आषाढ
शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा, अर्थात गुरुपौर्णिमा होय. भारतीय
संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य परंपरेला अतिशय महत्व
आहे. या अत्यंत पवित्र दिनी भगवान वेदव्यासांचा जन्म झाल्यामुळे व्यासपौर्णिमा असे
म्हणतात. भगवान व्यासांनी एक लाख मंत्रांचे विभाजन करून चार वेदांच्यामध्ये
अत्यंत सूव्यवस्थितपणे संकलन केले.
वेद
म्हणजेच विश्वामधील अखिल ज्ञानाचा सागर होय. गतकालापासून आजपर्यंत कोणत्याही
क्षेत्रामध्ये विज्ञान जे जे शोध लावीत आहे, त्या सर्वांचे स्पष्ट,
शास्त्रशुद्ध व युक्तियुक्त ज्ञान वेदांच्यामध्ये आहे. हे अपौरुषेय ज्ञान
आपल्यापर्यंत आणून भगवान व्यासांनी सर्व जगासमोर ज्ञानाचे भांडार खुले केलेले आहे.
म्हणूनच भगवान व्यास हे संपूर्ण जगताच्या गुरुस्थानी आहेत. म्हणून व्यासपौर्णिमेचा
दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
शिष्याने
आपल्या गुरूंच्याप्रति शरणागत भाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
शास्त्रकार गुरु या शब्दाची व्याख्या करतात –
गुकारो अन्धःकारः रुकारो
तन्निवर्तकः इति गुरुः |
आपल्या
अंतःकरणामधील अज्ञानाचा नाश करून गुरु ज्ञानज्योतीने शिष्याचे जीवन
उजळवून टाकतात. अन्य सर्व भौतिक ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असणारे गुह्य आत्मज्ञान
शिष्यास देऊन आत्मानुभूती घेण्यास त्याला पात्र बनवितात.
गुरु
ही एक व्यक्ति किंवा एखादे शरीर नाही. तर गुरु हे तत्व आहे. गुरु हे साक्षात
परब्रम्ह स्वरूप आहे. दीनांच्या उद्धारासाठी ते शरीर धारण करतात. मात्र उद्धार
व्हावयाचा असेल तर गुरूंच्या चरणी नितांत श्रद्धा व एकनिष्ठ भक्ति हवी. आचार्य
म्हणतात –
गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्तः
संसारादचिराद्भव
मुक्तः |
सेन्द्रियमानसनियमादेवम्
द्रक्ष्यसि
निजहृदयस्यं देवम् || (भजगोविंदम्)
- परमपूज्य माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment