आज संपूर्ण
विश्वाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल इतकी भव्य आणि दिव्य आपली सनातन हिंदु
संस्कृति आहे. आपली संस्कृति भोगमय
नसून त्यागमय आहे. यामुळे आजकाल पाश्चिमात्य लोक सुद्धा आपल्या संस्कृतीकडे,
आपल्या आध्यात्मिक तत्वज्ञानाकडे आकर्षित झालेले आहेत. त्याच्या अभ्यास करून कदाचित अमेरिकन माणसे
बदलतील, परंतु दुर्दैवाने आपण मात्र आपल्या या अमूल्य ठेव्यापासून वंचित होत आहोत.
आज
आमच्या जीवनाची मूल्ये बदललेली आहेत. आपले
तत्वज्ञान पुरातन आहे म्हणून ते dead आहे, असे
म्हणून आपण त्याकडे पाठ फिरवीत आहोत. उद्या
तेच तत्वज्ञान ज्यावेळी अमेरिकन लोक त्यांची मोहर (seal) लावून
आपल्याला देतील, कदाचित त्यावेळी आम्ही ते प्रतिष्ठेपायी ग्रहण करू. परंतु त्यावेळी फार उशीर झालेला असेल.
आपल्या
जीवनामध्ये आपण कशाला किंमत
देतो, यावरच आपले जीवन अवलंबून आहे. गेल्या
शतकामध्ये अमेरिकेमध्ये अर्थ आणि काम यालाच किंमत होती. यामुळेच ऐहिक व भौतिक समृद्धीच्या बाबतीत अमेरिका परमोच्च शिखरावर
आरूढ झाली. परंतु त्याचमुळे तेथील
प्रत्येक मनुष्याचे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवन उध्वस्त झाले. बहिरंगाने प्रगति होत असताना मनुष्याचे अंतरंग
मात्र कामक्रोधादि विकारांनी पोखरून निघाले. विषयांची, भोगांची, सुखसोयींची रेलचेल असूनही
त्यांना अंतरिक शांतीची मात्र उणीव भासली. त्यामुळे त्यांची जीवनाची value ही बदलली.
आंतरिक
शांतीसाठी व सुखासाठी अमेरिकन लोक हिंदू तत्वज्ञानाकडे आकृष्ट झाले. परंतु, दुर्दैवाने आम्हाला मात्र अमेरिकेची value आहे. आमची तरुण पिढी तेथील संस्कृतीचेच अनुकरण करते. प्रत्येक
गोष्टीमध्ये आम्हाला अमेरिका आदर्श वाटते. आम्ही कसे राहावे? कसे बोलावे? कोणते कपडे घालावेत? काय खावे? काय प्यावे? हे अमेरिका ठरविते. त्यामुळे सद्य समाजामध्ये भ्रष्टाचार, व्यभिचार
वाढीस लागला आहे.
- "व्यक्तिमत्त्व
विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती
लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ती, जुलै २००७
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, July 2007
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, July 2007
-
हरी ॐ –