Wednesday, January 26, 2022

पुरुषप्रयत्न | Dutiful Effort

 



साधुसंतांनी मार्गदर्शन केलेल्या मार्गाने काया-वाचा-मनाने जे कर्म केले जाते तेच खऱ्या अर्थाने पुरुषप्रयत्न असून त्याचेच योग्य फळ आपणास मिळते.  त्याव्यतिरिक्त उन्मत्तपणे केलेले कर्म निष्फळ, व्यर्थ ठरते.

 

वसिष्ठ मुनि पुरुषप्रयत्नांची आणखी एक सुंदर व्याख्या करतात.  प्रयत्न म्हणजे केवळ आपले मन मानेल तसे कर्म करणे नव्हे.  कर्म करतानाही कोणते कर्म करावे व कोणते करू नये, याचे सुद्धा शास्त्र आहे.  साधु-संतांनी उपदिष्ट केलेल्या कर्माचेच अनुसरण करावे.  आपल्या जीवनामध्ये सत्संगाला अतिशय महत्त्व आहे.  जीवनात एक वेळ पैसा, संपत्ति अन्य सर्वकाही मिळेल, परंतु सत्संग मात्र दुर्मिळ आहे.  सत्संगामुळे आपल्या विचारांना आणि जीवनाला योग्य दिशा मिळते.  म्हणून मनाने सत्संगामध्ये, संतांच्या संगामध्ये जावे.  संत याचा अर्थच - सन्मार्गस्थः संतः |  जो स्वतः काया-वाचा-मनसा सन्मार्गाचा, सदाचाराचे, श्रेष्ठ आचारधर्मांचे पालन करतो, तो साधु पुरुष असून तोच अन्य लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो.  त्यामुळे अशा सत्संगानेच आपल्या जीवनामध्ये अंतर्बाहय बदल होतो.

 

आदि शंकराचार्य सांगतात - नेयं सज्जनसंगे चित्तम् |  साधूंच्या संगामध्ये गेल्यावर आपोआपच त्याच्या उपदेशाचे संस्कार मनावर होतात.  त्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल होतात आणि विचार बदलले की आपले आचरणही बदलते.  याप्रकारे सत्संगामुळे आचार, विचार, उच्चार उदात्त होऊन साधक सत्कर्मनिष्ठ होऊन धर्मपरायण होतो.  अशा वेळी आपल्या हातून चांगलेच कर्म घडते.  अशा सदाचारालाच खऱ्या अर्थाने 'प्रयत्न' असे म्हटले जाते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, January 18, 2022

ब्रह्मलोकाची मर्यादा | Limitation of Heaven



 

शास्त्रामध्ये ऊर्ध्व भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम् हे सात ऊर्ध्व लोक सांगितलेले आहेत.  ब्रह्मलोक किंवा सत्यलोक हा सर्व लोकांच्यामध्ये अत्यंत ऊर्ध्व लोक आहे.  त्या ब्रह्मलोकापर्यंत जाणाऱ्या सर्व जीवांना पुनर्जन्म प्राप्त होतो.  सर्व जीव पुन्हा मर्त्यलोकामध्ये शरीर धारण करतात.

 

१) हे सर्व ऊर्ध्व लोक मर्त्यलोकामध्ये जीवाने अनुष्ठान केलेल्या यज्ञयागादि पुण्यकर्मांनी आणि देवता उपासनेने निर्माण झालेल्या पुण्यसंचयाने प्राप्त होतात.  ज्या प्रमाणामध्ये कर्म आणि उपासना अधिक होते त्या प्रमाणामध्ये ऊर्ध्व-ऊर्ध्व लोक प्राप्त होतात.  म्हणजेच सर्व ऊर्ध्व लोकांची प्राप्ति ही कर्मजन्य आहे.  त्यामुळे जोपर्यंत पुण्यसंचय आहे तोपर्यंतच जीव त्या लोकामध्ये राहू शकतो.  परंतु पुण्यसंचय संपला की, आपोआपच जीव मर्त्यलोकामध्ये परत येतो.  जसे कारण तसे कार्य असते, या न्यायाने – यत् कृतकम् तत् अनित्यम् |  कर्माने जे जे प्राप्त होते ते सर्व अशाश्वत, अनित्य असते.

