होईल.  किंवा, दुसरा अर्थ – हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानी पुरुष प्रारब्धाप्रमाणे जीवन जगेल.  प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर म्हणजेच देहपातानंतर त्याला विदेहकैवल्यावस्था प्राप्त होईल.  तो निर्विशेष परब्रह्मस्वरूपामध्येच निवास करेल.  पुन्हा या जन्ममृत्युयुक्त संसारात येणार नाही.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

म्हणून अर्जुना !  तू तुझे मन व बुद्धि माझ्यामध्ये ठेव.  मोक्षप्राप्तीसाठी तू माझाच आश्रय घे.  अत्यंत श्रद्धेने, भक्तीने तू माझी उपासना कर.  त्यामुळे तुला चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने गुरुप्राप्ति, ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.  यामध्ये कोणतीही शंका घेऊ नकोस.  निःसंशय होऊन ही श्रेष्ठ असणारी अंतरंग साधना तू कर.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Monday, July 11, 2022

सद्बुद्धि आणि सत् शास्त्र | Pure Intelligence And Pure Science

 



शुद्ध झालेल्या बुद्धीने सत्शास्त्राचे ज्ञान होऊन शास्त्राचे रहस्य, सार समजते आणि त्याचबरोबर सत्शास्त्राच्या सेवनाने, श्रवणानेच बुद्धि शुद्ध होते.  सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा असा परस्परसंबंध आहे.  सरोवरामध्ये किंवा एखाद्या जलाशयामध्ये ज्याप्रमाणे कमलपुष्प विकसित होते, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात सत्शास्त्राने सद्बुद्धीचा विकास होतो.

 

वसिष्ठ मुनि येथे सत्शास्त्र व सद्बुद्धि यांचा अन्योन्य संबंध सांगतात.  जसजसे मनुष्य सात्त्विक असणाऱ्या वेदांतशास्त्राचे गुरुमुखामधून श्रवण करेल, तसतसे त्याच्या मनामध्ये बदल होत जातो.  मन रागद्वेषरहित, विकाररहित, शुद्ध होते.  अशा मनामध्येच अमानित्वादि दैवी गुणांचा उदय होतो. सेवा, त्याग, समर्पण, भक्ति, शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व असे दैवी गुण वर्धन पावतात.  मन शांत होते.

 

मग हे कसे ओळखावे ?  तर मन शांत व शुद्ध झाल्यानंतर मनावर प्रसंगांचा परिणाम होत नाही.  मनामध्ये कामादि विकार उत्पन्न होत नाहीत.  मनामध्ये विषयांचे, उपभोगांचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे विचार उत्पन्न न होता ईश्वरचिंतन, शास्त्रचिंतन होऊ लागते.  ईश्वराच्या सगुण-साकार सुंदर रूपामध्ये मन तल्लीन होते.  असे मन शास्त्राचा एकेक शब्द गुरुमुखामधून चातकाप्रमाणे श्रवण करते.  त्यावेळी मनामध्ये शास्त्रज्ञान प्राप्त होऊन शास्त्राचे संस्कार दृढ होतात आणि त्या ज्ञानाची अनुभूति येते.

 

याप्रमाणे स्वच्छ सरोवरामध्ये सुंदर कमळ उगवावे, त्याप्रमाणेच सत्शास्त्राच्या श्रवणामधून सद्बुद्धि उदयाला येते आणि सद्बुद्धीमध्येच शास्त्रज्ञान उदयाला येते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ





Tuesday, September 8, 2020

ज्ञानातील मिथ्यात्व | The Futility of “Knowing”

 



आचार्य सुंदर दृष्टान्त देतात – दाह्यं इव दग्धुं अग्नेः दग्धुः न तु अग्नेः स्वरूपं एव |  जो जो दहनाचा विषय होतो, म्हणजेच जे जे दहनयोग्य, दाह्य आहे, त्यास अग्नि जाळतो.  सर्व दाह्य वस्तूंना अग्नि दग्ध करून भस्मसात करतो, कारण सर्व वस्तु या दहनाचा विषय होतात.  तसेच, त्या सर्व दाह्य वस्तु या दाहक असणाऱ्या अग्नीपासून भिन्न स्वरूपाच्या असतात.  म्हणून अग्नि त्यांना जाळू शकतो.  परंतु अग्नि स्वतःच स्वतःला मात्र जाळू शकत नाही.  दहन करण्यासाठी दाहक व दाह्य या दोन भिन्न वस्तूंची आवश्यकता आहे.

