Monday, March 29, 2021

आत्मस्वरूपाचे गुण | Properties of the “Self-Consciousness”

 


श्रुति अनेक शब्दांच्यामधून आत्मस्वरूपाचे प्रतिपादन करीत आहे.  

 

१. अच्छायं – आत्मचैतन्यस्वरूप हे छायारहित, म्हणजेच तमोगुणरहित अज्ञानरहित आहे.  

२. अशरीरं – आत्मस्वरूप नामरूपउपाधिरहित, निरुपाधिक आहे.  

३. अलोहितं – लोहित म्हणजे रक्त-लाल रंगाने युक्त होय. अलोहित म्हणजे रूपरंगरहित निर्विशेष, निराकार स्वरूप आहे.  

४. शुभ्रं – आत्मस्वरूप हे अत्यंत शुद्धस्वरूप, मायारहित आहे.  

५. अक्षरं – ते स्वरूप क्षररहित, म्हणजे अविनाशी, नित्य, शाश्वत आहे.   

६. सत्य – नित्य असल्यामुळेच ते स्वरूप सत्य असून ते तिन्हीही काळांच्यामध्ये सत् स्वरूपाने राहते.  

७. पुरुषाख्यं – तेच स्वरूप ‘पुरुष’ या नावाने संबोधिले जाते. पूर्णत्वात् पुरुषः |  पुरीशयनात् पुरुषः |  जो स्वतःच परिपूर्णस्वरूप असून या शरीरामध्ये निवास करतो, त्यास ‘पुरुष’ असे म्हणतात.  

८. अप्राणं – ते स्वरूप प्राणरहित आहे.  

९. अमनोगोचरं – ते स्वरूप मनबुद्धीला अगोचर असून मन बुद्धीच्याही अतीत आहे.  

१०. शिव – ते स्वरूप आनंदस्वरूप आहे.  

११. शान्तं – ते स्वरूप अत्यंत शांत, निस्तरंग, उत्कर्ष-अपकर्षरहित, वृद्धिक्षयरहित, आविर्भाव-तीरोभावरहित आहे.  ते चैतन्य कधी येत नाही अथवा जातही नाही.  त्यामध्ये कोणतीही वृद्धि किंवा क्षय होत नाही.

१२. सबाह्याभ्यंतरं – ते स्वरूप सर्वांना अंतर्बाह्य व्याप्त करते.  

१३. अजं – ते स्वरूप जन्ममृत्युरहित आहे.  

 

याप्रमाणे असे हे आत्मस्वरूप, जो सर्वत्यागी आहे, तोच जाणू शकेल.  

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012- हरी ॐ
Tuesday, March 23, 2021

बिंब-प्रतिबिंब दृष्टान्त | Source-Reflection Analogy

 आचार्य येथे दृष्टान्त देतात की, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये अनुप्रवेश करतो, त्याप्रमाणे परमात्म्याने उपाधीमध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व रूपाने प्रवेश केलेला आहे.  जसे सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  त्यावेळी सूर्य प्रतिबिंबरूपाने पाण्यामध्ये जणु काही प्रवेश करतो.  सूर्य हा स्वतः अद्वय, एक, स्वयंप्रकाशस्वरूप आहे.  मात्र जेव्हा त्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते, तेव्हा एकच सूर्य अनेक झाल्यासारखा भासतो.  जितक्या बादल्या आपण पाणी भरून ठेवू, तितक्या उपाधि प्राप्त होऊन तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  सूर्याकडूनच प्रतिबिंबांना प्रकाश व सत्ता मिळते.  पाणी हलले की प्रतिबिंब हलते.  बादलीतील पाणी ओतून दिले की, प्रतिबिंबही दिसेनासे होते.  याचे कारण प्रतिबिंब हे उपाधीशी तादात्म्य पावलेले असून उपाधीवर अवलंबून आहे.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्याने सर्व उपाधींच्यामध्ये क्षेत्रज्ञरूपाने अनुप्रवेश केलेला आहे.  म्हणून त्यालाच ‘चिदाभास’ किंवा ‘चित्प्रतिबिंब’ असे म्हटले जाते.  भगवान म्हणतात –

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः |           (गीता अ. १५-७)

‘मी’ आत्मस्वरूपाने अंशरूपाने म्हणजेच चित्प्रतिबिंबरूपाने सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्थित आहे.

 

याठिकाणी उपाधीच्या म्हणजेच पाण्याच्या दृष्टीने प्रतिबिंब आहे.  परंतु बिंबस्थानीय सूर्याच्या दृष्टीने पाणी नाही, उपाधि नाही किंवा प्रतिबिंब ही नाही.  कारण सूर्य हा एक, अखंड, स्वयंप्रकाशमान, साक्षीस्वरूप आहे.  उपाधीमुळे प्रतिबिंबे दिसतात.  जितक्या उपाधि तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  उपाधीमधील विकारांचा परिणाम प्रतिबिंबांच्यावर होतो.  मात्र सूर्यावर कोणताही परिणाम होत नाही.  सूर्य अलिप्त, अस्पर्शित, अविकारी राहतो.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्य अंतःकरणउपाधीमध्ये चित्प्रतिबिंबरूपाने जणु काही अनुप्रवेश करते.  त्या चित्प्रतिबिंबालाच ‘जीव’ असे म्हणतात.  जीवाला उपाधि मिळाली की, जीव या देहोपाधीशी तादात्म्य पावून कर्तृकारकादि प्रत्यय निर्माण करतो.  देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांचे विकार स्वतःवर आरोपित करतो व स्वतः जन्ममृत्युयुक्त, मर्यादित, परिच्छिन्न, अल्पज्ञ-अल्पशक्तिमान-अल्पव्यापी होऊन सुखी-दुःखी, संसारी, बद्ध होतो.

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012- हरी ॐ
Tuesday, March 16, 2021

व्यान वायु | Circulation Sub-System

 येथे श्रुति व्यान वायूचे स्थान व कार्य स्पष्ट करीत आहे.  आपल्या शरीरामध्ये असंख्य नाड्या असून नाड्यांच्यामधून शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा होत असतो.  या नाड्यांचे प्रमुख स्थान हृदय हे आहे.  जीवात्मा हा हृदयामध्ये आहे. सूक्ष्म शरीररूप आत्मा हृदयाकाशामध्ये स्थित असून हृदय हेच सर्व नाड्यांचे उत्पत्तिस्थान आहे.

 

जीवात्म्याला संपूर्ण शरीरामध्ये संचार करण्यासाठी या नाड्या आहेत. शरीरामध्ये नाड्यांचे जाळे पसरलेले आहे. शरीरामध्ये एकूण प्रमुख एकशे एक नाड्या आहेत.  या एकशे एक नाड्यांच्या प्रत्येकी शंभर अशा शाखा निर्माण होतात.  तसेच या नाड्यांना प्रत्येकी ७२ हजार प्रतिशाखा निर्माण होतात. या सर्व मिळून (७२,७२,१०,२०१) बहात्तर कोटी, बहात्तर लाख, दहा हजार, दोनशे एक नाड्या होतात. या सर्व नाड्यांच्यामध्ये व्यान वायू संचार करतो.

 

व्यान वायूने सामान्यतेने संपूर्ण शरीराला व्याप्त केलेले आहे. मात्र व्यान वायू विशेष रूपाने शरीराच्या सांधे, खांदे व मर्मदेश म्हणजेच जननेंद्रिय या स्थानांच्यामध्ये असतो.  ज्यावेळी प्राण व अपान कार्य करीत नाहीत, म्हणजेच ज्यावेळी श्वास व उच्छ्वास ही क्रिया होत नाही, त्यावेळी प्राण व अपान यांच्यामध्ये जो वायू असतो तो व्यान वायू होय. प्राण व अपान यामधील जो संधिकाळ त्यालाच “श्वास रोखणे” असे आपण म्हणतो.  त्यावेळी व्यान वायू वीर्याप्रमाणे निर्माण होतो.

