Sunday, July 29, 2018

धनाची तृष्णा | Thirst for Wealth




सर्वच मनुष्यांच्यामध्ये धनप्राप्तीची केवळ इछाच नाही तर धनाची तृष्णा आहे, कारण धन हे विषयप्राप्तीचे प्रमुख साधन आहे.  कोणताही विषय प्राप्त करावयाचा असेल, आपले जीवन सुखसोयींनी समृद्ध करायचे असेल तर धन हेच साधन आहे.  यामध्ये कोणतीही शंका नाही.  त्यामुळे धन हे वाईट नाही.  

परंतु व्यवहारामध्ये जीवन जगत असताना मनुष्य जेव्हा या धानालाच साध्य समजायला लागतो, तेव्हाच समस्यांना प्रारंभ होतो.  धनप्राप्ति हेच माझ्या जीवनाचे इतिकर्तव्य आहे, जितके धन अधिक तितका मी अधिक सुखी !  त्यामुळे धनाचे सातत्याने येन केन प्रकाराने वर्धन करणे, हेच माझे ध्येय आहे.  हा विचार मनुष्याला घातक आहे.  हीच धनाची तृष्णा आहे.  धनाच्या या तृष्णेमुळे मनुष्याच्या जीवनावर अनेक विपरीत परिणाम होतात.  

माणसाच्या मनामध्ये सतत लोभ, मोह वाढतात.  माणसाची बुद्धि मोहाने आवृत्त झाली की, त्याच्यामधील विवेक कमी-कमी व्हायला लागतो.  मनुष्य सुरुवातीला प्रामाणिक असतो.  सत्कर्म, सदाचार, यांच्या साहाय्याने सरळ मार्गाने कष्ट करून धन मिळवितो.  परंतु पैसा जरा जास्त म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त मिळायला लागला की, लोभ निर्माण होतो.  पैशाचा हव्यास वाढतो.  असा पैशाचा लोभी मनुष्य मोहीत होऊन त्याची बुद्धि भ्रष्ट होते.  अशा दुराचारी मनुष्याच्या मनामध्ये इतर माणसांच्याबद्दल द्वेष, असुया, मत्सर, क्रोध, कपट, चिंता असे अनेक विकार निर्माण होतात.  मनुष्य काही वेळेला व्यसनाधीन सुद्धा होतो.  

धनाच्या इच्छेमधुनच दुसरी लोकेच्छा निर्माण होते.  म्हणजे मानसन्मान, प्रतिष्ठा, कीर्ति यांची इच्छा होय.  या अपेक्षा मनुष्याला सुखाने, शांतीने जगू देत नाहीत.  म्हणुनच आचार्य इथे सांगतात की, हे मनुष्या !  तू या धनाच्या तृष्णेचा त्याग कर, कारण धन हे जीवनाचे साध्य नसून केवळ साधन आहे.  शरीराचे पोषण, वर्धन, रक्षण करून जीवन सुकर करण्यासाठी धनाचा निश्चितपणे उपयोग आहे.  मात्र धनाला फाजील महत्त्व देऊ नये.  धनाच्या लोभाचा, तृष्णेचा त्याग करावा.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ





Tuesday, July 24, 2018

दक्षता आणि काम-क्रोध | Alertness to Manage Desire-Anger




भगवान म्हणतात –
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ||       (गीता अ. ३-३७)
हे अर्जुना !  राजोगुणापासून निर्माण होणारा काम हाच क्रोध असून तो महाखादाड व महापापी आहे.  या विश्वामध्ये ‘काम’ हाच साधकाचा शत्रु आहे, असे तू जाण.  

यामुळे प्रत्येक साधकाने कामक्रोधरहित होणे अत्यंत आवश्यक आहे, हेच पुन्हा पुन्हा भगवान सूचित करतात.  पुन्हा पुन्हा सांगूनही याचे विस्मरण होते.  आपल्या अंतःकरणामधील कामक्रोधादि दोषांकडे साधकाचे दुर्लक्ष होते.  परंतु अशा कामक्रोधयुक्त कलुषित मनाने शास्त्राचे कितीही अध्ययन केले तरीही ते फलदायी ठरत नाही.  अशा केवळ शाब्दिक ज्ञानाने अंतरिक शांति, आनंद प्राप्त होत नाही.  म्हणूनच संपूर्ण गीतेमध्ये आणि सर्व शास्त्रामध्येही अंतःकरणशुद्धीला अत्यंत महत्व दिलेले आहे.  आपल्या अंतरिक दोषांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.  याउलट हे सर्व दोष साधकाने अत्यंत जाणीवपूर्वक अभ्यासाने काढून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे.  