 

त्याचप्रमाणे, “मी ब्रह्मस्वरूप जाणतो” या विधानामध्ये विसंगति आहे.  ‘मी’ ‘मी’ ला कधीही जाणू शकत नाही.  अथवा ‘मी’ ‘मी’ ला स्वस्वरूपाला ज्ञानाचा विषय करू शकत नाही.  मी – ज्ञाता माझ्याव्यतिरिक्त असणाऱ्या विश्वामधील यच्चयावत् सर्व ज्ञेय, दृश्य विषयांचे ज्ञान घेऊ शकतो.  कारण त्या सर्व ज्ञेय वस्तु इंद्रियगोचर, दृश्य असून ज्ञात्यापासून भिन्न स्वरूपाच्या आहेत.  परंतु आत्मज्ञानाच्या बाबतीत ‘ज्ञाता’ ही ‘मी’ आहे व ‘ज्ञेय’ वस्तु सुद्धा ‘मी’च आहे.  येथे ‘ज्ञाता’ व ‘ज्ञेय’ हे अभिन्न, अद्वय स्वरूपाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये जाणण्याची क्रिया होऊ शकत नाही.  ‘मी’ ज्ञाता हा सर्वांना जाणणारा असून ‘मी’ स्वतःच, ज्ञानस्वरूप, परब्रह्मस्वरूप आहे.  हाच संपूर्ण वेदांताचा सुनिश्चित, निर्णयात्मक अर्थ आहे.  

 

म्हणूनच येथे – “मी ब्रह्मस्वरूप जाणतो” ही शिष्याची बुद्धि निरास करणेच योग्य आहे.  “मला ब्रह्मज्ञान झाले”, या भ्रमात शिष्य राहू नये, हीच आचार्यांची इच्छा आहे.  अन्यथा शिष्याला शास्त्राच्या श्रवणामधून “मी ब्रह्म आहे” असे तो म्हणेल व दुसऱ्याला प्रवचन सुद्धा देईल.  परंतु प्रत्यक्ष जीवन जगत असताना मात्र तो पूर्वीप्रमाणेच संसारी, दुःखी, निराश, उद्विग्न, द्वंद्वयुक्त, अतृप्त, अशांत राहील.  याला ज्ञान किंवा अनुभूति म्हणता येणार नाही.  म्हणूनच शिष्याला खरे ज्ञान, यथार्थ, सम्यक् व संशयविपर्यरहित तसेच अनुभवसहित ज्ञान देण्यासाठीच शिष्याची “मला ब्रह्मस्वरूप समजले”, ही मिथ्या बुद्धि निरास करणेच अत्यंत योग्य, युक्तिसंगत आहे.         

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ




Tuesday, March 20, 2018

अज्ञानामुळे बौद्धिक अधःपतन | Intellectual Degradation due to Ignorance





अज्ञानी पुरुषाला ज्ञाननिष्ठा, ज्ञान, आत्माकार वृत्ति, सजातीय वृत्तिप्रवाह, समाधिअभ्यास या सर्व गोष्टी अशक्यप्राय असल्यामुळे काल्पनिक वाटतात.  रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रवृत्तीमुळे त्याचे मन कधीही शास्त्रश्रवणामध्ये तन्मय, एकाग्र होऊ शकत नाही. तो एका बाजूला कानाने शास्त्र श्रवण करतो, परंतु मनाने मात्र काल्पनिक विषय निर्माण करून काल्पनिक उपभोग घेतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या अंतःकरणामध्ये काम-क्रोध-मद-मोह-मत्सर-स्वार्थ-असूया-द्वेष-कपट असे विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येतात.  त्यामुळे श्रवण करूनही त्याच्या मनावर शास्त्राचा परिणाम होत नाही.  

कामना करून आणि कर्म करून करून त्याची बुद्धि इतकी जड आणि तमोगुणप्रधान झालेली असते की, त्या बुद्धीला दृश्य विषय, भोग याशिवाय दुसरे काहीही दिसत नाही.  रात्रंदिवस कसे मी जास्तीत जास्त भोग आणि विषय मिळवेन, कसे मी उच्छृंखल भोग घेईन, याचेच सतत चिंतन केल्यामुळे त्याची बुद्धि अत्यंत जड, मंद झालेली असते.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे दिसते म्हणजेच जे माझ्या पंचज्ञानेंद्रियांच्या कक्षेत आहे, तेवढेच सत्य असे झाल्यामुळे ती बुद्धि अत्यंत स्थूल, प्राकृत आणि वैषयिक असते.  

म्हणून आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीला एक ठराविक आकलन शक्ति आहे.  प्रत्येकाची ग्रहणशक्ति कमीजास्त फरकाने आहे.  एखाद्याला पटकन समजते आणि एखाद्याला दहादहा वेळेला सांगूनही साध्या गोष्टीही समजू शकत नाहीत.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे या बुद्धीला आज जड विषयांचे ज्ञान घेण्याची आणि निकृष्ट विषय भोगण्याचीच सवय लागलेली आहे.  

