Wednesday, May 29, 2019

अनात्म्याचे तादात्म्य | Mis-Identification with the Non-Conscious
वस्तुतः जन्म व मृत्यु शरीराला आहेत.  परंतु शरीर जन्माला आले की, मी जन्माला आलो, ही पहिली कल्पना करतो.  ‘मी’ जन्माला आलो असेन तर ‘मी’ मारणार, ही दुसरी कल्पना निर्माण करतो.  तसेच, शरीर भिन्न-भिन्न अवस्थेमधून जात असताना ‘मी’ बालक, ‘मी’ तरुण, ‘मी’ उंच, ‘मी’ कृश, ‘मी’ लठ्ठ, अशा कल्पना करतो.  शरीराला रोग झाला की, ‘मी’ रोगी किंवा ‘मी’ निरोगी असे म्हणतो.  इंद्रियांच्या अनुषंगाने ‘मी’ अपंग, ‘मी’ बहिरा, ‘मी’ अंध वगैरे म्हणवून घेतो.  प्राणाशी तादात्म्य पावून ‘मी’ क्षुधातृषार्त होतो.  

मनाशी तादात्म्य पावून जसे मन तसा ‘मी’ बनतो.  मनाचे तर अनंत विकार आहेत.  क्षणाक्षणाला मन बदलते.  काही वेळेस चांगल्या वृत्ति व पुष्कळ वेळेस वाईट वृत्ति, उर्मी, कामक्रोधादि विकार निर्माण होतात.  मन प्रसन्न असेल तर ‘मी’ प्रसन्न होतो व मन निराश, भकास झाले की, ‘मी’ सुद्धा निराश व उद्विग्न होतो.  याप्रमाणे आज आपले जीवन पूर्णतः मनाशी तादात्म्य पावल्यामुळे मनावर अवलंबून आहे.  मन मला नाचविते.  मनामध्येच घोर संसाराचा अनुभव येतो.  

यानंतर बुद्धीशी तादात्म्य पावून ‘मी’ स्वतःला ज्ञानी किंवा अज्ञानी समजतो.  चित्ताशी तादात्म्य पावल्यामुळे मला स्मृति किंवा विस्मृति यांची जाणीव होते.  अहंकाराशी तादात्म्य पावल्यामुळे आपल्यामध्ये गर्व, मानित्व किंवा अभिमानाची वृत्ति निर्माण होते.  ‘मी’ स्वतःभोवती खोट्या प्रतिष्ठेच्या अनेक कल्पना निर्माण करतो.  याप्रमाणे मी – अनात्मनि आत्मभाव निर्माण करतो.  अनात्मस्वरूप असणाऱ्या कार्यरूप, दृश्य, जड, अचेतन, अनित्य, क्षणभंगुर देहादि संघाताशी तादात्म्य पावून घोर शोकमोहरूपी संसारामध्ये बद्ध होतो.  जन्ममृत्युरूपी चक्रामध्ये अडकतो.  
- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013 


- हरी ॐ


Tuesday, May 21, 2019

संघात, शरीर आणि मी | Assemblage, Body and Self
संघात म्हणजे अनेक घटकांनी, अवयवांनी बनलेला समूह होय.  जसे घर हा एक संघात, समूह आहे.  जेव्हा घराची दारे, खिडक्या, जमीन, छप्पर, चार भिंती इत्यादी सर्व अवयव विशिष्ट, नियमित पद्धतीने, नियमाने एकत्र येऊन एकमेकांशी संबंधित होतात, तेव्हा त्यास ‘घर’ असे म्हणतात.  

घर या संघाताचे निरीक्षण केले तर प्रामुख्याने काही गोष्टी लक्षात येतात –
१. घर हा संघात पूर्णतः जड व अचेतन असतो.
२. घर हे स्वतःसाठी नसून घरापासून भिन्न असणाऱ्या सचेतन पुरुषासाठी असते.  त्याला गृहस्थ असे म्हणतात.
३. गृहस्थ पुरुष घराचा एक अवयव नसून घरापासून भिन्न, विलक्षण स्वरूपाचा असतो.
४. तो पुरुष संघाताच्या गुणधर्मांनी कधीही लिप्त, स्पर्शित व परिणामी होत नाही.
५. तो पुरुष संघातावर अवलंबून नसतो तर उलट संघात त्या पुरुषावर अवलंबून असतो.
६. घरापासून गृहस्थ पुरुष भिन्न असल्यामुळेच तो घरामध्ये प्रवेश करू शकतो.  तसेच घर बांधले, घर पडले, घर जीर्ण झाले तरी त्या पुरुषावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

याचप्रमाणे ‘शरीर’ हा सुद्धा एक संघात असून तो श्रोत्र, चक्षु वगैरे अनेक इंद्रियांनी, अवयवांनी बनलेला आहे.  म्हणून शरीर-इंद्रिये-प्राण-मन-बुद्ध्यादि हा कार्यकारणसंघात स्वभावतःच जड, अचेतन, कार्य, निर्मित असून शरीर हे सावयव, सविशेष, विशिष्ट गुणधर्मकर्मांनी युक्त आहे.  तसेच शरीर हे स्वतःसाठी नसून शरीरामध्ये राहणाऱ्या देहधारी पुरुषासाठी आहे.  तो देहस्थ पुरुष शरीराचा किंवा संघाताचा एक अवयव नसून संघातापासून अत्यंत भिन्न व विलक्षण स्वरूपाचा आहे.  तो शरीराच्या गुणधर्मांनी कधीही लिप्त, स्पर्शित व परिणामी होत नाही.  तो शरीरादि संघातावर अवलंबून नसून संघात त्याच्यावर अवलंबून असतो.  - "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013- हरी ॐTuesday, May 14, 2019

