Tuesday, October 25, 2016

जीवाचा जन्म, परमेश्वराचा अवतार | Being’s Birth, God’s Incarnation


परमेश्वराचा जन्म जिवांप्रमाणे नाही.  तो पापपुण्यात्मक संस्कारांमधून झालेला नसल्यामुळे कर्मवशात नाही.  त्यामुळे जन्म घेणे किंवा न घेणे याचे स्वातंत्र्य परमेश्वराला आहे.  परमेश्वराचा अवतार हा प्रारब्ध कर्माचे सुखदुःखादि फळ भोगण्यासाठी नसतो.  जीवाचे जन्म अनंत, अगणित झालेले असतात.  परंतु परमेश्वराचा जन्म मात्र आवश्यकतेनुसार होत असतो.  ज्यावेळी तो अवतार घेतो त्यावेळी मायेच्या साहाय्याने आवश्यक असणारी योग्य उपाधी निर्माण करतो.  म्हणजेच अन्य जीवांच्या उपाधीप्रमाणेच परमेश्वराची उपाधी सुद्धा मायाशक्ति निर्माण करते.

परमेश्वर स्वतः स्वस्वरूपाने जन्मरहित, अविनाशी, अविकारी असला तरी सुद्धा मायेच्या उपाधीमुळे तो मर्यादित झाल्यासारखा वाटतो.  त्याला जन्ममृत्यु आहे असे वाटते.  परंतु उपाधीमुळे अवतीर्ण झाल्यानंतर सुद्धा तो स्वतः मायेच्या अधीन होतो. त्यामुळे तो कलुषित होतो.  अशुद्ध होतो.  त्याच्या ज्ञानशक्तीमध्ये प्रतिबंध निर्माण होतात.  परंतु अवतारामध्ये परमात्मा प्रकृतीच्या अधीन न होता त्रिगुणात्मक प्रकृति त्याच्या अधीन होऊन कार्य करते.  याचाच अर्थ उपाधीमध्ये येऊनही परमात्म्याला स्वस्वरूपाचे कधीही विस्मरण होत नाही.  तो मानवी शरीरात असला तरी तो स्वस्वरूपाने सच्चिदानंद, पूर्ण स्वरूपच आहे.

             उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः |
             परमात्मेति चाप्युक्तो देहेsस्मिन्पुरुषः परः || (गीता अ. १३-२२)

या भगवंताच्या वचनाप्रमाणे तो पुरुष याच देहात मायेच्या अतीत, साक्षीस्वरूप असून प्रकृतीच्या कर्माला अनुमति देणारा, सर्वांना धारण करणारा जीवरूपाने भोक्ता असून सर्वांचा नियमन करणारा आणि सच्चिदानंद परमात्मस्वरूप आहे.  याउलट जीव मात्र देहात्मबुद्धीमुळे बद्ध, संसारी आणि मर्त्य होतो.  परमेश्वर शरीरामध्ये असूनही देहातीत असल्यामुळे तो मुक्त आहे.  यामुळे अवतारामध्ये सुद्धा परमेश्वर स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही.

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                            - हरी ॐ

Tuesday, October 18, 2016

“सूर्य निर्माण करणे” हा पुरुषार्थ नाही | “Creating the Sun” is not our Aim



सर्व जीवांची दृष्टि अज्ञानरूपी पटलाने लांछित झालेली असल्यामुळे ते स्वयंप्रकाशमान चैतन्यस्वरूप असूनही दिसत नाही, प्रचीतीला येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  ज्याप्रमाणे एखादा अंध मनुष्य चक्क सूर्यप्रकाशात उभा असूनही, सूर्याच्या प्रकाशाची उष्णता अनुभवूनही सूर्यप्रकाश प्रत्यक्ष पाहू शकत नाही.

सूर्य स्वयंप्रकाशित, तेजस्वी, प्रकाशस्वरूप आहे.  परंतु जर आपण कृष्णमेघाच्या उपाधीमधून पाहिले तर तोच सूर्य आपल्याला तेजोहीन, निष्प्रभ, काळवंडलेला दिसतो.  हा दोष सूर्याचा नसून आपल्या दृष्टीचा आहे.  सूर्य कधीही तेजोहीन नाही.  तो नित्य प्रकाशस्वरूप आहे.  त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशमान आत्मस्वरूपावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे ‘मी’ ‘मला’ यथार्थ स्वरूपाने जाणू शकत नाही.