 

२) ब्रह्मलोक जरी सर्व लोकांच्यामध्ये ऊर्ध्व असेल तरीही इतर ऊर्ध्वलोकांप्रमाणे विश्वामध्ये निर्माण झालेला आहे.  म्हणून तो कार्य आहे.  जे कार्य आहे ते काळाने बद्ध असल्यामुळे अनित्य, नाशवान असते, याच नियमाने ब्रह्मलोकही शाश्वत नसून अनित्य आहे.

 

३) ब्रह्मलोक इतर लोकांप्रमाणे मायाकार्य आहे.  त्यामुळे ब्रह्मलोकासहित सर्व ऊर्ध्व लोक सुद्धा मिथ्या स्वरूपाचे, कल्पित लोक आहेत.  म्हणून स्वतःच्या पुरुषार्थाने कर्मानुष्ठान व देवता-उपासना करून हा जीव ब्रह्मलोकापर्यंत गेला तरीही तो मायेच्याच अधीन आहे.  मर्त्यलोकाच्या तुलनेने ब्रह्मलोक अत्यंत ऊर्ध्व असेल तरी पारमार्थिक दृष्टिकोनामधून तो मायांतर्गत म्हणजेच संसारांतर्गतच आहे.  म्हणून ब्रह्मलोकप्राप्ति मोक्षदायक नसून पुन्हा पुन्हा संसारचक्रामध्येच अडकवणारी आहे.

 

या सर्व कारणामुळे भगवान येथे स्पष्ट करतात की, हे सर्व जीव त्या त्या देवतांच्या ऊर्ध्वलोकाला जातात.  परंतु ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये उर्ध्वलोकामध्ये जाऊन उपभोग घेण्याचीच वासना असते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ





Tuesday, January 11, 2022

दैव आणि प्रयत्न | Fate and Effort

 



कोणत्याही मनुष्याने कर्म केले की त्याचे फळ हे मिळतेच.  क्रिया केली की त्याचा परिणाम दिसतो.  म्हणजेच कर्म केले की, त्याचे फळ निश्चित आहे.  काही कर्मांची फळे लगेच मिळतात तर काही फळे काही काळानंतर मिळतात, तर काही कर्मांची फळे कदाचित पुढील जन्मामध्येही मिळतात.  परंतु या विषयामध्ये मंदबुद्धीचे लोक विचार करीत नाहीत.  त्यामुळेच मोहित झालेले हे अज्ञानी लोक दैवाची कल्पना करतात.  परंतु हे रामा ! दैव हे वस्तुतः अस्तित्वातच नसून ती मंदबुद्धि लोकांनी केलेली कल्पना आहे.  अज्ञानी लोक जीवनामध्ये किंवा रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा सतत दैव हा शब्द वापरतात.  त्यांच्या मनात दैव आणि प्रयत्न या शब्दांविषयीच गोंधळ असतो.  ज्यावेळी मनुष्याच्या शरीराला, इंद्रियांना, बुद्धीला मर्यादा येतात त्यावेळी मनुष्य सोयीस्कर दैव हा शब्द वापरतो.

 

काही वेळेस मोक्षाला सुद्धा दैवाच्या पक्षात टाकतो.  "माझ्या दैवात असेल तर मुक्ति मिळेल, माझ्या नशिबात संसारच लिहिला आहे."  अशी विधाने करून साधक साधनेचा त्याग करतो.  निरुत्साही बनतो. हे अत्यंत अयोग्य आहे.  ऐहिक-पारलौकिक उपभोग असोत किंवा मोक्ष असो, यापैकी काहीही मिळवायचे असेल तरी मनुष्याने प्रयत्न हा केलाच पाहिजे.  कारण विश्वामध्ये दैव नावाची कोणतीही अज्ञात वस्तु अस्तित्वात नाही.  शेवटी दैव, दैव म्हणजे तरी काय ?  याचा विचार केला, दैवाचा शोध घेतला तर समजते की, पूर्वी भूतकाळात केलेला प्रयत्न - पुरुषार्थ म्हणजेच दैव होय.

