Wednesday, July 29, 2015

शरणागती | Submission


‘शरणागति’ यामध्ये शरण व आगति हे दोन शब्द आहेत.  ‘शरणागति’ म्हणजेच शरण येणे होय.  आगति यामध्येही गति म्हणजेच गमन म्हणजेच जाणणे असा शब्द आहे.  जाणणे हा बुद्धीचा धर्म आहे.  म्हणून शरण येणे, हा सुद्धा शरीराचा धर्म नसून बुद्धीचा धर्म आहे, हे सिद्ध होते.

‘शरणागति’ हे बुद्धीचे लक्षण आहे. केवळ मनाने उचंबळून येणारी भावना म्हणेज शरण जाणे नव्हे.  आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपल्या भावना उचंबळून आल्या की, आपण उतावीळ होऊन कुठेतरी डोके टेकवितो किंवा अनेक लोक एखाद्या ठिकाणी डोके टेकवितात, म्हणून मीही टेकवितो.  क्षणभर बरे वाटते. परंतु नंतर ती श्रद्धा राहत नाही.  याला ‘शरणागति’ म्हणत नाहीत.  किंवा डोळ्यामधून पाणी येणे, सारखेच रडणे ही सुद्धा शरणागति नाही, कारण ‘शरणागति’ हे बहिरंगाचे, शरीराचे लक्षण नाही.  तर – गत्यर्थः बुद्ध्यर्थः इति |

शरण जाणे हा बुद्धीचा भाव आहे. माझी बुद्धि शरण गेली पाहिजे.  मग बुद्धि केव्हा शरण जाईल ?  जेव्हा मनुष्याच्या बुद्धीला स्वतःच्या मर्यादा समजतात, आपल्यावर तसेच या संपूर्ण विश्वावर नियमन करणारी एक अज्ञात शक्ति आहे, याची बुद्धीला तीव्रतेने जाणीव होते, तेव्हाच बुद्धि शरण येते.  मनुष्यामधील मी करतो हा कर्तृत्वभाव कमी होतो.  जीवनामध्ये काही प्रसंग असे येतात की, मनुष्य आपोआपच परमेश्वराच्या शक्तीपुढे नतमस्तक होतो.  शरणागतीची व्याख्या केली जाते –
त्वमेव उपायभूतो मे भवेति प्रार्थनामतिः |  शरणागतिरित्युक्ता सा देवेस्मिन् प्रयुज्यताम् ||

परमेश्वरा ! तूच माझ्यासाठी उपाय व्हावेस, तूच साधन व्हावेस ही प्रार्थनाबुद्धि म्हणजेच ‘शरणागति’ होय.  म्हणजेच ज्यावेळी मनुष्याचे सर्व बाह्य उपाय संपतात, बाह्य साधने संपतात, त्यावेळी त्याला ईश्वर हाच एकमेव आशेचा किरण दिसतो.  ईश्वर हेच जीवन, ईश्वर हेच साध्य, ईश्वर हीच साधना, ईश्वर हीच निष्ठा, श्रद्धा, सेवा असा भाव निर्माण होतो, तेव्हाच त्याला ‘शरणागति’ असे म्हणतात.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013




- हरी ॐ

Tuesday, July 21, 2015

संसार | Material World


आपण व्यवहारात अनेक वेळेला संसार हा शब्द वापरतो.  अनेक लोक म्हणतात की, आम्हाला अध्यात्म करण्याची खूप इच्छा आहे हो !  पण काय करणार ?  आमच्या मागे संसार लागलाय !  मुलं, बाळं, पती, पत्नी, सगे-सोयरे, घर-दार यासारख्या सर्व गोष्टींना मिळून संसार अशी संज्ञा दिली जाते.  परंतु शास्त्राप्रमाणे याला ‘संसार’ म्हणत नाहीत.

आचार्य आपल्या भाष्यांच्यामधून ‘संसार’ या शब्दाची व्याख्या करतात – कर्तृत्वभोक्तृत्वलक्षणः संसारः |  ज्यामध्ये मी केले किंवा मी कर्ता व मी सुखदुःखांचा भोक्ता असा कर्तृत्व – भोक्तृत्व भाव असतो त्यास ‘संसार’ असे म्हणतात.  किंवा दुसरी व्याख्या आहे – अहंताममतालक्षणः संसारः |  ज्यामध्ये अहंकार व ममकार या दोन वृत्ति असतात, त्यास ‘संसार’ असे म्हणतात.

मी व माझे या दोनच वृत्ति मनुष्याच्या संसारबंधनाला कारण आहेत.  मी ही अभिमानाची व माझे ही ममत्वाची वृत्ति आहे.  उदा. सोन्याचा दागिना जोपर्यंत सोनाराच्या दुकानात असतो तोपर्यंत आपल्याला त्रास नसतो.  परंतु ज्याक्षणी आपण पैसे देऊन दागिना विकत घेतो, तेव्हा त्यामध्ये हा माझा दागिना, अशी ममत्वाची भावना निर्माण होते.  यालाच संसार असे म्हणतात.  माझे घर, माझी मुलं, माझी पत्नी, माझे शरीर, माझे मन याप्रमाणे सर्व ठिकाणी ममत्वाची वृत्ति निर्माण करून त्यामध्ये आपण आसक्त होतो.  यालाच ‘संसार’ असे म्हणतात.

