Saturday, December 24, 2016

मानव कोण आहे? | Who is Human?


यः मानवःमानव कोण आहे ?  मननशीलात् इति मानवः |  जो विवेकी मनुष्य गुरुपदेशाचे श्रवण करून सूक्ष्म विवेकाने आत्मानात्मस्वरूप जाणून अनात्मविषयांचा त्याग करतो आणि नित्य, शाश्वत असणाऱ्या आत्मस्वरूपाचाच आश्रय घेतो, तोच खऱ्या अर्थाने मानव आहे.

नवं नवं संकल्पविशयं जातं कामयते इति नवः कामी तद्विपरीतः मानवः अकामी इत्यर्थः |
ज्याच्या मनामध्ये सतत एकामागे एक नवीन नवीन विषयांचे संकल्प निर्माण होतात त्याला नवः असे म्हणतात.  तोच कामी आहे.  थोडक्यात असंतुष्ट, अतृप्त पुरुषाला नवः असे म्हटले आहे आणि ‘मा’ म्हणजे नाही.  कामी पुरुषाच्या विरुद्ध असलेला जो तो ‘मानव’ होय.

म्हणून मानव शब्दाचा अर्थ होतो – ज्याच्या मनामध्ये नवीन नवीन कामना निर्माण होत नाहीत असा अकामी पुरुष हाच मानव म्हणण्यास योग्य आहे.  याचे कारण तो चिंतनशील असतो यामुळे विवेकाच्या साहाय्याने सत् आणि असत् वस्तूचा आश्रय घेतो.

त्याचा परिणाम म्हणजे अनित्य, असत् स्वरूपाच्या सर्व विषयांच्या कामना गळून पडतात आणि तो अकामी होतो.  असा अकामी पुरुषच संतुष्ट असून त्याला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहात नाही


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 20, 2016

परमेश्वराच्या अवताराचे प्रयोजन | Purpose of God’s Incarnation


शरीराने, वाचेने आणि मनाने संपूर्ण शास्त्रनिषिद्ध कर्मे करतात ते पापी, दुष्ट पुरुष आहेत.  जगाच्या नाशालाच ते जन्मलेले असल्यामुळे अशा उन्मत्त, अहंकारी, स्वैर दुष्टांचा संहार करून विश्वामध्ये पुन्हा धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.  अधर्माचा उच्छेद करून म्हणजे अधार्मिक, स्वैर, हिंसाचारी असलेल्या दुष्ट पुरुषांचा नाश करून अभ्युदय-निःश्रेयस प्राप्तीचे साधन असलेल्या धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो.

सर्व अधिकारी, श्रद्धावान लोकांनी शास्त्रप्रतिपादित कर्मांचे नियमाने अनुष्ठान करणे म्हणजे धर्मसंस्थापना होय.  हा परमेश्वराचा अवतार प्रत्येक युगामध्ये म्हणजेच ज्या ज्या वेळी आवश्यकता असेल त्यावेळी होतो.  तसेच परमेश्वर स्वतःच योगमायेच्या साहाय्याने त्यावेळी योग्य शरीर निर्माण करून सगुण साकार रूपाला प्राप्त होतो. हाच परमेश्वराचा अवतार होय.

या अवताराची तीन प्रयोजने आहेत.  १. साधूंचे रक्षण, २. दुष्टांचा संहार आणि ३. धर्मसंस्थापना
तो हे कशासाठी करतो ?  याचे कारण यज्ञयागादि कर्मानुष्ठानाने सर्व देव संतुष्ट होतात.  मनुष्य यज्ञयागादि कर्मांच्यामध्ये देवतांचा हविर्भाग देऊन देवतांना संतुष्ट करतात.  देवता संतुष्ट झाल्या की, त्यांच्या कृपेने योग्य वेळी आवश्यकतेनुसार पर्जन्यवृष्टि होते आणि त्यामुळे धान्यसमृद्धि होते व सर्व प्राणिमात्रांचे जीवन सुकर होते.

याप्रमाणे धर्माच्या रक्षणानेच सर्व विश्वाचे रक्षण होते.  विश्वामध्ये सुस्थिति निर्माण होते.  उत्कर्ष, अभ्युदय होऊन जीवन सुखी होते.  म्हणून धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे.  यासाठीच परमेश्वर अवतार घेतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 13, 2016

ब्रह्मज्ञानी तृप्त का असतो ? | Why Self-Realized is Complete?


