Monday, June 26, 2017

राज्यकर्त्यांना उपदेश | Learning for the Rulers



राजा सर्व समाजाचे किंबहुना मानवजातीचे रक्षण करतो.  लोककल्याणार्थ अविरत कार्य करतो.  त्यावेळी समाजाचे खरे कल्याण कशामध्ये आहे, हे राजाला निश्चितपणे समजले पाहिजे.  सामान्यतेने भौतिक समृद्धि, सांपत्तिक सुस्थिति आणि विषयांची भरभराट यामध्येच मानवजातीचे कल्याण आहे, असे म्हटले जाते.

परंतु हे करीत असताना मनुष्याची दृष्टि फक्त ऐहिक आणि विषयांची प्राप्ति हीच झाली तर तो मनुष्य अर्थ आणि कामनेने प्रेरित होवून कामांध होईल.  तो विषयासक्त होवून विषयप्राप्ति व विषयभोग हाच त्याच्या जीवनाचा परमपुरुषार्थ होईल.  यामुळे तो आपोआपच श्रेष्ठ नीतिमूल्ये, जीवनमूल्ये तसेच, सदाचार, संयमन, सद्गुणांची जोपासना, कर्तव्यपारायणता या सर्वांना झुगारून देवून स्वतःच्या कामनापूर्तीसाठी अनीति आणि अनाचाराचे अनुसरण करेल.  तो अत्यंत स्वैर, उच्छ्रुंखल, पशुतुल्य होईल.  त्यामुळे मनुष्यामधील माणुसकीचा ऱ्हास होईल.

हे समाजाच्या आणि मानवजातीच्या दृष्टीने योग्य होणार नाही.  म्हणून समाजपरिपालक असणाऱ्या राजे लोकांना किंबहुना सामाजिक कार्यकर्त्यांना जीवनाची खरी दृष्टि काय आहे, हे कळणे अत्यंत आवश्यक आहे.  नीतिमूल्यांचा त्याग करून केवळ भौतिक समृद्धि केली तर तीच समृद्धि समाजाच्या नाशाचे कारण होईल आणि संसारामधून मुक्त होण्यासाठी आत्मचिंतन हेच ध्येय आहे, असे जर सांगितले तर मनुष्य सर्व कर्तव्यकर्मांचा त्याग करून निष्क्रिय होईल.  त्याची कर्म न करण्याकडे प्रवृत्ति वाढेल.  यामुळेही समाजाचा उत्कर्ष आणि सुस्थिति होणार नाही.

म्हणून या दोन्हीही मार्गांचा योग्य तो समन्वय होणे आवश्यक आहे.  जीवनाचे खरे कल्याण लक्षात घेऊन आत्मोन्नति करून घेण्यासाठी कर्मयोगनिष्ठेची आवश्यकता आहे.  तसेच, जीवनामध्ये संयमन, सदाचार, श्रेष्ठ नीतिमूल्यांची जोपासना आणि उदात्त, शुद्ध विचारांसाठी विवेकाची आवश्यकता आहे.  ही दृष्टि आणि दिशा देण्यासाठी राज्यकर्त्यांना या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे.  



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, June 20, 2017

तीन प्रकारचे लोक | Three Types of People



या विश्वामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत.

१. अज्ञानी – अविवेकी लोक.  ते स्वतःला कर्ता-भोक्ता समजतात.  ते अनेक बाह्य, सुंदर, मोहक विषयांनी मोहीत होणारे असून ऐहिक आणि पारलौकिक विषयांची प्राप्ति व विषयोपभोगात स्वतःला कृतार्थ समजणारे असतात.  त्यामुळे बाह्य विषयांच्या आकर्षणाला बळी पडून त्यांच्या प्राप्तीसाठी जन्मभर प्रयत्न करतात आणि काया-वाचा-मनसा विषयांच्यामध्येच रमतात. विषयांच्या प्राप्तीशिवाय अन्य काहीही त्यांच्या जीवनात नसते.