दृष्टांतामध्ये ‘सूर्य निर्माण करणे’ हा पुरुषार्थ नसून आपल्या डोळ्यावरील आवरण दूर करणे हा आहे, कारण सूर्य नित्य प्रकाशस्वरूप असल्यामुळे आवरण दूर केले की, आपल्याला सूर्याचे साक्षात दर्शन होते.  किंवा शेवाळ्याखाली शुद्ध आणि निर्मळ पाणी असतेच.  परंतु शेवाळ्याच्या आवरणामुळे ते दिसत नाही.  म्हणून ‘पाणी निर्माण करणे’ हा पुरुषार्थ नसून, शेवाळे बाजूला करणे हा पुरुषार्थ आहे.

त्याचप्रमाणे जीवनाचा पुरुषार्थ कोणता ?  अनात्म वस्तूंचे चिंतन करणे हा पुरुषार्थ नाही.  तर शास्त्रकार सांगतात – आत्मकल्याणं एव कर्तव्यम् |  या मनुष्यशरीरामध्येच जीवन परिपूर्ण करणे हेच आत्मकल्याण आहे.  मानवाला अत्यंत दुर्लभ अशी विवेकबुद्धि दिलेली आहे.  मानवाने याच दुर्लभ नरदेहामध्ये आत्मकल्याण करून घेण्यासाठी अन्य सर्व अनात्मवस्तूंचे चिंतन करण्याऐवजी आत्मस्वरूपाचे अखंड चिंतन करावे, कारण बाह्य विषयांचे चिंतन केल्याने मन बहिर्मुख, विषयाभिमुख होऊन मनुष्याचे क्रमाने अधःपतन होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

Tuesday, October 11, 2016

आपण मुक्त का नाही आहोत ? | Why We are Not Free ?



आत्मस्वरूप सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये ‘अहं’ ‘अहं’ प्रत्ययाने अंतःस्फूर्तपणे स्पष्टपणे अनुभवाला येत असेल तर प्रयत्न न करता अनायासाने सर्व जीव मुक्तच का नाहीत ?  सर्व जीव स्वभावतः जन्मापासून मुक्त पाहिजेत.  परंतु वस्तुस्थिति पाहिली तर, सर्व जीव दुःखी, मर्त्य, संसारी दिसतात. असे का ?

सर्व जीव स्वतःला अहं प्रत्ययाच्या आलंबनाने जाणत असले तरीही त्यांच्या दृष्टीवर अज्ञानरूपी आच्छादन आल्यामुळे स्वतःला असंगचिदानन्दस्वरूपाने स्पष्टपणे जाणत नाहीत.  अहं अस्मि  ‘मी आहे’ हा सर्वांचा अनुभव आहे.  ‘मी’ या प्रत्ययाचे आलंबन देह होतो आणि देहाबरोबर ‘मी’ सुद्धा जन्ममृत्युयुक्त होतो.  यामधूनच ‘मी मर्त्य आहे’ ही भावना निर्माण होते.  थोडक्यात ‘मी आहे’ हे सर्वजण जाणत असले तरीही ‘मी सत्यस्वरूप आहे’ हे कोणीही जाणत नाही.  सत् म्हणजे नित्य अविनाशी होय.  त्रिकालेSपि तिष्ठति इति सत् |  भूत भविष्य, वर्तमान या तीन्हीही काळात सत्तास्वरूपाने असणाऱ्या स्वस्वरूपाची जाणीव असत नाही.

विश्वातील सर्व विषयांचे ज्ञान मी घेतो.  म्हणजेच हे सर्व विश्व ज्ञेय आहे आणि मी त्या सर्वांचा ज्ञाता आहे.  परंतु दुर्दैवाने तो जितके बाह्य विश्वातील विषयांचे ज्ञान घेतो तितक्या प्रमाणात त्याला स्वतःच्या अज्ञानाची अधिक जाणीव होते.  तो स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे ‘मी’ ज्ञानस्वरूप आहे हे जाणत नाही.

