Tuesday, June 28, 2016

ज्ञानशक्ति | Power of Knowledge

ज्ञानशक्ति ही मनुष्यामध्ये असणारी सर्वश्रेष्ठ शक्ति आहे.  या शक्तीमुळेच आपल्याला विश्वामधील प्रत्येक वस्तुबद्दल, विषयाबद्दल कुतूहल आहे, जिज्ञासा आहे.  ही जिज्ञासावृत्ति प्रत्येकामध्ये जन्मतःच आहे.  लहान बालकाला कदाचित बोलता येत नसेल, शब्दांकित करता येत नसेल, परंतु जितकी जिज्ञासा मोठ्या माणसामध्ये आहे तितकीच लहान मुलामध्ये सुद्धा आहे.  म्हणून तरी लहान मुले बोलायला लागली की, घरातील सर्वांना अनेक प्रश्न विचारून त्रस्त करतात.

एक प्रयोग केल्यावर लहान मुलामधील जिज्ञासा समजते.  एखाद्या अत्यंत लहान बालकास खेळायला चार खेळणी समोर ठेवली की, त्याबरोबर ते मूल खेळते.  दुसऱ्या दिवशी पुन्हा कालची सर्व खेळणी व त्यामध्येच त्या बालकाच्या नकळत एक नवीन खेळणे टाकून निरीक्षण केले तर दिसते की, ते लहान मूल कालची सर्व खेळणी बाजूला ठेवून नवीन खेळणे लगेचच उचलते.

यावरून सिद्ध होते की, प्रत्येकाच्या मनामध्ये जन्मतःच जिज्ञासा म्हणजे ज्ञान घेण्याची प्रवृत्ति आहे.  आज विज्ञानामध्ये झालेली प्रचंड मोठी प्रगति, उत्क्रांति, नवनवीन शोध हा सर्व मनुष्यामध्ये असलेल्या ज्ञानशक्तीचाच आविष्कार आहे.

याप्रमाणे इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति या तीन दुर्मिळ शक्ति प्राप्त झाल्यामुळेच मनुष्यशरीर हे सर्व योनींच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ व दुर्लभ शरीर आहे.

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011

- हरी ॐ

Wednesday, June 22, 2016

क्रियाशक्ति | Power of Action

प्रत्येक मनुष्यामध्ये जन्मतःच इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति या तीन अत्यंत दुर्मिळ शक्ति अंतर्भूत आहेत.  या तीन शक्तींच्यामुळेच मनुष्यप्राणी हा सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानला जातो.  या तीन विशेष शक्तींच्या साहाय्यानेच मनुष्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास करून भौतिक जीवन अधिकाधिक समृद्ध केलेले आहे.

अंतःकरणामधील इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रियाशक्ति हे साधन आहे.  केवळ मनामध्ये इच्छा, महत्त्वाकांक्षा करून किंवा स्वप्ने रंगवून इच्छापूर्ति होत नाही.  तर त्यासाठी कर्म करावे लागते.  कर्म करण्याची शक्ति म्हणजेच क्रियाशक्ति होय.

प्रत्येक मनुष्यामध्ये क्रियाशक्ति आहे.  फक्त मनुष्य आपल्याच आत असणाऱ्या या क्रियाशक्तीचा शोध घेत नाही.  तसेच, पुष्कळ वेळेला या शक्तीचा दुरुपयोग करतो.  प्रत्येकाने ठरविले, संकल्प केला तर प्रत्येक मनुष्य खूप मोठे कार्य करू शकतो.  आपल्याला अशक्य असे या विश्वात काहीही नाही.  या क्रियाशक्तीचाच अत्यंत विधायकपणे उपयोग करून आजपर्यंत सर्व श्रेष्ठ पुरुषांनी, संतांनी, वीर योद्ध्यांनी, स्वातंत्र्यवीरांनी विश्वामध्ये प्रचंड मोठे कार्य केलेले आहे.

परंतु सुसंस्कारांच्या अभावी जर त्याच क्रियाशक्तीचा विघातक मार्गाने विनियोग केला, तर ती क्रियाशक्ति पाशवी – विध्वंसक बनून मनुष्याचा, समाजाचा, राष्ट्राचा, अखिल मानवजातीचाही नाश करू शकते.  हा सर्व क्रियाशक्तीचा आविष्कार आहे.

