Tuesday, March 29, 2022

कर्म कोठे समर्पित करावी ? | Whom To Dedicate Actions ?

 प्रत्येक व्यक्ति कोठे न कोठे समर्पित होतेच.  धर्मनिष्ठ धर्माला समर्पण होतो.  धार्मिक पुरुष निष्ठेने जन्मभर धर्माचरण, श्रौत-स्मार्त कर्मामध्ये परायण असतो.  कोणी स्त्रीसाठी, कोणी धनासाठी, किंवा पुत्रासाठी, उपभोगासाठी तर कोणी सत्तेसाठी, देशासाठी समर्पण होतो.  म्हणजेच कोठे न कोठे तरी मनुष्याची प्रीति आहे.  प्रेम आहे.  त्याशिवाय माणूस जगू शकत नाही.  माणसावर नाही तर, पशुपक्षांच्यावर, निसर्गावर तो प्रेम करतो.  यामध्ये सर्व जगाचा, अन्य गोष्टींचाही त्याला विसर पडतो.  काया-वाचा-मनसा रात्रंदिवस त्याला एकाच गोष्टीचा ध्यास असतो.  प्रारब्धवादी लोक शरीराला प्रारब्धावर सोडून देतात.  वेदान्ती ब्रह्मामध्ये अध्यास आहे असे मानून अध्यस्त, अनात्म वस्तूंचा त्याग करतात आणि रात्रंदिवस ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न होतात.

 

खरा भक्त मात्र तो विषयांना, व्यक्तीला, राष्ट्राला, समाजाला, धर्माला समर्पण होत नाही.  परमेश्वरालाच समर्पण होतो.  आपल्याला व्यवहारात दिसते की ज्याची जेथे श्रद्धा असते ते त्याचे श्रद्धास्थान बनते.  तेथेच तो प्रेम करतो.  तेथेच त्याची निष्ठा असते.  इतकेच नव्हे तर तेथे तो नम्र होतो.  त्याचा अहंकार समर्पण होतो.  तो त्याच्यासाठी जगत राहातो.  भक्ताचेही तसेच आहे.  भक्ताची श्रद्धा परमेश्वरामध्ये असते, कारण त्याला जाणीव असते की, परमेश्वर हाच कर्तुम्-अकर्तुम् आहे.  सर्वशक्तिमान, विश्वाचा चालक, नियामक असून सर्व जीवांचा तो पोषण, वर्धन, रक्षणकर्ता आहे.  तोच जीवांचा उद्धारकर्ता असून जीवाचे अंतिम साध्य आहे.  तो आनंदघन आहे.  त्यामुळे सर्व दुःखांच्यामधून पार करणारा आहे.  याउलट जीव अत्यंत अगतिक असून अहंकार, दंभ दर्प वगैरे दोषांनी ग्रस्त आहे.  तो सर्व बाजूंनी मर्यादित आहे. दुःखी, व्याकूळ त्रस्त आहे.

 

म्हणून त्याचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आनंदघन परमेश्वराला या दुःखसागरातून पार होण्यासाठी संपूर्ण, अनन्यभावाने शरण गेले पाहिजे.  त्याच्या मनात आस्तिक्यबुद्धि निर्माण होते.  त्यामधून श्रद्धा, श्रद्धेमधून भक्तीचा भाव आणि अगतिकता निर्माण होते.  शेवटी याचेच पर्यवसान समर्पण भावामध्ये होते.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006- हरी ॐ
Tuesday, March 22, 2022

शास्त्रविहित आणि शास्त्रहीन पुरुषार्थ | Pro and Anti Shaastra Efforts

 शास्त्रविहित पुरुषार्थ आणि शास्त्रहीन पुरुषार्थ, असे पुरुषार्थाचे दोन प्रकार आहेत.  त्यांपैकी शास्त्रहीन पुरुषार्थ अनर्थाला कारण होतो, तर शास्त्रविहित पुरुषार्थ परमार्थाचे साधन होतो.  येथे शास्त्रीय - शास्त्रविहित पुरुषार्थ म्हणजेच धर्माचरण होय आणि अशास्त्रीय पुरुषार्थ म्हणजे अधर्म होय.  हेच सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर म्हणता येईल की, चालल्या कर्माचे चांगले फळ मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.  आपण ज्या प्रतीचे बीज पेरू त्याप्रमाणेच धान्य उगवते.  तसेच "जसे कर्म - तसे फळ" हा लोकप्रसिद्ध न्याय आहे.

