Monday, April 29, 2024

अविचाररूपी निद्रा | The Stupor of Indiscrimination

 



हे राघवा !  अविचाररूपी निद्रा ही काजळाप्रमाणे काळी असून तिच्यामध्ये मदिरेचे धर्म आहेत.  म्हणून हे रामा !  तुझ्यामधून अशा निद्रेचा नाश होवो.  जसे मनुष्याला झोपेमध्ये काहीच कळत नाही, तसेच अविचार ही सुद्धा मनुष्याला दीर्घकाळ लागलेली निद्रा आहे.  एक वेळ रोजची झोप बरी !  कारण त्यामधून सकाळी मनुष्य जागृत होतो.  परंतु अविचाररूपी निद्रेमध्ये झोपलेल्या मनुष्याला असे वाटत असते की, आपल्याला सर्व काही समजते.  परंतु वस्तुतः त्याला काहीही समजत नसते.  अशी ही निद्रा काजळाप्रमाणे अत्यंत गडद म्हणजे अंधारमय, अज्ञानमय आहे.  तसेच मदिरेचे सर्व गुणधर्म या अविचाररूपी निद्रेमध्ये आहेत.  मदिरा प्याली की, जसे मनुष्याला धुंदी चढते, त्याला कसलीच शुद्ध राहत नाही.  मनुष्य विवेकभ्रष्ट झाल्यामुळे आपण काय बोलतो, काय करतो, याचे भान त्याला राहत नाही.  असे आचरण अविचारी पुरुषाचे असते.  म्हणून साधकामध्ये अविचाराचा एक अंश सुद्धा राहू नये.

 

विचाररहित, अज्ञानी मनुष्यामध्ये पुरुषाची बुद्धि अतिशय विकल, अशक्त होते.  बुद्धिमान पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विवेकरूपी चंद्रप्रकाशामुळे सर्वच स्पष्ट दिसते.  परंतु अविचारी मनुष्याला मात्र कोणत्याच गोष्टीचे स्पष्टपणे ज्ञान होत नाही.  जसे लहान मुलाला अंधारात वेताळाची भीति दाखविली तर त्याला सगळीकडे वेताळच दिसायला लागतो.  त्यामुळे ते मूल भयग्रस्त होते.  तसेच अविचारी मनुष्याला सुंदर चंद्र सुद्धा एखाद्या दगडाप्रमाणे भासू लागतो.  थोडक्यात, विचारभ्रष्ट मनुष्य चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले मानू लागतो.

 

अविचारी मनुष्याचे मन म्हणजे दुःखरूपी धान्याचे कोठार असते.  जसे कोठारे धान्याने गच्च भरलेली असतात, त्याचप्रमाणे अविवेकी मनुष्याच्या मनात अनेक दुःखे असतात.  त्याच्यासमोर कोणी आले तर तो आपले दुःखचरित्र सांगण्यास सुरुवात करतो.  अशा या मनुष्यावर अनेक संकटे येतात.  अविचारी मनुष्याचे मन हे संकटरूपी लता-वेलींना वाढविणाऱ्या वसंत ऋतुप्रमाणे असते.  जेथे अविचार आहे, तेथे दुःख व संकटे येतात.  वसंत ऋतुमध्ये जशा लता-वेली बहरतात तसेच अविचारी मनुष्यावर दुःखांचा व संकटांचा वर्षाव होतो.  म्हणून हे रामा !  अशा अविवेकाचा व अविवेकी लोकांचा साधकाने दुरूनच त्याग करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, April 23, 2024

संगत्याग | Giving-Up Inferior Company

 



संग दोन प्रकारचा आहे.  विषयी पुरुषांचा संग आणि ईश्वरनिष्ठ, भगवद्भक्तांचा संग.  जे लोक प्रेमाचा उत्कर्ष होण्यामध्ये प्रतिबंध करणारे आहेत, म्हणजेच ज्यांच्या संगतीमुळे आपल्या मनात परमेश्वराचे प्रेम वाढण्याऐवजी विषयांचे विचार येतात, उपभोगाच्या कामना निर्माण होतात, मन क्षुब्ध होते, अशुद्ध होते अशा वैषयिक लोकांचा संग टाळावा.  जे प्राकृत बुद्धीचे नास्तिकवादी तसेच विषयांच्या आणि उपभोगांच्या चर्चेमध्ये रस घेतात अशा पुरुषाचा संग टाळावा.  भगवान गीतेमध्ये म्हणतात - अरतिर्जनसंसदि |

 

मग कोणाचा संग धरावा ?  जे विषयभक्त नसून भगवद्भक्त आहेत.  ज्यांचे आचार, विचार, उच्चार शुद्ध आहेत, श्रद्धावान आहेत अशा पुरुषांचा संग करावा.  ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ।  ते सर्वाही सदासज्जन सोयरे होतु ।।       (ज्ञानेश्वरी)

ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  तो संग मनुष्याच्या उद्धाराला कारण होतो.