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011

- हरी ॐ

Monday, June 13, 2016

इच्छाशक्ति | Power of Desire

प्रत्येक मनुष्यामध्ये जन्मतःच इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति या तीन अत्यंत दुर्मिळ शक्ति अंतर्भूत आहेत.  या तीन शक्तींच्यामुळेच मनुष्यप्राणी हा सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानला जातो.  या तीन विशेष शक्तींच्या साहाय्यानेच मनुष्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास करून भौतिक जीवन अधिकाधिक समृद्ध केलेले आहे.

इच्छाशक्ति म्हणजेच इच्छा निर्माण करण्याची शक्ति होय.  या शक्तीमुळेच प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये क्षणाक्षणाला अनंत इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, कामना निर्माण होत असतात.  एका इच्छेमधून दुसरी इच्छा, दुसऱ्या इच्छेमधून तिसरी इच्छा, याप्रमाणे सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत, इतकेच नव्हे तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मनुष्य अनेक इच्छा निर्माण करतो.
मनुष्य हा प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या प्रयत्नाने काही इच्छा पूर्ण होतात.  परंतु पुष्कळ इच्छा अपूर्णच राहतात.  इच्छा पूर्ण करता-करता मनुष्याचे आयुष्य संपते, पण इच्छा मात्र संपत नाहीत.

इच्छा निर्माण करून, त्या त्या इच्छा पूर्ण करून, विषयांचे येथेच्छ उपभोग घेऊन मनुष्य जीवनाचा काळ व्यतीत करतो.  काळाच्या ओघात त्याचे संपूर्ण शरीर गलितगात्र होते, सर्व अवयव शिथिल होतात, डोक्यावरील केस निघून जातात, दात पडून जातात, वृद्धावस्था येऊन हातात काठी येते.  अशी जराजर्जर अवस्था होऊनही मनुष्याच्या मनामधील कामवासना शांत होत नाही.

ज्याप्रमाणे एखाद्या प्रज्वलित अग्नीमध्ये आपण जितके इंधन घालत राहू, तितका तो अग्नि शांत न होता उलट अधिक भडकतच राहतो.  त्याचप्रमाणे सर्वांच्या अन्तःकरणामध्ये जन्मतःच कामाग्नि प्रज्वलित झालेला असतो.  कितीही याद्या पूर्ण केल्या तरी विषयवासना काही संपत नाहीत.  हा सर्व इच्छाशक्तीचा आविष्कार आहे.

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011

- हरी ॐ

Tuesday, June 7, 2016

द्रौपदीच्या हाकेचा विलंब | Delay in Draupadi’s Call

महाभारतामधील द्रौपदीवस्त्रहरणाचा प्रसंग आपणा सर्वांना माहीत आहे.  तो प्रसंग घडून गेल्यानंतर द्रौपदी व भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद आहे.  द्रौपदी भगवंताला प्रश्न विचारते की, भगवंता !  तू माझा पाठीराखा असताना माझ्यावर इतका अपमानास्पद प्रसंग खरे तर येताच कामा नये.  तू स्वतःला भक्तरक्षक म्हणवितोस. परंतु तू त्यादिवशी राजसभेमध्ये येण्यास खूप उशीर लावलास.

यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात की, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.  परंतु तू ती घटना नीट आठव.  भर सभेमध्ये तुझी विटंबना होत होती, दुर्योधन अत्यंत घृणास्पद शब्दांनी तुझी अवहेलना करीत होता.  दुःशासनाने ज्यावेळी तुझ्या वस्त्रास हात लावला, त्यावेळी तू लज्जारक्षणार्थ त्या सभेमधील राजा धृतराष्ट्र, गुरु द्रोणाचार्य, कुलगुरू कृपाचार्य, पितामह भीष्माचार्य या सर्वांना प्रार्थना केलीस.  त्यानंतर तू तुझ्या पराक्रमी पाच पतींच्याकडे धाव घेतलीस. परंतु तुझी निराशा झाली.

नंतर तू स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केलास.  परंतु ते तुला शक्य झाले नाही.  तू असह्य अगतिक झालीस.  त्याचवेळी तुला माझे तीव्रतेने स्मरण झाले.  एका ईश्वराशिवाय आता माझे कोणीही रक्षण करू शकत नाही, याची तुला जाणीव झाली व त्याक्षणी तू मला आर्ततेने ‘गोविंद’ अशी हाक मारलीस.  मी तुझ्या रक्षणाला हजर झालो.  म्हणून हे द्रौपदी, मी उशीर लावला नसून तूच मला हाक मारण्यास विलंब केलास !

ज्यावेळी साधकाच्या जीवनामध्ये ईश्वराव्यतिरिक्त अन्य सर्व आश्रयांचा त्याग होतो, त्यावेळी तिला अनन्य, अव्यभिचारिणी भक्ति असे म्हणतात.