अशा प्रकारे ज्या साधकांनी प्रयत्नाने कामक्रोधांवर विजय मिळवलेला आहे, त्यांचे मन त्यांच्या स्वाधीन झालेले असते.  साधन करीत असताना ते अत्यंत दक्ष, सावधान असतात.  भगवान सांगतात – कूर्मोङ्गानीव सर्वशः |  ज्याप्रमाणे समोर एखादा अडथळा दिसल्यानंतर कासव आपले अवयव लगेचच कठीण कवचाखाली ठेवते आणि तो अडथळा संपल्यानंतर पुन्हा ते अवयव बाहेर काढून पाण्यामध्ये मुक्त विहार करते, त्याप्रमाणेच हा विवेकी साधक अत्यंत दक्ष राहातो.  प्रसंग घडत असताना मनामध्ये कामक्रोध निर्माण होतील असे दिसताच त्यांच्यावर नियमन करतो.  यामुळे त्याचे मन हळूहळू कामक्रोधाच्या आवेगापासून निवृत्त होते.  म्हणूनच ‘दक्षता’ हा साधकाचा महत्वाचा गुण आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002





- हरी ॐ – 

Tuesday, July 17, 2018

आत्मज्ञांची सुखप्राप्ति | Achievements of the Self-Realized





विदितात्मनाम्” म्हणजेच आत्मज्ञ होय.  त्यांनी ब्रह्मस्वरूप हे माझेच प्रत्यगात्मस्वरूप आहे, हे निश्चितपणे जाणलेले आहे.  त्यामुळे “ब्रह्म एव सत्यम् | अन्यत् सर्वं मिथ्या इति |ही अद्वैताची पारमार्थिक दृष्टि त्यांना प्राप्त झालेली असते.  असे पारमार्थिक तत्त्व जाणणारे ब्रह्मज्ञानी यति दोन्हीही प्रकारचे सुख प्राप्त करतात.  

(१) जीवद्दशायाम् जिवंत असतानाच याच शरीरामध्ये ते यति ब्रह्मानंदाची अनुभूति घेतात.  त्यांचा आनंद बाह्य विषयांच्यावर अवलंबून नसून सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद त्यांना प्राप्त होतो.  या निरतिशय आनंदाच्या प्राप्तीमुळे ते पूर्ण, तृप्त, आनंदस्वरूपच होतात.  यामुळे त्यांच्या मनामधील सर्व कामना गळून पडतात.  भगवान अशा आत्मतृप्त पुरुषाचे वर्णन करतात -
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् |
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ||       (गीता अ. २-५५)
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः |
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते || (गीता अ. ३-१७)
याप्रकारे जीवन जगत असतानाच ते ब्रह्मानंदाची परमोच्च अवस्था, जीवन-मुक्तावस्था प्राप्त करतात.

(२) विदेहदशायाम् शरीर पडल्यानंतर शरीररहित असणारी निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाची विदेहकैवल्यावस्था ते प्राप्त करतात.  हे शरीर पडल्यानंतर ते पुन्हा कधीही या जन्ममृत्युयुक्त संसारामध्ये येत नाहीत.  भगवान म्हणतात –
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम |           (गीत अ. १५-६)

या सर्व विवेचनावरून सिद्ध होते की, प्रत्येक साधकाने प्रथम विक्षेपला कारण असणाऱ्या कामक्रोधापासून निवृत्त व्हावे.  अंतःकरणाची शुद्धि प्राप्त करून नित्यनिरंतर समाधिअभ्यास करावा.  यामुळे निःसंशय, यथार्थ, सम्यक ज्ञानाची प्राप्ति होवून त्यामध्ये निष्ठा प्राप्त होईल आणि या ज्ञाननिष्ठेचे फळ म्हणजेच निरतिशय आनंदाची अर्थात मोक्षप्राप्ति होईल.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ – 

Monday, July 9, 2018

छिन्नद्वैधा | Going Beyond the Doubts




शास्त्राचे श्रवण केल्यानंतर मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत असतात.  प्रथम आत्म्याच्या अस्तित्वाविषयीच शंका येते.  आत्मा आहे की नाही?  आत्मा आहे असे मानले तर त्यावर पुन्हा शंका येते.  आत्मा असेल तर तो चैतन्यस्वरूप आहे की जडस्वरूप आहे?  चैतन्यस्वरूप असेल तर तो नित्य आहे की अनित्य आहे?  तो नित्य आहे असे मानले तर तो देह-इंद्रिय-प्राण-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान या सर्वांपासून भिन्न आहे की अभिन्न आहे?  समजा, आत्मा हा या देहादिपासून भिन्न आहे, असे मानले तर त्याचा देहादि उपाधीशी संबंध आहे की नाही?  देहादि उपाधीशी त्याचा संबंध नाही असे मानले तर तो कर्तृत्वादि धर्मांनी युक्त आहे की नाही?  तो आत्मा कर्ता-भोक्ता नाही, असे मानले तरी तो स्वतः असंग स्वरूपाचा आहे की नाही?  तो असंग आहे असे मानले तर देहादि उपाधीने केलेल्या कर्माने तो लिप्त, स्पर्शित होतो की नाही?  तो सर्व कर्मांच्यापासून अभिन्न आहे की नाही?  

