Tuesday, February 4, 2025

सत्संगाचे फळ | Benefits Of Satsang

 




हे रामा !  सत्संगाचे फळ प्रत्यक्ष बहिरंगाने दिसत नाही.  सत्संगामध्ये गेल्यावर एखादी व्यावहारिक गोष्ट किंवा वस्तु मिळत नाही.  व्यवहारामध्ये अन्य अनेक संग आहेत.  त्यामधून मनुष्याला धन, सत्ता, प्रतिष्ठा वगैरेदि अनेक दृश्य वस्तु प्राप्त होतात.  ते व्यावहारिक फळ दुसऱ्यांना दाखविता येते.  परंतु सत्संगामध्ये गेल्यावर काय मिळते ?  असा प्रश्न आपल्यास कोणी विचारला तर आपण व्यावहारिक दृष्टीने त्याचे उत्तर देऊ शकत नाही.  कारण सत्संगाचे फळ डोळ्यांना दिसत नाही.  तेथे जाऊन एखादी पदवी किंवा प्रमाणपत्र मिळत नाही.  परंतु सत्संगाचा आपल्या मनावर मात्र खूप मोठा परिणाम होतो.  आपले जीवन अंतरबाह्य बदलते.  कदाचित एखादा नास्तिक मनुष्य असेल तर तो सत्संगाच्या प्रभावाने आस्तिक, श्रद्धावान सुद्धा होऊ शकतो.

 

सत्संगामध्ये गेल्यानंतर साधकामध्ये सर्वात पहिला फरक पडत असेल तर तो म्हणजे साधक विवेकाचा आश्रय घेतो.  आपण आयुष्यामध्ये कसे जगावे ?  कशाला किती महत्त्व द्यावे ?  धर्म काय ?  आणि अधर्म काय ?  आपल्या विचारांची दिशा काय असावी ?  असे सर्व ज्ञान साधकाला होते.  मगच जीवनामध्ये बदल होऊ लागतो.  सत्संगामधून प्राप्त झालेल्या या विवेकाचे साधक रक्षण करतो.  म्हणजेच गुरूंनी सांगितलेल्या शास्त्रदृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतो.  गुरु आपल्या जीवनाला अधिष्ठानरूप होतात.

 

जसजसे साधक सत्संगामध्ये जाईल, तसतसे त्याच्या मनामधील विषयासक्तीचा प्रभाव कमी कमी होतो.  सत्संगाची आवड निर्माण होते.  त्याला भोगांच्यामध्ये, विषयांच्यामध्ये रस वाटेनासा होतो.  गुरुमुखामधून शास्त्रश्रवणाची दृढ इच्छा मनामध्ये निर्माण होते.  सत्संगामध्ये गेल्यानंतर त्याला परमानंदाची प्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, January 28, 2025

खरे प्रेम कोणावर ? | Whom Do We Love Truly ?

 




विश्वामध्ये सर्व जीव स्वतःवरच खरे प्रेम करतात.  म्हणूनच याज्ञवल्क्य ऋषि मैत्रेयीला उपदेश करतात – आत्मनः वा अरे पत्युः कामाय सर्वं प्रियं भवति |  (बृह. उप. २-४-५)
“हे मैत्रेयी !  विश्वामध्ये स्वतःच्या कामनेसाठीच मनुष्याला सर्व विषय प्रिय होतात.  जर मनुष्य अन्य व्यक्तींच्यावर, विषयांच्यावर प्रेम करीत असेल, तर ते विषयांच्यासाठी किंवा दुसऱ्यांसाठी करत नाही.  पति पत्नीवर, पत्नी पतीवर, आईवडिल मुलांच्यावर प्रेम करीत असतील, तर ते प्रेम स्वतःसाठीच आहे.  प्रेम करण्यात मला आनंद मिळतो म्हणून मी प्रेम करतो.  जेथे जेथे मला आनंद मिळतो, जी जी व्यक्ति मला आनंद देते, अनुकूल आहे, तेथेच मी प्रेम करतो. म्हणून व्यवहारामध्ये आपण कितीही I love you, I love you ! असे म्हणालो, तरी I love myself alone !  हेच सत्य आहे.  संपूर्ण विश्वामध्ये मी हाच एकमेव माझ्या प्रेमाचा विषय आहे.  कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये, काळामध्ये, स्थानामध्ये मी मला अप्रिय होत नाही.  बाकी सर्व विषय काही काळ प्रिय होतात, काळाच्या ओघात पुन्हा अप्रिय होतात.  परंतु मी मला मात्र सतत सर्व ठिकाणी सर्व काळामध्ये प्रिय होतो.
 
