Tuesday, October 27, 2020

पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण | Hazards of Blind Westernization 

साधकाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति करावयाची असेल तर पहिल्या पायरीपासून क्रमाने साधना केली पाहिजे.  नराचा एकदम एका दिवसात नारायण होऊ शकत नाही.  त्यासाठी साधकाने प्रथम चांगला माणूस बनले पाहिजे.  आध्यात्मिक, उच्च, अत्युच्च साधन करण्यापूर्वी प्रथम आपल्या जीवनामधील आचार-विचार-उच्चार विकसित होऊन उदात्त बनले पाहिजेत.  मनुष्याने चारित्र्यसंपन्न, धर्माधीष्ठित, धर्मपरायण जीवन जगण्याचा अभ्यास केला पाहिजे.  

 

आज वर्तमानपत्रे उघडल्यानंतर जे भयंकर, बीभित्स प्रकार वाचायला मिळतात, ते वाचुनच मन विदीर्ण होऊन जाते.  त्याचे मूळ कारण आहे - पाश्चिमात्त्यांचे केलेले अंधानुकरण, भोगवाद, भौतिकवाद, चंगळवाद !  केवळ यामुळेच आज मनुष्याचे जीवन भोगवादी बनले आहे.  शरीरावर व शारीरिक भोगांवर केंद्रीभूत झाले आहे.  आपण काय चांगले, याचा विचार न करता केवळ पाश्चिमात्त्य लोक करतात, म्हणून आपणही करायचे, इतकीच विचारशक्ति शिल्लक राहिली आहे.  

 

पाश्चिमात्त्य लोक मांसाहार करतात, म्हणून आपणही करायचा, ते लोक व्यसनाधीन होतात म्हणून आपणही व्यसन करायचे, त्या स्त्रिया अपुरे व पुरुषांचे कपडे घालतात म्हणून आपल्याकडील स्त्रियांनी सुद्धा अपुरेच कपडे घालायचे.  जीन्स घालायच्या, कुंकु लावायचे नाही, गळ्यात मंगळसूत्र घालायचे नाही, उंच टाचांच्या चपला घालायच्या, जितके म्हणून पुरुषासारखे वागता येईल, राहता येईल तेवढे राहायचे.  दारू प्यायची, सिगारेट ओढायची, फ्रेंड्स डे साजरे करायचे.  ते लोक ३१ डिसेंबर, १ जानेवारी साजरे करतात म्हणून आपण गुढीपाडवा सोडून तेच दिवस दारू पिऊन साजरे करायचे.  जितके अंगप्रदर्शन करता येईल, तेवढे करायचे.  असे सर्व तंतोतंत अनुकरण करायचे, ही तरुण पिढीची धारणा व त्यानुसार चाललेले प्रत्यक्ष आचरण हे वास्तवच किती भयंकर आहे ?  

 

वस्तुतः आपला धर्म, आपल्या परंपरा, आपले सण, आपली पारंपारिक वेषभूषा, केशभूषा, आहार-विहार यांना अतिशय महत्व आहे.  त्यामागे जीवनविकासाचा उदात्त विचार आहे.  जीवन कसे जगावे, याचे शास्त्र आहे.  त्यामुळे विचार न करता पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण करणे ही अधःपतित करणारी गोष्ट आहे आणि याहीपेक्षा भयंकर असेल तर तरुणांनी आपल्या महान परंपरांचा, श्रेष्ठ आदर्शांचा, नीतिमूल्यांचा केलेला त्याग !  याचे कारण एकच आणि ते म्हणजे दृश्य भोग विषयांना दिलेले सत्यत्व आणि महत्व !  

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ

Tuesday, October 20, 2020

आत्मविद्येने अभय | Self-Realization & Fearlessness

 आपण पाहतो की, व्यवहारात एखादा मनुष्य कितीही श्रीमंत असू देत, त्यालाही मृत्यूची भीति आहेच किंवा एखाद्याजवळ अन्य लोकांचे साहाय्य असेल, व्यावहारिक लोक, आप्त आपल्याला अन्य सर्व सहकार्य करतील, परंतु ते आपल्याला मृत्यूच्या भीतीमधून पार नेऊ शकत नाहीत.  काही वेळेस आपण मृत्यूला टाळण्यासाठी अनेक औषधींचे सेवन करू. अॅलोपॅथी-होमिओपॅथी-आयुर्वेदिक अनेक औषधी वनस्पती, अनेक उपाय करु.  परंतु मनुष्य मृत्यूच्या भीतीपासून मात्र मुक्त होऊ शकत नाही.  काही वेळेस एखादा साधक खूप तपश्चर्या करेल, उग्र तपश्चर्या करून अनेक सिद्धि सुद्धा मिळवेल, योगसाधना, प्राणायामादि साधना करून इंद्रियांवर, मनावर निग्रह करेल.  परंतु यापैकी कशानेही साधक मृत्यूवर जय मिळवू शकत नाही.

