Tuesday, July 30, 2013

भक्तीमधील व्याकुळता | Yearning in Devotion




स्त्री, पुत्र, देहादीमध्ये ज्याप्रमाणे ममता असते, त्याप्रमाणे केवळ परमेश्वरामध्ये ममता असून त्यामध्ये प्रियत्व असेल, तर तीच “भक्ति” होय, असे भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारदादि भागवताचार्य म्हणतात.

अशी ही अनन्य भक्ति प्राप्त करण्यासाठी काय करावे ?  आपल्यासमोर अनेक आकर्षक वस्तु, विषय आहेत.  आपली इंद्रिये, मन सतत बाह्य विषयांच्यामध्येच रममाण झालेले आहे.  त्यामुळे विषयांचेच संस्कार होऊन मनामध्ये विषयांच्याच वृत्ति निर्माण होतात.  विषयांच्यासाठीच मन व्याकूळ होते.  उपभोगांच्यासाठी शरीर, इंद्रिये आतुर होतात.  आपण स्वत:ला भक्त म्हणवून घेत असलो, वर्षानुवर्ष परमेश्वराची पूजा केली तरी परमेश्वराच्या भेटीसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी मात्र कधीही व्याकूळ होत नाही.  म्हणून आपण अजुनही विषयांचेच भक्त आहोत.

जीवनामध्ये आपण सर्वांच्यासाठी रडतो. एखादी प्रिय व्यक्ति भेटली नाही, एखादा विषय उपभोगण्यास मिळाला नाही, साधा चहा मिळाला नाही तरी आपण अत्यंत व्याकूळ होतो.  त्यासाठी तळमळतो. व्याकुळतेशिवाय व्यवहारातील एखादी क्षुल्लक गोष्टही मिळत नसेल तर तीव्र तळमळ निर्माण झाल्याशिवाय सर्वोत्कृष्ट, विश्वकर्त्या परमेश्वराची तरी प्राप्ति कशी बरे होईल?

भक्त प्रल्हाद परमेश्वराला प्रार्थना करतो,
य प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी |
त्वामनुस्मरत: सा मे हृदयान्मापसपर्तु ||                (विष्णुपुराण)             

“ हे भगवन्ता, ज्याप्रमाणे हे सर्व सामान्य, विषय लंपट, कामुक जीव विषयांच्या प्राप्तीसाठी रात्रन्दिवस तळमळतात.  त्यांना ध्यास लागतो.  त्यासाठी ते वेडे होतात.  विषयासक्तीमुळे विषयांच्याशिवाय एक क्षणही ते जगू शकत नाहीत.  त्याप्रमाणेच माझे मन तुझ्यामध्ये – परमेश्वरामध्ये पूर्णपणे आसक्त होऊ दे.  तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या अंत:करणात तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होऊ दे.  हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

 
- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ


Sunday, July 21, 2013

गुरुपौर्णिमा | Gurupournima




आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा, अर्थात गुरुपौर्णिमा होय. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य परंपरेला अतिशय महत्व आहे. या अत्यंत पवित्र दिनी भगवान वेदव्यासांचा जन्म झाल्यामुळे व्यासपौर्णिमा असे म्हणतात. भगवान व्यासांनी एक लाख मंत्रांचे विभाजन करून चार वेदांच्यामध्ये अत्यंत सूव्यवस्थितपणे संकलन केले.

वेद म्हणजेच विश्वामधील अखिल ज्ञानाचा सागर होय. गतकालापासून आजपर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये विज्ञान जे जे शोध लावीत आहे, त्या सर्वांचे स्पष्ट, शास्त्रशुद्ध व युक्तियुक्त ज्ञान वेदांच्यामध्ये आहे. हे अपौरुषेय ज्ञान आपल्यापर्यंत आणून भगवान व्यासांनी सर्व जगासमोर ज्ञानाचे भांडार खुले केलेले आहे. म्हणूनच भगवान व्यास हे संपूर्ण जगताच्या गुरुस्थानी आहेत. म्हणून व्यासपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

शिष्याने आपल्या गुरूंच्याप्रति शरणागत भाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शास्त्रकार गुरु या शब्दाची व्याख्या करतात –
गुकारो अन्धःकारः रुकारो तन्निवर्तकः इति गुरुः |

आपल्या अंतःकरणामधील अज्ञानाचा नाश करून गुरु ज्ञानज्योतीने शिष्याचे जीवन उजळवून टाकतात. अन्य सर्व भौतिक ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असणारे गुह्य आत्मज्ञान शिष्यास देऊन आत्मानुभूती घेण्यास त्याला पात्र बनवितात.

