Friday, August 27, 2021

निरतिशय प्रकाशक | The Ultimate Illuminator

 



सर्व बोधवृत्ति निर्मित असल्यामुळे त्या जड, अचेतन आहेत.  या सर्व बुद्धिवृत्तींना प्रकाशमान करणारे चैतन्यच आहे.  कसे ?  तर व्यावहारिक ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय अशा दोन भिन्न गोष्टी आहेत.  ज्ञाता हा ज्ञेयापासून नित्य भिन्न असतो.  घटद्रष्टा घटात् भिन्नः इति न्यायेन |  ‘मी’ हा ज्ञाता आहे व सर्व दृश्य विषय ज्ञेय आहेत.  ‘मी’ हा ज्ञाता सतत ‘अहं’, ‘अहं’ स्वरूपाने प्रचीतीला येतो.  तो सर्व दृश्याचे ज्ञान घेतो.  त्यालाच प्रमाता असे म्हणतात.  परंतु ज्ञाता, हा दृश्याचे ज्ञान घेत असेल तरी त्यालाही प्रकाशमान करणारे कोणीतरी असलेच पाहिजे.

 

आचार्य एके ठिकाणी सुंदर वर्णन करात –

किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादीकम् |

स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे ||

चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने |

किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो ||       (एकश्लोकी वेदान्त)

खरोखरच या विश्वाचे निरतिशय प्रकाशक कोण आहे ?  हे समजावून देण्यासाठी आचार्य शिष्यालाच प्रश्न विचारून त्यास सर्वप्रकाशकाचे स्वरूप सांगतात.

 

आचार्य: तुला कोण प्रकाशमान करते ? (कोण जाणते ?)

शिष्य: दिवसा सूर्य व रात्री दीप वगैरे.

आचार्य: सूर्य, दिवा यांना कोण प्रकाशमान करते ?

शिष्य: डोळे.

आचार्य: डोळे मिटल्यानंतर कोण प्रकाशक आहे ?

शिष्य: बुद्धि.

आचार्य: बुद्धीचे ज्ञान कोणामुळे होते ?

शिष्य: माझ्यामुळे.

 

यावरून सिद्ध होते की, सर्व बुद्धिवृत्तींनाही प्रकाशमान करणारे, निरतिशय, सर्वप्रकाशक आत्मचैतन्यस्वरूपच असून तेच प्रत्येक जीवाचे प्रत्यगात्मस्वरूप, सर्व वृत्तींचे साक्षीचैतन्यस्वरूप आहे.

 


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, August 24, 2021

आत्मज्ञानाची द्वारे | The Doors of Self-Knowledge

 



आपल्याला बुद्धीच्या साहाय्याने ज्या ज्या विषयांचे, प्रत्ययांचे ज्ञान होते, बोध होतो, ती प्रत्येक ज्ञानवृत्ति, बोधवृत्ति म्हणजेच जणु काही आत्मज्ञानाची द्वारे आहेत.  कारण या प्रत्येक बोधवृत्तीमधून त्या त्या विषयाचे तर ज्ञान होतेच, परंतु त्या त्या ज्ञानवृत्तीमधून त्या ज्ञानवृत्तीच्या अधिष्ठानाचे म्हणजे आत्मचैतन्याचेच ज्ञान होत असते.  सर्व अंतःकरणवृत्ति या प्रकाश्य असून आत्मचैतन्यस्वरूप सर्व वृत्तींचे प्रकाशक आहे.  त्यामुळे आत्मचैतन्य हे त्या वृत्तींच्यापासून अत्यंत विलक्षण स्वरूपाचे आहे.  लोखंडाच्या गोळ्यामधील अग्नि जसा त्या गोळ्यापासून अत्यंत भिन्न आहे, तसेच सर्व वृत्तींच्यामध्ये व्याप्त असणारे, अधिष्ठानरूप असणारे चैतन्य सर्व वृत्तींच्यापासून अत्यंत भिन्न स्वरूपाचे आहे.  म्हणूनच सर्व बुद्धिवृत्तींच्यामधून अधिष्ठानरूपाने चैतन्यच जाणले जात असल्यामुळे सर्व बुद्धिवृत्ति याच जणु काही आत्म्याच्या प्राप्तीसाठी द्वारे आहेत.

