Friday, October 24, 2014

तीन ऋणं | Three Debts
कर्माचे रहस्य न जाणता मनुष्य सर्व कर्मसिद्धीचे कर्तृत्व अहंकारामुळे आपल्याकडेच घेतो.  देवांच्या कृपेमुळे मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय त्यांना न देता स्वार्थाने प्रेरित होवून स्वतःकडेच घेतो.  आणि स्वतःच्या सुखासाठीच त्या फळाचा उपभोग घेतो.  त्यांच्या कृपेने आपली समृद्धि आणि भरभराट होत आहे.  यात माझे स्वतःचे कर्तृत्व नाही, याची जाणीव ठेवणे म्हणजेच देवांचे ऋणी होणे होय.
 

प्रत्येकाच्या जीवनामध्ये तीन प्रकारची ऋणं आहेत.  १) देवण,  २) षिण,  ३) पितृण. ही तीन ऋणं पूर्ण न करता स्वशरीरपोषणासाठी, इंद्रियभोगासाठी जो सर्व भोग स्वार्थाने, कामुकतेने भोगतो तो सर्व देवांचा चोर आहे.  तो श्रेष्ठ लोकांच्यामध्ये निंद्य होतो.


देवऋण – हे फेडण्यासाठी देवांना साधनभूत असणारे श्रौतस्मार्तादि, यज्ञयागादि कर्म करून त्यामध्ये त्या त्या देवतांच्यासाठी आहुती अर्पण करून देवांना संतुष्ट करावे.

 
षि – हे पूर्ण करण्यासाठी ब्रह्मचर्य वृत्तीने सर्व इंद्रियांच्यावर आणि उपभोगांवर संयमन करून नियमित, विवेकी जीवन जगावे.  आचार, विचार आणि उच्चाराने चारित्र्यसंपन्न जीवन जगावे. समर्थ म्हणतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो || (मनोबोध)

पितृ – प्रजोत्पत्ति करून हे फेडावे.  श्राद्धपिंडादि तर्पण करून पितरांना संतुष्ट करावे.

जो ही ऋणे न फेडता स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो तो चोरच आहे.  चोर कोण आहे ?  दुसऱ्याच्या मालकीची वस्तु स्वतःचीच आहे असे समजून जो त्यावर मालकी हक्क दाखवितो आणि स्वतःसाठी उपभोगतो तोच खरा चोर आहे.  आपल्याला जे काही मिळालेले आहे ते खरोखर कोणाच्या मालकीचे आहे ?  हे स्वकर्तृत्वाने मिळालेले आहे का ?  याचा विचार मनुष्य कधीही करीत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ

Tuesday, October 21, 2014

देवता व मनुष्य यांची सुसंगति | Synergy between Gods and Human


मनुष्याने देवतांना संतुष्ट केले तर त्या देवता प्रसन्न होवून मनुष्याला सर्व प्रकारचे उपभोग देवून संतुष्ट करतील.  याप्रमाणे एकमेकांना संतुष्ट करून मनुष्याने जीवन जगत रहावे.  विश्व म्हणजेच निसर्ग.  विश्वामधील निसर्गाची शक्ति आणि मनुष्य यामध्ये सुसूत्रता आणि सुसंगति निर्माण झाली तरच हे विश्वचक्र नियमाने चालेल.

जर मनुष्य मन मानेल त्याप्रमाणे स्वैर, उच्छृंखल, दुराचारी बनून त्याचे जीवन स्वार्थ आणि लोलुपतेने बरबटलेले असेल तर तोच स्वतः स्वतःच्या पुरुषार्थाने विश्वचक्रामध्ये प्रतिबंध निर्माण करतो.  त्यामुळे निसर्गाचे नियम सुव्यवस्थित कार्य करणार नाहीत.  याला जबाबदार ईश्वर, निसर्ग किंवा विश्व नाही.  तर मनुष्यच पूर्णतः जबाबदार आहे.  विश्वामधील सर्व प्रश्न मनुष्यनिर्मितच आहेत.  तो स्वार्थाने आणि अहंकाराने विश्वामध्ये विसंगति निर्माण करीत आहे.  म्हणून येथे म्हटले आहे – परस्परं भावयन्तः |

मनुष्याने ईश्वरासाठी जगावे आणि त्याची परतफेड म्हणून परमेश्वर मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण करेल, कारण सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही.  जोपर्यंत विश्वातील शक्ति मनुष्याला अनुकूल होत नाही तोपर्यंत त्याला कधीही यश किंवा ईप्सित फळ प्राप्त होणार नाही.  म्हणून मनुष्य आणि देवांची शक्ति यांनी परस्परांना अनुकूल होणे आवश्यक आहे.
 