त्याचप्रमाणे, मी आनंदावर प्रेम करतो.  कोणताही मनुष्य कधीही दु:खावर प्रेम करीत नाही आणि आनंद हेच आत्म्याचे स्वरूप आहे.  श्रुति म्हणते – आनंदो ब्रह्मेति व्यजानात् |  (तैत्ति. उप. ३-६)
आनंद हेच ब्रह्माचे स्वरूप आहे.  परमप्रेमआस्पदत्वात् |  परमप्रेम हेच ब्रह्माचे स्वरूप
आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष आत्म्यावर, स्वस्वरूपावरच नितांत प्रेम करतो.  तो अनित्य विषयांच्यामध्ये मुळीच रममाण होत नाही.  

भगवान म्हणतात –
ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते |
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ||  (गीता अ. ५-२२)  
इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगामधून निर्माण झालेले सर्व भोग दु:खालाच कारण आहेत.  ते सर्व भोग अनित्य, नाशवान, दु:खस्वरूप असल्यामुळे ज्ञानी पुरुष त्यामध्ये रममाण होत नाही.

याउलट भगवान म्हणतात (गीता. अ. ३-१७)
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव: |  आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ||
जो आत्मरति होतो, आत्म्यावरच प्रेम करतो, तो स्वस्वरूपामध्ये स्वतःच्याच स्वरूपाने तृप्त, संतुष्ट होतो.  तोच कृतकृत्य होतो.  म्हणून ज्ञानी पुरुष आनंदस्वरूप परमात्म्यावरच प्रेम करतो.


     

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ



Tuesday, January 21, 2025

शास्त्र कसे रुजवावे ? | How To Assimilate Science ?

 



शास्त्र कसे ऐकावे ?  कसे सांगावे ?  शिष्याच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान कसे रुजवावे ?  याच्या सुद्धा विशिष्ठ पद्धती आहेत.  प्रसन्न मनाने ऐकले तर त्या शब्दांचे गूढार्थ अंतःकरणामध्ये लागेचच उमटतात.  परंतु शास्त्र ऐकताना मन उद्विग्न होत असेल तर समजावे की, आपल्या अंतःकरणात अजूनही अनेक दुर्गुण आहेत.  वैषयिक, भोगासक्त, बहिर्मुख लोक शास्त्रश्रवण करू शकत नाहीत.  मनामध्ये अनेक प्रकारांच्या भयंकर कामना आणि वासना असतील तर श्रवणाने मन शांत न होता अधिक उद्विग्न होते.  त्यालाच येथे 'पशुबुद्धि' असे म्हटले आहे.

 

म्हणून मोक्षाच्या प्रामाणिक इच्छेने जर शास्त्राचे श्रवण करायचे असेल, तर मन काही प्रमाणात तरी शुद्ध, सात्त्विक व अंतर्मुख असणे आवश्यक आहे.  अन्यथा अनधिकारी मनुष्य जर बळजबरीने शास्त्र ऐकायला बसला, तर तो अर्ध्यातून उठून जाईल.  त्याला कोणतीही प्राप्ति होणार नाही.  एका बाजूला मोक्षाची इच्छा करून शास्त्र ऐकायचे आणि दुसऱ्या बाजूने मनामध्ये विषयांच्या इच्छा निर्माण करायच्या !  असे केले तर अशा मनुष्याला ना भोग मिळत, ना स्वर्ग मिळत, ना मुक्ति मिळत !

