Saturday, December 26, 2015

संकटांचे प्रयोजन | Provision of Calamities


संकटं आपल्याला रडविण्यासाठी नाहीत.  पूर्णत्वाला नेण्यासाठी आपली सतत कसोटी घेतली जाते, ती या संकटातच.  जीवनमूल्यांची व दैवीगुणांची जोपासना या संकटातच होत असते.  तेथेच गुणांना प्रकट करण्याची संधी मिळते.  सुखावह, आरामशीर जीवनात सुखलोलुपता, अधार्मिक वृत्ति, अनाचार, स्वैराचार, मद्यपान हे दुर्गुण मोकाट सुटतात.  सुखावह जीवन सद्गुणांचा नाश करते.  संकट हे सद्गुणांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे.

श्रद्धा, निष्ठा, धैर्य, सहनशीलता, आत्मविश्वास व भक्ति हे मनाचे धर्म आहेत.  ते गुण मनाची अवस्था दर्शवितात.  हे दैवी गुण किती आत्मसात केले आहेत, हे प्रसंगांतूनच दिसून येते.  संकटे येतात ती मनुष्याला उर्ध्वगतीला नेण्यासाठीच येतात.  शास्त्राच्या अध्ययनाला दैवीगुणसंपत्तीची व शुद्ध, निर्मळ अंतःकरणाची आवश्यकता असते.  तसे मन या संकटांमधून तयार होते.

तसेच, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दुःखाच्या फटक्यांनी माणसाचे डोळे उघडतात व त्याला कळून येते की सर्व विषयोपभोग रसहीन आहेत. व्यवहार व्यर्थ आहे.  पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नातेवाईक हे सर्व दुःखवर्धन करणारे आहेत.  ते प्राप्त करणे हे जीवनाचे ध्येय नाही.  चिरंतन शांति व आनंदप्राप्तीसाठी शास्त्र अध्ययन हा एकमेव मार्ग आहे.

माणसे संसारसागरात गटांगळ्या खातात तेव्हा त्यांचा जीव संकटांनी बेजार होतो.  ही सर्व परमेश्वरी योजना असते.  संकटामागील परमेश्वराचा हेतु लक्षात घेऊन परिपक्व दृष्टिकोन ठेऊन शांत व प्रतिक्रियारहित होऊन संकटाला सामोरे जावे.



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, December 22, 2015

ईश्वरच दिशा देतो | God Directs our Life


ईश्वर हा विश्वनियंता असून तो प्रत्येक व्यक्तीला हळुहळू पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने घडवत असतो.  त्यामुळेच आपली इच्छा असो वा नसो, ईश्वर विशिष्ट क्रिया करण्यास आपल्याला भाग पाडतो.  दुःखांच्या प्रसंगांतून मनुष्याला जावे लागते.  एखाद्या प्रसंगात “ तू असे का केलेस ? ” असे एखाद्याला विचारले असता तो उत्तरतो, “ माझी इच्छा नव्हती पण हा निर्णय मला घ्यावा लागला. ”

विशिष्ट परिस्थिती, प्रसंग निर्माण करणारी ही श्रेष्ठ शक्ति निश्चितच आहे.  त्यामुळे अनिष्ट घटना मनुष्याला निराश करण्यासाठी अथवा दुःख देण्यासाठी नाहीत तर मनुष्याला या घटना स्पष्ट समज देतात, की परमेश्वर नियामक असल्याने मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे अथवा योजनेप्रमाणे घडणार नाही.  कदाचित मनुष्याच्या इच्छेप्रमाणे घडले तर परमेश्वराची व त्याची इच्छा सुदैवाने एकच आहे असे म्हणता येईल.

