Tuesday, September 19, 2023

कर्तृत्वाचा निरास | Elimination of Ownership of Action

 



ज्ञानी पुरुष या विश्वामध्ये एखाद्या अज्ञ पुरुषाप्रमाणेच सर्व क्रिया किंवा व्यवहार करीत असतो.  अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच क्रिया व व्यवहार सत्य वाटतो.  अज्ञानी मनुष्य ज्ञानी पुरुषाला सुद्धा उपाधीच्या दृष्टीने पाहत असल्यामुळे ज्ञानी मनुष्याच्या येणे-जाणे, कर्म करणे, बोलणे, वगैरेदि सर्वच क्रिया अज्ञानी मनुष्याला सत्य वाटतात.

 

परंतु ज्ञानी पुरुषामधून कर्तृत्वाचा निरास झाल्यामुळे स्वस्वरूपाच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानी पुरुष कोठे जातही नाही आणि कोठून येतही नाही.  कोणते कर्म करीतही नाही अथवा बोलतही नाही.  तर या क्रिया केवळ त्याच्या शरीरइंद्रियादि उपाधीमधून घडत असतात.  ज्ञानी पुरुष मात्र यापासून अलिप्तच राहतो.

 

याचे कारण ज्ञानी पुरुषाला परमपदाचे ज्ञान झाल्यामुळे त्याच्यामधील कर्तृत्वबुद्धि निरास पावते.  प्रमाता-प्रमेय-प्रमाण हा व्यवहार निरास पावतो.  मागे सांगितल्याप्रमाणे हेय आणि उपादेयरहित झाल्यामुळे तो द्वंद्वरहीत होतो.  त्याला कशाचीच अपेक्षा नसल्यामुळे कामनांचा अभाव होऊन त्याची कर्मे सुद्धा क्षय पावतात.

 

येथे समारंभ म्हणजेच कर्म होय.  कर्माच्याच साहाय्याने मनुष्याच्या संसारगतीला प्रारंभ होतो.  किंवा ज्याचा आरंभ केला जातो त्याला 'आरंभ' म्हणजे 'कर्म' असे म्हणतात.  ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानी पुरुष काही त्याग करीत नाही किंवा काही ग्रहणही करीत नाही.  याचे कारण - प्रयोजनअभावात् |  काही मिळविण्याच्या इच्छाच गळून पडल्यामुळे प्रिय-अप्रिय, रागद्वेषादि वृत्ति गळून जातात.  म्हणून ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामधील कामना, कर्म, कर्तृत्व, भोक्तृत्व या सर्वच संसारप्रत्ययांचा निरास होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, September 12, 2023

मौन साधना | The Practice of Silence

 



शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी असणारी मौनसाधना सांगितली जाते.  भगवान श्रीरमणमहर्षींनी वर्षानुवर्षे मौन साधना केली, आत्मपरीक्षण केले.  जीवनभर साधकांना मौनाचाच उपदेश केला.  मौन याचा अर्थ केवळ न बोलणे नव्हे.  कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकारचे मौन आहे.  व्यवहारामध्ये आपण खरोखरच जे बोलायला पाहिजे, ते कधीच बोलत नाही आणि जे कधीही बोलायला नको, तेच बोलतो.  साधकाचे आणखी एक महत्वाचे ब्रीद आहे आणि ते म्हणजे जीवनामध्ये कोणावरही comments करू नयेत.  दुसऱ्याचे चारित्र्यहनन करू नये.

 

भगवान वाचिक तपस् सांगतात – अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |       (गीता अ. १७-२५)

साधकाने दुसऱ्यांना उद्विग्न न करणारे, सत्य, प्रिय व हितकारक वचन बोलावे.  जे जे आपण अध्ययन करतो, जे जे मी श्रवण करतो, त्यावरच बोलावे.  व्यवहारामध्ये आपण अन्य विषय, व्यक्ति, प्रसंग, राग-द्वेष, कामक्रोधादि विकार याबद्दलच अधिक बोलतो.  व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांशी जितके बोलाल, एकमेकांच्या जवळ याल, दुर्दैवाने बोलता-बोलता एकमेकांच्यामधील राग आणि द्वेष उफाळून बाहेर पडतात.  मनुष्य विकारांच्या आहारी जातो.  साधकाचे मन विक्षिप्त, कलुषित होते.