म्हणून मनुष्याचे जीवन हे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा केवळ कामनापूर्तीसाठी नसून मनुष्य आणि विश्व यामध्ये एक प्रकारचा समन्वय व सुसंगति निर्माण करण्यासाठी आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

 
- हरी ॐ

Tuesday, October 14, 2014

कर्मबंधन | Bondage of Actions


लौकिक आणि व्यावहारिक कर्म असो किंवा शास्त्रप्रतिपादित कर्म असो, ते जर मनुष्याने कामनेने प्रेरित होवून आणि कर्मफळाच्या अपेक्षेने केलेले असेल तर ते कर्म व्यावहारिक दृष्टीने कितीही चांगले असले तरी बंधनकारक होते.  कसे ?

कोणतेही कर्म कामनेने प्रेरित होवून केले असता त्यामध्ये आपोआपच कर्मफळाची अपेक्षा निर्माण होते.  ते फळ किती असावे, कसे असावे, केव्हा मिळावे याची सर्व कल्पना मनुष्य आपल्या मनामध्ये निश्चित करून ठेवतो आणि ज्यावेळी त्या कर्मानुसार फळ मिळते त्यावेळी मनुष्य ते फळ जसेच्या तसे न स्वीकारता त्याने केलेल्या कल्पनेमधून किंवा अपेक्षेमधून बघत असतो.  त्यामुळे मनामध्ये साहाजिकच दोन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण होतात.  ते फळ त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे असेल तर सुखकारक, आनंदवर्धन करणारी वृत्ति निर्माण होते आणि जर ते फळ अपेक्षेपेक्षा कमी अथवा अपेक्षेच्या विरुद्ध असेल तर ते दुखःवर्धन करणारे होते.

दुर्दैवाने आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नसते.  अगदी झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत अपेक्षाभंगच होत असतात.  याचे कारण आपण विश्वावर, कर्मावर, तसेच कर्मफळावर नियमन करू शकत नाही.  इतकेच नव्हे तर, मी माझ्यावरही नियमन करू शकत नाही.  त्यामुळे कर्म तेच असेल आणि कर्माचे फळही एकच असेल तरीसुद्धा मी ते माझ्या अपेक्षेमधून पाहिल्यामुळे मनामध्ये उद्विग्नता, द्वंद्व, वैफल्य, नैराश्य निर्माण होते.  हेच कर्मबंधन होय.

प्रत्यक्षात कर्म किंवा कर्मफळ मनुष्याला कधीही बद्ध करीत नाही.  तर त्यामागील अपेक्षा बद्ध करणारी आहे.  यामुळे मनात सतत रागद्वेषादि प्रतिक्रिया निर्माण होवून मनाचे संतुलन किंवा मनाचा तोल जातो.  जितक्या अपेक्षा अधिक तितके विक्षेप अधिक !  जितक्या प्रतिक्रिया अधिक तितके नैराश्य, द्वंद्व अधिक निर्माण होते आणि कर्मबंधन अधिक दृढ होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, October 7, 2014

कर्मानुरूप गति | Progress Through Actions
जघन्यगुणवृत्तस्थाः अधो गच्छन्ति तामसाः |  (गीता अध्याय १४-१८)
 प्रत्येक जीवाला त्याच्या कर्म व उपासनेनुरूप गति प्राप्त होते.  निकृष्ट असलेल्या गुणांच्यामध्ये जे स्थित आहेत असे मूढ, तामसी पुरुष अधोयोनीला जातात.
 यामुळे कर्म न करण्यापेक्षा नियत कर्म करणे हे निश्चितच श्रेयस्कर आहे, कारण
 
 १. नियत कर्मामुळे इंद्रियांच्या सहजस्वाभाविक, स्वैर विषयोपभोग घेण्याच्या प्रवृत्तीवर हळुहळू नियमन होते.
 २. अधर्मप्रवृत्तीपासून इंद्रिये निवृत्त होवून धर्माचरण आणि सदाचारामध्ये प्रवृत्त होतात.
 ३. यामुळे इंद्रियांच्यावर दमन होते.
 ४. नियत कर्म न करण्यामुळे निर्माण होणारे प्रत्यवाय दोष नाहीसे होतात.
 ५. ईश्वराची कृपा आणि अनुग्रह प्राप्त होतो.
 ६. हळुहळू चित्तशुद्धि प्राप्त होवून रागद्वेषांचा क्षय होतो. तसेच, पापकर्मांचाही क्षय होतो.
 ७. त्यामुळे अंतःकरण विवेकवैराग्यसंपन्न होवून संयमित होते.
 ८. या सर्वांचा परिपाक म्हणजे गुरुप्राप्ति होतेत्यानंतर गुरुकृपेने ज्ञानप्राप्ति होवून मोक्षप्राप्ति होते.  जीवाला पूर्णता मिळते.  जीव सर्व सुखदुःखात्मक, अविद्याकल्पित संसारामधून मुक्त होतो.
 
यावरून सिद्ध होते की, नियत कर्म करणे हेच श्रेयस्कर आहे.  म्हणून हे अर्जुना !  तुझी वृत्ति कर्म न करण्याकडे ठेवू नकोस.  तर कर्म करण्याकडेच ठेव.
 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