 

व्यानवायूमुळे साहसी, पराक्रमी कृत्ये केली जातात. एखादा वीर पुरुष जेव्हा धनुष्याची प्रत्यंचा ओढून श्वास रोखतो, तेव्हा तेथे व्यानवायू कार्यरत असतो.  तेथे प्राण व अपान वायूची अनुपस्थिती असल्याने त्यावेळी व्यान वायुमुळे धाडसी कृत्ये केली जातात.  असा हा व्यान वायू शरीरामधील सांधे, खांदे आणि जननेंद्रियामध्ये विशेष रूपाने असतो.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012

- हरी ॐ
Wednesday, March 10, 2021

ईश्वर निर्मिती कशी करतो ? | How God Ideates?

 


ईश्वर विश्वामधील सर्व लौकिक व शास्त्रीय पदार्थांची निर्मिती करतो.  लौकिक पदार्थ म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि हे बाह्य पदार्थ होय व शास्त्रीय पदार्थ म्हणजे पापपुण्यादि फळे होय.  हे सर्व पदार्थ ईश्वराच्या अंतःकरणामध्ये अव्यक्तरूपाने, वासनारूपाने राहतात.  ईश्वर या पदार्थांना संकल्परूपाने आपल्या आताच ठेवतो.  नंतर ईश्वरच बहिश्चित्त होऊन या सर्व वासनारूप, अव्यक्त पदार्थांना व्यक्त करतो.

 

सर्व पदार्थ ईश्वराच्या चित्तामध्ये वासनारूपाने, अव्यक्तरूपाने राहतात.  त्यावेळी त्या पदार्थांचे नाम-रूपादि धर्म प्रत्यक्ष अनुभवायला येत नसल्यामुळे ते पदार्थ व्यवहारास अयोग्य असतात.  म्हणूनच त्यांना अव्यक्त असे म्हटले आहे.  नंतर ईश्वरच बाह्य विश्वामधील पृथ्वीसारखे स्थिर पदार्थ व विजेसारखे अस्थिर, क्षणिक पदार्थ कल्पित करतो.  म्हणजेच ईश्वर बहिर्मुख होऊन बाह्य, दृश्य, स्थूल, व्यवहारयोग्य असणाऱ्या अनंत पदार्थांची कल्पना करतो.

 

ज्याप्रमाणे एखादा कुंभार घटाची किंवा विणकर वस्त्राची निर्मिती करतो.  त्यावेळी प्रथम कुंभार किंवा विणकर अव्यक्त, अदृश्य, व्यवहार-अयोग्य असणाऱ्या घटपटाची कल्पना त्यांच्या अंतःकरणामध्ये करून नंतरच मग त्या अव्यक्त घटपटाला नामरूपांच्या साहाय्याने व्यक्त करतात.  त्याचप्रमाणे विश्वकर्ता ईश्वर सुद्धा पुढे निर्माण होणारे सर्व पदार्थ प्रथम आपल्या आतच कल्पित करतो.  मायेच्या साहाय्याने कल्पित कारून पाहतो व नंतरच बहिश्चित्त होऊन त्या पदार्थांना व्यक्त करतो.  त्यावेळी ते सर्व पदार्थ नामरूपांनी संपन्न झाल्यामुळे सर्वांची दृश्यरूपाने व भिन्न-भिन्न स्वरूपाने आपणास प्रचीति येते.


थोडक्यात, प्रथम अव्यक्त, अदृश्य रूपामध्ये असणारे पदार्थच ईश्वराच्या संकल्पाने व्यक्त होऊन दृश्य, स्थूल रूपाला प्राप्त होतात.  ईश्वरच केवळ संकल्पमात्राने अंतर्बाह्य सर्वच पदार्थांची कल्पना करतो.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016- हरी ॐ