 

तसेच, साधकाच्या दृष्टीने पाहिले तर या सर्व चर्चांचा, त्याला साधनेमध्ये काहीही उपयोग होत नाही.  उलट प्रतिबंधच होतो.  म्हणजे त्याचे मन अधिकाधिक बहिर्मुख, विषयाभिमुख होते.  म्हणूनच श्रुतीने याठिकाणी साधना सांगितलेली आहे की – अन्या वाचा विमुञ्चथ |  हे शिष्या !  तू अन्य वाचेचा त्याग कर आणि मौनाचा अभ्यास कर.  जितके कमी बोलता येईल, तितके कमी बोलावे.  हा अभ्यास करावा.  असा मौनाचा जर अभ्यास केला, तर मन शांत, अंतर्मुख होऊन तेच मन या साधनेसाठी योग्य, अनुकूल आणि अधिकारी होऊ शकते.  अन्य लोक, विश्व, व्यक्ति, प्रसंग याविषयी बोलण्यापेक्षा साधकाने आत्मस्वरूपाचे चिंतन करावे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Tuesday, September 5, 2023

मनुष्य शरीराचा 'रथ' | The 'Chariot' of Human Body

 



वसिष्ठ मुनि रथाचा दृष्टांत देतात.  रथ जसा जड, अचेतन असतो तसेच आपले शरीरही रथाप्रमाणे अचेतन आहे आणि या शरीररूपी रथामध्ये बसलेला रथस्वामी म्हणजे जीवात्मा आहे.  या शरीररूपी रथाला पाच ज्ञानेंदिये व पाच कर्मेंद्रिये असे घोडे जोडले आहेत.  असा हा रथ सज्ज होऊन त्याच्यामध्ये रथस्वामी बसला की, तो रथ मार्गक्रमण करू लागतो.  हे मार्ग म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि दृश्य विषय आहेत.  या विषयरूपी मार्गांच्यामधून जात असताना इंद्रियरूपी घोड्यांच्यावर नियमन करण्यासाठी रथस्वामीच्या जवळ मनरूपी लगाम आहे.  म्हणजे मनानेच इंद्रियांच्यावर निग्रह केला पाहिजे.  याप्रमाणे शरीररूपी रथ या संपूर्ण विश्वामध्ये परिभ्रमण करीत असतो.

 

ज्ञानी पुरुष ज्यावेळी या रथाकडे पाहतो, त्यावेळी त्याला निश्चितपणे माहीत असते की, रथ हा माझ्यापासून नित्य भिन्न आहे.  जाण्यायेण्याचे फक्त ते साधन आहे.  'मी' मात्र त्या रथापासून भिन्न असणारा परमात्मस्वरूप आहे.  'मी' परमात्मा त्या रथस्थ पुरुषापासून म्हणजेच जीवाच्या सुद्धा अतीत आहे.  इतकेच नव्हे, तर तो रथस्थ पुरुष आणि मी खरे तर एकच आहोत.  जीव हा जीव नसून जीव स्वतःच परमात्मस्वरूप आहे.  केवळ शरीर, बुद्धि या उपाधीच्या अनुषंगाने त्याला 'जीव' असे म्हटले जाते.  परंतु उपाधीचा निरास केला तर रथही नाही, घोडे, लगाम, रस्तेही नाहीत व रथस्वामी सुद्धा नाही.  केवळ परमात्मस्वरूप हेच सत्य आहे.  म्हणजेच शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान ही सर्व उपाधि काल्पनिक, मिथ्या स्वरूपाची असून, 'मी' परमात्मा मात्र या सर्वांच्याही अतीत आहे.

