Showing posts with label Ishavasya. Show all posts
Showing posts with label Ishavasya. Show all posts

Tuesday, July 14, 2026

प्रेम आणि ज्ञानी पुरुष | Love and The Self-Realized

 




अज्ञानी पुरुष कधीतरी प्रेम करतो आणि पुष्कळ वेळेला द्वेष करतो.  कधीतरीच त्याला प्रेमाचा उमाळा येतो परंतु ती प्रेमाची उर्मी काळाच्या ओघात निघूनही जाते.  म्हणजेच जोपर्यंत अहंकाराला पोषक वातावरण असते, तोपर्यंतच प्रेम असते, नंतर तो तिरस्कार करतो.  असे प्रेम तर कोणीही करते.  पशु सुद्धा करतात.  त्यामध्ये काही विशेष पुरुषार्थ नाही.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र नित्य-निरंतर प्रेम करतो.  येथे ‘निरंतर’ हा खूप महत्वाचा शब्द आहे.  अज्ञानी पुरुष द्वेष करणे सोडत नाही आणि ज्ञानी पुरुष प्रेम करणे, क्षमा करणे सोडत नाही.

 

मनुष्य स्वतःवरच जास्त प्रेम करतो.  आत्मस्वरूप हेच प्रेमाचे आश्रयस्थान आहे.  माणसाने दुसऱ्यांवर कितीही प्रेम केले तरी ती प्रेमाची उर्मी येते आणि निघूनही जाते.  प्रेमाची जागा द्वेषबुद्धि घेते.  त्याला ‘प्रेम’ म्हणता येत नाही.  म्हणून मनुष्याचे खरे प्रेम स्वतःवरच आहे.  मी अखंडपणे माझ्यावर सतत प्रेमच करीत असतो.  मी कधीही मला अप्रिय होत नाही.  मी माझ्या स्वतःचा द्वेष करूच शकत नाही.  ज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही.  त्याला समत्वाची, एकत्वाची दृष्टि प्राप्त होते.  जसे तो स्वतःवर प्रेम करतो, तसेच सर्वांच्यावर करू शकतो.

 

श्री रामकृष्ण परमहंस फार सुंदर गोष्ट सांगत – एकदा एक विंचु पाण्यामध्ये पडला.  त्या विंचवाला वाचविण्यासाठी एक साधु त्याला पाण्यातून बाहेर काढत होता, पण विंचु त्याला चावत होता.  असे एकदा नाही तर अनेक वेळेला घडले.  त्यावेळी हे सर्व पाहणारा एक मनुष्य त्या साधूला म्हणाला की, “तो विंचु तुम्हाला चावत आहे तरी तुम्ही त्याला का वाचवत आहात ?”  त्यावर साधु उत्तर देतो, “चावणे हा विंचवाचा धर्म आहे, विंचु त्याचा धर्म सोडत नाही.  दया करणे हा साधूचा धर्म आहे, मग तो मी का बरे सोडू ?”  ही साधूची, ज्ञानी पुरुषाची उदात्त परमोच्च दृष्टि आहे.  त्या दृष्टीमध्ये स्वार्थ नाही, कामना अपेक्षा नाहीत, व्यक्तिगत रागद्वेष नाही, आपपर भाव नाही, अहंकार, ममकार प्रत्यय नाहीत, तर ती शुद्ध, निर्विशेष, आत्मचैतन्यस्वरूपाची अभेद दृष्टि आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ



Tuesday, April 21, 2026

तिरस्कार आणि ज्ञानी पुरुष | Hatred and The Self-Realized

 



जसे भिंतीवर किंवा कॅनव्हासवर हुबेहुब निसर्गाचे चित्र काढले, तर त्या चित्रामध्ये जड असणारा दगड असेल, तेथेच एखादा सचेतन, सजीव उडणारा पक्षी असेल.  ते चित्र पाहत असताना चित्रामधील पक्षी हा सजीव दिसतो आणि दगड हा दगडासारखा निर्जीव दिसतो.  पण वस्तुतः दगड जितका मिथ्या आहे, तितकाच पक्षी सुद्धा मिथ्या आहे.  सर्वच मिथ्या आहे.  नदी, पाणी मिथ्या आहे.  फक्त त्याच्यामागे असणारे अधिष्ठान, भिंत किंवा कॅनव्हासचे कापड, हे अधिष्ठान फक्त एक सत्य आहे.  ही दृष्टि प्राप्त झाली तर तो ज्ञानी पुरुष कोणाचाही तिरस्कार करीत नाही.