कामना करणे, विषय प्राप्त करणे, विषयांचा संग्रह करणे आणि इंद्रियांच्या साहाय्याने स्वैर उपभोग घेणे याव्यतिरिक्त आपण आपल्या जीवनात काहीही केलेले नाही.  आयुष्याच्या संध्याकाळी तर विषयांचा विचार करून करून बुद्धि इतकी थकते की, त्या बुद्धीला साध्या साध्या गोष्टीही जमत नाहीत.  बुद्धीला आयुष्यभर ताणच न दिल्यामुळे बुद्धीवर गंज चढतो.  बुद्धीने सारासार विचार केला नाही तर बुद्धीवर तमोगुणाचे आवरण येते.  म्हणून रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव कमी करून मन सत्वगुणप्रधान करण्यासाठीच निष्काम कर्मयोग हे साधन आहे.  
  
    
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


                                                                      - हरी ॐ                 

Tuesday, January 9, 2018

ज्ञान व अज्ञान कुठे असते? | Where Knowledge and Ignorance Lies?



आत्मज्ञान प्राप्त होते याचा अर्थ असा नाही की, आत्म्याला ज्ञान प्राप्त होते.  आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये प्रत्यक्षात ज्ञान नाही किंवा अज्ञानही नाही.  ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धिनिष्ठ आहे.  त्या बुद्धीच्या अवस्था आहेत.  म्हणूनच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, असे म्हटले जाते.  आत्मा अज्ञानाच्या विरोधी नाही.  जर आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे असे म्हटले तर आत्मा नित्य असल्यामुळे अज्ञानाचे अस्तित्वच राहाणार नाही आणि त्यामुळे अज्ञानाचा अभाव झाल्यामुळे जीवाला संसारच येणार नाही.  

प्रत्येक जीव जन्मतःच मुक्त होईल.  शास्त्राची, गुरूंची आणि अध्ययनाची गरजच भासणार नाही.  इतकेच नव्हे तर परमपुरुषार्थ सुद्धा नाही, कारण जीव हा जन्मतःच मुक्त होईल.  परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र प्रत्येक जीव आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी असून संसारी आहे.  याचाच अर्थ आत्मा ज्ञानस्वरूप असूनही जीवाला मात्र अज्ञानाची अनुभूति आहे.  म्हणून हे अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे, हे सिद्ध होते.  तसेच श्रवण, मनन, निदिध्यासनेच्या अभ्यासाने अंतःकरणामध्ये आत्माकार वृत्ति उदयाला येऊन ती वृत्ति अज्ञानविरोधी असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस होऊ शकतो.  

समजा, घट समोर असूनही जर दिसत नसेल तर दोष घटामध्ये नाही दृष्टीमध्ये आहे.  मोतीबिंदु काढून टाकल्यानंतर घटाची साक्षात प्रचीति येते.  येथे आवृत्ति आणि अनावृत्ति घटामध्ये नसून डोळ्यामध्ये आहे.  त्याचप्रमाणे आत्मा स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशक असल्यामुळे आत्म्याला ज्ञानाची जरुरी नाही.  तर अज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे बुद्धीला आत्मज्ञानाची जरुरी आहे.  

तसेच जर आत्मा अज्ञानी आहे असे मानले तर “मी आहे” हे ज्ञान होणार नाही, कारण अज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये ज्ञानाची शक्यता नाही.  तसेच अज्ञानाला अज्ञानाची जाणीव किंवा ज्ञान सुद्धा शक्य नाही.  याउलट आत्म्याला अज्ञानाची जाणीव आहे.  यावरून सिद्ध होते की, आत्मा अज्ञानी नसून स्वयंसिद्ध ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान व अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, September 29, 2015

अविनय | Impoliteness



मनुष्य विश्वामध्ये व्यवहार करीत असताना अन्य व्यक्ति, विषय, सृष्टि यांच्याशी तर उद्धटपणे वागतोच.  परंतु मनुष्याचा सर्वात जास्त अविनय हा स्वतःशीच आहे.  मनुष्य सर्वात जास्त उद्धट स्वतःबरोबर आहे.

मनुष्य बुद्धि, मन, इंद्रिये व वाणी या चार स्तरांच्यावर जीवन जगत असतो.  प्रत्येक मनुष्याला स्वभावतःच सद्सद्विवेकबुद्धि प्राप्त झालेली आहे.  योग्य-अयोग्य, चांगले-वाईट, धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, नीति-अनीति यांचा निर्णय घेण्याची क्षमता बुद्धीमध्ये असते.  आपण बुद्धीच्या साहाय्याने निर्णय घेतो.  मात्र तोच निर्णय जेव्हा मनाच्या स्तरावर येतो, तेव्हा आपणच त्या निर्णयावर संकल्प-विकल्प करतो.  उदा. आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुद्धीने रोज सकाळी लवकर उठण्याचा निर्णय घेतो.  मात्र आपलेच मन त्यावर दुसऱ्या क्षणी विकल्प करते.  खरोखरच आपल्याला जमेल का ?  त्यापेक्षा ठरवायलाच नको.  याप्रमाणे आपले मन आपल्या बुद्धीच्या निर्णयाची सर्व शक्ति काढून घेते.  माझेच मन माझ्याच बुद्धीला आदर देत नाही.  हाच मोठा अविनय आहे.  मन माझ्या बुद्धीशी उद्धटपणे वागते.

