Friday, November 23, 2018

ब्रह्मचारी व्रत | Brahmachari Penanceप्रत्येक मुमुक्षूने ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे आवश्यक आहे.  या व्रतामध्ये तीन गोष्टी असतात.

१. ब्रह्मचर्य – सर्व इंद्रियांच्यावर संयमन करावे.  सर्व इंद्रियांची सहजस्वाभाविक प्रवृत्ति पाहिली तर ती बहिर्मुख, विषयाभिमुख आहे.  सर्व इंद्रिये अत्यंत स्वैर, उच्छृंखल असून बाह्य विषयांच्या उपभोगामध्येच रात्रंदिवस रममाण झालेली आहेत.  तसेच इंद्रियांच्यामध्ये स्वभावतःच रागद्वेष आहेत.  यामुळे सर्व इंद्रिये विषयांच्या आहारी जावून विषयलंपट झालेली आहेत.  साधकाने या स्वैर इंद्रियांच्यावर संयमन करून त्यांना विषयासक्तीमधून पूर्णपणे निवृत्त करावे.  यालाच ‘ब्रह्मचर्य’ असे म्हणतात.  ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच सर्व इंद्रिये व मन यांच्यावर संयमन करून नीतिनियम, आचार-विचार, आचारसंहितेने युक्त असलेले संयमित जीवन जगणे होय.  

२. गुरुशुश्रुषाब्रह्मचर्याश्रमामध्ये असताना अत्यंत श्रद्धेने व भक्तीने गुरूंची काया-वाचा-मनसा सेवा करावी.  गीतेमध्ये यालाच ‘आचार्योपासना’ असे म्हटलेले आहे.  साधकाच्या जीवनामध्ये ‘गुरु’ हेच सर्वश्रेष्ठ स्थान आहे.  तिथेच साधक पूर्णपणे नतमस्तक होतो.  त्यामुळे अहंकार नम्र होवून मनामधील रागद्वेषादि विकारही कमी-कमी होतात.  म्हणून साधना करीत असताना गुरुशुश्रुषा आवश्यक आहे.  

३. भिक्षाटन – भिक्षाटन करून त्यामधूनच स्वतःचा उदरनिर्वाह करावा.  भिक्षाटनामध्ये दुसऱ्याकडे भिक्षा मागावयाची असते.  त्यामुळे प्रथम अहंकार खाली येतो.  आवड-नावड कमी होते.  पात्रामध्ये पडणारे अन्न काहीही असो, ते आनंदाने खावेच लागते, कारण त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असतो.  भिक्षा मागत असताना अन्नाबरोबरच जननिंदा, अपमान, अवहेलना होते.  अशाच प्रसंगांमध्ये तितिक्षा, सहनशीलता हे गुण आत्मसात करता येतात.  भिक्षा मागितल्यामुळे “लोक माझी चेष्टा करतील का ?” ही भीति कमी होवून मन निर्भय होते.  भिक्षाटनामुळे संग्रहवृत्ति नाहीशी होते.  यामुळे संग्रह केलेल्या विषयांच्या रक्षणाचीही भीति संपते.  भिक्षा मागून आणल्यानंतर मी एकट्याने न खाता त्याचे समान भाग करून ती प्राणीमात्रांना, गुरूंना अर्पण करायची असते.  यामुळे मनामध्ये समर्पणवृत्ति निर्माण होते.  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ

Tuesday, November 20, 2018

समदर्शी | Equi-Observer
यथार्थ व सम्यक ज्ञानाची दृष्टि प्राप्त झाल्यामुळे ज्ञानी पुरुष सर्व विश्वामध्ये एकत्व पाहतो.  मातीचे ढेकूळ, दगड, सोने हे सर्व समदृष्टीनेच पाहातो.  याठिकाणी मातीचे ढेकूळ हे अत्यंत निकृष्ट आहे.  त्यापेक्षा दगडाला थोडी किंमत आहे आणि दगडापेक्षाही सोने अत्यंत मौल्यवान आहे.  अशा सर्व निकृष्ट-उत्कृष्ट विषयांना ज्ञानी पुरुष समदृष्टीनेच पाहातो.  