 

आत्मविद्येचे सामर्थ्य मात्र खरे सामर्थ्य आहे.  आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानेच अज्ञानाचा ध्वंस होऊन अज्ञानजन्य सर्व कल्पनांचा निरास होतो.  अहंकार-ममकारादि प्रत्यय तसेच कर्तृत्व-भोक्तृत्वाचा निरास होतो.  साधकास अभेदस्वरूपाने परब्रह्माचे ज्ञान होते.  ‘मी’ स्वतःच चिदानंदस्वरूप, शिवस्वरूप, आनंदस्वरूप आहे, ही त्याला साक्षात ‘अपरोक्षानुभूति’ येते.  हेच आत्मविद्येचे सामर्थ्य आहे.  

 

म्हणुनच आत्मज्ञानी पुरुषाचे श्रुति वर्णन करते -

            न बिभेति कुतश्चनेति |       (तैत्ति. उप. २-४-१)

आत्मज्ञानी पुरुष भयभीत होत नाही.  समोर मृत्यु दिसला तरी आनंदाने, अत्यंत स्थिर मनाने स्वतःच्याच मृत्यूचे स्वागत करतो.  तो स्वतःचे शरीर मृत्यूला समर्पित करतो.  हेच आत्मज्ञानाचे सामर्थ्य आहे.  हे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानानेच मिळते.  

 

अथर्व श्रुति सुद्धा म्हणते-

            नायमात्मा बलहीनेन लभ्यः |       (मुण्ड. उप. ३-२-४)

बलहीन पुरुषाला आत्मस्वरूप प्राप्त होत नाही.  म्हणून मृत्यूवर विजय प्राप्त करून अमृतत्त्वाच्या प्राप्तीसाठी ‘आत्मविद्या’, ‘प्रतिबोधाचे ज्ञान’ हेच मुख्य साधन आहे, कारण आत्मविद्येनेच अमृतत्व, मोक्ष प्राप्त होतो.  

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ
Tuesday, October 13, 2020

अमृतत्व आणि मोक्ष | Immortality & Salvation


 

प्रतिबोधविदितं मतं अम्रुतत्वं हि विन्दते |  आत्माना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेSमृतम् |  यामधून श्रुति आत्मज्ञानाचे फळ सांगत आहे.  प्रतिबोधाच्या ज्ञानाने साधकाला अमृतत्वाची प्राप्ति होते.  अमरणभाव, मृत्युरहित अवस्था म्हणजे अमृतत्व होय. स्वर्गामध्ये सुद्धा अमृतत्वाची प्राप्ति होते.  परंतु स्वर्गलोकप्राप्ति म्हणजे आत्मज्ञानाचे फळ किंवा अमृतत्वाची प्राप्ति होऊ शकत नाही.  

 

स्वर्गलोकाचे वर्णन केले जाते –

स्वर्गे लोके भयं किंचन्नास्ति न तत्र मृत्युं जरया बिभेति |             (कठ. उप. १-१-१२)

स्वर्गामध्ये स्थूल शरीराच्या अनुषंगाने असणारी जन्ममृत्यूची भीति नाही, व्याधि, वार्धक्य नाही.  तेथे तहान-भुकेने व्याकुळ होऊन होणाऱ्या यातना नाहीत.  म्हणून स्वर्गादि ऊर्ध्वलोकांना अमृतत्व म्हटले असेल तरीही हे अमृतत्व नित्य शाश्वत तसेच निरतिशय स्वरूपाचे नाही.  त्यामुळे स्वर्गादि ऊर्ध्वलोकप्राप्ति म्हणजे मोक्ष नव्हे, कारण ते सर्व लोक कर्मजन्य असल्यामुळे अनित्य, नाशवान स्वरूपाचे, मर्यादित स्वरूपाचे आहेत.  