 

याप्रमाणे अधिकारित्व नसताना, मनाची तयारी नसताना, जे लोक केवळ बहिरंगाने अध्यात्ममार्गाचे आचरण करतात, ते अध्यात्मापासून सुद्धा च्युत होतात.  पुन्हा एकदा भोगमय जीवन जगत राहतात. ते सर्व पशुतुल्य लोक आहेत. ना धड प्रपंच, ना धड परमार्थ !  ही भयंकर अवस्था आहे.  म्हणून साधकाने या मार्गामध्ये आल्यानंतर मनापासून साधना करावी.

 

रामा !  श्रेष्ठ साधु पुरुषांच्या सहवासामध्ये गेलास की, त्या सत्संगाच्या प्रभावानेच तुझे अंतःकरण शीतल होईल, तुझ्या मनामधील विषयकामनांचे जंजाळ कमी होऊन कामक्रोधादि विकार व त्यांचा प्रभाव कमी होईल.  सत्पुरुषही हे ज्ञान सहजासहजी देत नाहीत.  म्हणून ज्ञानार्जनासाठी नितांत श्रद्धा, विनयशीलता आणि भक्तीचा भाव आवश्यक आहे.  अशा मनामध्येच सत्पुरुषांचा उपदेश फलद्रूप होतो.  सत्पुरुषांच्या मुखामधून याप्रमाणे मनापासून शास्त्राचे श्रवण केले तर हे गुह्य ज्ञान, ज्ञाननिष्ठा, परमपदाची अनुभूति शीघ्रतेने प्राप्त होते.  "अरे रामा !  महिना सुद्धा नाही, काही दिवसांच्यामध्येच हे परमपद प्राप्त होते.  रामा !  अरे आत्मप्राप्तीला एक महिनाही लागत नाही.  इतके हे ज्ञान सुविज्ञेय, सुलभ आणि सहज आहे."

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, January 14, 2025

मद्योगमाश्रितः | Base Your Work in Me

 




अत्युत्तम असणारे श्रेष्ठ अधिकारी अहंकाराचा त्याग करून परमेश्वराला दृढ श्रद्धेने, अनन्य भक्तीने शरण जातात.  त्यांच्यासाठी भगवंतांनी “मय्येव मन आधत्स्व...|”  ही साधना सांगितली.  ही साधना ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी सजातीयवृत्तिप्रवाह निर्माण करून ‘अभ्यासयोग’ करावा, असे प्रतिपादन केले.  ज्यांना हेही शक्य नसेल त्यांनी सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करावी.  म्हणजेच कर्मामागील भाव बदलावा.  परमेश्वर हाच कर्तुं-अकर्तुं असून मी फक्त एक निमित्तमात्र आहे.  हे जाणून कर्मामधील कर्तृत्वबुद्धीचा त्याग करावा.

 

याठिकाणी भगवान “मद्योगमाश्रितः” हा विशेष शब्द योजतात.  माझ्या – परमेश्वराच्या योगामध्ये आश्रित होऊन कर्मे करावीत.  परमेश्वराला कर्मे समर्पण करणे हाच योग आहे.  म्हणजेच केवळ कर्म करीत राहाणे याला अर्पण म्हणत नाही.  तर अर्पण करणे ही वृत्ति आहे.  म्हणून जर कर्म परमेश्वरासाठी केले तरच तो ‘कर्मयोग’ आहे.  अन्यथा ते केवळ कर्म, काम अथवा कष्ट आहेत.  भगवान म्हणतात – जे कर्म यज्ञासाठी – परमेश्वरासाठी केले जाते ते मनुष्याला बंधनकारक नसून त्याव्यतिरिक्त केलेले कर्म मात्र त्याला बद्ध करते.