 

आत्मस्वरूपाचे असे यथार्थ ज्ञान ज्या ज्ञानी पुरुषाला होते, त्याचे या जगात राहणे म्हणजे आनंदाने पर्यटन करणे आहे.  ज्ञानी पुरुष तत्त्वाची दृष्टि प्राप्त झाल्यामुळे अत्यंत स्थिर, शांत व प्रसन्न मनाने राहतो.  याचे कारण त्याच्या दृष्टीने हा दृश्य संसार, सर्व प्रसंग, सर्व दुःखे मिथ्या व कल्पित स्वरूपाची आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, August 29, 2023

साक्षी आणि उत्पत्तीकरता | Witness and Creator

 



यस्य सन्निधिमात्रेण प्रधानादिप्रवृत्तिः सः अध्यक्षः |  ज्याच्या केवळ अस्तित्वाने राजसभागृहामध्ये प्रधानादि सर्व लोक कार्यान्वित होतात तो राजा किंवा अध्यक्ष होय.  राजाच्या केवळ अस्तित्वाने सर्व लोक त्यांच्या त्यांच्या विशिष्ट कर्मामध्ये प्रवृत्त होतात.  राजाशिवाय कोणताही व्यवहार चालू शकत नाही.  म्हणून सर्व सभा राजावर अवलंबून असते.  राजा मात्र कोणत्याही व्यापारामध्ये ढवळाढवळ न करता तटस्थ आणि अलिप्त असतो.

 

त्याप्रमाणे परमात्म्याच्या केवळ सान्निध्याने प्रकृति चराचर विश्वाची निर्मिती करते.  येथे एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, परमात्मा निर्गुण, निराकार, निर्विशेष, निरुपाधिक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही.  त्यामुळे विश्वाच्या निर्मितीची शक्यता नाही.  विश्व निर्माण करणे म्हणजे विकार होणे होय.  तसेच त्रिगुणात्मक प्रकृति स्वतः जड, अचेतन असल्यामुळे ती स्वतःच्या कर्तृत्वाने विश्वाची निर्मिती करू शकत नाही.  मग प्रश्न आहे विश्वाची निर्मिती कशी होते ?  यासाठी येथे – मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् |

 

माझ्या अध्यक्ष स्वरूपाने म्हणजेच मायेमध्ये पडलेल्या कूटस्थ, साक्षी, चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त झाल्यामुळे मायेला सत्ता आणि स्फूर्ति म्हणजे चेतना प्राप्त होते, हे मायाउपहित चैतन्य त्रिगुणांच्यामधून चर-अचर, स्थावर-जंगम आदि सर्व विश्व आणि भूतामात्रे निर्माण करते.  याठिकाणी ‘सूयते’ हा शब्द स्थिति आणि संहार या अन्य दोन क्रिया सुद्धा दर्शवितो.  याचा अर्थ त्रिगुणात्मक प्रकृति निर्माण करते, तीच स्थिति करते आणि सर्वांचा संहार करते.

 

मायाउपाधियुक्त परब्रह्मामधून म्हणजेच आत्मचैतन्यामधून आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथिवी ही क्रमाने पंचमहाभूते निर्माण होऊन त्यानंतर औषधी आणि अन्न निर्माण झाले.  अन्नामधून अन्नरसमय पुरुष म्हणजेच स्थूल शरीर निर्माण झाले.  त्याच्याही आत क्रमाने प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय पुरुष निर्माण होऊन त्या सर्वांच्या आगदी आत तोच परमात्मा प्रत्यगात्मस्वरूपाने आहे.  तोच प्रकृतीच्या उत्पत्तिस्थितिलय वगैरे कर्मामध्ये साक्षीचैतन्य स्वरूपाने राहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, August 22, 2023

निःसंग जीवन - एक फेरफटका | Unattached Life - An Easy Stroll

 



ज्ञानी पुरुष आत्मचिंतन करून देहात्म्याचा निरास करतो.  त्यानंतर निदिध्यासनेच्या साहाय्याने तो ज्ञाननिष्ठा प्राप्त करून ब्रह्मस्वरूपामध्ये दृढ होतो.  त्यावेळी अज्ञान पूर्णतः ध्वंस होऊन मोहाचाही निरास होतो आणि विपरीत ज्ञानही गाळून पडते.  भ्रांतिरूपी घनदाट मेघ निरस्त होतात.  ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये सत्-चित्-आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, प्रकाशस्वरूप प्रकट होते.  तो आणि आत्मचैतन्य भिन्न न राहता तो स्वतःच परब्रह्मस्वरूप होतो.  त्याला एकत्वाची, अद्वैताची अभेद दृष्टि प्राप्त होते.  तो या शरीरामध्ये राहताना शरीरापासून अत्यंत अलिप्त व अस्पर्शित राहतो.