आपल्या हितासाठी विशिष्ट ध्येयानुसार परमेश्वर विशिष्ट प्रसंगांतून आपल्याला नेत नेत घडवत असतो.  तेव्हा कुरकुर न करता समाधानाने त्याला साथ देणे, हे आपले कर्तव्य आहे.  ही जीवनाची विचाराने येणारी समज फार महत्वाची आहे.  ही समज एक महत्वपूर्ण शोध आहे.  ईश्वरी सत्तेच्या जाणीवेने मनुष्यात साहजिकच नम्रता येते.  सतत या सत्तेची जाणीव पदोपदी होत रहाते.  त्यामुळेच ईश्वराबद्दल त्याच्या मनात श्रद्धेचा भाव निर्माण होतो.  आस्तिक्य बुद्धि मनात उदयाला येते.  संकटे व दुःखांचे हेच प्रयोजन आहे.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, December 15, 2015

महावाक्यांचा विचार | Analysis of Great Vedanta Principles


सर्व वेदांचे सार सांगणारी जी महावाक्ये आहेत त्यात जीवब्राह्मैक्याचे ज्ञान प्रकट केले आहे.  त्यांच्या अर्थाचा सखोल व सर्वांगीण विचार करावा.  या महावाक्यांनाच अखंडबोधार्थ वाक्य म्हणतात.  महावाक्ये आत्म्याचे अद्वैत स्वरूपाचे ज्ञान देतात.  यासाठी जे वाक्य संपूर्ण द्वैताचा निरास करून अखंडबोधार्थ ज्ञान देते, अशा महावाक्यांचा विचार साधकाने करावा.

उपनिषदातील अत्यंत प्रसिद्ध अशी चार महावाक्ये पुढीलप्रमाणे आहेत – १. प्रज्ञानं ब्रह्म |  २. अयमात्मा ब्रह्म |  ३. तत्त्वमसि |  ४. अहं ब्रह्मास्मि |  या चार महावाक्यांमध्ये मुख्यतः ‘तत्त्वमसि |’ या उपदेशपर महावाक्याचा विचार पुढील प्रमाणे करावा.  १. तत्द विचार, २. त्वं पद विचार, ३. असि पद विचार.  साधकाने मुख्यतः दोन पदांचाच विचार करावा.  १. ‘मी’ म्हणजे हा जीव,  २. ‘मी’ ला निर्माण करणारा व विश्व निर्माण करणारा – विश्वाचा कर्ता – परमेश्वर.

त्वम् पदाने जीव कोण आहे ?  जीवाचे स्वरूप काय आहे ?  जीवाला कोणत्या कारणास्तव संसार प्राप्त झाला ?  त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यु या कल्पना व अनुभव कोठून व कसे निर्माण झाले ?  ‘मी’ च्या उपाधीचा विचार टाकून देऊन त्याच्याही पलीकडे असणारा शुद्ध, निर्भेळ ‘मी’ कोण आहे ?  या प्रश्नांचा साधकाने साकल्याने विचार करावा.

तसेच ‘तत्’दवाचक जगत्उत्पत्तिस्थितिलयकर्ता,  सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वराचा विचार केल्यावर, ईश्वर हा स्वस्वरूपाने कोण आहे ?  याचा विचार करावा.  ईश्वराच्या सर्व उपाधींच्या व गुणधर्मांच्या पलीकडे असणारी त्याची शुद्ध, निरुपाधिक सत्ता विचारात घ्यावी.

‘तत्’ आणि ‘त्वम्’ या दोघांचे स्वरूप एकच आहे.  या सच्चिदानंद स्वरूपाच्या किंवा स्वस्वरूपाच्या दृष्टीने ‘असि’ पदाचा विचार करून हे ऐक्य जाणावे.  ही एकत्वाची, अखंडत्वाची संशयविपर्ययरहित दृष्टि किंवा हे ज्ञान ‘असि’ पदाने, श्रुतींच्या साहाय्याने गुरुमुखातून श्रवणाने प्राप्त करावे.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, December 8, 2015