म्हणून संसार हा वस्तुतः बाहेर नसून मनुष्याच्या मनामध्ये संसार आहे.  जोपर्यंत मन आहे, तोपर्यंतच संसार आहे, कारण मनच लयावस्थेला गेले तर तेथे संसाराचा अभाव होतो.  आचार्य म्हणतात – चित्तमेव हि संसारः |  मन म्हणजेच संसार आहे. आचार्य संसाराचे वर्णन करतात – अनेकानर्थसंकुलः |  अनेक अनर्थांचे संकुल असणारा ‘संसार’ आहे.  संकुल म्हणजे समूह होय.  त्याप्रमाणेच, जेथे सर्व बाजूंनी अनर्थच अनर्थ घडत असतात, त्यास ‘संसार’ असे नाव आहे.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013




- हरी ॐ

Wednesday, July 15, 2015

अविनय | Ego



षट्पदी स्तोत्रामध्ये आचार्य सुंदर प्रार्थना करतात – अविनयं अपनय विष्णो |  भगवंता !  माझ्यामधील अविनय दूर कर.

मानवी मनामधील सर्व संघर्ष अभिमानाच्या वृत्तीमुळे निर्माण होतो.  अभिमानाने मी स्वतःच माझ्या स्वतःभोवती अनेक कल्पनांचे जंजाळ निर्माण केले आहे.  त्या कल्पनांच्यामध्येच मी जीवन जगतो.  माझे शरीर बाह्य विश्वात आहे.  परंतु ‘मी’ मात्र माझ्या मनोकल्पित विश्वामध्ये जगतो.  मी माझं स्वतःचं स्वतंत्र मनोविश्व निर्माण करतो.  त्यामध्ये स्वतःविषयी तर अनंत कल्पना आहेतच.  परंतु मी जगत असताना अन्य व्यक्तींच्याबद्दल सुद्धा कल्पना करतो.  विश्वाबद्दल विषयांच्याबद्दल कल्पना करतो.

इतकेच नव्हे तर, दुसऱ्या व्यक्तीने कसे वागावे ?  हे मी ठरवितो.  मी असं बोलल्यावर समोरच्या व्यक्तीनं मला कसं प्रत्युत्तर द्यावं, माझ्याकडं त्यानं कसं पाहावं ?  कसं बोलावं ?  कसं हसावं ?  कशी प्रतिक्रिया द्यावी ?  हे मी ठरवितो आणि त्याप्रमाणं घडलं नाही तर आपण दुःखी होतो.  म्हणुनच व्यवहारामध्ये क्षणाक्षणाला आपला अपेक्षाभंग होत असतो.  आपल्या अपेक्षेप्रमाणे विश्वामधील एकही व्यक्ति वागत नाही.  मग मात्र आपले जीवन असह्य होते.

याप्रमाणे जितका अविनय अधिक तितक्या कल्पना वर्धन पावतात.  जितक्या कल्पना अधिक तितक्या अपेक्षा अधिक व जितक्या अपेक्षा अधिक तितका अपेक्षाभंग अधिक होतो.  याचा अर्थच मनुष्याच्या सर्व दुःखांचे, असह्य वेदनांचे, त्यास अनुभवायला येणाऱ्या संसाराचे मूळ कारण अहंकार हेच आहे.  म्हणुनच आचार्य प्रामुख्याने प्रार्थना अहंकाराच्या नाशासाठी करीत आहेत.


- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री  २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013




- हरी ॐ

Tuesday, July 7, 2015

जीवन कसे जगावे ? | How to Live Life ?


जीवन हे जगण्याचे शास्त्र आहे.  धार्मिक जीवन हे पळपुटेपणाचे जीवन नाही.  समाजामधून निवृत्त होऊन निष्क्रिय होण्याचे जीवन नाही.  जीवन हा अखंड गतिमान असणारा प्रवाह आहे.  मृत्यु हाच जर जीवनाचा शेवट असेल, तर मरेपर्यंत माणसाने जगले पाहिजे.  त्याठिकाणी कोणालाही स्वातंत्र्य नाही.  त्यामुळे कोणत्या भावाने जगायचे आहे, हे तुमच्यावरच अवलंबून आहे.

तुम्ही सतत निराश, भकास, हताश होऊन जर बसलात तर प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला, कोणीही आला तरी तो तुम्हाला त्या नैराश्यामधून बाहेर काढू शकणार नाही.  शेवटी तुम्हालाच तुमच्या मनाने या मानसिक दुर्बलतेमधून, अस्वस्थतेमधून बाहेर आले पाहिजे आणि एक भव्य, दिव्य, श्रद्धा, भक्ति, आत्मविश्वासाने युक्त असणारे जीवन जगले पाहिजे.  त्यासाठी अंतरंगातील भाव बदलणे आवश्यक आहे.  कितीही भयंकर प्रसंगामध्ये मनाचे संतुलन, तोल ढळणार नाही, तर सतत मन प्रसन्न, शांत, स्थिर राहील.

जीवन प्रत्येकाला जगलेच पाहिजे, त्यावेळी कोठेही मन न अडकता, बाहेरील प्रसंगांचा आघात होऊ न देता असे प्रसन्न, सुंदर जीवन जगावे, जीवनातील आनंद अनुभवत जीवन जगावे.  कारण बहिरंगाने आपण किती श्रीमंत आहोत, किती उपभोग आहेत, यावर आनंद अवलंबून नाही, तर सर्व काही मनावर अवलंबून आहे.  मन किती शुद्ध, निर्मळ, द्वंद्वरहित आहे, त्यावरच जीवनाचा आनंद अवलंबून आहे.


- "तणावमुक्त जीवन" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २०१३
- Reference: "
Tanavmukta Jeevan" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2013



- हरी ॐ