२. ज्ञानी – आत्मानात्मविवेकाने विश्वाच्या आणि सर्व विषयांच्या मर्यादा, क्षणभंगुरत्व, अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व आणि फोलपणा जाणून विश्वाच्या पलीकडे असलेले नित्य, शाश्वत, अविनाशी तत्त्व जाणतात आणि विषयांच्यामधून मन निवृत्त करून तत्त्वचिंतन करतात.  यामुळे त्यांची व्यावहारिक, रागद्वेषात्मक संकुचित दृष्टि नाहीशी होऊन ते विश्वाकडे पाहाताना पारमार्थिक दृष्टीने पाहातात.  त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्तव्य शिल्लक राहात नाही.  ते समुद्राप्रमाणे अचल, परिपूर्ण, निरतिशय शांति प्राप्त करतात.  सर्व विषयांच्यामध्ये संसारामध्ये राहूनही विषय त्यांना आकर्षित करू शकत नाहीत, बद्ध करीत नाहीत.  ते अलिप्त, असंग राहातात.  त्यांची अंतरिक शांति कधीही ढळत नाही.  ते नित्य संतुष्ट, तृप्त असतात.

३. अज्ञानी विवेकी जिज्ञासु साधक – हा पूर्ण अज्ञानी नाही किंवा पूर्ण ज्ञानीही नाही.  पूर्ण अज्ञानी असेल तर त्याला कोणताच प्रश्न नसतो किंवा पूर्ण ज्ञानी असेल तरी सुद्धा प्रश्न नसतो.  परंतु जिज्ञासु साधक हा अज्ञानीही आहे आणि त्याचवेळी विवेकीही आहे.  तो विवेकी असल्यामुळे विवेकाने, विचाराने विश्वाचे तसेच कर्म आणि कर्मफळाचे अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व, मिथ्यात्व समजलेले असते.  विषय आणि विश्व मला कधीही सुखी करणार नाहीत, तर ते दुःखालाच कारण आहेत हे त्याला स्पष्टपणे समजलेले असते.  विषयोपभोगामध्ये त्याला रस वाटत नाही.  शाश्वत सुखाचा व आनंदाचा तो शोध घेत असतो.  परंतु निश्चित स्वरूपाचा शुद्ध आनंद किंवा अंतरिक सुख आणि शांतीही त्याला प्राप्त झालेली नसते.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Tuesday, June 13, 2017

पापी जीवांचा उद्धार | How Sinners are Uplifted ?


पापी जीवांचा आचार्य कसा उद्धार करतात ?  प्रथम कोणत्याही पुरुषाला आपल्या पापकर्मांचा मनोमन पश्चात्ताप झाला पाहिजे.  त्याला स्वतःच्या पापकर्मांची जाणीव होऊन तो जे करतो ते सर्व व्यर्थ, निष्फळ आहे, हे समजले पाहिजे.  यामधूनच अंतरिक तळमळ आणि व्याकुळता निर्माण होऊन, या पापकर्मामधून पार होण्यासाठी, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी योग्य मार्गाचा तो शोध घेईल.

त्याच्या जीवनामध्ये श्रेष्ठ साधु पुरुष येईल.  त्यावेळी नितांत श्रद्धेने त्यांना समर्पण होऊन त्यांची मनोभावे काया-वाचा-मनासा दीर्घकाळ अखंडपणाने सेवा करावी.  यामुळे हळूहळू त्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होईल.  अधर्माचरण, पापाचराणापासून निवृत्त होऊन सदाचार आणि सत्कर्मामध्ये प्रवृत्त होऊन तो धार्मिक होईल आणि यामुळे इंद्रियांच्यावर संयमन होऊन स्वैर, उच्छ्रुंखल, विषयोपभोगामध्ये रत असलेली इंद्रिये त्याच्या ताब्यात येतील.  वाणीने परमेश्वराचे भजन केल्यामुळे वाकशुद्धि होईल.