 

व्यवहारामध्ये अज्ञानी पुरुष सतत द्वेष किंवा तिरस्कार करतो.  याचे महत्वाचे कारण अज्ञानी पुरुषामध्ये भेद किंवा द्वैत दृष्टि आहे.  द्वेष किंवा तिरस्कार हा एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये किंवा व्यक्तींमध्येच होऊ शकतो.  द्वेष करण्यासाठी माझ्यापासून भिन्न कोणीतरी हवे.  परंतु ज्ञानी पुरुष स्वतःव्यतिरिक्त म्हणजेच आत्मस्वरूपाव्यतिरिक्त भिन्न काहीही पाहत नाही.  त्यामुळे तो कोणाचा द्वेष करणार ?  द्वेष करण्यासाठी त्याला दुसरा विषय किंवा व्यक्ति उपलब्धच होत नाही.  अन्यवस्त्वन्तरअभावात् |

 

जो खरा ज्ञानी आहे, ज्याला खऱ्या अर्थाने ज्ञानदृष्टि प्राप्त झालेली आहे, तो कोणाचाही तिरस्कार करीत नाही.  मग यामधून श्रुतीला काय बरे अभिप्रेत आहे ?  तिरस्कार न करणे म्हणजेच सर्वांच्यावर प्रेम करणे होय.  ज्ञानी पुरुष सर्वांच्यावर प्रेम करतो.  तो कोणालाही तुच्छ लेखत नाही.  नम्रता, विनयशीलता हेच ज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे.  जर उन्मत्तपणा, अविनय असेल तर त्याला ‘ज्ञानी’ म्हणताच येणार नाही.  जो ज्ञानाने परिपक्व, प्रगल्भ झाला आहे, तो कधीही दुसऱ्याचा तिरस्कार करीत नाही.  दुसऱ्याची निंदा, नालस्ती, अपमान करीत नाही.  तो ज्ञानाने आपोआपच नतमस्तक, नम्र नम्र होत जातो.

 

खरे ज्ञान साधकाला नतमस्तक व्हायला लावते.  वृक्षाला फळे आल्यानंतर वृक्ष खाली वाकतात.  पाणी भरलेले मेघ खाली येतात.  समृद्धीने सर्वांशी नम्रतेने वागणे हा सत्पुरुषांचा स्वभावाच आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Monday, January 26, 2026

आत्मस्वरूप – दूर की समीप ? | Self-Realisation – Far Or Near ?

 



श्रुति शब्द वापरते – तत् दूरे तद्वन्तिकेते स्वरूप दूर आहे आणि ते स्वरूप अत्यंत समीप आहे.  मग याठिकाणी शंका येईल की, आत्मस्वरूप खरोखरच दूर आहे की जवळ आहे ?  कारण दूर म्हटल्याबरोबर आपण लगेच विचार करू की, चला आता आपल्याला दूर आत्म्यापर्यंत जावयाचे आहे.  प्रथम विवेक, नंतर वैराग्य याप्रकारे हळुहळू त्या दूर असणाऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचावे, असा विचार करू.  परंतु श्रुति लागेचच दुसराही शब्द वापरते – आत्मा दूर नसून आत्मा अत्यंत समीप, जवळ आहे.

 

भाष्यकार दूर याचा अर्थ स्पष्ट करतात – वर्षकोटिशतैः अपि |  शेकडो, कोट्यवधी वर्षे झाली तरी अज्ञानी, अविवेकी, मूढ लोकांना आत्मप्राप्ति शक्य नाही.  श्रुति अशा लोकांसाठीच आत्मा दूर आहे असे सांगते.  कारण बहुतांशी लोक श्रुतीने सांगितल्याप्रमाणे – अन्धेन तमसावृताः |  अज्ञानानेच आवृत्त झालेले आहेत.  अत्यंत स्थूल, प्राकृत बुद्धीचे असून यत् दृष्टं तत् सत्यम् | असे मानून विश्वालाच घट्ट पकडणारे आहेत.  कनक-कांचन-कामिनी यामध्येच आसक्त झालेले कामक्रोधलोभमोहमदमत्सरादि विकारयुक्त असणारे, अहंकार ममकार प्रत्ययांनी युक्त असणारे असे जे लोक आहेत, त्यांच्यापासून आत्मा फार फार दूर आहे.

