Tuesday, June 27, 2023

विचारमार्ग आणि समन्वय | Path Of Thinking And Reconciliation

 विचाराने या दुःखांचा परिहार होऊ शकतो. विचाराने दुःखांचा प्रभाव कमी करता येतो.  जे घडणार ते कधीही टाळता येत नाही, या विचाराने प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची तयारी होते.  मग ती गोष्ट मान्य करणे खूप सोपे जाते.  त्या दुःखाचा मनावर तितकासा परिणाम होत नाही.  म्हणूनच वसिष्ठ मुनि येथे म्हणतात की, विचाराने सकल दुःखांचा क्षय अवश्य होतो.  त्यामुळे विचारदृष्टींचा कधीही अवमान करू नये.  साधकाने विचारमार्गाची म्हणजे ज्ञानमार्गाची अवहेलना करू नये.

 

सामान्यतेने सर्व साधक अध्यात्ममार्गामध्ये स्वतःच कल्पना करून साधनांच्यामध्ये भेद करतात.  भक्तिमार्ग वेगळा, ज्ञानमार्ग वेगळा, कर्म, योग, ध्यान या सर्व मार्गांना भिन्न स्वरूपाने पाहतात.  स्वतःला ज्ञानमार्गी समजणारे लोक भक्तीला कमी लेखतात.  याउलट स्वतःला भक्तिमार्गी समजणारे लोक ज्ञान, कर्म, योग, ध्यान या सगळ्यालाच कमी लेखतात.  स्वतःला योगमार्गी समजणारे लोक योगाव्यतिरिक्त सगळी साधने निष्फळ समजतात.  याप्रमाणे प्रत्येकजण माझाच मार्ग खरा, असे गृहीत धरून संकुचित वृत्तीने साधना करतात.

 

परंतु वस्तुतः हे सर्व मार्ग साहाय्यकारी व परस्परपूरक आहेत.  ज्या साधकाचे जसे मन असेल, जसा स्वभाव प्रकृति असेल, त्या त्या प्रमाणे तो साधक योग्य त्या मार्गामध्ये प्रवृत्त होऊ शकतो.  मात्र तरीही आपण मार्ग भिन्न करू शकत नाही.  कारण ज्ञानामध्येही भाव, भक्ति पाहिजे.  ज्ञानमार्गी साधकालाही कर्म करावे लागते.  भक्तिमार्गी साधकालाही प्रथम आपल्या आराध्याचे ज्ञान व्हावे लागते.  भक्तिशिवाय ज्ञानाला अर्थ नाही आणि ज्ञानाच्या दृष्टिशिवाय केवळ भावालाही अर्थ नाही.

 

याचा सारांश पाहिला की एवढे मात्र निश्चित होते की, ज्ञान-भक्ति-कर्म-ध्यान-योग असो, कोणताही मार्ग असेल तरी त्यामध्ये विचार म्हणजे विवेक हा आवश्यक आहेच.  त्यामुळे कोणत्याही मार्गाची कोणीही अवहेलना करू नये. तसेच विचारमार्गाची तर करूच नये.  कारण विवेकाशिवाय ज्ञान मिळत नाही. विवेकाशिवाय कोणाची भक्ति करायची हे समजत नाही.  विवेकाशिवाय कोणते कर्म करावे, हेही समजत नाही.  विवेकाने मन नियंत्रित केल्याशिवाय योगसाधनाही करता येत नाही.  म्हणून वसिष्ठमुनि येथे पुन्हा एकदा सिद्ध करतात की, विचारमार्ग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ
Tuesday, June 20, 2023

वाणीचे सामर्थ्य, दुरुपयोग | The Power, Misuse of Speech

 हा साधनमार्ग अत्यंत खडतर आहे.  कुठे पाय घसरेल, ते सांगता येत नाही, कारण वाट निसरडी आहे.  जसे, हिमालयामध्ये रस्ता अत्यंत अरुंद आहे, अनेक धोके आहेत.  अत्यंत दक्षतेने, सावधानतेने मार्गक्रमण करावे लागते.  तसेच, आध्यात्मिक जीवन ही सुद्धा एक महान यात्रा आहे.  धोके टाळण्यासाठी वाचेवर नियमन करावे, कारण विश्वामधील जवळजवळ सर्व समस्या या वाणीमधून, शब्दांच्यामधून निर्माण होतात.  शब्दाने हजारो, लाखो माणसे जोडली जातात आणि त्या शब्दांनी आपलीच माणसे दुरावली जातात.  शब्दांचा परिणाम हा एकदम हृदयावर होत असतो.  म्हणून बोलत असताना सतत विचार करून बोलावे.

