Tuesday, May 14, 2013

आदि शंकराचार्य जयंती - १५ मे २०१३





श्रीमद्भभागवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात - 

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे ||

सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या विनाशासाठी तसेच, धर्माच्या संस्थापनेसाठी परमेश्वर प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. अवतार ही कल्पना नाही तर संपूर्ण विश्वाच्या सुव्यवस्थेसाठी, धर्मरक्षणासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी असणारी सृष्टीची व्यवस्था आहे.

आज वैशाख शुद्ध पंचमी ! भगवद्पुज्यपाद आदि शंकराचार्य जयंती ! आचार्यांचा जन्म हा युगप्रवर्तक जन्म आहे. आदि शंकराचार्य म्हणजे साक्षात् शिवाचा अवतार !  स्कन्दपुराणामध्ये शिव स्वत:च सांगतात -

मदंशजानं देवेशि कलौ अपि तपोधनम् |
केरलेषु तदा विप्रं, जनयामि महेश्वरि ||

शिवावतार असणाऱ्या आचार्यांचा हा युगावातर आहे. वैदिक धर्माची ज्योती आपल्या युगप्रवर्तक हातांनी त्यांनी सतत प्रज्वलित ठेवली.

काळ बदलला, विश्व बदलले. विज्ञानाने नवनवीन शोध लावले, सुखसोयींची साधने बदलली, मनुष्याच्या जीवनपद्धती बदलल्या. असं सर्व काही बदलत असताना या सर्वांची प्रतिष्ठा ज्यामध्ये आहे, असा आर्य सनातन वैदिक धर्म मात्र बदलला नाही. अनादी काळापासून या वैदिक संस्कृतीवर अन्य धर्मियांचे अनेक आघात झाले परंतु वैदिक धर्माच्या मुलतत्वांना कणभर देखिल क्षति पोहोली नाही.

आदि शंकराचार्यांनी आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यामध्ये वैदिक धर्माचे रक्षण केले. वेदांच्यामधील, उपनिदांच्या मधील गूढ तत्वज्ञान सामान्य मनुष्याला समजेल अशा पद्धतीने आपल्या भाषांच्यामधून, प्रकरणग्रंथांच्यामधून व अनेक सुंदर स्तोत्रांच्यामधून कथन केले.

धर्मरक्षणासाठी भारतामध्ये चार दिशेला चार धर्मपीठे स्थापन करून त्यांची कार्यव्यवस्था सर्वासंगपारित्यागी विरक्त संन्याशांकडे सोपविली. त्रिविध तापांनी होरपळलेल्या, दु:खग्रस्त नैराश्याने विफल, उद्विग्न, मोहग्रस्त, शोकाकुल, मनुष्यासाठी आचार्यांचे तत्वज्ञान हे यावश्र्चन्द्रदिवाकरौ दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, आदि शंकराचार्य जयंती १५ मे २०१३, श्रुतिसागर आश्रम.
- हरी ॐ

Sunday, May 5, 2013

श्रद्धा – विज्ञानाचा पाया (Faith – Foundation of Science)

कारणं विना कार्यं न सिध्यति | असा शास्त्राचा सिद्धांत आहे. कारणाशिवाय कोणत्याही कारणाची निर्मिती होत नाही. प्रत्येक दृश्य कार्यामागे त्या कार्याचे कारण व ते कार्य निर्माण करण्यामागचे काहीतरी प्रयोजन हे असतेच.

व्यवहारामध्ये आपण पाहतो की, साधी एक छोटीशी टाचणी जरी दिसत असेल तरी त्यामागे टाचणी निर्माण करणारा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तसेच टाचणीच्या निर्मितीमागे निश्चित असे काहीतरी प्रयोजन आहे. उगीचच विनाकारण टाचणी बनविली जात नाही. त्या टाचणीचा काहीतरी विशेष उपयोग आहे. इतकेच नव्हे तर टाचणी बनविताना, ‘ती कशी असावी?’, ‘टाचणीची लांबी, जाडी, वजन, आकार कसे असावे?’, याचा व्यवस्थित विचार करूनच निर्मिती केली जाते.

यावरून स्पष्ट होते की, विश्वामधील एखाद्या छोट्या वस्तुमागे सुद्धा कारण हे आहेच. तर मग हे इतके विशाल, जगड्व्याळ विश्व, निसर्ग, सूर्य-चंद्र-ग्रह-तारे-नक्षत्र हे सर्व कार्य दिसत असेल तर मग यामागे निश्चितपणे विश्वाचे काहीतरी कारण हे असलेच पाहिजे. करणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्य अस्तित्वातच येऊ शकत नाही. या न्यायाप्रमाणे विश्वाच्या निर्मितीमागे कारण हे आहेच.

तेच विश्वनिर्मितीचे कारण शोधण्याचा आज विज्ञान सुद्धा कसोशीने प्रयत्न करीत आहे. विज्ञान जर विश्वाच्या कारणाचा शोध घेत असेल तर निश्चितपणे विश्वाच्या मागील कारणाचे अस्तित्व विज्ञानाने मान्य केले आहे, हेच सिद्ध होते. विज्ञानाने त्या कारणाच्या अस्तित्वावर प्रथम विश्वास ठेवला. म्हणजेच श्रद्धा ठेवली. श्रद्धा ठेवल्यावरच विश्वाच्या अज्ञात कारणाच्या शोधास प्रारंभ झाला. म्हणून अज्ञाताच्या शोधामध्ये श्रद्धेनेच प्रारंभ होत असून श्रद्धा हाच विज्ञानाच्या सर्व शोधांचा पाया आहे. आधार अधिष्ठान आहे.




- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ती, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011

- हरी ॐ