आत्मा ब्रह्मस्वरूपापासून अभिन्न असेल तर माझ्यामध्ये जीवब्रम्हात्मैक्य ज्ञान उदयाला आले आहे की नाही?  जर हे ज्ञान उत्पन्न झाले असेल तर ते यथार्थ आहे की नाही?  समजा, हे ज्ञान यथार्थ आहे असे मानले तर ते ज्ञान मुक्तीचे साधन आहे की नाही?  समजा, ते ज्ञान मोक्षसाधन आहे असे मानले तरी सुद्धा त्या ज्ञानप्राप्तीनंतर मला जीवनमुक्ति आहे की नाही?  समजा, त्या ज्ञानाने मी मुक्त झालो तरी या शरीराचा नाश झाल्यानंतर मला विदेहकैवल्यावस्था आहे की नाही?  म्हणजेच मला पुनर्जन्म आहे की नाही?  

अशा प्रकारचे अनेक, अनंत संशय आहेत.  हे सर्व संशय ज्ञानाने नष्ट होवून त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचे ज्ञान यथार्थ, सम्यक, संशयविपर्यरहित होते.  तेच यति या जीवनामध्ये जीवन्मुक्तावस्था प्राप्त करतात आणि शरीरपातानंतर विदेहकैवल्यावस्था प्राप्त करतात.  ब्रम्हात्मैक्यज्ञानामुळे अज्ञानजन्य असणाऱ्या सर्व कर्तृकारकादि प्रत्ययांचा, सर्व संचित, आगामी कर्मांचा नाश होतो.  श्रुति म्हणते – जीवब्रम्हात्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होवून जीव मुक्त होतो.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, July 3, 2018

क्रोध | Anger




कामाचेच दुसरे रूप म्हणजे ‘क्रोध’ होय.  आपली कामना पूर्ण करण्यामध्ये जर एखादा प्रतिबंध आला तर लगेचच त्या कामनेचे रूपांतर क्रोधामध्ये होते.  किंवा अप्रिय वस्तूच्या स्मरणाने, श्रवणाने, दर्शनाने सुद्धा मनामध्ये क्रोध, संताप निर्माण होतो.  म्हणजेच मन संतप्त करणाऱ्या द्वेषाच्या परिणामालाच ‘क्रोध’ असे म्हणतात.  

ज्याप्रमाणे अग्नि स्वतःच्या आश्रयाला म्हणजे लाकडालाच जाळून भस्मसात करतो त्याप्रमाणेच हा क्रोधाग्नि स्वतःच्या आश्रयाचाच नाश करतो.  या क्रोधाच्या आवेगामुळे अहंकार बळावला जातो.  मनुष्य त्यावेळी सर्वांच्यावर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करतो.  त्याचा विवेक संपतो.  मन व इंद्रियांच्यावरील संयमन सुटते आणि त्या क्रोधाच्या भरात जे करू नये ते करतो, जे बोलू नये असे अपशब्द बोलतो, जे खाऊ नये ते खातो.  त्याला कसलेच ताळतंत्र राहात नाही.  स्वतःच्या गुरुंचीही तो अवहेलना करतो.  इतकेच नव्हे तर त्या क्रोधाच्या आहारी जावून शारीरिक इजा करण्यासही तो मागेपुढे पाहात नाही.  

अशा प्रकारे, क्रोधाच्या आवेगामुळे विवेकवैराग्यादि, शमदमादि सर्व दैवीगुणसंपत्तीचा नाश होतो. मन अत्यंत विक्षेपयुक्त, संतप्त, प्रक्षुब्ध होते. अंतरिक दाह होतो.  इतकेच नव्हे तर, या क्रोधाच्या आवेगाचा बाह्य शरीरावरही विपरीत परिणाम होतो.  आचार्य सांगतात – ज्यावेळी क्रोध अनावर होतो त्यावेळी शरीराचा थरकाप होतो.  सर्वांगाला दरदरून घाम फुटतो.  ओठ दाताखाली चावले जातात.  डोळे रक्तवर्णीय होतात.  कानशीले तप्त होतात.  चेहेरा लाल होतो.  त्यावेळी श्वासोच्छ्वासही वेगाने होतो.  अशा आवेगामध्ये सापडले तर मनुष्य अक्षरशः होरपळून निघतो.  

याप्रमाणे काम आणि क्रोध यांचे आवेग अत्यंत भयंकर, मनाला प्रक्षुब्ध, अस्थिर, तप्त करणारे आहेत.  अशा मनामध्ये कधीही निरतिशय आनंदाची, शांतीची अनुभूति येवू शकत नाही.  कामक्रोधाचा आवेग वर्तमानकाळातील देह पडण्यापूर्वी, मृत्यूपूर्वी म्हणजेच तरुण वयामध्येच जो मुमुक्षु तितिक्षेच्या साहाय्याने सहन करू शकतो त्यालाच श्रावणादि साधनेमधून ज्ञानप्राप्ति होते.  तो योगी, ज्ञानी होतो आणि त्यालाच निरतिशय ब्रह्मानंदाची प्राप्ति होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002





- हरी ॐ –