 

म्हणून बहिरंगाने कर्म कोणतेही असेल.  भजन, पूजन, कीर्तन, उपासना अशी वैदिक – धार्मिक कर्मे असतील.  किंवा साधे झाडणे, पुसणे, स्वच्छता करणे, स्वयंपाक करणे अशी व्यावहारिक कर्मेही असतील.  त्याला विशेष महत्व नाही.  त्या कर्मामध्ये जर भक्तीचा, प्रेमाचा भाव, समर्पण वृत्ति असेल तर ते प्रत्येक कर्म ईश्वराभिमुख असल्यामुळे आपोआपच आपले मन अत्यंत शांत, प्रसन्न, आनंदी होते.  या निष्काम, निःस्वार्थ बुद्धीने केलेल्या कर्मालाच ‘कर्मयोग’ किंवा ‘मद्योग’ असे म्हणतात.  ते कर्म ‘योग’ या संज्ञेस पात्र होते.  तेच क्रमाने चित्तशुद्धिद्वारा मोक्षाचेही साधन होते.

 

याउलट जे कर्म स्वार्थाने, स्वतःची कामुकता पूर्ण करण्यासाठी ‘मी करतो’ या अहंकाराने प्रेरित झालेले असते, त्या कर्मामधून कधीही शांति, आनंद अनुभवाला येत नाही.  ते कर्म मनुष्याला बहिर्मुख, विषयाभिमुख करून परमेश्वरापासून दूर दूर नेते.  मनामध्ये द्वन्द्व, विक्षेप, अहंकार-ममकार प्रत्यय निर्माण करते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, January 7, 2025

सत्संगाचे प्रयोजन | Necessity Of Satsang

 




सर्वांच्यामध्ये संसारसागर तरून जाण्यासाठी साधुसमागम म्हणजे सत्संग हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे.  याचे कारण मागे सांगितलेले शम, विचार, संतोष ही साधने आत्मसात करण्यासाठी सुद्धा शास्त्राचे श्रवण आवश्यक आहे आणि शास्त्राच्या श्रवणासाठी गुरूंची प्राप्ति म्हणजे सत्संग आवश्यक आहे.  श्रवणाचे संस्कार झाल्याशिवाय शास्त्रविचार, धर्माधर्मविचार होऊ शकत नाही.  विचाराशिवाय मनाची उपशमा होत नाही आणि मनाची उपशमा झाल्याशिवाय तृप्ति सुद्धा प्राप्त होत नाही.  म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम सत्संगाचीच आवश्यकता आहे.  हा पहिला भाग.

 

दुसरा भाग म्हणजे ज्या आत्मवस्तूचे आपल्याला ज्ञान घ्यावयाचे आहे, ती आत्मवस्तु अत्यंत सूक्ष्म असून इंद्रिये, मन, बुद्धीच्याही अतीत आहे.  त्यामुळे केवळ स्वतःच्या बुद्धीने आत्मज्ञान घेता येत नाही.  त्यासाठी गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता असते.  हा दुसरा भाग.

 

यानंतर ज्या बुद्धीने ज्ञान घ्यावयाचे, ती बुद्धि अत्यंत मर्यादित असून ती फक्त दृश्य वस्तूचेच ज्ञान देऊ शकते.  बुद्धीमध्ये रागद्वेषादि दोष असल्यामुळे ती कलुषित आणि मर्यादित असते.  म्हणून आत्मज्ञानाची स्वतःची बुद्धि हे प्रमाण होऊ शकत नाही.  आत्मज्ञान घेण्यासाठी गुरूंनाच शरण गेले पाहिजे.

 

याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर साधकाने जप-तपादि अन्य कितीही साधना केल्या, त्यामुळे चित्ताची शुद्धि झाली, तरी साधकामध्ये अहंकार हा दोष राहतोच.  अन्य सर्व साधनांनी हा दोष कमी न होता उलट वर्धन पावतो.  म्हणून अहंकाराचा नाश करावयाचा असेल तर गुरुसेवेशिवाय अन्य कोणताही उपाय नाही.  म्हणून सर्व दैवी गुणांच्यामध्ये आचार्यासेवा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