 

म्हणजेच प्रत्येक प्रत्ययामध्ये, ज्ञानवृत्तीमध्ये त्या त्या वृत्तीच्या विषयाला प्रकाशमान करणारा जो प्रत्यगात्मा प्रकट होतो, तो प्रकाशस्वरूप, ज्ञानस्वरूप आत्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे.  हेच ब्रह्माचे खरे, यथार्थ ज्ञान आहे.  उदा. घटज्ञानामध्ये ‘घट’ हा ज्ञेय विषय आहे.  घटाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर घटाच्या अज्ञानाचा नाश केला पाहिजे.

 

घटाच्या अज्ञानाचा नाश करावयाचा असेल तर घटाची ज्ञानवृत्ति म्हणजेच घटवृत्ति उदयाला आली पाहिजे.  घटाकार वृत्ति उदयाला येण्यासाठी प्रथम घटाव्यतिरिक्त असणाऱ्या अन्य वृत्तींचा निरास झाला पाहिजे.  यानंतर ‘घट’ ही वस्तु डोळ्यासमोर ठेवली पाहिजे.  त्यानंतर डोळे निर्दोष असून ते उघडे ठेवले पाहिजेत.  त्यानंतर डोळ्यांच्या मागे मन म्हणजेच वृत्ति पाहिजे.  मग ती वृत्ति डोळ्यांच्या माध्यामामधून ‘घट’ या ज्ञेय विषयापर्यंत जाऊन ती घटाकार झाली पाहिजे.  ती वृत्ति ज्ञेय विषयाशी तादात्म्य पावल्यानंतर ती घटाकार होते. येथपर्यंत ठीक आहे.

 

परंतु त्यापुढे ती वृत्ति ज्ञात्याकडून जाणली गेली पाहिजे.  घटवृत्ति ही स्वतःच जड आहे.  तसेच, ही वृत्ति निर्मित, कार्य असल्यामुळे जड स्वरूपाचीच आहे.  त्यामुळे घटवृत्ति स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही.  “मी घट आहे”, असे म्हणू शकत नाही.  सर्व बोधवृत्ति निर्मित असल्यामुळे त्या जड, अचेतन आहेत.  या सर्व बुद्धिवृत्तींना प्रकाशमान करणारे चैतन्यच आहे.

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Mataji Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, August 17, 2021

अविद्या आणि ब्रह्मविद्या | Ignorance & Knowledge

 



अविद्येचे मूळ कारण अध्यास आहे.  म्हणजेच चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास हाच हेतु आहे.  याउलट एषणत्रय संन्यास हा विद्येचा हेतु आहे.  विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति आणि मुमुक्षुत्व हा ब्रह्मविद्येचा हेतु आहे.  याप्रमाणे ब्रह्मविद्या आणि अविद्या यांच्या हेतुमध्ये, यांच्या स्वरूपामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये पूर्णतः भेद आहे.

 

१) अविद्या –       हेतु    – चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास

स्वरूप – अज्ञानस्वरूप

फळ   – संसारप्राप्ति

श्रुति   - अविद्यायामन्तरे वर्तमानाःस्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |

        दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः || (कठ. उप. १-२-५)

ज्याप्रमाणे एक अंध पुरुष दुसऱ्या अंध पुरुषाला मार्ग दाखवितो.  त्याप्रमाणे स्वतःला धीर व विद्वान समजणारे, अविद्येमध्येच रत झालेले पुरुष संसारचक्रामध्येच परिभ्रमण करतात.

