Tuesday, May 31, 2022

प्रतिकूल दैवातच उत्कर्ष होतो | Progress Through Ill-Fate

 



भगवान म्हणतात - कर्मणा जायते जन्तु कर्मणैव विलीयते |  सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ||  स्वतःच्या कर्मानेच जीव जन्माला येतो. कर्मानेच मृत्यु पावतो.  कर्मानेच जीवाला सुख, दुःख, भय, क्षेम इत्यादि प्राप्त होतात.  म्हणून कर्म किंवा पुरुषार्थ हाच श्रेष्ठ आहे.  दैव आहे म्हणून पुरुषार्थ सुद्धा आहे.  उलट जितके दैव प्रतिकूल तितका अधिक पुरुषार्थ करता येतो.  छोटेसे दैव असेल तर पुरुषार्थही छोटाच आहे.  खरे तर आपल्यासमोर खूप छोटे-छोटे दैव येत असते.

 

याउलट आजपर्यंत जगामध्ये जी जी महान कार्ये झाली ती सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्येच झाली.  सर्व संतांच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर प्रसंग येऊनही, सर्व समाजाचा विरोध होऊनही त्या दैवावर मात करून त्यांनी लोकोद्धाराचे अलौकिक कार्य केले.  प्रत्यक्ष प्रभु श्रीरामांच्या जीवनामध्ये सुद्धा भयंकर घटना घडल्या.  श्रीरामांना पुढच्या क्षणी राज्याभिषेक होणार होता परंतु त्याचवेळी सर्व राजवैभव त्याग करून त्यांना वनवासामध्ये जावे लागले.  या सर्व घटना श्रीरामांनी अत्यंत शांत व धीर गंभीर मनाने स्वीकार केल्या.  वनवास मिळूनही तेथे रावणसंहाराचे आपले अवतारकार्य केले.  श्रीरामांचे समग्र लीलाचरित्र पाहिले की, श्रीराम ही साक्षात पुरुषार्थाची मूर्ति आहेत, असेच वाटते.

 

म्हणून मनुष्याने प्रतिकूल दैव आल्यावर निराश न होता त्याच प्रारब्धाचा उपयोग पुरुषार्थ करण्यासाठी करावा.  आपल्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिति आली की, उलट आता आपला खूप उत्कर्ष होणार आहे, असे समजावे.  कारण प्रतिकूल दैवामध्येच शास्त्रविहित पुरुषार्थ तेजस्वी सूर्याप्रमाणे देदीप्यमान होतो.  सगळे जग विरुद्ध गेले तरी मनुष्य धर्माची कास धरून मोठ्या धैर्याने आपली कर्तव्य पार पाडतो.  ज्याला जीवनात खरोखरच काहीतरी करावयाचे आहे, तो दैवाला दोष न देता उठेल आणि कामाला लागेल.  दैव चांगले असो अथवा वाईट असो, ते पुरुषार्थ करण्यासाठी साधन आहे.  उलट वाईट दैव पुरुषार्थाला अधिक गति व सामर्थ्य देणारे आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, May 24, 2022

आत्मज्ञानाचे सामर्थ्य | Strength of Self Realization

 



आत्मज्ञानाने प्राप्त होणारे सामर्थ्य हे शारीरक सामर्थ्य नाही.  तर आत्मस्वरूपावर अविद्येचे आवरण घालून सर्व अध्यस्त संसार निर्माण करणारी माया सुद्धा ज्याचा पराभव करू शकत नाही, असे सामर्थ्य केवळ आत्मविद्येनेच प्राप्त होते.  मायाशक्तीने सर्व जीवांनाच आवृत्त केलेले आहे.  त्यामुळे सर्व जीव मोहीत होऊन जन्मानुजन्मे संसारचक्रामध्येच बद्ध होतात.  परंतु जो कोणी एखादाच भाग्यवान जीव आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल, गुरूंच्याकडून वेदान्तशास्त्राचे ज्ञान विधिवत् प्राप्त करून मनन-निदिध्यासनेच्या साहाय्याने ज्ञाननिष्ठा प्राप्त करेल, त्यालाच या आत्मविद्येचे फळ म्हणजे अमृतत्त्वाची प्राप्ति होईल.  त्याला आत्मविद्येने इतके सामर्थ्य प्राप्त होते की, माया त्याला मोहीत करू शकत नाही.  त्याला पुन्हा शोकमोहात्मक संसाराची प्राप्ति होत नाही.  हे सर्व सामर्थ्य आत्मज्ञानाचे आहे.