याचा अर्थ डोळ्यांना त्याच्यामधील भिन्नत्व हे दिसणारच !  परंतु आपण बुद्धीने काही विषयांना महत्व दिलेले आहे आणि कल्पनेनेच वस्तूंचे मूल्य ठरविलेले आहे.  यामुळे मौल्यवान वस्तुंविषयी मनामध्ये आसक्ति निर्माण होवून निकृष्ट विषयांचा त्याग करण्याची प्रवृत्ति निर्माण होते.  म्हणून उत्कृष्ट व निकृष्ट या बुद्धीच्याच अज्ञाननिर्मित कल्पना आहेत.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र सर्वच विषयांना समदृष्टीने पाहातो.  

याचा अर्थच तो कोणत्याही विषयाला फाजील महत्व देवून त्यामध्ये आसक्ति निर्माण करीत नाही.  अथवा एखाद्या विषयाचा तिरस्कार करून त्याला टाळण्याचाही प्रयत्न करीत नाही, कारण सर्व विश्वाकडे, सर्व विषयांच्याकडे तो ब्रह्मस्वरूपाच्या, एकत्वाच्या, अभेदत्वाच्या दृष्टीनेच पाहातो.  या दृष्टीमध्येच सर्व रागद्वेषांचा, द्वन्द्वांचा निरास होतो.  तो पुरुष ‘समदर्शी’ होतो.

शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान, स्तुति-निंदा, तसेच आध्यात्मिकादि सर्व उपद्रवांच्यामध्ये कोणतेही चांगले-वाईट प्रसंग प्राप्त झाले असताना हा ब्रह्मज्ञानी पुरुष समदर्शी असतो.  ब्रह्मस्वरूपामध्येच त्याची बुद्धि स्थिर झाल्यामुळे त्याच्या मनात विषयांचे संकल्प, रागद्वेष वगैरेदि विकार निर्माण होत नाहीत.  कोणत्याही बाह्य विषयाचा, प्रसंगांचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही.  तो हर्षविषादरहित, द्वन्द्वरहित होतो.  तो स्वस्वरूपामध्येच दृढ, स्थिर होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ


Tuesday, November 13, 2018

कार्यकारण संघातावर नियमन | Control on Causal Assembly
कार्यकारणसंघातरूपी अशुद्ध, कलुषित आत्म्यावर ज्या संस्कारयुक्त, विवेकी आत्म्याने जय मिळविलेला आहे, तो आत्मा स्वतःचा बंधु, मित्र होतो.  जय मिळविणे म्हणजे कार्यकारणसंघाताची, इंद्रियांची, मनाची जी सहजस्वाभाविक बहिर्मुख प्रवृत्ति आहे, त्यावर नियमन करणे होय आणि त्याच्या विरुद्ध, प्रतिकूल प्रवृत्ति मनामध्ये निर्माण करणे होय.  मग या कार्यकारणसंघातावर नियमन कसे करायचे, यावर आचार्य फार सुंदर सांगतात –

१. देहशरीर, डोके, मान हे एका सरळ रेषेत ठेवून देहप्रवृत्तीवर नियमन करावे.  
२. प्राणप्राणायामाच्या साहाय्याने आणि शांतीने प्राणावर संयमन करावे.  
३. इंद्रिये व मन – इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख, विषयासक्त असून कितीही उपभोगले तरीही अतृप्त, सतत वखवखलेली असतात.  त्यामुळे मनही अखंडपणे विषयांमध्येच रममाण, रत झालेले असते.  अशा इंद्रियांच्या व मनाच्या स्वैर, विषयाभिमुख प्रवृत्तीवर तीव्र वैराग्यवृत्तीने संयमन करावे.  
४. बुद्धि – बुद्धीची सुद्धा सतत बहिर्मुख प्रवृत्ति आहे.  विश्वाचा, बाह्य विषयांचाच सतत बुद्धि विचार करते.  बुद्धीच्या बहिर्मुख प्रवृत्तीवर नियंत्रण करण्यासाठी त्याच बुद्धीने सतत सत्-असत् चा विवेक करावा.  खरोखरच या विश्वामध्ये नित्य काय, अनित्य काय ?  याचा विचार करावा आणि जे असत् , अनित्य असेल त्याचा जाणीवपूर्वक त्याग करून सत् वस्तूचाच आश्रय घ्यावा.  यामधूनच आपोआप सर्व विषय अनित्य स्वरूपाचे आहेत, हे समजल्यानंतर नित्य, सत् वस्तु कोणती ?  तिचे स्वरूप काय आहे ?  ही जिज्ञासा निर्माण होईल.  मनामध्ये तीव्र तळमळ निर्माण होऊन, तीव्र मोक्षेच्छा व तीव्र वैराग्य उदयाला येईल.  मन, बुद्धि अंतर्मुख होईल.  अशा प्रकारे बुद्धिप्रवृत्तीवर नियमन करावे.  
५. अहंकार – ब्रह्मज्ञानाच्या अहं अकर्ता-अभोक्ता |  अहं सच्चिदानन्दस्वरूपः |  या अनुभूतीमध्येच अहंकार आपोआपच गळून पडतो.  