ब्रह्मज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाने तृप्त असतो.  व्यवहारामध्ये आपण बघतो की, मनुष्य एखाद्या वस्तूच्या प्राप्तीने तृप्त झाला तरी त्याला अन्य वस्तूंची इच्छा असतेच.  तसेच ब्रह्मज्ञानी पुरुषाला आत्मतृप्ति प्राप्त झाली तरी अन्य विषय मिळवायला काय हरकत आहे ?  परंतु ही आत्मतृप्ति बाह्य विषयांच्या प्राप्तीमधून झालेली नसून स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक अवस्था आहे.  त्यामुळे ती केवळ अनुभूति नसून तो ब्रह्मज्ञानी पुरुषाचा स्वभाव असतो.  ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर अन्य कोणताही मोठा लाभ शिल्लक राहात नाही, कारण सर्व निःसार, निःसत्त्व होते.

योगक्रियेने प्राप्त होणाऱ्या आकाशामधून गमन करणे, अणिमा, गणिमा वगैरेदि सिद्धींची तो अपेक्षा करीत नाही.  या सर्व सिद्धि मायिक असल्यामुळे संसारांतर्गत आहे.  त्यामुळे या सिद्धि मोक्षाचे साधन नसून संसारामध्येच अडकविणाऱ्या आहेत.  म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष सिद्धींची अपेक्षा करीत नाही.  काही लोकांना मृत्यूनंतर उर्ध्वगति मिळून देवपदवी मिळावी ही इच्छा असते.  परंतु या कशाचाही मोह त्याला नसतो, कारण तो आत्मस्वरूपाने सर्व विश्वाचा आत्मा झाल्यामुळे ब्रह्माविष्णुमहेशादि इंद्र, वरुणादि देवतांचा सुद्धा आत्मस्वरूप झालेला असतो.  ‘मी’ च विश्वस्वरूप आहे, ही त्याची अनुभूति असते.

तो स्वतःच जीवन्मुक्तावस्था अनुभवत असल्यामुळे श्रौतस्मार्तादि कार्मामधून प्राप्त होणारी चित्तशुद्धि व त्याद्वारे प्राप्त होणारा मोक्ष याची सुद्धा त्याला इच्छा नसते.  जो बद्ध आहे त्याला मोक्ष हवा असतो.  परंतु ‘मी’ नित्यमुक्त असल्यामुळे ‘मी’ ला कोणीही बंधन घालू शकत नाही.  ‘मी’ सर्वव्यापी असल्यामुळे परिपूर्ण आहे.  ‘मी’ तृप्त आहे.  यामुळे काहीही मिळवायचे प्रयोजन नसल्यामुळे कशाचीही इच्छा राहात नाही, अपेक्षा नाही, कारण आत्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व मायान्तर्गत आहे.  म्हणून मिथ्या आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, December 6, 2016

कर्म ईश्वरार्पण का करावे ? | Why God-Oriented Actions?

ईश्वरार्पण केलेल्या कर्मामध्ये –

१. कर्म विषयाभिमुख नसते.
२. जरी कर्म बाह्यांगाने शारीरिक असेल तरीही त्याचा आश्रय परमेश्वरच असतो. म्हणजेच प्रत्येक कर्म ईश्वराभिमुख झालेले असते.
३. अन्य कर्मांच्यामध्ये असणाऱ्या कामुकतेचा आणि उपभोगवासनेचा लवलेशही नसतो.
४. कर्म निस्वार्थ, निष्काम वृत्तीने ईश्वरसेवा म्हणून केले जाते.
५. प्रत्येक कर्मामध्ये असलेली कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावना परमेश्वरचरणी अर्पण केलेली असते.
६. कर्म जीवाला विषयाभिमुख आणि विषयासक्त न करता ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय करते.
७. रागद्वेषादि आणि कामक्रोधादि विकार तसेच, त्यांचा होणारा परिणाम कमी होवून मन शुद्ध होते.

थोडक्यात, ईश्वरार्पणबुद्धीने केलेले कर्म हे बंधनकारक न होता चित्तशुद्धीचे साधन होवून सत्वगुणाचा उत्कर्ष होतो आणि तेच कर्म क्रमाने मनुष्याला मोक्षापर्यंत म्हणजेच निरतिशय आनंदाच्या प्राप्तीपर्यंत घेवून जाते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