 

यावर पुन्हा शंका येईल की, “आत्मस्वरूप आपल्यापासून अत्यंत दूर असेल तर ते आपल्याला कसे काय प्राप्त होईल ?  त्यापेक्षा त्यासाठी प्रयत्न न करणेच चांगले,”  असा विचार करून साधक साधनेपासून च्युत होतील.  पुन्हा पूर्ववत भोगमार्गामध्ये प्रवृत्त होतील.  अशा साधकांना आत्मस्वरूपप्राप्तीची खात्री देण्यासाठी श्रुति लगेचच सांगते की, आत्मा हा - तत् अन्तिके |  तुझ्या अत्यंत जवळ आहे.  भाष्यकार याचे स्पष्टीकरण करतात – तत् अन्तिके समीपे अत्यन्तं एव विदुषां आत्मत्वात् न केवलं दूरे अन्तिके च |

 

या श्रुतीमध्ये केवढे सौंदर्य आहे !  केवढा अलौकिक अर्थ भरलेला आहे !  श्रुति सांगते की, आत्मा तुझ्यापासून अजिबात दूर नाही.  तू जेथे आहेस, तेथेच आत्मा आहे.  जवळ म्हटल्याबरोबर साधक शोधायला सुरुवात करेल.  म्हणून भाष्यकार लगेचच सांगतात की, आत्मा हा अज्ञानी मनुष्याला दूर आहे, परंतु ज्ञानी पुरुषाला मात्र अत्यंत समीप आहे.  त्यामुळे अज्ञानी पुरुषाला आत्म्याची समीपता अनुभवायची असेल तर त्यानेही ज्ञानी झाले पाहिजे.  ज्ञानी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009




- हरी ॐ



Tuesday, August 16, 2022

साक्षीभाव आणि मन | The Witness And The Mind

 



अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास होतो आणि दुसरा अध्यास म्हणजेच आत्म्यावर अनात्म्याचा अध्यास होय.  शरीरापासून अज्ञानापर्यंत सर्व अनात्म उपाधीचे गुणधर्म मी आत्म्यावर म्हणजेच ‘मी’वर आरोपित करतो.  म्हणून त्यांच्या गुणधर्मांनी ‘मी’च लिप्त, स्पर्शित, विकारी होतो.  या सर्व सुख-दुःखांच्यामधून, जंजाळामधून मुक्त व्हावयाचे असेल तर एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपल्या मनाकडेच साक्षीभावाने पहिले पाहिजे.  साक्षीभावाचा अभ्यास केला पाहिजे.

 

भगवान रमणमहर्षींनी जीवनभर केवळ साक्षीभावाचा अभ्यास करून परमोच्चअवस्था प्राप्त केली.  आज मी मनाशी तादात्म्य पावल्यामुळेच मन म्हणेल तसे मला नाचावे लागते.  मनाचे सर्व विकार माझ्यावर आरोपित होतात.  माझेच मन मला या घोर संसारामध्ये अधिकाधिक बद्ध करीत असते.  म्हणून विश्व, विषय, माणसे समस्या नाहीत, तर माझेच मन मला problem आहे.  म्हणूनच ज्याक्षणी आपण मनाकडे साक्षी भावाने पाहू, त्याचक्षणी मन एका क्षणात शांत होते.  भगवान रमणमहर्षि म्हणतात –

            मानसं तू किं मार्गणे कृते |

            नैव मानसं मार्ग आर्जवत् ||              (उपदेशसारम्)

 

जे मन आपल्याला या संसाराचा अनुभव देते, ते मनच काय आहे ?  याचा विचार केला तर ते मनच लय पावते.  मनामधील विकार संपतात.  खरोखरच ज्याला मी ‘मन-मन’ असे म्हणतो, जे मला खूप भरकटायला लावते, त्याच मनावर प्रथम संयमन केले पाहिजे.  अन्य अनेक साधना वर्षानुवर्षे केल्या तरीही जोपर्यंत मनोनिग्रह होत नाही, तोपर्यंत संसाराचा, दुःखांचा निरास होणे अत्यंत कठीण आहे.  त्यासाठी मनामध्येच enquiry केली पाहिजे.  जितके आपण आपल्या मनाला महत्व देऊ, मनाबरोबर वाहत जाऊ, तितके ते मन मनुष्याचा नाश करते.