 

जसे आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो, तसेच तो स्वतःच्या शरीरामधये निःसंगपणाने राहतो.  भाड्याच्या घरात आपण आयुष्यभर राहिलो तरी आपल्याला माहीत असते की, हे आपले घर नाही.  ते राहायचे फक्त एक तात्पुरते स्थान आहे.  त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाला अगदी निश्चित माहीत असते की, हे शरीर म्हणजे राहण्याचे फक्त स्थान आहे.  म्हणून तो शरीरापासून स्वतःला पूर्णतः निवृत्त करतो आणि अखंडपणे ब्रह्मस्वरूपामध्येच रममाण होतो.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे फार सुंदर दृष्टांत देतात - धियो दृष्टे तत्त्वे रमणमटनं जागतमिदम् |  ज्ञानी पुरुषांचे जगात राहणे म्हणजे जणु काही सहज फेरफटका मारणे आहे.  जसे आपण कंटाळा आला म्हणून बागेत बाहेर फिरून येतो, तसेच जणु काही या विश्वामध्ये ज्ञानी पुरुष भ्रमण करतो.  विश्वामध्ये सर्वांच्यामध्ये असूनही तो कशानेही लिप्त होत नाही.  अज्ञानीपेक्षा ज्ञानी पुरुषच विश्वाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो.  त्याच्या दृष्टीने जग हे खेळण्याचे, फिरण्याचे एक स्थान आहे.  त्यामुळे ज्ञानी पुरुष या जगात येतो, काही काळ राहतो, निर्लिप्त मनाने सर्व अनुभवतो आणि प्रारब्ध संपले, या उपाधीचे प्रयोजन संपले की, तो या विश्वामधून निघून जातो.  असे सुंदर जीवन ज्ञानी पुरुष जगतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, August 15, 2023

भक्तीचे साधन ज्ञान आहे | Knowledge - The Means Of Devotion

 



ज्यावेळी एखाद्या वास्तूचे गुण, धर्म, माहात्म्य, सौंदर्य, उपयोगिता वगैरे संपूर्ण अज्ञात असते त्यावेळी अशा अज्ञात वस्तूवर किंवा व्यक्तीवर कोणताही मनुष्य प्रेम करू शकत नाही.  ती वस्तु प्राप्त करावी ही इच्छा सुद्धा उत्पन्न होत नाही.  म्हणून व्यवहारामध्ये आपल्याला जेव्हा वस्तूचे गुण, धर्म, महत्व, उपयोगिता वगैरेंचे प्रत्यक्ष ज्ञान होते तसे आपले मन त्या वस्तूकडे आकर्षित होते.  जरी ती वस्तु आपण प्रत्यक्ष बघितली नसली तरी तिच्या गुणश्रवणाने त्या वस्तूकडे आकर्षित होतो.  कळत नकळत त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होते.  अनेक लोकांच्याकडून त्या वस्तूचा गुणगौरव ऐकतो तितके त्याचे महत्व अधिक वाटावयास लागते.  ओढ निर्माण होते. वस्तु हवीहवीशी वाटू लागते.  ती वस्तु प्रिय वाटते.  स्नेह वाढतो.  हे व्यवहारात बघतो.

 

त्याचप्रमाणे परमेश्वर पूर्णतः अज्ञात आहे.  तो कसा आहे ?  कोठे आहे ?  त्याचे स्वरूप, कार्य, ऐश्वर्य काहीही माहीत नाही.  अशा पूर्ण अज्ञात परमेश्वरावर परमप्रेमरूप भक्ति करणे अशक्यप्राय आहे.  जो परमेश्वर पूर्ण अज्ञात आहे, त्याविषयी मनुष्याच्या मनात भक्तीची उदात्त वृत्ति कशी निर्माण होणार ?  हे कधीही शक्य नाही.  म्हणून काही आचार्य म्हणतात की, अशा प्रकारची भक्ति निर्माण होण्यासाठी, भक्तीचा उदात्त भाव निर्माण होण्यासाठी भक्ताला, साधकाला, ईश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  नवविधा भक्तीमध्येही पहिली 'श्रवणभक्ति' आहे.