अशा प्रकारे ज्या पुरुषाने आपल्या देहेंद्रियादि कार्यकारणसंघातावर विजय मिळवून सर्वांना नियमित केलेले आहे, तो पुरुषच त्याच्या आत्म्याचा म्हणजेच स्वतःचा बंधु, मित्र होतो.  तो शोकमोहादि संसारापासून मुक्त होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, November 6, 2018

आपला उद्धार कोण करणार ? | Who Will Liberate Us?
ज्याप्रमाणे रोगी मनुष्य जिभेच्या आवेगाला बळी पडून अपथ्याचे सेवन करतो आणि स्वतःच स्वतःचा नाश ओढवून घेतो, त्याचप्रमाणे जो जीव स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करीत नाही, शमदमादि संपत्ति प्राप्त करीत नाही, ब्रह्मयोगनिष्ठेचा अभ्यास करीत नाही.  उलट, अविद्येमधून निर्माण झालेल्या भोगवासनेच्या आहारी जावून विषयासक्त, विषयलंपट होतो.  अत्यंत कामुकतेचे, वैषयिक जीवन जगतो.  यामुळे तो दुःखी, संसारी होतो. स्वतःच स्वतःचा नाश करणारा शत्रु होतो.  

अविवेकामुळे, मोहामुळे स्वस्वरूपापासून च्युत होवून विषयाभिमुख, बहिर्मुख, विषयारामः होतो.  असाच पुरुष स्वतःच स्वतःचा निश्चितपणे शत्रु आहे.  आत्मा ‘एव’ रिपुरात्मनः |  भगवान निश्चयात्मक, निर्णयपूर्वक, ठासून सांगण्यासाठीच येथे ‘एव’ कार योजतात, कारण बाहेरून येवून कोणीही आपला उद्धार करू शकत नाही.  प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा असमर्थ आहे, कारण आपलीच तीव्र इच्छा नसेल तर परमेश्वराजवळ जावूनही आपण त्याला मुक्ति न मागता इतर सर्व काही मागतो आणि परमेश्वरही आपल्याला ‘तथास्तु’ म्हणतो.  

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भज्याम्यहम् |      (गीता अ. ४-११)      
बहुतांशी सर्व जीव विषयांचेच भक्त असल्यामुळे कोणालाही मोक्षाची तीव्र इछाच नसते.  त्याला भगवान तरी काय करणार ?  मग भगवान कोणाचा उद्धार करतात ?  भगवान स्वतःच सांगतात -
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् | भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् || (गीता अ. १२-७)
ज्यांना मोक्षाची तीव्र तळमळ, इच्छा आहे, ज्यांचे मन पूर्णपणे माझ्यामध्ये – ईश्वरामध्येच तल्लीन, तन्मय झालेले आहे, अशा उत्तम साधकांचाच, अनन्य भक्तांचाच ‘मी’ ईश्वर उद्धारकर्ता होतो.  असे जीव स्वतःच स्वतःचे बंधु होतात.  परंतु ज्या मूढ, अविवेकी जीवांना विषयरूपी उकिरड्यामध्येच बरे वाटते, त्यातच किड्यामाशांप्रमाणे जे रममाण होतात, अशा जीवांची गति म्हणजे – पुनरपि जननं पुनरपि मारणं | पुनरपि जननीजठरे शयनम् |  

यावरून सिद्ध होते की, स्वतःचा उद्धार होण्यासाठी स्वतःचीच तीव्र तळमळ आणि प्रयत्न आवश्यक आहेत.  म्हणूनच भगवान सर्व साधकांना कळवळून सांगतात – उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |  स्वतःच स्वतःचा नाश करून न घेता उद्धार करून घ्यावा.  - "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