स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणाने दृष्टि आवृत्त झाल्यामुळे मनुष्य ‘मी’लाच देह, इन्द्रिये, मन वगैरेदि म्हणवून घेतो.  या तादात्म्यामुळे त्यांचे सर्व विकार, गुणदोष, सुख-दुःख स्वतःवर आरोपित करतो.  ‘मी सुखी’, ‘मी दुःखी’, असे अविचाराने म्हणतो. यामधूनच तो सुखाचा शोध घेतो.  परंतु शेवटी त्याच्या वाट्याला दुःख, नैराश्य येते.  सतत असंतुष्ट राहातो.  स्वतःला दुःखी, अभागी म्हणवून घेतो.  हे चिरंतन, शाश्वत सुख, आनंद बाह्य विषयांच्यामध्ये नसून ते स्वतःचे स्वरूपच आहे.  दुर्दैवाने ते चिरंतन सुख आपल्या आतच आहे हे मनुष्याला माहीत नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Tuesday, October 4, 2016

ब्रह्मप्राप्ति निरतिशय कशी असेल ? | Can Self-Realization be Absolute ?


ब्रह्मज्ञानी पुरुषाने ब्रह्मप्राप्ति केली तरीही या देहामध्ये राहात असल्याने देहेन्द्रिये वगैरेंशी तादात्म्य पावून ‘मी स्थूल आहे’, ‘मी कृश आहे’, ‘मी बहिरा आहे’, ‘मी भुकेलेला आहे’ वगैरे अनुभव येतच असतात.  या अनुभवांमध्ये मर्यादा, परिच्छिन्नत्व, दुःख, यातना, विकार या सर्व अनात्मधर्मांचा अनुभव येतो.  यामुळे ती ब्रह्मप्राप्ति निरतिशय स्वरूपाची कशी असेल ?

अनात्म्याचे अनुभव येणे हा काही दोष नाही कारण देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार हा सर्व कार्यकारणसंघात असून स्वतः तो जड आहे.  त्यांचा अनुभव येताना ‘मी शरीर आहे’ असा येत नसून मम इदं शरीरम् |’ ‘हे माझे शरीर आहे’ असाच येत असतो.  म्हणजेच हा देहेन्द्रियादि संघात ‘इदं’ या प्रत्ययाचा विषय आहे.  

घटवत् |’  घटाप्रमाणे हा संघातही दृश्य असून अनात्मस्वरूप आहे.  घटद्रष्टा घटात् भिन्नः |या न्यायाने कार्यकारणसंघाताचा द्रष्टा तो संघातापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचा, संघाताच्याही अतीत असणारा आहे.  तो या संघाताचा एक अवयव किंवा भाग नसून भिन्न असून नित्य चैतन्यस्वरूप आहे.  तोच सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये स्वयंसिद्ध स्वरूपाने सन्निविष्ट असून ‘अहं’ ‘अहं’ या प्रत्ययाने सतत अनुभवाला येतो.  तोच आपले आत्मस्वरूप असून, ‘अहं’ प्रत्ययाचा विषय आहे.  म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुष वर्तमान देहामध्ये राहात असला तरीही त्याची दृष्टि आत्मस्वरूपाची असते.

नवद्वारयुक्त शरीररूपी नगरामध्ये सर्व कर्मांचा मनाने त्याग करून, आपले मन संयमित करणारा पुरुष निःसंदेहपणे काहीही न करता आणि करविता अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहातो.
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् |
मी यत्किंचितही कर्म करीत नाही.’  ही तत्त्ववित् पुरुषाची दृष्टि असते. म्हणून उपाधीचे गुणधर्म, दोष, विकार स्वस्वरूपाला परिच्छिन्न करीत नाहीत, लिप्त करीत नाहीत, विकार करीत नाहीत.  तो उपाधीत असूनही स्वतः अपरिच्छिन्न, अविकारी, अस्पर्शित, पूर्ण स्वरूपाने राहातो.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012




- हरी ॐ