कळतं पण वळत नाही. माझ्या बुद्धीचा निर्णय माझंच मन ऐकत नाही.  माझे मन माझ्याच आज्ञा उल्लंघून टाकते.  हा माझ्यामधील फार मोठा स्वतःशीच असलेला अविनय व उद्धटपणा आहे.  माझ्यामधील हा अभिमान माझ्या बुद्धीला झुगारून देतो.  सर्व तत्त्वज्ञान बाजूला ठेवतो.  मन मानेल तसे वागतो.

मनुष्याच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या अनंत कामना, विषयभोगवासना, कनक-कांचन-कामिनी यांचा लोभ आणि या सर्वांच्या मागे असणारा अभिमान मनुष्याला धर्मापासून च्युत करतो.  मनुष्याला एका तत्त्वनिष्ठ चांगल्या जीवनापासून दूर घेऊन जातो.  म्हणूनच आचार्य प्रार्थना करतात – अविनयं अपनय विष्णो |  हे सर्वव्यापक असणाऱ्या विष्णो !  माझ्यामधील अभिमान दूर कर.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013


- हरी ॐ

Wednesday, July 29, 2015

शरणागती | Submission


‘शरणागति’ यामध्ये शरण व आगति हे दोन शब्द आहेत.  ‘शरणागति’ म्हणजेच शरण येणे होय.  आगति यामध्येही गति म्हणजेच गमन म्हणजेच जाणणे असा शब्द आहे.  जाणणे हा बुद्धीचा धर्म आहे.  म्हणून शरण येणे, हा सुद्धा शरीराचा धर्म नसून बुद्धीचा धर्म आहे, हे सिद्ध होते.

‘शरणागति’ हे बुद्धीचे लक्षण आहे. केवळ मनाने उचंबळून येणारी भावना म्हणेज शरण जाणे नव्हे.  आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपल्या भावना उचंबळून आल्या की, आपण उतावीळ होऊन कुठेतरी डोके टेकवितो किंवा अनेक लोक एखाद्या ठिकाणी डोके टेकवितात, म्हणून मीही टेकवितो.  क्षणभर बरे वाटते. परंतु नंतर ती श्रद्धा राहत नाही.  याला ‘शरणागति’ म्हणत नाहीत.  किंवा डोळ्यामधून पाणी येणे, सारखेच रडणे ही सुद्धा शरणागति नाही, कारण ‘शरणागति’ हे बहिरंगाचे, शरीराचे लक्षण नाही.  तर – गत्यर्थः बुद्ध्यर्थः इति |

शरण जाणे हा बुद्धीचा भाव आहे. माझी बुद्धि शरण गेली पाहिजे.  मग बुद्धि केव्हा शरण जाईल ?  जेव्हा मनुष्याच्या बुद्धीला स्वतःच्या मर्यादा समजतात, आपल्यावर तसेच या संपूर्ण विश्वावर नियमन करणारी एक अज्ञात शक्ति आहे, याची बुद्धीला तीव्रतेने जाणीव होते, तेव्हाच बुद्धि शरण येते.  मनुष्यामधील मी करतो हा कर्तृत्वभाव कमी होतो.  जीवनामध्ये काही प्रसंग असे येतात की, मनुष्य आपोआपच परमेश्वराच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो.  शरणागतीची व्याख्या केली जाते –
त्वमेव उपायभूतो मे भवेति प्रार्थनामतिः |  शरणागतिरित्युक्ता सा देवेस्मिन् प्रयुज्यताम् ||

परमेश्वरा ! तूच माझ्यासाठी उपाय व्हावेस, तूच साधन व्हावेस ही प्रार्थनाबुद्धि म्हणजेच ‘शरणागति’ होय.  म्हणजेच ज्यावेळी मनुष्याचे सर्व बाह्य उपाय संपतात, बाह्य साधने संपतात, त्यावेळी त्याला ईश्वर हाच एकमेव आशेचा किरण दिसतो.  ईश्वर हेच जीवन, ईश्वर हेच साध्य, ईश्वर हीच साधना, ईश्वर हीच निष्ठा, श्रद्धा, सेवा असा भाव निर्माण होतो, तेव्हाच त्याला ‘शरणागति’ असे म्हणतात.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013




- हरी ॐ