 

परमपूज्य स्वामीजी नेहमी सांगतात – What I mean that alone I talk and what I talk that alone I mean.”  अशी विचारांची स्पष्टता (clear thinking) जर असेल, तर sorry म्हणावे लागत नाही.  व्यवहारामध्ये रोज आपण दर दोन मिनिटांनी sorry म्हणतो.  “नाही, मी असे म्हटलो, परंतु बोलण्यामागे माझा असा वाईट भाव नव्हता”  हे म्हणणे अत्यंत चूक आहे.

 

म्हणून वाणीवर संयमन करणे ही प्रचंड मोठी साधना आहे.  आपण काय बोलतो ?  कोणाला बोलतो ?  कोठे बोलतो ?  याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे.  शब्दाला शब्द, शब्दाला शब्द, शब्दाला शब्द बाहेर पडतात.  एकदा शब्द मुखामधून बाहेर पडले की, त्याचा अन्य व्यक्तीच्या मनावर परिणाम होतोच.  तसेच, जितके मी अधिक बोलतो, त्याप्रमाणात माझी शक्ति क्षीण होते.  मी अस्वस्थ, उद्विग्न, विक्षिप्त होतो.  मनुष्याची जीवनभर अर्धी शक्ति आणि अर्धे आयुष्य बोलण्यामध्येच व्यर्थ जाते.  आपण जे बोलतो, त्यापैकी पुष्कळसा भाग अनावश्यक, विनाकारण असतो.  याचा गांभीर्याने विचार करावा.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ
Tuesday, June 13, 2023

ज्ञानाचे प्रयोजन आणि उपशमा | Purpose And Culmination Of Knowledge

 अध्यात्मशास्त्राचे श्रवण करताना जो जो उपदेश आरंभ केला जातो, तसेच प्रमाण-प्रमेय विषयक ज्या-ज्या सर्व दृष्टि आहेत, हे सर्व ज्ञान साधकाला आत्मतत्त्वाचा अनुभव येईपर्यंतच उपयोगी असते.  त्यानंतर हा सर्व उपदेश, या सर्व शास्त्रदृष्टि, हे ज्ञान या सर्वांची उपशमा होते.  कारण आत्मानुभूतीनंतर उपदेशाचे प्रयोजन सुद्धा संपते.

 

श्रीवसिष्ठ मुनि येथे श्रीरामांना उपदेश देण्यापूर्वीच त्या ज्ञानाचे स्वरूप व प्रयोजन सांगतात.  शास्त्र ऐकताना साधकाला शास्त्राची दृष्टि समजणे अत्यंत आवश्यक आहे.  शास्त्राचे शाब्दिक ज्ञान समजणे सोपे आहे.  संस्कृत येत असेल तर शब्दार्थ, अन्वयार्थ लावून आपल्याला थोडेफार समजू लागते.  "यत् दृष्टं तत् नष्टम् |"  असे युक्तिवादही बुद्धीला समजू लागतात.  परंतु श्रुति आणि युक्ति समजल्यानंतर अनुभव येणे महत्त्वाचे आहे.  अनुभव नसेल तर त्या शाब्दिक पांडित्यामध्ये काहीही अर्थ नाही.  म्हणून शास्त्रामध्ये श्रवण, मनन, निदिध्यासना अशा तीन साधना सांगितल्या जातात.

 

श्रवणामधून शास्त्राचे शाब्दिक ज्ञान होते.  मननामधून त्या ज्ञानाविषयीच्या शंका नष्ट होतात आणि निदिध्यासनेने ते ज्ञान दृढ होऊन त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होऊन साधकाला ज्यावेळेस 'मी' स्वतःच आनंदस्वरूप आहे, अशी अनुभूति येते, त्यावेळी मग शाब्दिक ज्ञानाचेही प्रयोजन संपते.  शास्त्राचे सर्व आरंभ, शास्त्रबुद्धि या सर्वांची उपशमा होते.  कारण 'मी' स्वतःच सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म आहे, ही अनुभूति आली की, शास्त्राचे प्रयोजनच संपते.