 

हे सामर्थ्य कसे असते ?  यावर आचार्य आत्मज्ञानाच्या सामर्थ्याचे वैशिष्ठ्य सांगतात – अमृतं अविनाशि |  आत्मज्ञानाचे सामर्थ्य हे अमृत म्हणजेच अविनाशी स्वरूपाचे असते.  याउलट अविद्याजन्य सामर्थ्य हे नाशावान असते.  कारण अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो.  मात्र ज्ञानाचा नाश कशानेही होत नाही.  म्हणून अविद्येमधून निर्माण झालेले सामर्थ्य हे अविद्येप्रमाणेच नाशवान असते.  बाह्य, दृश्य पदार्थांची, अनात्म्याची विद्या ही सर्व अविद्याच आहे.  म्हणून बाह्य, भौतिक ज्ञानाने कितीही सामर्थ्य, बल, वीर्य, प्रसिद्धि, नावलौकिक, प्रतिष्ठा मिळाली तरीही हे सर्व नाशावान आहे.  मात्र एखाद्याजवळ कदाचित बहिरंगाने काहीही नसेल व फक्त सम्यक् आत्मज्ञान असेल तर तो सर्वात श्रेष्ठ, सामर्थ्यशाली पुरुष आहे.  आत्मज्ञान हेच आत्मज्ञानी पुरुषाचे सामर्थ्य आहे.  ते सामर्थ्य नित्य, शाश्वत असते.  म्हणूनच ब्रह्मज्ञानी पुरुष हा नित्य निर्भय असतो.

 

श्रुति वर्णन करते-

विद्वान्न बिभेति कुतश्चन |                           (तैत्ति. उप.२-९-१)

विद्वान पुरुष कोणालाही भीत नाही, कारण ज्ञान हेच त्याचे बल आहे.  आत्मज्ञानाने मायेला सुद्धा पराभूत करण्याचे सामर्थ्य मिळते.  मायेचा, अध्यासाचा निरास झाला की, आपोआपच नित्य अमृतस्वरूप असणारे आत्मतत्त्व प्रत्यगात्मस्वरूपाने प्रकट होते.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013


- हरी ॐ




Tuesday, May 17, 2022

वेदांतशास्त्र कोणाकडून ऐकावे? | Who Can Guide On Vedant?

 



येथे वसिष्ठांनी दृष्टं, अनुभूतं, श्रुतं आणि कृतं असे चार शब्द वापरले आहेत.  म्हणजेच "जो उपदेश केला, तो आम्ही प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला, ऐकला आणि कृतीत आणला."  यावरून समजते की, गुरु किंवा आचार्य स्वतःच्या मनाचे काही सांगत नाहीत.  तर जे त्यांनी त्यांच्या गुरुंच्याकडून ऐकले असते, तेच ज्ञान गुरु आपल्या शिष्याला देतात.  त्या उपदेशाचे स्वतः आचरण करतात आणि शिष्याकडूनही करवून घेतात.  म्हणून आचार्य या शब्दाची व्याख्या केली जाते - यः शास्त्रार्थं स्वयं आचरन् इतरान् अपि आचरयति सः आचार्यः |  जे शास्त्राच्या अर्थाचे स्वतः आचरण करतात आणि अन्य साधकांच्याकडून त्याचे आचरण करून घेतात, त्यांना 'आचार्य' किंवा 'गुरु' असे म्हणतात.  म्हणूनच आपण स्वतः काही साधना केली असेल तरच आपण दुसऱ्याला सांगू शकतो.

 

जसे व्यवहारात आपण पाहतो की, आपल्याला स्वतःला एखादे काम व्यवस्थित येत असेल तरच आपण दुसऱ्याला ते काम त्यामधील बारकाव्यासह शिकवू शकतो.  तसेच या मार्गामध्ये ज्याने स्वतः साधना केली असेल, पूजा-अर्चना, जप, नामस्मरण केले असेल, गुरुसेवा केली असेल, श्रवण, मनन, चिंतन केले असेल, तोच दुसऱ्याला त्या साधना कशा कराव्यात ?  याचे यथार्थ मार्गदर्शन करू शकेल.  म्हणून वसिष्ठ येथे सांगतात की, "हे रामा !  तुला जो उपदेश मी करतोय ते सर्वप्रथम मी अनुभवले आहे."