 

मनुष्याला कर्म तर केलेच पाहिजे.  करावे किंवा करू नये, यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही.  कर्माशिवाय मनुष्य एक क्षणभरही राहू शकत नाही.  मात्र कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये यामध्ये स्वातंत्र्य आहे.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत मनुष्याला कोणते ना कोणते तरी कर्म हे केलेच पाहिजे.  कर्म करायचेच असेल तर वाईट करण्यापेक्षा चांगले कर्म करावे.  कर्म चांगले की वाईट हे ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे.  कार्य-अकार्य, धर्म-अधर्म यांचा न्यायनिवाडा करताना वेदशास्त्र हेच प्रमाण असून मनुष्याने शास्त्रविहित कर्मच करावे.

 

पुष्कळ वेळेला मनुष्याला शास्त्रविधान माहीत असते.  चांगले-वाईट कर्मही कळत असते.  परंतु ज्यावेळेस चित्तामध्ये काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर-स्वार्थ असे विकार उत्पन्न होतात, त्यावेळी मनुष्य सत्कर्मांचा त्याग करून अधर्मामध्ये प्रवृत्त होतो.  अन्याय, भ्रष्टाचार, हिंसा, व्यभिचार अशी भयंकर कृत्ये त्याच्या हातून घडतात.  म्हणून मनुष्याचा विवेक सतत जागृत पाहिजे.

 

वेद मनुष्याला अनेक आदेश देतात - मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |  अतिथिदेवो भव |  स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |  देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |  सत्यं वद |  धर्मं चर |  हिंसा न कुर्यात् |  कलजं न भक्षयेत् |  सुरां न पिबेत् |  अशा सर्व वेदाज्ञा मनुष्याने पालन केल्या तर याच धर्माचरणाच्या अनुष्ठानाने साधकाचे मन दैवीगुणसंपन्न, शुद्ध होऊन त्याला क्रमाने मोक्षप्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019- हरी ॐ
Tuesday, March 15, 2022

भासाचे मूळ | The Root of Illusion

 शंका: दर्पण-नगरी दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे आरशामध्ये नगरी भासमान आहे.  याचाच अर्थ दर्पणामध्ये नगरीचा भास होण्यासाठी आरशाच्या बाहेर नगरीची सत्ता असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय भास होणार नाही.  म्हणजेच दर्पणाच्या बाहेर नगरीची स्वतंत्र सत्ता आहे.  त्यावरून आपोआपच दोन सत्ता मानल्या पाहिजेत.  १) आरशाची सत्ता आणि २) नगरीची सत्ता.  याचप्रमाणे ब्रह्म अद्वय, अखंड, निर्विशेष वगैरे स्वरूपाचे आहे, हे कबूल.  परंतु त्याच परब्रह्मामध्ये द्रष्टादृश्यदर्शनात्मक विश्वाचा भास होत असेल, तर ब्रह्माशिवाय जगताची स्वतंत्र सत्ता मानली पाहिजे.  त्याशिवाय ब्रह्मामध्ये जगदाभास निर्माण होणारच नाही.  म्हणजेच - ब्रह्म सत्य आहे.  परंतु जगदपि सत्यम् |  हेच सिद्ध होते.