 

परंतु एखादाच धीर पुरुष विवेकाच्या मार्गाने मनावर निग्रह प्राप्त करतो, मनाकडे साक्षीभावाने पाहतो.  तो मनाचा गुलाम होत नाही.  त्यामुळे आपोआपच माझे मनाशी झालेले तादात्म्य कमी कमी होते.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, August 17, 2021

अविद्या आणि ब्रह्मविद्या | Ignorance & Knowledge

 



अविद्येचे मूळ कारण अध्यास आहे.  म्हणजेच चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास हाच हेतु आहे.  याउलट एषणत्रय संन्यास हा विद्येचा हेतु आहे.  विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति आणि मुमुक्षुत्व हा ब्रह्मविद्येचा हेतु आहे.  याप्रमाणे ब्रह्मविद्या आणि अविद्या यांच्या हेतुमध्ये, यांच्या स्वरूपामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये पूर्णतः भेद आहे.

 

१) अविद्या –       हेतु    – चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास

स्वरूप – अज्ञानस्वरूप

फळ   – संसारप्राप्ति

श्रुति   - अविद्यायामन्तरे वर्तमानाःस्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |

        दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः || (कठ. उप. १-२-५)

ज्याप्रमाणे एक अंध पुरुष दुसऱ्या अंध पुरुषाला मार्ग दाखवितो.  त्याप्रमाणे स्वतःला धीर व विद्वान समजणारे, अविद्येमध्येच रत झालेले पुरुष संसारचक्रामध्येच परिभ्रमण करतात.

 

२) ब्रह्मविद्या –     हेतु    - एषणत्रयसंन्यास (पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा यांचा त्याग)

साधनचतुष्टयसंपत्ति (विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति, मुमुक्षुत्वम्

स्वरूप – ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप (यथार्थ, सम्यक्, संशयविपर्ययरहित ज्ञान)

फळ   – अत्यंत दुःखनिवृत्ति निरतिशय आनंदप्राप्तिः मोक्षप्राप्ति

श्रुति   - भिद्यते हृदयग्रन्थििश्छद्यन्ते सर्वसंशयाः |

        क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे || (मुण्ड. उप. २-२-८)

जीवब्रह्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होऊन जीव मुक्त होतो.

 

याप्रमाणे ज्ञान आणि कर्म यांच्या हेतु, स्वरूप आणि फळ यामध्ये भेद असल्यामुळे कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय अजिबात शक्य नाही.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, August 10, 2021

ध्यान प्रक्रियेचा क्रम | Step-by-Step ‘Dhyaan’ Process

 



ध्यानाचे प्रयोजन हे मनाची एकाग्रता करणे नाही, सिद्धि, दर्शन हे नाही, तर स्वतःच्या स्वरूपाची सुस्थिति प्राप्त करणे, स्वस्थ होणे होय.  भगवान प्रत्यक्ष ध्यानप्रक्रिया स्पष्ट करतात –  

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया |

आत्मसंस्थं मनः क्रुत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ||              (गीता अ. ६-२५)

क्रमाने मन सर्व बाह्य विषयांच्यापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करणे, यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात.  भगवान येथे साधकाला क्रमाने लयच करायला सांगतात.  परंतु मनाचा लय करताना सुद्धा विशिष्ट क्रम आहे.  स्थूल वस्तूचा लय सूक्ष्म वस्तुमध्ये, सूक्ष्माचा सूक्ष्मतरामध्ये आणि सूक्ष्मतर वस्तूंचा लय सूक्ष्मतम वस्तूंमध्ये करावा.  म्हणजेच कार्याचा लय कारणामध्ये, कारणाचा लय त्याच्या कारणामध्ये, त्या कारणाचा लय त्याच्याही कारणामध्ये करावा.