 

२) ब्रह्मविद्या –     हेतु    - एषणत्रयसंन्यास (पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा यांचा त्याग)

साधनचतुष्टयसंपत्ति (विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति, मुमुक्षुत्वम्

स्वरूप – ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप (यथार्थ, सम्यक्, संशयविपर्ययरहित ज्ञान)

फळ   – अत्यंत दुःखनिवृत्ति निरतिशय आनंदप्राप्तिः मोक्षप्राप्ति

श्रुति   - भिद्यते हृदयग्रन्थििश्छद्यन्ते सर्वसंशयाः |

        क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे || (मुण्ड. उप. २-२-८)

जीवब्रह्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होऊन जीव मुक्त होतो.

 

याप्रमाणे ज्ञान आणि कर्म यांच्या हेतु, स्वरूप आणि फळ यामध्ये भेद असल्यामुळे कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय अजिबात शक्य नाही.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, August 10, 2021

ध्यान प्रक्रियेचा क्रम | Step-by-Step ‘Dhyaan’ Process

 



ध्यानाचे प्रयोजन हे मनाची एकाग्रता करणे नाही, सिद्धि, दर्शन हे नाही, तर स्वतःच्या स्वरूपाची सुस्थिति प्राप्त करणे, स्वस्थ होणे होय.  भगवान प्रत्यक्ष ध्यानप्रक्रिया स्पष्ट करतात –  

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया |

आत्मसंस्थं मनः क्रुत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ||              (गीता अ. ६-२५)

क्रमाने मन सर्व बाह्य विषयांच्यापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करणे, यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात.  भगवान येथे साधकाला क्रमाने लयच करायला सांगतात.  परंतु मनाचा लय करताना सुद्धा विशिष्ट क्रम आहे.  स्थूल वस्तूचा लय सूक्ष्म वस्तुमध्ये, सूक्ष्माचा सूक्ष्मतरामध्ये आणि सूक्ष्मतर वस्तूंचा लय सूक्ष्मतम वस्तूंमध्ये करावा.  म्हणजेच कार्याचा लय कारणामध्ये, कारणाचा लय त्याच्या कारणामध्ये, त्या कारणाचा लय त्याच्याही कारणामध्ये करावा.

 

यच्छेद्वाम्ङनसि प्राज्ञस्तद्यच्छेज्ज्ञान आत्मनि |

ज्ञानमात्मनि महति नियच्छेत्तद्यच्छेच्छान्त आत्मनि ||           (कठ उप. १-३-१३)

प्राज्ञ म्हणजे विद्वान पुरुषाने सर्व इंद्रिये मनामध्ये, मन बुद्धीमध्ये, बुद्धि महत्तत्त्वामध्ये आणि महत्तत्त्व शांतस्वरूप असणाऱ्या अविकारी, निर्विशेष आत्म्यामध्ये क्रमाने लय करावे.

 

विवेकी पुरुषाने वाणीचा उपसंहार करावा.  वाणी हा शब्द सर्व इंद्रियांचे उपलक्षण आहे.  इंद्रियांचा उपसंहार मनामध्ये करावा.  त्या मनाचा ज्ञानरूपी बुद्धीमध्ये, प्रकाशस्वरूप बुद्धीमध्ये लय करावा, कारण बुद्धीच मन वगैरेदि इंद्रियांना व्याप्त करते.  त्यामुळेच ती मन, इंद्रियांचा आश्रय, अधिष्ठान आहे.  ती बुद्धि मग प्रथमज असलेल्या महदात्म्यामध्ये, हिरण्यगर्भामध्ये लय करावी.  म्हणजेच हिरण्यगर्भाचा जसा स्वभाव आहे, स्वच्छ स्वभाव, रागद्वेषविकाररहित, अमलिन, तसा स्वभाव व्यष्टि बुद्धीने प्राप्त करावा.  नंतर त्या हिरण्यगर्भाचा अव्याकृतात लय न करता निर्विकार स्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा.  तो महदात्मा, हिरण्यगर्भ शांतस्वरूपाच्या मुख्य आत्म्यामध्ये, नीरव शांतस्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा.  ज्याठिकाणी सर्व विकार, विशेष प्रत्ययांचा निरास होतो, संकल्पविकल्पांचा निरास होतो.  सर्वांच्या आत अधिष्ठानस्वरूपाने असणारा निर्विकार, सर्व बुद्धिप्रत्ययांचा साक्षी असणाऱ्या मुख्य आत्म्यामध्ये लय करावा.  हीच निदिध्यासना, ब्रह्माभ्यास, बाधितसमाधि, ज्ञानसमाधि आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Wednesday, August 4, 2021

