Tuesday, July 25, 2017

मनाचे औदसीन्य – भाग १ | Composure of Mind – Part 1


औदासीन्यमभिप्स्यताम् |  
साधकामध्ये भावनावशतेने औदासीन्याचा उद्रेक नसावा.  औदासीन्य हा साधकाचा स्थायी भाव झाला पाहिजे. त्यासाठी त्याने सतत अभ्यास करावा.  उदासीन वृत्ति म्हणजे समतोल वृत्ति होय !  उदासीनवृत्ति म्हणजे सुतकीपणा (Indifference) नव्हे.  सुखदुःखाच्या अनुभवात Indifferent राहणे नव्हे, कारण सुखदुःखाचे आघात मृत्युपर्यंत होताच राहणार.  मनुष्याला सुखदुःखामुळे अनुक्रमे हर्ष व विषाद सतत अनुभवाला येतात.  दोन विरोधी वृत्तीत मन सतत हेलकावे खात रहाते.  प्रसंग कधीच टाळता येत नाहीत, बदलता येत नाहीत किंवा थांबविताही येत नाहीत.  माणसे व प्रसंग हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत.

म्हणून साधकाचा पुरुषार्थ काय ?  मनाच्या आंदोलनातून, खाली-वर होणाऱ्या हेलकाव्यातून त्याने मुक्त व्हावे यासाठी साधना आहे.  साधकाने हर्ष व विषाद या विकारांच्या आहारी न जाता उदासीन राहण्याचा अभ्यास केला पाहिजे.  त्यासाठी त्या प्रसंगांना खुबीने व चातुर्याने तोंड दिले पाहिजे.  सतत तटस्थ राहण्याचा अभ्यास केला पाहिजे.  सर्व प्रकारच्या प्रसंगात समत्वबुद्धि ठेवण्याचा अभ्यास केला पाहजे.  मनाची समतोल वृत्ति हीच खरी परिपक्वता आहे.  

श्रवण, मनन साधनेतही चांगले व वाईट प्रसंग येणारच.  परमेश्वर साधकांच्या श्रद्धेची परीक्षा घेतो.  जे श्रद्धा, भक्ति, निष्ठेच्या जोरावर कोणत्याच प्रसंगाने विचलित होत नाहीत, तेच साधक पुढे जातात.  एकापेक्षा एक जास्त बिकट प्रसंग हे साधकाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी लावलेले Filters आहेत.  चोहोबाजूंनी संकटांनी घेरले जाऊनही जो साधक आत्मज्ञानप्राप्तीपासून जराही परावृत्त होत नाही तोच आत्मविद्येसाठी अधिकारी होतो, कारण संकटातही त्याची परमेश्वर व जीवन यावरील दृढ श्रद्धा टिकून रहाते.  

साधकाने दुःख निवारणार्थ परमेश्वराला प्रार्थना करू नये.  प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता जबरदस्त आत्मबलाने व आनंदाने हसत जीवनात पुढे जाणे हीच साधकाला साधना करावयाची आहे.  हे मनाचे सामर्थ्य हा त्याचा स्वभाव बनला पाहिजे.  त्याने मनाची तटस्थ व अलिप्त वृत्ति आत्मसात केली पाहिजे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ


Tuesday, July 18, 2017

प्रारब्ध आणि जिज्ञासु | Fate and The Seeker


शास्त्रकार म्हणतात -  तथा च अभाविनः यत्नेन अपि लाभ असम्भवात् भाविनः च यत्नेन निवारयितुं अशक्यत्वात् च यत्नः निष्फलः इति |  

एखादी गोष्ट जीवनात मिळणार नसेल, तर लाखो प्रयत्न करूनही ती मिळणारच नाही.  तसेच कर्मवशात एखादी गोष्ट मिळणार असेल, मग ती चांगली असो वा वाईट असो, जीवाचा आटापिटा करूनही ती गोष्ट टाळता येणार नाही.  हा स्वतःच्या कर्माचा दोष आहे.  याबाबत कुणालाही दोष देता येणार नाही.  याच दृष्टीने जीवनात मनुष्याचे प्रयत्न निष्फळ आहेत.  प्रत्येकाला जेवढे, जेव्हा व जे मिळावयाचे आहे तेवढेच मिळणार.  ते कमी नाही, जास्तही नाही, आधीही नाही व नंतरही नाही.  

म्हणून जिज्ञासु साधकाने वेळ व शक्ति खर्च करून अन्न मिळवू नये.  त्यासाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत, कारण साधक हा वेदाध्ययनासाठी येतो, तेव्हा आपला सगळा भार ईश्वरावर टाकतो.  भगवन्ताने अशा साधकाला पूर्ण आश्वासन दिले आहे व निश्चिंत राहण्यास सांगितले आहे.  म्हणून भगवान गीतेत म्हणतात, ‘योगक्षेमं वहाम्यहम् |’  मी तुझा चरितार्थ चालवितो.  आवश्यक, योग्य ते सर्व पुरवितो, कारण मी परमेश्वर सर्वशक्तिमान, सर्व विश्वाचा पोषणकर्ता आहे.  