 

शास्त्रामध्ये ज्ञानाची श्रुति, युक्ति आणि अनुभूति अशी तीन प्रमाणे आहेत.  श्रुति म्हणजे शास्त्रप्रमाण, युक्ति म्हणजे जे शास्त्र आपण श्रवण केले ते युक्तिवादाने सिद्ध करणे होय आणि अनुभूति म्हणजे जे शास्त्रज्ञान ऐकले, जे युक्तिवादाने सिद्ध केले ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवणे होय.  म्हणून येथे वसिष्ठांनी  'श्रुतम् ' या शब्दामधून श्रुतिप्रामाण सांगितले.  'प्रत्यक्षतः दृष्टं' यामधून युक्तिप्रमाण सांगितले आणि 'अनुभूतं' या शब्दामधून अनुभूतिप्रमाण सांगितले.  वसिष्ठ सांगतात की, "रामा !  मनुष्याने शास्त्र ऐकले, सत्संग केला, आचारधर्मांचे पालन केले तर त्याला चित्ताची शुद्धि व चित्ताची एकाग्रता प्राप्त होऊन क्रमाने मोक्षप्राप्ति होते.  यामध्ये शंकाच नाही.  कारण हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे.  आम्ही तसे जीवनभर प्रयत्न केलेले आहेत.  जे केले तेच आम्ही सांगत आहोत."

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, May 10, 2022

अहंकार रहित विद्या | Knowledge Without Ego

 



सर्व प्रमाणजनित विद्या अहंकारावर केंद्रिभूत असल्यामुळे अहंकाराचेच पोषण, वर्धन करतात.  उदा. एखादा फुगा हवा भरून फुगविला तर तो मोठा मोठा होतो, त्याप्रमाणे या सर्व विद्या अहंकाराला फुगवितात आणि “मी मोठा आहे” असा भ्रम निर्माण करून अनेक प्रकारचा अभिमान निर्माण करतात –  १) सौंदर्याचा अभिमान  २) शरीरस्वास्थ्याचा अभिमान  ३) कुल, गोत्र, जाति, धर्म, पंथ, वर्ण, आश्रम यांचा अभिमान,  ४) स्थावर-जंगम-मालमत्ता, संपत्तीचा अभिमान,  ५) सत्ता, यश, कीर्ति यांचा अभिमान,  ६) विद्वत्तेचा अभिमान, इतकेच नव्हे तर  ७) मी चार कोटी जप केला, मी धार्मिक आहे, त्यागी आहे, उपासक आहे, वगैरेंचाही अभिमान आहे.

 

म्हणून आचार्य म्हणतात – हा अहंकार आत्मस्वरूपाच्या आश्रयाने राहातो.  परंतु आपल्या स्वतःच्याच आश्रयावर आवरण घालून आपणच खरे आहोत असे भासवतो.  जितका अहंकार मोठा तितक्या प्रमाणामध्ये आपण शुद्ध, निर्भेळ आनंदापासून दूर दूर जातो.  त्यामुळे सर्व विद्या अपरा, निकृष्ट आहेत.  ती अविद्याच आहे.

 

मग विद्या कशी असावी ?  ज्या विद्येमुळे अहंकाराचा निरास होऊन मनुष्य नम्र, विनयशील होतो.  विद्या विनयेन शोभते | या उक्तीप्रमाणे जेथे खरे ज्ञान असते तेथेच नम्रता, विनयशीलता असते.  म्हणून तत्त्वमसि“ते तू आहेस” या महावाक्याच्या उपदेशाने “अहं ब्रह्मास्मिस्वरूपाने उदयाला आलेली ब्रह्मविद्या अनात्म्यामध्ये निर्माण झालेला अहंकार नष्ट करून देहात्मबुद्धीचा संपूर्ण निरास करते.  सर्व अविद्याकल्पित संसाराचा – सुखदुःख, तसेच द्रष्टा-दृश्य-दर्शन वगैरेदि त्रिपुटींचा निरास करते.  म्हणजे द्वैतभावाचा ध्वंस करून आत्मस्वरूप प्रकट करते.