गुरु ही एक व्यक्ति किंवा एखादे शरीर नाही. तर गुरु हे तत्व आहे. गुरु हे साक्षात परब्रम्ह स्वरूप आहे. दीनांच्या उद्धारासाठी ते शरीर धारण करतात. मात्र उद्धार व्हावयाचा असेल तर गुरूंच्या चरणी नितांत श्रद्धा व एकनिष्ठ भक्ति हवी. आचार्य म्हणतात –
गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्तः
संसारादचिराद्भव मुक्तः |
सेन्द्रियमानसनियमादेवम्
द्रक्ष्यसि निजहृदयस्यं देवम् || (भजगोविंदम्)

                                                             -  परमपूज्य माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

 
- हरी ॐ

Tuesday, July 16, 2013

अदंभित्व | Non-Pretentiousness




दंभित्वाच्या वृत्तीमुळे आपण कधीही १००% श्रवण करीत नाही.  याचे कारण आपण आपले दोष कधीच प्रांजळपणे मान्य करीत नाही.  “मी चुकलो”, हे वाक्य आपल्या शब्दकोशात नसतेच.  उलट माझे दोष हे दोष नसून ते गुण कसे आहेत, हे आपण सिद्ध करीत असतो.  उदा. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये आपल्या अशिलाची केस मांडत असताना ती सदोष आहे, हे माहीत असूनही वकील युक्तिवाद करतो, पुरावे सादर करतो आणि खरयाचे खोटे व खोट्याचे खरे करतो.  अगदी त्याचप्रमाणे आपणही आपले दोष हे गुण कसे आहेत, हे युक्तिवादाने सिद्ध करतो.  आपण आपल्या दोषांच्याकडे जाणून–बुजून दुर्लक्ष करतो.  प्रत्येक चुकीला आपण स्वत:ची सुंदर कारणमीमांसा देतो.  आपला अहंकार आपले दोष मान्य करू देत नाही.
यामुळेच शास्त्र अध्ययनामध्ये प्रतिबंध निर्माण होतात.  शास्त्रज्ञान कधीही आकलन होत नाही. म्हणून आपले मन वकिलासारखे नको.  तर न्यायाधीशासारखे हवे.  न्यायाधीश दोन्हीही पक्षांच्या बाजू शांतपणे, तटस्थपणे ऐकतो.  त्यांचे सर्व युक्तिवाद संपले की, विवेकाने योग्यायोग्यतेचा निवाडा करून योग्य, न्याय्य निर्णय देतो.
त्याचप्रमाणे आपल्या मनामध्येही दोन विरोधी वृत्तींचे द्वंद चालू असते.  अहंकार, दंभ यामुळे अनेक दोष निर्माण होतात.  मनामधील या कोणत्याही वृत्तीच्या आहारी न जाता आपले दोष अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करावेत.  यासाठी धैर्याची आवश्यकता आहे.  आपल्या स्वत:च्याच मनाला सामोरे जाण्यासाठी प्रचंड मोठ्या अंतरिक शक्तीची, सामर्थ्याची आवश्यकता आहे.  दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये पुरुषार्थ नसून स्वत:चे दोष मान्य करून ते काढून टाकणे, यातच साधकाचा पुरुषार्थ आहे.
म्हणून शास्त्रामध्ये “आत्मपरीक्षण” (Self Introspection) ही महत्वाची साधना सांगितलेली आहे. आपले दोष मान्य करणे, ही पहिली साधना आणि ते जाणीवपूर्वक काढणे ही दुसरी साधना आहे. यामुळे आपोआपच दंभित्वाची वृत्ति हळुहळू कमी होऊन अदंभित्व आत्मसात होईल.


"दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010

 

- हरी ॐ

Tuesday, July 9, 2013

अंतरंगाची मशागत | Nurturing our Mind







भगवंतानी अर्जुनाला आत्मस्वरूपाचे ज्ञान श्रीमद्भगवतगीतेच्या अठरा अध्यायांच्यामधून प्रतिपादित केलेले आहे.  हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अंत:कारण हे साधन आहे आणि जेथे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञानाचे स्थानही अंत:करणच आहे.  त्यामुळे जीवनाचे अत्यंत गूढ, श्रेष्ठ, सूक्ष्म ज्ञान प्राप्त करण्यासाठी अंत:करणाची तयारी होणे अत्यंत आवश्यक आहे.
 