 

श्रवणामधून ईश्वराचा महिमा, माहात्म्य, विभूति तसेच अनेक अंगांचे ज्ञान होते.  सौंदर्य, माधुर्य, परमेश्वराचे भक्तवात्सल्य, करुणास्वरूप, भक्तांचा रक्षणकर्ता, उद्धारकर्ता, तसेच सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, विश्वाचा नियामक, उत्पत्तिस्थितिलयकर्ता वगैरे स्वरूप श्रवण केल्यामुळे परमेश्वराच्या सत्तेची जाणीव होते.  कळत नकळत मनात श्रद्धा निर्माण होते.  प्रेम निर्माण होते.  त्याच्या कथा, कल्याणगुण ऐकत असताना मनामध्ये भक्तीचा भाव उत्कर्षित होऊन, मन तल्लीन होते.  मन अत्यंत शुद्ध होते.  मनाला शुद्ध, निर्विषयक आनंदाची अनुभूति येते.  त्यामुळे मन परमेश्वराकडे अधिकाधिक ओढ घेऊ लागते.  याप्रकारे प्रेमाचा उत्कर्ष होतो.  म्हणून भक्ताला ईश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे.  भक्तीचा उत्कर्ष होण्यासाठी ज्ञान हे साधन होते.  भक्तिरूपी फळ ही त्याची पूर्णता आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ




Tuesday, August 8, 2023

कुतूहल आणि विकल्प | Curiosity & Doubtfulness

 



अज्ञानी लोक सतत विषयचिंतन करीत असल्यामुळे प्रत्येक विषयाबद्दल त्यांच्या मनात नको इतकी जिज्ञासा आणि कुतूहल असते.  हे काय ?  ते काय ?  येथे नवीन काय मिळते ?  तेथे काय मिळते ?  नवीन प्रकार, नवीन फॅशन हे शोधण्यातच त्यांचे आयुष्य जाते.  याउलट ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये विषयांचे थोडेही कौतुक नसते.  त्याच्यासमोर काहीही ठेवा, तो त्या विषयाचा आवश्यक तितका उपयोग करेल आणि नंतर तो विषय बाजूला ठेवून देईल.  याचे कारण त्याला निश्चित माहीत असते की, विश्वामध्ये जे जे दृश्य व निर्मित आहे ते सर्वच नाशवान, अनित्य व मिथ्या स्वरूपाचे आहे.  एक ना एक दिवस हे सर्व नष्ट होणार आहे.  म्हणून त्याला कोणत्याही विषयाचे आकर्षण वाटत नाही.  विषय असतील तरी आणि नसतील तरी तो आनंदाने राहतो.

 

अज्ञानी मनुष्याच्या मनात मात्र सतत सर्व शंकाच असतात.  ईश्वर, गुरु, शास्त्र, स्वतःचे जीवन, दुसरी माणसे अशा सर्वांच्याविषयी शंका असतात.  खरेच ईश्वर आहे का ?  असेल तर कोठे आहे ?  कसा आहे ?  वेदशास्त्र खरे आहे का ?  हे गुरु मला ज्ञान देऊ शकतील का ?  मी हे करू शकेन का ?  ही व्यक्ति चांगली आहे की वाईट आहे ?  आता मी काय करावे ?  हे करावे की करू नये ?  अशा एक नव्हे दोन नव्हे, तर अनेक शंका क्षणाक्षणाला अज्ञानी मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात.  या शंका, विकल्प, संशय त्याला स्वस्थ बसू देत नाहीत.  तो सतत अस्थिर, उद्विग्न व विक्षिप्त असतो.  शेवटी या संशयी पुरुषाचा विनाश होतो.