 

परंतु ही शंका श्रुतिसंमत नाही.  याचे कारण रज्जूच्या दृष्टीने सर्प नाहीच.  रज्जूने कधीच सर्प निर्माण केलेला नसल्यामुळे सर्पाचा सुद्धा भास नाही.  मग रज्जूमध्ये सर्पाचा भास कोण पाहातो ?  जो रज्जू पाहात नाही तोच अज्ञानी पुरुष सर्प पाहातो.  त्याच्या दृष्टीने सर्प आभासात्मक नसून सत्य आहे.  म्हणूनच तो साप, साप असे ओरडतो.  त्याला फक्त सर्पच दिसतो.  रज्जू कधीच दिसत नाही.  बाकीचे लोक सर्प पाहण्यासाठी येतात तेव्हा त्या सर्वांना तेथे रज्जूच दिसतो.  मग हा सर्प आहे कोठे ?  तो सर्प बाहेर नसून केवळ सर्पभ्रमिष्ट पुरुषाच्या बुद्धीमध्ये झालेला भास आहे.  तो आहे आतच परंतु दिसतो मात्र बाहेर.

 

थोडक्यात सर्पाचा भास अज्ञानावस्थेमध्येच अनुभवाला येतो.  रज्जुज्ञानामध्ये प्रचीतीला येत नाही.  त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये झालेला विश्वाचा भास हा अज्ञानावस्थेमध्येच आहे.  परब्रह्माच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने पाहिले तर विश्व नाहीच.  फक्त अखंड, अद्वय परब्रह्मच आहे.  ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विकार, निरुपाधिक असल्यामुळे परब्रह्माने विश्वाची निर्मितीच केलेली नसल्यामुळे विश्वाचा भास होईलच कसा ?  त्यामुळे परब्रह्माव्यतिरिक्त विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व सुद्धा कसे असेल ?  यामुळे ही शंकाच योग्य नाही.  नव्हे, ही शंका विश्वाला सत्यत्व देऊन निर्माण केलेली आहे.  म्हणून ही शंका अज्ञानावस्थेमध्ये आहे.  ज्ञानावस्थेमध्ये नाही.  जर विश्व दिसत असेल तर ते कोण पाहातो ?  अज्ञानीच आपल्या बुद्धीमध्ये पाहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ
Tuesday, March 8, 2022

धर्माने प्रारब्धाचा नाश | Duty (Dharma) Can Destroy Fate

 प्रयत्नाने साध्यप्राप्ति तर होतेच होते, पण पुरुषार्थाने प्रारब्धाचा सुद्धा नाश करता येतो.  यावरून लक्षात येईल की, आपल्या धर्मग्रंथांच्यामधून किंवा शास्त्रग्रंथांच्यामधून कोठेही अज्ञात दैवाला, अंधविश्वासाला, निष्क्रियतेला स्थान दिलेले नाही.  तर उलट शास्त्र प्रत्येक मनुष्याला त्याच्या नियत कर्तव्यकर्मामध्येच प्रवृत्त करते.  शास्त्र मनुष्याला आळशी, कर्मशून्य बनवीत नसून कर्तव्यपरायण, कर्तव्यदक्ष बनविते.  शास्त्र मनुष्याला परमोच्च सकारात्मक दृष्टि देते.  जीवन उत्साहाने व आनंदाने जगण्यास प्रवृत्त करते आणि त्याच जीवनामध्ये मनुष्याला परमपुरुषार्थ असणाऱ्या मोक्षामध्ये प्रवृत्त करते.

 

जो मनुष्य शास्त्राने सांगितलेल्या मागणे सत्कर्माचे आचरण करतो, त्याला त्यापासून निश्चितपणे इच्छित फळ प्राप्त होते.  त्याव्यतिरिक्त केलेले सर्व कर्म अनर्थाला कारण होते.  म्हणून साधकाने नित्यनिरंतर वेदविहित कर्मांचेच अनुष्ठान करावे. हिंसादि वेदनिषिद्ध कर्मांचा पूर्णतः त्याग करावा.  कोणते कर्म योग्य व कोणते अयोग्य, हे ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे.  सर्वसाधारणपाने जोपर्यंत अनुकूल प्रसंग येतात तोपर्यंत मनुष्य धर्माचे अनुसरण करतो.  परंतु काही वेळेस प्रतिकूल परिस्थिति आल्यावर मनुष्याची धर्मावरची श्रद्धा उडते.  तसेच काही वेळेला मनुष्य स्वार्थ, लोभ या विकारांना वश होऊन सत्कर्म-सदाचाराचा त्याग करतो.