मनाचा लय आणि ध्यान | Mind Dissolution and ‘Dhyaan’

 



अनेक विद्वान लोक शास्त्रशुद्ध ध्यानपद्धती समजावून न घेता सामान्य लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करतात.  आजकाल तर Meditation चे प्रस्थच माजलेले आहे.  कोणीही उठतो आणि जगाला ध्यान शिकवितो.  इतकेच नव्हे, तर प्रत्येकाने आपापली ध्यानपद्धती develop केलेली आहे, त्याला एक-एक सुंदर नाव दिलेले आहे.  पुष्कळ लोक मनाच्या लयावस्थेलाच ध्यान असे समजतात.

 

परंतु मनाची लयावस्था म्हणजे ध्यानावस्था नव्हे किंवा समाधिवस्था देखील नव्हे, तर ती अव्याकृताची, अज्ञानाची अवस्था आहे.  म्हणून त्या अवस्थेमध्ये सुद्धा सुषुप्तिप्रमाणे अज्ञानाचाच अनुभव येतो.  जसे, गाढ झोपेमध्ये मी सुखाचा अनुभव घेतो.  म्हणूनच उठल्यानंतर मी म्हणतो की – सुखेन अहं अस्वाप्सम् |  सुखेन मया निद्रा अनुभूयते |  “मला छान झोप लागली होती, मी सुखाने झोपलो होतो.”  तेथे दुखांचा अभाव होतो.

 

मनोलयाच्या अभ्यासामध्ये एक क्षण जरी मनोलय झाला तरी तेथे दुःखांचा अभाव झाल्यामुळे आपोआपच क्षणभर सुखाचा आभास निर्माण होतो आणि त्यालाच तथाकथित विद्वान लोक ‘आत्मसाक्षात्कार’ असे नाव देतात.  याच अनुभवाला सामान्य लोक भुलतात.  वस्तुतः या अनुभवामध्ये प्रत्यक्ष त्या ध्यान शिकाविणाऱ्याचा काहीही पुरुषार्थ नसतो.  कारण मनोलय झाला की, तो अनुभव कोणालाही, कोठेही येऊ शकतो.  एक क्षणभर दिव्य सुखानुभूति येते.  शरीरामधील, मनामधील सर्व ताण-तणाव नाहीसे होतात.  मन एकदम relax होते.  दुःखाने ग्रस्त झालेल्या, पीडित झालेल्या सामान्य, अज्ञानी मनुष्याला हा मनोलयाचा क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा काहीतरी दैवी चमत्कार वाटतो.

 

शास्त्रशुद्ध ध्यानपद्धति समजावून न घेतल्यामुळे सामान्य मनुष्य त्या मनोलयाच्या अवस्थेलाच आत्मसाक्षात्कार, आत्मप्रचिती असे नाव देतो.  परंतु तो दिव्य अनुभव एक क्षणापुरता टिकतो आणि पुन्हा उत्थानसमयी दुःख, यातना, शोक-मोहादि संसार प्रचीतीला येतो.  मनोलयाच्या अवस्थेमध्ये सुषुप्तीप्रमाणे निदान काही क्षण आनंद, सुख प्राप्त होते.  म्हणून त्या अवस्थेला गौण अर्थाने, गौण दृष्टीनेच श्रुतीने अमृतस्वरूप असा शब्द वापरलेला आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