ज्ञान होण्याची प्रक्रिया | Process of Obtaining Knowledge
जेव्हा ‘घट’ हा एखादा विषय इंद्रियांच्या कक्षेमध्ये येऊन इंद्रियगोचर होतो, म्हणजेच जेव्हा घट डोळ्यासमोर येतो, तेव्हा डोळ्यांच्या माध्यमामधून मनाची वृत्ति घटापर्यंत जाते व घटाला अंतर्बाह्य व्याप्त करून घटाकार होते.  त्यावेळी ‘घट’ हा विषय व ‘वृत्ति’ यांचे तादात्म्य होते.  यालाच ‘वृत्तिव्याप्ति’ असे म्हटले जाते.  यानंतर या घटाकार वृत्तीला पाहणारा ‘द्रष्टा’ किंवा जाणणारा जो ज्ञाता आहे, त्या ज्ञात्याकडून जेव्हा घटाकर वृत्ति जाणली जाते, तेव्हाच ज्ञात्याला ‘हा घट आहे’ असे निश्चयात्मक, निर्णयात्मक ज्ञान होते.  यालाच ‘फलव्याप्ति’ असे म्हणतात.

याप्रमाणे कोणत्याही ज्ञानामध्ये द्रष्टा-दृश्य-दर्शन, ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान किंवा प्रमाता-प्रमेय-प्रमाण याप्रमाणे तीन घटक असून त्रिपुटीचा व्यवहार असतो.  यालाच आलोचन-संकल्प-अध्यवसाय असे शब्द वापरले आहेत.  ‘आलोचन’ म्हणजेच मन प्रथम विचार किंवा निरीक्षण करते.  त्यानंतर मनामध्ये ‘संकल्प’ निर्माण होतो.  संकल्पानंतरच अंतःकरणामध्ये निर्णयात्मक वृत्ति निर्माण होते.

याप्रकारे इंद्रिय-मनाच्या सर्व व्यापारामागे असणारा प्रेरक या व्यापाराच्या अनुमानाने जाणला जातो.  याचे कारण इंद्रिये वगैरेदि हा सर्व जड असणारा संघात चेतनशील भासत असेल तर त्याच्यामागे कोणतातरी चेतनशील प्रेरक हा आहेच आणि तो प्रेरक संघातापासून भिन्न असतो.  तोच श्रोत्र वगैरेदि इंद्रियांच्या पाहणे, ऐकणे, बोलणे वगैरे सर्व व्यापारांचा प्रेरक असून तो या सर्वांच्यापासून अत्यंत भिन्न, विलक्षण स्वरूपाचा असतो.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013- हरी ॐTuesday, May 7, 2019

गुरूंची आवश्यकता काय ? | Necessity of Guru
कोणी म्हणेल की, ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गुरुंच्याकडे कशाला जायला पाहिजे ?  आम्ही आमच्या बुद्धीने, तर्काने, युक्तीच्या साहाय्याने हे ज्ञान घेऊ.  परंतु हे ज्ञान तर्काने घेणेही शक्य नाही.  श्रुति म्हणते – “नैषा तर्केण मतिरापनेया” इति श्रुतेश्च |  आत्मज्ञान केवळ तर्काने, स्वबुद्धिसामर्थ्याने प्राप्त होत नाही.  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंची नितांत आवश्यकता आहे.

ज्या साधकाला गुरूंची प्राप्ति झालेली आहे, तोच निश्चितपणे आत्मस्वरूपाला यथार्थपणे जाणतो, कारण आत्मवस्तु ही अतिशय सूक्ष्म असून इंद्रियअगोचर आहे.  तसेच आत्मवस्तु ही विश्वामधील घटपटादि विषयांच्याप्रमाणे एखादी निर्मित दृश्य वस्तु नाही.  म्हणून आत्म्याला डोळ्यांनी पाहता येत नाही.  अन्य इंद्रियांचाही आत्मा हा विषय नाही.  म्हणून आत्म्याला कानाने ऐकता येत नाही.  स्पर्श करता येत नाही.  इतकेच नव्हे, तर मनानेही आत्म्याची अनुभूति येत नाही.  आत्मा स्थूल बुद्धीने जाणता येत नाही, कारण आत्मा हा इंद्रियांचा, मनबुद्धीचा विषय होत नाही.

म्हणूनच आचार्य आदेश देतात -
पण्डितेनापि स्वातन्त्र्येण ब्रह्मन्वेषणं न कुर्यात् |     (शांकरभाष्य)

पंडित, विद्वान पुरुषाने देखील स्वतंत्रपणे, स्वतःच्या बुद्धीने ब्रह्मविचार करू नये.  त्यासाठी श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच अनन्य भावाने शरण जावे.  यासाठीच आत्मजिज्ञासु साधक, मुमुक्षु प्रत्यगात्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचा नि:शेष त्याग करतो.  हा साधक ऐहिक व पारलौकिक भोगांच्या आसक्तीपासून पूर्णतः विरक्त होतो आणि तो फक्त एका अभय, नित्य, शिव, अचल स्वरूपाची इच्छा करून गुरूंना शरण जातो.


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013- हरी ॐ