निरतिशय आनंद अनुभवण्यासाठी आपले मन सापेक्षतेने तरी आनंदी, शांत, प्रसन्न असले पाहिजे.  यासाठी शास्त्रकार सुंदर दृष्टान्त देतात.  जमिनीमध्ये एखादे बी पेरावयाचे असेल तर आपण काय करतो ?  बी घेऊन लगेचच पेरत नाही.  तर जमिनीची योग्य प्रकारे उत्तम मशागत करतो.  प्रथम जमिनीवरील मोठमोठे दगड, छोटे दगड, अनावश्यक वाढलेले गवत काढून टाकतो.  नंतर जमीन नांगरून तिच्यामध्ये बी पेरतो.  त्याला कुंपण घालतो.  योग्य प्रमाणात खतपाणी घालून त्या बीजाची सर्वतोपरी निगा राखतो.  त्यानंतरच योग्य काळामध्ये त्या सुपीक जमिनीमधून आपल्याला त्या बीजापासून भरघोस पिक मिळते.
 
त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणामध्ये या गुह्य ज्ञानाचे बी पेरायचे असल्यास प्रथम अंत:करणाची मशागत केली पाहिजे.  आज आपले मन अशुद्ध आहे, कारण अनके जन्मांचे आपल्या मनावर चांगले-वाईट संस्कार झालेले आहेत.  आपण आपल्या पुरुषार्थाने सतत रागद्वेषांचे, कामक्रोधादि विकारांचे पोषण करीत असतो.  ही सर्व अशुद्धता नाहीशी करण्यासाठीच सर्व साधना आहे. ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.  पूर्वतयारीसाठीच जन्मानुजन्मे लागतात.
 
श्रुति म्हणते – मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो: | (अमृतबिन्दुउपनिषद् )

मन हेच मनुष्याच्या बंधनाला किवा मोक्षाला कारण आहे.  म्हणून सर्व उपदेश मनालाच आहे. मनाला उद्देशुनच सर्व साधना आहेत.
 
 

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ती, २०१०
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010




- हरी ॐ

 
 
 
 




 

Tuesday, July 2, 2013

उत्तिष्ठत जाग्रत ! | Arise and Awake !




जसे लहान मूल पहिल्यांदाच चालायला लागल्यावर खाली पडते, खाली पडल्यानंतर पुन्हा उठते, उभे राहायला शिकते, पहिले पाउल टाकते, पुन्हा पडते. त्याचा हात सोडला तर ते मूल स्वतःच उठण्यासाठी संघर्ष करते, प्रयत्न करते. त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्येही संघर्ष आहे. स्वतःच स्वतःच्या साहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रथम आमची आमच्या जीवनावर श्रद्धा पाहिजे. दुर्दम्य आत्मविश्वास, प्रचंड मोठे धैर्य व जिद्द आवश्यक आहे. त्यामधूनच जीवनाचा अंतरंग विकास होत असतो. तोच मनुष्याचा पुरुषार्थ आहे.

भगवान हजारो वर्षांच्यापूर्वी अर्जुनाला जीवनाचे हेच रहस्य सांगतात. गीता मनुष्याला कधीही निषक्रीय बनवीत नाही. उलट जो मनुष्य जीवनाला घाबरतो, भ्याडपणे पळून जातो, आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो, अशा निराश, उद्विग्न व दु:खी मनुष्याला भगवान गीतेमधून जीवन जगण्याची सुंदर दृष्टि प्रदान करतात. जीवन खूप सुंदर आहे, ते अधिक सुंदर कसे जगावे? यासाठी बहिरंगाने जीवन बदलण्यापेक्षा जीवनाकडे पाहण्याची अंतरंग दृष्टी बदलणे आवश्यक आहे. वेदही मनुष्याला हाच आदेश देतात –

            उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत  (कठ. उप. १-३-१४)

“Arise and Awake!”  अज्ञानामध्ये गाढ निद्रिस्त झालेल्या हे जीवांनो ! उठा ! जागे व्हा ! निश्चित ध्येयांना प्रेरित होऊन श्रेष्ट आचार्यांना शरण जा. दुर्दैवाने हा मनुष्य फक्त इंद्रियभोगांना  महत्व देऊन वैषयिक जीवन जगतो. त्याच्या जीवनाचे “खाओ, पिओ, मजा करो !”  हेच सूत्र झालेले आहे. परंतु या भोगमय, पशुतुल्य, स्वैर, कामुक जीवनापेक्षा सुद्धा एक उत्कृष्ठ असे असणारे वेगळे जीवन आहे, याची जाणीव मनुष्याला झाली पाहिजे. त्याच वेळी त्याच्या जीवनाचा विकास होण्यास हळुहळू प्रारंभ होईल.


 

"व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ती,  जुलै २००७
- Reference: "Vyaktimattwa Vikas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, July 2007
                                    
- हरी ॐ