 

यच्छेद्वाम्ङनसि प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान आत्मनि |

ज्ञानमात्मनि महति नियच्छेत्तद्यच्छेच्छान्त आत्मनि ||           (कठ उप. १-३-१३)

प्राज्ञ म्हणजे विद्वान पुरुषाने सर्व इंद्रिये मनामध्ये, मन बुद्धीमध्ये, बुद्धि महत्तत्त्वामध्ये आणि महत्तत्त्व शांतस्वरूप असणाऱ्या अविकारी, निर्विशेष आत्म्यामध्ये क्रमाने लय करावे.

 

विवेकी पुरुषाने वाणीचा उपसंहार करावा.  वाणी हा शब्द सर्व इंद्रियांचे उपलक्षण आहे.  इंद्रियांचा उपसंहार मनामध्ये करावा.  त्या मनाचा ज्ञानरूपी बुद्धीमध्ये, प्रकाशस्वरूप बुद्धीमध्ये लय करावा, कारण बुद्धीच मन वगैरेदि इंद्रियांना व्याप्त करते.  त्यामुळेच ती मन, इंद्रियांचा आश्रय, अधिष्ठान आहे.  ती बुद्धि मग प्रथमज असलेल्या महदात्म्यामध्ये, हिरण्यगर्भामध्ये लय करावी.  म्हणजेच हिरण्यगर्भाचा जसा स्वभाव आहे, स्वच्छ स्वभाव, रागद्वेषविकाररहित, अमलिन, तसा स्वभाव व्यष्टि बुद्धीने प्राप्त करावा.  नंतर त्या हिरण्यगर्भाचा अव्याकृतात लय न करता निर्विकार स्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा.  तो महदात्मा, हिरण्यगर्भ शांतस्वरूपाच्या मुख्य आत्म्यामध्ये, नीरव शांतस्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा.  ज्याठिकाणी सर्व विकार, विशेष प्रत्ययांचा निरास होतो, संकल्पविकल्पांचा निरास होतो.  सर्वांच्या आत अधिष्ठानस्वरूपाने असणारा निर्विकार, सर्व बुद्धिप्रत्ययांचा साक्षी असणाऱ्या मुख्य आत्म्यामध्ये लय करावा.  हीच निदिध्यासना, ब्रह्माभ्यास, बाधितसमाधि, ज्ञानसमाधि आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Wednesday, August 4, 2021

मनाचा लय आणि ध्यान | Mind Dissolution and ‘Dhyaan’

 



अनेक विद्वान लोक शास्त्रशुद्ध ध्यानपद्धती समजावून न घेता सामान्य लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करतात.  आजकाल तर Meditation चे प्रस्थच माजलेले आहे.  कोणीही उठतो आणि जगाला ध्यान शिकवितो.  इतकेच नव्हे, तर प्रत्येकाने आपापली ध्यानपद्धती develop केलेली आहे, त्याला एक-एक सुंदर नाव दिलेले आहे.  पुष्कळ लोक मनाच्या लयावस्थेलाच ध्यान असे समजतात.

 

परंतु मनाची लयावस्था म्हणजे ध्यानावस्था नव्हे किंवा समाधिवस्था देखील नव्हे, तर ती अव्याकृताची, अज्ञानाची अवस्था आहे.  म्हणून त्या अवस्थेमध्ये सुद्धा सुषुप्तिप्रमाणे अज्ञानाचाच अनुभव येतो.  जसे, गाढ झोपेमध्ये मी सुखाचा अनुभव घेतो.  म्हणूनच उठल्यानंतर मी म्हणतो की – सुखेन अहं अस्वाप्सम् |  सुखेन मया निद्रा अनुभूयते |  “मला छान झोप लागली होती, मी सुखाने झोपलो होतो.”  तेथे दुखांचा अभाव होतो.