 

म्हणुनच येथे वसिष्ठ विशेषत्वाने सांगतात की, प्रतिकूल परिस्थिति आली तरीही मनुष्याने धर्माचा त्याग करू नये. तसेच स्वार्थ, लोभाला वश होऊन कधीही आपल्या सत्कर्मामध्ये तडजोड करू नये.  धर्माचरणापासून विचलित होऊ नये.  याचे कारण - धर्मो रक्षति रक्षितः |  जो मनुष्य कितीही संकटे आली तरीही तितक्याच श्रद्धेने, उत्साहाने, विवेकाने, धर्माच्याच मार्गाने जाईल, त्याला आज नाही उद्या त्याचे इप्सित फळ निःसंशयपाने प्राप्त होते.  ते सत्कर्मच त्या मनुष्याचे अधःपतनापासून रक्षण करते.  यामध्ये संशय नाही. मात्र - धर्म एव हतः हन्ति |  अधार्मिक आचरण मनुष्याच्या अधःपतनालाच कारण होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ
Tuesday, March 1, 2022

वेद शिकण्याचा सर्वाधिकार | Universal Right to Learn Vedas

 ब्रह्मज्ञान हे कोणत्याही जातीवर, पंथावर, वर्णावर, धर्मावर अवलंबून नाही.  ज्ञानामध्ये धर्मभेद, पंथभेद, जातिभेद, वर्णभेद नाहीत.  सर्व धर्म-पंथ-जाति-वर्ण यामधील दैवीगुणसंपन्न असणाऱ्या प्रत्येक सुसंस्कृत, अधिकारी व्यक्तीस वेदांचा अधिकार आहे.  भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला चातुर्वर्ण्याचा अर्थ समजावून न घेतल्यामुळे पुष्कळ वेळेला वर्णभेदाचा दोष काही बुद्धिमान लोक वेदांना, गीतेला देतात.  भगवान म्हणतात –  

           

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः |                (गीता अ. ४-१३)

 

ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र हे चार वर्ण केवळ जन्माने ठरत नसून त्या त्या व्यक्तीच्या सात्त्विक-राजसिक-तामसिक गुणांच्या प्रमाणानुसार व ती ती व्यक्ति करीत असलेल्या कर्मानुसार ठरत असतात.  त्यामुळे एखादी जन्माने शूद्र असणारी व्यक्ति जर अत्यंत सात्त्विक असेल तर ती गुणाने ब्राह्मण ठरते.  तसेच, एखादी जन्माने ब्राह्मण असणारी व्यक्ति अत्यंत तामसिक असेल तर ती गुणाने शूद्र ठरते.  यामुळे जो मनुष्य साधनचतुष्टयसंपन्न असेल तो मग कोणत्याही जातीचा-धर्माचा-वर्णाचा-आश्रमाचा अथवा कोणत्याही वयाचा असो, तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी साधक आहे.  येथे राजपुत्र हा कुमार अवस्थेत म्हणजेच अत्यंत तरुण होता.  याचा अर्थच ज्ञान हे शरीराच्या कोणत्याही बाह्य स्थितीवर अथवा वयावर अवलंबून नसते.  भगवान म्हणतात –  

 

            स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम् ||      (गीता अ. ९-३२)

 

स्त्री असेल, वैश्य किंवा शूद्र असेल, कोणालाही निरतिशय मोक्षगति प्राप्त होते.  म्हणून ब्राह्मण म्हणजे केवळ जन्माने ब्राह्मण नव्हे.  तर आचार्य व्याख्या करतात – ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः |  जो ब्रह्मस्वरूप जाणतो तोच ब्राह्मण होय.  किंवा – ब्रह्म ज्ञातुं इच्छति इति ब्रह्मणः |  जो ब्रह्मस्वरूप जाणण्याची इच्छा करतो, तो ब्राह्मण होय.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012- हरी ॐ