 

म्हणून ब्रह्मविद्या स्वस्वरूपाने प्रकाशमान होत असल्यामुळे सर्व विद्यांची राणी आहे.  सर्वश्रेष्ठ आहे.  येथे ‘विद्या’ हा शब्द स्त्रिलिंगी असल्यामुळे ‘राज्ञी’ हा स्त्रिलिंगी शब्द वापरलेला आहे.  थोडक्यात ब्रह्मविद्या अहंकाराचे सर्व बुरखे फाडून जीवाला स्वतःचे खरे स्वरूप दाखविते की, ज्यामध्ये अहंकार-ममकार, शोकमोहादि संसार नष्ट होऊन जीव पूर्णात्मा होतो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, May 3, 2022

मोक्ष कर्माचे फळ नाही | Liberation – Not A Result Of Action

 



मोक्ष हे कोणत्याही कर्माचे फळ कदापि होऊ शकत नाही.  कारण मोक्ष हा कर्माचे फळ झाला तर कर्माप्रमाणेच नाशवान होईल.  काही काळ जीव मुक्त होईल आणि मोक्षाचा नाश झाला की, पुन्हा जीव बंधनात अडकेल.  मग वैषयिक सुख आणि मोक्षसुख यामध्ये फरक राहणार नाही.  परंतु याला मोक्ष म्हणत नाहीत.  मोक्ष हा मर्यादित कर्माचे फळ नाही.  तर उलट ज्यावेळी सर्व क्रिया थांबतात, द्वैताचा पूर्णतः निरास होतो, कर्तृकारकादि प्रत्यय संपतात, तीच निरतिशय मोक्षाची परमोच्च अवस्था होय.  त्यामुळे मोक्ष हा मन, बुद्धि किंवा इंद्रियांच्या प्रयत्नाने प्राप्त होत नाही.

 

व्यवहारात जे जे आपण मन, बुद्धी, इंद्रियांच्या साहायाने मिळवितो, ते ते सर्व मर्यादित व अल्प स्वरूपाचे असते.  व्यवहारात काहीही मिळवायचे असेल तर तिथे खूप कष्ट आहेत.  एक पी. एच. डी. ची पदवी मिळवायची असेल तरी अनेक वर्षांचे परिश्रम आहेत.  परंतु आत्मविद्या मात्र अतिशय सुलभ आहे.  या जगात मोक्षाइतके सोपे दुसरे काहीही नाही.  भगवान म्हणतात - राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं |  प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् |  आत्मविद्या ही सर्वश्रेष्ठ असणारी राजविद्या असून अत्यंत गुह्य, पवित्र, प्रत्यक्ष आणि अतिशय सहजपणे ग्रहण करण्यास योग्य अशी विद्या आहे.  कारण जे तत्त्व मी शोधतो आहे, ज्या तत्त्वाचे मला ज्ञान घ्यावयाचे आहे, ते माझ्यापासून भिन्न, दूर किंवा बाहेर नाही, तर ते माझ्या अंतरंगामध्येच आहे.  नव्हे नव्हे, ते माझे स्वतःचे प्रत्यगात्मस्वरूप आहे.  त्यामुळे 'मी'च मला जाणावयाचे आहे.  म्हणून गुरूंचा उपदेश आह - तत्त्वमसि ।  ते तत्त्व तू आहेस. तसेच, शिष्याने जाणवायचे आहे की - अहं ब्रह्मास्मि ।  'मी' ब्रह्मस्वरूप आहे.

 

एकदा हे ज्ञान झाले की, नंतर त्या ज्ञानाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये ना कोणता पुरुषार्थ आहे, ना कोणते दैव आहे, ना कोणते प्रयत्न आहेत.  मोक्ष ही स्वस्वरूपाची सहजावस्था आहे.  मोक्षासाठी कोणतेही कर्म किंवा कोणतीही साधना करण्याची आवश्यकता नाही.  किंबहुना मोक्ष हे कर्माचे, उपासनेचे, श्रवण-मननादि साधनेचे सुद्धा फळ नाही.  श्रुति स्पष्ट करते - नायमात्मा प्रवचनेन लभ्यः |  न मेधया न बहुना श्रुतेन |  आत्मा हा केवळ पुष्कळशी प्रवचने ऐकून अथवा प्रवचने करून प्राप्त होत नाही.  अथवा खूप शास्त्रश्रावण करून प्राप्त होत नाही.  खूप बुद्धीनेही प्राप्त होत नाही.  आत्मप्राप्तीमध्ये सर्व प्रयत्नांचा निरास होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