 

भगवान म्हणतात – पुण्यसंचय संपल्यावर जीव पुन्हा मर्त्यलोकामध्येचप्रवेश करतात.  ब्रह्मलोकापासून सर्व ऊर्ध्वलोक पुनरावर्ती स्वरूपाचे असून अल्प, अनित्य आहेत.  त्यामुळे स्वर्गप्राप्ति म्हणजे मोक्षप्राप्ति नव्हे, असे आचार्य स्पष्ट करतात.  मग मोक्ष म्हणजे काय ?  आचार्य येथे सुंदर व्याख्या करतात - अमृतत्वं अमरणभावं स्वात्मानि अवस्थानं मोक्षः |

 

मृत्युरहित, अमृतत्त्वाची अवस्था, म्हणजेच स्वस्वरूपामध्ये सुस्थिति प्राप्त करणे, म्हणजेच ‘मोक्ष’ होय.  या अवस्थेमध्ये अमरणभाव प्राप्त होतो, म्हणजे मोक्षावस्थेमध्ये ‘मी मरणार’ ही अज्ञानजन्य असणारी मृत्यूची कल्पनाच गळून पडते.  जसे गाढ झोपेमध्ये ‘मी मरणार’ ही कल्पनाच लय पावल्यामुळे आपल्याला तेथे कधीही मरणाची भीति वाटत नाही.  म्हणजेच मृत्यूची कल्पना निरास झाली की, मृत्यूची भीति सुद्धा संपते, कारण मृत्यूची भीति ही मृत्यूच्या कल्पनेमधून उगम पावली आहे.  कल्पना संपली की, भीतीही नष्ट होते.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ

Tuesday, October 6, 2020

अनात्मउपाधीचा निरास | Knowledge by Elimination of Non-Self

 आचार्य सांगतात की, आत्म्याला जाणण्याची किंवा आत्म्याचे ज्ञान घेण्याची आवश्यकताच नाही, कारण आत्मा हा संवेदनस्वरूपत्वात् |  स्वतःच संवेदनस्वरूप, ज्ञानस्वरूप आहे.  त्यामुळे त्याला दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकताच नाही.  ज्याप्रमाणे प्रकाशाला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकताच नाही.  सूर्याला पाहण्यासाठी टॉर्चची गरज नाही.  तसेच ज्ञानस्वरूप आत्म्याला दुसऱ्या ज्ञानाची, प्रकाशाची आवश्यकता नाही.  

 

आत्मस्वरूप हे विदित व अविदित वस्तूंच्याही अतीत आहे.  जसे – सूर्य हा स्वयंप्रकाशस्वरूप आहे.  त्याच्या प्रकाशामध्येच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते.  परंतु “सूर्य प्रकाशमान करतो” ही प्रकाशमान करण्याची क्रिया सुद्धा वस्तुतः सूर्यामध्ये संभवत नाही.  अंधाराच्या दृष्टीने आपण ‘प्रकाश’ हा शब्द वापरतो.  परंतु सूर्याच्या दृष्टीने अंधार व प्रकाश या दोन्हीही कल्पनाच आहेत.  सूर्य हा अंधार व प्रकाशाच्याही अतीत असून प्रकाशस्वरूप आहे.  सूर्य व प्रकाश या दोन भिन्न गोष्टी नाहीत तर प्रकाश हे सूर्याचेच स्वस्वरूप आहे.  

 

आत्मचैतन्यस्वरूप हे प्रकाशकांचेही प्रकाशक असून अंधाराच्याही अतीत आहे.  म्हणून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा आत्म्याच्या सिद्धीसाठी अन्य कोणत्याही प्रमाणाची आवश्यकता नाही.  वेदांतशास्त्र सुद्धा प्रत्यक्ष आत्म्याचे “हा आत्मा आहे”, याप्रकारे ज्ञान देत नाही.  “आत्मा काय आहे” हे न सांगता वेदांतशास्त्र “आत्मा काय नाही”, याचेच ज्ञान देते.  म्हणजेच वेदांतशास्त्र आत्म्यावर झालेल्या अध्यासाचा निरास करते.  

 

हा आत्मा नाही, हा आत्मा नाही, याप्रकारे श्रुति आत्म्याचे ज्ञान देतात.  म्हणजेच आत्मस्वरूपावर अनात्मा, शरीर-इंद्रिये-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान या अनात्मउपाधीचा झालेला जो आरोप, त्या सर्व आरोपांचा श्रुति निरास करते.  म्हणजेच दृश्य असणाऱ्या विश्वाचा, नामरूपात्मक विषयांचा, समष्टी-व्यष्टीचा श्रुति निरास करते.  सर्वांचा निरास झाल्यानंतर अधिष्ठानस्वरूपाने राहते ते – आत्मचैतन्यस्वरूप होय.  म्हणून आत्मा हा वेदांताचा व वेदांचा सुद्धा ज्ञेय विषय होऊ शकत नाही.  कारण वेदांची निर्मिति सुद्धा परमात्म्यामधूनच झालेली आहे.  

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