ज्ञानासाठी नतमस्तक | Surrender for Knowledge


शिष्य असो, पुत्र असो किंवा बंधू किंवा पत्नी असो, ब्रह्मविद्येसाठी गुरूंच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय गुरु ज्ञान प्रदान करत नाहीत.  प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे जीवश्च कंठश्च मित्र !  रात्रंदिवस दोघे एकमेकांच्या सहवासात होते.  अर्जुनाने काहीही व कोणत्याही क्षणी मागावे व भगवंताने त्याची इच्छापूर्ती करावी.  अर्जुनाने बोलविता क्षणीच श्रीकृष्ण हजर होत असत.  इतका घनिष्ट सहवास असूनही भगवंतांनी जीवनाचे सर्वश्रेष्ठ रहस्य कधीही आपणहून अर्जुनाला उलगडून सांगितले नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे, अर्जुनाला स्वतःला ब्रह्मविद्येबद्दल जिज्ञासाच नव्हती आणि मी क्षत्रिय, मी अजिंक्य, महापराक्रमी, वीर, योद्धा हा त्याचा अभिमान त्याला सोडत नव्हता.  दुसऱ्यापुढे वाकणे, नम्र होणे हे त्याच्या क्षत्रियाच्या ताठर वृत्तीत कधीच बसत नव्हते.  परंतु युद्धाच्या वेळेस तो अगतिकतेने भगवंताला समर्पण झाला.  ‘सखा’ असलेल्या श्रीकृष्णाला त्याने ‘गुरूं’च्या पूज्य भावनेने स्वीकारले व शिष्यत्व पत्करले.  त्याचवेळी गीतेचा उपदेश भगवंतांनी त्याला केला.

प्राणापलीकडे विलक्षण बंधुप्रेम असणाऱ्या लक्ष्मणाने रामाची वनवासात बारा वर्षे सेवा करूनही लक्ष्मणाचा अहंकार गेला नाही म्हणून श्रीरामानेही त्याला गूढ तत्त्वज्ञान प्रकट केले नाही.

या परम पवित्र ज्ञानासाठी शिष्यही तितकाच शुद्ध, निर्मळ मनाचा असावा लागतो.  नंतरच साधकाने एकाक्षर ब्रह्माची अत्यंत व्याकुळतेने गुरूंना प्रार्थना करावी, कारण आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही.  साधकाच्या सर्व साधनेचा परिपाक, शेवट ज्ञानात होतो.  अशा सर्वगुणविशिष्ट असलेल्या ज्ञानासाठी मनोभावे गुरूंची प्रार्थना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, December 1, 2015

सद्गुरू ईश्वरापेक्षा श्रेष्ठ | Sadguru Greater than the Almighty


गुरु ईश्वरस्वरूपच असल्याने शिष्यासाठी गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच उपासना व गुरु हीच सेवा आहे.  त्याने अखंडपणे कायावाचामनसा गुरुभक्ति करावी, कारण गुरु आत्मोपदेश देऊन त्याचा आत्मोद्धार करतात.  गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत.  गुरूंच्यापेक्षा ईश्वर सुद्धा श्रेष्ठ नाही.  गुरु हेच जिज्ञासूच्या जीवनातील अंतिम व अत्युत्तम तपस आहे.  आत्मज्ञान प्रदान करून जीवाचा उद्धार करणाऱ्या गुरुसेवेपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तपस नाही.

भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूंच्याकडेच पाठवितो. म्हणून गुरुचरणाचा आश्रय घ्यावा.  याचसाठी स्वतः परिपूर्ण ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णाने सुद्धा सांदिपनी गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा व उपासना केली.  परमश्रेष्ठ गुरुस्थानी असणाऱ्या महात्म्यांचा संग, सहवास अत्यंत दुर्लभ, अनाकलनीय व निश्चितपणे फलदायी असतो.  यासाठी ईश्वर शोधण्यापेक्षा गुरु शोधावा.

गुरु हेच स्थान इतके पूज्य, पवित्र व पावन करणारे आहे की, तेथे शिष्याने यत्किंचितही व्यावहारिक बुद्धि ठेऊ नये.  व्यावहारिक बुद्धि ठेवल्याने गुरूंचे आशीर्वाद मिळत नाहीत, कारण व्यावहारिक बुद्धि सदैव रागद्वेष व अपेक्षायुक्त असते.  शिष्याने संपूर्णपणे गुरुचरणी समर्पण होऊन एकनिष्ठपणे सेवा करावी.  गुरुसेवा हीच ईश्वरसेवा होय.  गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना.  गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा !

ईश्वरावरील पराभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरूंच्यावर अनन्यसाधारण भक्ति असेल, नितान्त श्रद्धा, भक्ति, सेवा, निष्ठेने तो जगत असेल तर वेदान्तातील या मंत्रांचे गूढ रहस्य, मर्म त्याला सहज उलगडते, कळते.  तत्त्वप्रतिपादन व तत्त्वानुभूति आपोआप होते.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