 

ईश्वर किंवा गुरु आपल्याला दैव देत नाहीत किंवा दैवामध्ये बदलही करीत नाहीत.  तर सर्व संत दैवाला सामोरे जाण्यासाठी सर्वांना उपदेश देतात.  उपदेश भूतकाळासाठी किंवा भविष्यकाळासाठी दिला जात नाही. तर शास्त्र, गुरु, संत हे मनुष्याला वर्तमानकाळासाठी उपदेश देतात.  याचे कारण भूतकाळ तर निघून गेलेला आहे.  भविष्यकाळ अज्ञात आहे.  उद्या मी जिवंत आहे की नाही याची सुद्धा शाश्वती नाही.  साधना भविष्यकाळात करता येत नाही.  तर जे काही चांगले करायचे आहे, त्यासाठी आपल्या हातात फक्त वर्तमानक्षण उपलब्ध आहे.  तोही क्षण आला-आला म्हणेपर्यंत भूतकाळामध्ये निघून जातो.  म्हणून पुरुषप्रयत्न हा फक्त वर्तमानकाळातच करता येतो, हे स्पष्ट होते.  श्री वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, अज्ञानी लोक दैवाची कल्पना करतात.  परंतु भूतकाळच काल्पनिक असल्यामुळे भूतकाळातले दैवही काल्पनिक आहे.  म्हणून मोक्षप्राप्ति जरी करायची असेल तरी प्रयत्न आवश्यक आहेत.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, January 4, 2022

भगवत कथेचे महत्व | Effects of God's Laudation

 



कथा अनेक प्रकारच्या आहेत.  व्यावहारिक कथा, वैषयिक कथा, स्त्रीकथा, परमेश्वराच्या कथा.  व्यावहारिक आणि वैषयिक कथा मन वैषयिक करून कलुषित करतात, कामुकता निर्माण करतात.  मन बहिर्मुख करून विषयांचेच प्रेम वृद्धिंगत करतात आणि शेवटी मन विषयासक्त होते.  याउलट परमेश्वराच्या कथाश्रवणाने भक्तिरस निर्माण होऊन, मन शुद्ध, निर्मळ होते, सर्व कामुकता, विकारांचा ध्वंस होतो.  जर नित्य आनंद प्राप्त करावयाचा असेल तर भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात.  त्यामुळे भक्तिरस निर्माण होईल आणि आनंद मिळेल.

 

स्त्रिया विटानामिव साधुवार्ता |  ज्याप्रमाणे लंपट पुरुष स्त्रियांच्या हाव-भाव-विलासाची चर्चा करून थकत नाही, त्यामध्ये नित्य रस घेतो, काया-वाचा-मनसा त्याशिवाय अन्य दुसरा विषयच नसतो.  तो तहानभूक, वेळ सर्व विसरून जातो, त्यातच तो नित्य रसास्वाद घेतो.  त्याप्रमाणे भक्त भगवंताच्या कथा श्रवणामध्ये, चर्चेमध्ये रस घेतो, तो स्वतःला विसरून जातो, तहान भूक देश-काळ विसरतो.  तासन् तास ऐकूनही थकत नाही.  कंटाळत नाही.  त्याला श्रवणामध्ये नित्य नवीन रस मिळतो.

 

कथेमध्ये भगवंताचे चरित्र, कल्याणगुण, माहात्म्य, विभूति, अनेक प्रकारच्या लीला श्रवण केल्या जातात.  कथा श्रवण करण्यामुळे मनामध्ये त्या प्रकारचा भाव निर्माण होतो.  परमेश्वर हा कर्तुम्-अकर्तुम् असून त्याच्या सत्तेची जाणीव निर्माण होते.  तो विश्वनियामक असून सर्व जीवांचा रक्षणकर्ता आहे हे समजते.  श्रवणामधूनच नकळत परमेश्वराबद्दलचे प्रेम निर्माण होते.  कथा चित्ताची पकड घेते आणि भगवंताच्या कथेमध्ये मन सहजपणे तल्लीन होते.  विषयांचा विसर पडतो.  आपला अहंकार गळून पडतो.  यामधून भक्तीचा रस निर्माण होतो.  मन शुद्ध होते, अत्यानंदाचा अनुभव येतो.  हळूहळू भक्तीचा उत्कर्ष होऊन भक्त जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक कर्मामध्ये, प्रसंगामध्ये परमेश्वराची कृपा पाहातो.  परमेश्वराच्या सत्तेची अनुभूति घेतो.  सर्व विश्वातच त्याचे स्वरूप पाहातो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