 

ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये मात्र शास्त्र, ईश्वर, गुरु यांच्याबद्दल एकही विकल्प किंवा शंका नसते.  त्यामुळे तो नितांत श्रद्धेने गुरुमुखातून शास्त्राचे श्रवण करतो.  अनन्य भक्तीच्या भावाने ईश्वराला शरण जाऊन ईश्वरावर निर्भर होऊन राहतो.  यामुळे तत्त्वाचे स्वरूप त्यालाच यथार्थ, सम्यक व निःसंशय समजलेले असते.  यथार्थ ज्ञानामुळे त्याला परमपदाचा साक्षात् अनुभव येतो.  म्हणून ज्ञानी लोक विश्वामध्ये एखाद्या सम्राटाप्रमाणे राहतात.  ब्रह्मा-विष्णु-महेश ज्याप्रमाणे आप्तकाम-पूर्णकाम होऊन राहतात, तसेच हे ज्ञाननिष्ठ, नरोत्तम पुरुष या जगतामध्ये राहतात.  त्यांची बुद्धि ज्ञानाने अत्यंत विशुद्ध झाल्यामुळेच ते आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर होतात.  स्वस्वरूपाच्या साम्राज्यावर ते आरूढ होतात.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, August 1, 2023

सृष्टिचक्र | The Cosmic Cycle

 



अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत |

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ||           (गीता अ. २-२८)

हे अर्जुना !  सर्व भूतमात्रे अव्यक्तामधून व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्तामध्येच लय पावतात.  म्हणून तू कोणासाठी आणि कशासाठी रडतोस ?  याठिकाणी महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.

 

१) परमेश्वराच्या त्रिगुणात्मक मायाशक्तीमुळेच विश्वाची आणि भूतमात्रांची उत्पत्ति-स्थिति-लय होते.  म्हणून सर्वच मायाकार्य आहे.  म्हणजेच जीव, जगत, परमेश्वर, जीवाचा सुखदुःखरूपी संसार सुद्धा मायाकल्पित आहे.  सत्य नाही.

 

२) प्रलयानंतर विश्व आणि सर्व जीव त्रिगुणात्मक प्रकृतीला किंवा अव्यक्तावस्थेत प्राप्त होतात.  येथे भगवान माझ्या स्वरूपाला येतात असे कधीही म्हणत नाहीत.  म्हणजेच मृत्युनंतर कोणताही अज्ञानी जीव परमेश्वरस्वरूपाला प्राप्त होत नाही.  तर अव्यक्तावस्थेला प्राप्त होतो की, ज्या अवस्थेमधून तो पुन्हा व्यक्त होतो, म्हणजे जन्माला येतो, हे स्पष्ट होते.

 

३) हे सर्व विश्व मायेचे कार्य असल्यामुळेच ते मायाधीन आहे.  मायांतर्गत आहे.  मायेने नियमित केलेले आहे.  तसेच जीव सुद्धा त्रिगुणात्मक मायेच्या आश्रित आहेत.  म्हणून त्यांचे जाणे-येणे, जन्म-मृत्यू, तसेच ऊर्ध्वगति किंवा अधोगति हे सर्व अज्ञानांतर्गतच आहे.  त्यामुळे प्रकृतिवश झाल्यामुळे अविद्याकामकर्मरूपी ग्रंथींचा छेद होईपर्यंत – पुनरपि जननं पुनरपि मरणं |  पुन्हा पुन्हा जन्ममृत्युरूपी संसारामध्येच अडकलेले असतात.  संसार हेच त्यांच्या कर्माचे फळ आहे.

 

४) हे सर्व विश्व जरी त्रिगुणात्मक मायेमधून निर्माण झालेले असेल तरी भगवान येथे मायेने विश्व निर्माण केले असे म्हणत नाहीत.  उलट मी विश्व निर्माण केले असे म्हणतात.  याचे कारण केवळ त्रिगुणात्मक प्रकृति स्वतः जड आणि अचेतन असल्यामुळे स्वतंत्रपणे स्वतः विश्वाची रचना करू शकत नाही.  मायेच्या कार्याच्या मागे चैतन्यस्वरूप पुरुषाची आवश्यकता आहे.  त्याच्या सत्तेशिवाय मायेला सत्ता आणि चेतना मिळू शकत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