 

आदि शंकराचार्य म्हणतात (आत्मबोध) –

अज्ञानकलुषं जीवं ज्ञानाभ्यासात् विनिर्मलं |  कृत्वा ज्ञानं स्वयं नश्येत् जलं कतकरेणुवत् ||  आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे अहंकारादि प्रत्ययांनी कलुषित झालेला जीव ज्ञानाभ्यासामुळे अज्ञानाचा नाश होऊन अत्यंत शुद्ध, विकाररहित होतो.  त्यामुळे जसे कतकरेणु प्रथम सर्व पाणी शुद्ध करून नंतर स्वतः सुद्धा नाश पावतो, त्याचप्रमाणे ज्ञानाने जीवाच्या अज्ञानउपाधीचा नाश होऊन जीव स्वतःच परब्रह्मस्वरूप होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ
Tuesday, June 6, 2023

अंतरस्थित परंतु अलिप्त | Contained But Untouched

 नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त, प्रत्यगात्मस्वरूप आत्म्याने आकाशापासून पृथ्वीपर्यंत पंचमहाभूत आणि त्यांच्या कार्यासहित पंचभौतिक विषय व सर्व प्रकारची शरीरे निर्माण करून स्वतःच्या सत्तेने आणि चैतन्यस्वरूपाने सत्ता देतो.  त्यांना चेतना देतो.  त्यामुळे सर्व शरीर चेतनयुक्त होऊन जिवंत आहे असे भासतात.  त्या आरोपित झालेल्या सर्व जीवांना परमात्मा धारण करून पोषण करतो.  भगवंतांची मायाशक्ति सर्वांच्या बुद्धीवर आवरण घालून मोह निर्माण करते.  बुद्धि भ्रष्ट करते.  मनुष्याला विवेकशून्य करते.  यामधूनच संसाराचे चक्र सुरु होते.

 

अहंकार स्वतःच्याच कर्माने अनेक प्रकारच्या विषयवासना संग्रहीत करून वासनांचा गुलाम होतो.  तो अगतिक होतो.  आणि याच वासना पुनरपि जननं पुनरपि मरणं |  याप्रमाणे जन्ममृत्यूरूपी संसाराला कारण होतात.  जीव कर्म-कर्मफळाच्या चक्रामध्ये संपूर्ण अडकले.  हेच संसाराचे वर्धन आणि पोषण होय.  परंतु मनुष्य मात्र आपल्या सर्व दोषांचे खापर परमेश्वरावर फोडून म्हणतो की तूच कर्ता आहेस.  तूच मला बुद्धि दिलीस वगैरे वगैरे.  असे झाले तर सर्व दोष भगवंतावर येतील.  तो दोषी ठरेल.  म्हणून याचे खंडन करण्यासाठी भगवान स्वतःच म्हणतात – नतु भूतस्थः इत्युच्यते |  भूतमात्रांना मर्यादा आहेत.  त्यांच्यामध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व असून सुख-दुःखांचा संसार आहे.  परंतु ‘मी’ ला मात्र कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.  कर्तृत्व-भोक्तृत्व, सुख-दुःख सुद्धा स्पर्श करू शकत नाही.  त्यामुळे ‘मी’ कर्म-कर्मफलांनी कधीही बद्ध होत नाही.

 

ज्याप्रमाणे आकाश घटामध्ये राहूनही घटाशी कधीही तादात्म्य पावत नाही.  त्यामुळेच ते घटाच्या गुणधर्म, विकारांनी लिप्त होत नाही.  स्पर्शित होत नाही.  इतकेच नव्हे तर परिणामी सुद्धा होत नाही.  त्याचप्रमाणे मी सर्व भूतमात्रांच्यामध्ये राहूनही सोपाधिक गुणधर्मविकारांनी स्पर्शित, परिणामी होत नाही.  ‘मी’ कर्ता भोक्ता, सुखी-दुःखी होत नाही, कारण सर्व भूतमात्र कल्पित आहेत.  कल्पित वस्तूच्या गुणधर्मांनी अधिष्ठान कधीही लिप्त होत नाही.  म्हणून मी नित्य, असंग, कूटस्थ आणि साक्षीचैतन्यस्वरूप आहे.  थोडक्यात मी त्यांच्यामध्ये असूनही अलिप्त आहे.  मी नित्य, निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