मनामध्ये श्रद्धा, भक्तीचा उदय झाल्यामुळे हळूहळू निष्काम वृत्ति निर्माण होऊन सेवा, त्याग, विनयशीलता वगैरेदि सद्गुणांचा उत्कर्ष होईल.  परमेश्वराच्या व गुरूंच्या अखंड चिंतनामुळे मन सर्व बाह्य विषयांमधून निवृत्त होऊन अंतर्मुख, एकाग्र, गुरुमय होईल.  विषयांचे आकर्षण, आसक्ति, भोगलालसा कमी होईल.  या प्रदीर्घ साधनेमुळे त्याचे चित्त शुद्ध होऊन तो गुरूंचा उपदेश ग्रहण करण्यासाठी अधिकारी होईल.

आचार्य म्हणतात –
सत्सङगत्वे निःसङगत्वं निःसङगत्वे निर्मोहत्वम् |
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||   (भज गोविन्दम् )
सत्संगामुळे विषयासक्ति कमी होऊन निर्मोहत्व प्राप्त होते.  त्यामुळे अंतर्मुख झालेले मन तत्त्वचिंतन करून निश्चल, स्थिर, एकाग्र होते आणि स्वस्वरूपामध्ये सुस्थिति प्राप्त केल्यामुळे जीवनमुक्तावस्था प्राप्त करते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ


Tuesday, June 6, 2017

ज्ञान पापांच्यामधून मुक्त करते | Knowledge Liberates from Sins


अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः |
सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रुजिनं संतरिष्यसि ||   (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-३६)
हे अर्जुना !  जरी तू सर्व पापी लोकांच्यापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ पापी असशील तरीही ज्ञानरूपी नौकेने तू निःसंदेहपणे सर्व पापांच्यामधून तरून जाशील.  

येथे ज्ञानाने मनुष्य सर्व पापांच्यामधून मुक्त होतो, असे सांगितले आहे.  याचा अर्थ – तो लगेच मुक्त होईल, असे नाही.  तर त्यासाठी मनुष्याला ज्ञाननौकेमध्ये बसण्यासाठी प्रथम नौकेच्या जवळ गेले पाहिजे.  त्यासाठी नौकेचा शोध घेतला पाहिजे.  तसेच, नौकेमध्ये बसण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे.  आणि नौका चालविण्यासाठी कुशल नावाड्याची – गुरूंची जरुरी असून त्यांच्यावर नितांत श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे.  

श्रद्धा-भक्तीने, विश्वासाने आपल्या जीवनाची सूत्रे गुरूंच्या हातात दिली पाहिजेत, कारण ते स्वतःच संसाररूपी महासागराला पार करून परतीला पोहोचलेले अत्यंत अनुभवी, कुशल आहेत.  स्वतः तरति परान् अपि तारयति |  या न्यायाने अन्य संसारी जीवांना या महासागरामधून पार करून नेण्यासाठी तेच अत्यंत निपुण नावाडी आहेत.  म्हणून प्रत्येक साधकाने या विश्वामध्ये संसार पार करण्यासाठी गुरूंना नितांत श्रद्धा आणि अनन्य भावाने शरण जावे.  म्हणजे ते श्रेष्ठ आचार्य साधकाचा उद्धार करतील.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड ते तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे हो तु ||   (पसायदान)
जे लांछनरहित पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अंतरंगामधून सर्व दोषरहित, शुद्ध, परिपूर्ण आत्मस्वरूप प्राप्त केलेले आहेत आणि तापरहित असलेल्या तेजस्वी, प्रकाशस्वरूप सूर्याप्रमाणे आहेत ते श्रेष्ठ, ज्ञानी पुरुष सर्व जीवांचे कल्याण करणारे असल्यामुळे साधकांनी त्यांच्याशी सोयरिक करावी.  म्हणजेच त्यांना श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने शरण जावे.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