प्रत्यक्ष परमेश्वर मातापित्याप्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनाची काळजी घेणारा असल्याने, साधकाने जीवनातील बहुमोल वेळ फक्त साधनेत घालवावा.  परमेश्वराच्या कृपेने प्रारब्धवशात् सर्व काही व्यवस्थित होत रहाते.  अशा प्रकारे साधकाने साधनेतील जास्तीत जास्त प्रतिबंध काढून टाकावेत आणि तमोगुण व रजोगुण कमी करून सत्त्वगुणाचे संवर्धन करावे.  कालानुक्रमे मन अधिकाधिक शुद्ध करावे.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ


Tuesday, July 11, 2017

अन्न ग्रहणात संतोष | Satisfaction in Partaking Food


विधिवशात् प्राप्तेन संतुष्यताम् |
विधिवशात् किंवा प्रारब्धवशात् प्राप्त होणाऱ्या अन्नात साधकाने संतोष मानावा.  अन्नासाठी त्याने याचना व प्रयत्न करावयाचे नाहीत.  अशा परिस्थितीत त्याने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण कसे करावे ?

विधिवशात् म्हणजे कर्मवशात् होय.  कोणताही जीव किंवा मनुष्य जन्माला येतो त्यावेळी निश्चितपणे त्याच्या जीवनाचे आवश्यक असणारे पूर्वनियोजन केलेले असते, कारण पूर्वजन्मात जीवाने केलेल्या कर्मानुसार त्याचा जन्म म्हणजे त्याबरोबर त्याचे शरीरही निश्चित केले जाते व त्याच्या शरीरनिर्वाहाचे नियोजनही आधीच केलेले असते.  म्हणून सत्कृतस्य दुष्कृतस्य कर्मवशात् |’ किंवा जन्मान्तरकृतस्य कर्मणाअसे सांगितले आहे.  ज्या कर्मामुळे हे शरीर जन्माला येते ते कर्मच शरीराचे पोषण, रक्षण व वर्धन करते.

प्रारब्धं पुष्यति वपुः |
प्रारब्धकर्म म्हणजेच पापपुण्यात्मक कर्मच या शरीराला जन्म देऊन त्याचे पोषण करते.  जीवन जगत असताना मनुष्य स्वतःच्या कर्माची फळे उपभोगत असतो.  त्याला कर्मानुसार निश्चितपणे अन्न मिळते.  म्हणून कर्मफलाच्या स्वरूपात, प्रयत्न न करता व याचना न करता साधकाजवळ येईल त्या अन्नात त्याने संतोष मानावा.  आपण रोज अन्न ग्रहण करतो ते प्रारब्धामुळेच, हे जसे सत्य आहे तसेच एखाद्या दिवशी अन्न मिळत नाही ते ही प्रारब्धामुळेच.

तसेच प्रारब्धात अन्न पोटात जावयाचे नसेल तर पुढे भरपूर अन्न असूनही मनुष्याला दुर्बुद्धि होऊन तो अन्न खाण्याचे नाकारेल.  याउलट प्रारब्धात मनुष्याला अन्न मिळणार असेल तर त्याच्या जबरदस्त श्रद्धेने, निष्ठेने परमेश्वराची प्रार्थना केल्याने बसल्याजागी त्याला कोणीतरी अन्न आणून देईल.  याच कारणास्तव साधकाने प्रारब्धानुसार जे मिळेल, त्या अन्नात संतोष मानावा.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ

Tuesday, July 4, 2017

ज्ञानी राजा, उन्नत समाज | Wise Ruler, Progressive Society


इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेSब्रवीत् ||   (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-०१)
मी हा अविनाशी योग कल्पारंभी विवस्वानाला, विवस्वानाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितला.

श्रेष्ठ ज्ञानाने युक्त असलेले राजे उदात्त ध्येयाने प्रेरित होवून निस्पृह होतात आणि मानवजातीच्या कल्याणासाठी त्यागमय निःस्वार्थ जीवन जगतात.  ते समाजाला प्रेरणा व स्फूर्ति देतात.  राजे लोकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्माचे रक्षण करणे.  धर्माचे रक्षण म्हणजे केवळ मंदिरांचे रक्षण नाही, कारण धर्म हा बाह्य विषयांवर आश्रित नसून मनुष्यावर आश्रित आहे.

त्यामुळे जे धर्माचे अनुसरण करून रक्षण करतात, त्या धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे, कारण धर्मनिष्ठ विद्वान लोक समाजामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार, कर्तव्यपारायणता, श्रेष्ठ नीतिमूल्ये आणि सद्गुणांची जोपासना करतात.  समाजाला उदात्त ध्येयाने प्रेरित करतात.  त्यामुळे समाजामध्ये श्रेष्ठ नीतिमूल्यांचे जीवन निर्माण होवून सुसंगति, सुसूत्रता निर्माण होते.  म्हणून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या श्रेष्ठ विद्वान पुरुषांचे रक्षण करणे हेच कर्तव्य आहे.

याप्रकारे समाजामध्ये विवेकी, क्षत्रिय आणि विद्वान ब्राह्मण यांचा योग्य समन्वय झाला तर तो समाज ध्येयवादी, सुसंस्कृत होतो.  म्हणून अशा प्रकारची दृष्टि असलेला, प्रजेचा हितकर्ता, प्रजेसाठी जगणारा प्रजाहितदक्ष राजा असेल तर समाजाची उन्नति होते.  राजाला धर्माचे अधिष्ठान असेल व ब्राह्मणांना राजाचा आश्रय असेल तर सर्व समाज सुरळीत चालेल.  म्हणून याठिकाणी भगवंतांनी ही दृष्टि लक्षात ठेवून क्षत्रिय परंपरा सांगितलेली आहे.  इतकेच नव्हे तर, हे दिव्य ज्ञान भगवंतांनी रणभूमीवर सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्धर अर्जुनाला दिलेले आहे.- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