 

मनोलयाच्या अभ्यासामध्ये एक क्षण जरी मनोलय झाला तरी तेथे दुःखांचा अभाव झाल्यामुळे आपोआपच क्षणभर सुखाचा आभास निर्माण होतो आणि त्यालाच तथाकथित विद्वान लोक ‘आत्मसाक्षात्कार’ असे नाव देतात.  याच अनुभवाला सामान्य लोक भुलतात.  वस्तुतः या अनुभवामध्ये प्रत्यक्ष त्या ध्यान शिकाविणाऱ्याचा काहीही पुरुषार्थ नसतो.  कारण मनोलय झाला की, तो अनुभव कोणालाही, कोठेही येऊ शकतो.  एक क्षणभर दिव्य सुखानुभूति येते.  शरीरामधील, मनामधील सर्व ताण-तणाव नाहीसे होतात.  मन एकदम relax होते.  दुःखाने ग्रस्त झालेल्या, पीडित झालेल्या सामान्य, अज्ञानी मनुष्याला हा मनोलयाचा क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा काहीतरी दैवी चमत्कार वाटतो.

 

शास्त्रशुद्ध ध्यानपद्धति समजावून न घेतल्यामुळे सामान्य मनुष्य त्या मनोलयाच्या अवस्थेलाच आत्मसाक्षात्कार, आत्मप्रचिती असे नाव देतो.  परंतु तो दिव्य अनुभव एक क्षणापुरता टिकतो आणि पुन्हा उत्थानसमयी दुःख, यातना, शोक-मोहादि संसार प्रचीतीला येतो.  मनोलयाच्या अवस्थेमध्ये सुषुप्तीप्रमाणे निदान काही क्षण आनंद, सुख प्राप्त होते.  म्हणून त्या अवस्थेला गौण अर्थाने, गौण दृष्टीनेच श्रुतीने अमृतस्वरूप असा शब्द वापरलेला आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, July 27, 2021

परमात्म्याची उपासना | Worshipping the Supreme

 



संभूतीच्या, कार्यब्रह्माच्या उपासनेने साधकाला सिद्धि प्राप्त झाल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ति होऊन त्याच्या अहंकाराचे वर्धन होते.  त्यामुळेच तो घोर अंधकारात प्रवेश करतो, म्हणजेच अधःपतित होतो.  कारणब्रह्माची उपासना ही प्रकृतिलयाची उपासना असल्यामुळे प्रकृति स्वतःच जड, अचेतन, अविद्यास्वरूप असल्यामुळे अशा अविद्येच्या उपासनेमुळे साधक अत्यंत घनघोर अशा अंधकारात प्रवेश करतो.  

 

म्हणून या दोन्हीही उपासना अविद्वान, अज्ञानी, कामुक पुरुषाला सांगितलेल्या आहेत.  जो विवेकी, ज्ञानी पुरुष आहे, तो कधीही जडत्वप्राप्तीसाठी उपासना करणार नाही.  मात्र अविद्वान, कामुक पुरुषच या अविद्याजन्य उपासनांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  वस्तुतः उपासकाला या उपासानांचे फळ प्रत्यक्ष प्रकृति देऊ शकत नाही, कारण प्रकृति ही स्वतःच जडस्वरूप आहे.  तसेच आणिमादि सिद्धि सुद्धा उपासकाला कोणतीही कुट्टीदेवता देऊ शकत नाही, कारण या देवताही कल्पित, अध्यस्त, अविद्याजन्य आहेत.  या सर्व उपासकांना प्रत्यक्ष परमेश्वरच फळ देत असतो.  

 

भगवान म्हणतात –

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति |

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ||

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते |

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ||

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् |

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ||       (गीता अ. ७–२१,२२,२३)

 

जो साधक ज्या देवतेवर श्रद्धा ठेवतो, त्याला ती अचल श्रद्धा मी परमात्माच प्रदान करतो.  त्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या त्या देवतेची उपासना करतो.  त्यामुळे त्याला जे जे फळ प्राप्त होते, ते फळही मी परमात्माच त्याला देतो.  परंतु हे सर्व फळ कर्मजन्य असल्यामुळे ते सर्व नाशवान, क्षणिक असते.  म्हणून मला – परमात्म्याला शरण येणारे लोक माझ्या परमात्मस्वरूपालाच प्राप्त होतात.  मात्र देवातांना भजणारे लोक देवतालोकाला प्राप्त होतात.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