 

सत्संगत्वे निःसङ्गत्वम्  

निःसङ्गत्वे निर्मोहत्वम् |

निर्मोहत्वे निश्चलतत्त्वम्  

निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ||                                       (भज गोविन्दम् )

 

यावरून सिद्ध होते की, ज्याला स्वतःचा उत्कर्ष किंवा जीवनाचे सार्थक करावयाचे असेल त्याने ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  तो संग मनुष्याला परमोच्च अवस्थेपर्यंत, ईश्वरस्वरूपापर्यंत नेऊन जीवन तृप्त, पूर्ण करील.  सर्व जीवन आनंदरसाने भरून जाईल.  सर्व दुःख, यातना, संसाराचा संपूर्ण उच्छेद होईल.  थोडक्यात जीवनाला पूर्णत्व देण्याचे सामर्थ्य ईश्वरनिष्ठ पुरुषांच्या संगतीमध्ये आहे.  म्हणून अन्य सर्व विषयासक्त पुरुषांचा संग त्याग करावा असे म्हटले आहे.  परंतु खरे पाहाता त्याग करण्याची जरूरी नाही, कारण ईश्वरनिष्ठांच्या संगतीमुळे अन्य सर्व लोक आपोआपच आपल्यापासून दूर होतील.  फक्त त्यासाठी आपली दृढ श्रद्धा आणि निष्ठा असणे आवश्यक आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ




Tuesday, April 16, 2024

निर्गुण-सगुण भिन्न नाहीत | Equivalence Of Manifested And Formless

 



महाप्रलयाच्या वेळी शून्य, अत्यंत सूक्ष्म असे निरुपाधिक परब्रह्म सत्तास्वरूपाने राहते.  त्यानंतर पुन्हा ज्यावेळी पुढील सर्गाचा म्हणजे सृष्टीचा आरंभ होतो, त्यावेळी परब्रह्मामध्ये "मी देह आहे" असा भाव निर्माण होतो.  निर्गुण-निर्विशेष चैतन्यामध्ये "देहोSहं" असे स्फुरण पावते.  त्यामधूनच - एकोSहं बहुस्याम् |  असा संकल्प निर्माण होतो आणि त्यावेळी एकामधून - अद्वयामधून काकतालीय न्यायाप्रमाणे अचानक भिन्न-भिन्न आकार दिसू लागतात.  सर्वप्रथम ब्रह्माजीची निर्मिती होते.  निर्गुण सगुणत्वाला प्राप्त होते.  पहिला आकार म्हणजे ब्रह्मदेव होय.  त्यानंतर पुढे मिथुनामधून सर्व प्रजा उत्पन्न होते.

 

वस्तुतः निर्गुण आणि सगुण हे दोन भिन्न नाहीत.  निर्गुणामधून सगुणाची निर्मीती होते म्हणजेच निर्गुणामध्ये सगुणाचा भास होतो.  जसे दोरीमधून साप निर्माण होतो. दोरी स्थिर, अचल आहे.  परंतु त्यातूनच आपणास अचानक हालचाल झाल्यासारखे वाटते आणि सापाचा भ्रम निर्माण होतो.  मग साप दिसला की, तो साप कोणत्या जातीचा आह ?  कोणत्या रंगाचा आहे ?  किती लांबीचा आहे ?  किती विषारी आहे ?  याची आपण चर्चा करतो.

 

परंतु या सर्व चर्चा व्यर्थ आहेत.  कारण त्या चर्चा उत्पन्न न झालेल्या सापाबद्दल आहेत.  साप दोरीमधून निर्माण होत नाही.  तर दोरीच्या अज्ञानामधून निर्माण होतो.  नव्हे, साप निर्माणच होत नाही तर सापाचा केवळ भास निर्माण होतो.  मग कोणी साप निर्माण झाला असे म्हणो किंवा निर्माण झाला नाही, असे म्हणो !  पारमार्थिक दृष्टीने या विधानाला महत्त्व नाही.

 

तसेच पृथ्व्यादि पंचमहाभूते निर्माण झाली, असे कोणी म्हणो किंवा निर्माण झाली नाहीत, असे म्हणो !  ही सर्व विधाने औपचारिक आहेत.  वस्तुतः निर्गुणामधून काहीही निर्माण झालेले नाही.  झालेच असेल तर ते केवळ ब्रह्माजीच्या संकल्पामधून - कल्पनेमधून निर्माण होते.  म्हणून ही सृष्टी म्हणजे ब्रह्माजीच्या कल्पनेला मिळालेला केवळ आकार आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ




Tuesday, April 9, 2024

शम आणि दम | Mitigation And Control

 



शमः – अन्तःकरणस्य उपशमः इति शमः |  अंतःकरणाची सहज-स्वाभाविक असलेली विषयाभिमुख प्रवृत्ति आहे.  त्यावर नियमन किंवा निग्रह करणे म्हणजे शम होय.  येथे मनानेच मनाच्या बहिर्मुख प्रवृत्तीवर आवर घालावा.  भगवान म्हणतात – अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते |  सतत अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने मनोनिग्रह प्राप्त होतो.

 

दमः – बाह्येन्द्रियोपशमः इति दमः |  बाह्येंद्रियांच्यावर संयमन किंवा नियमन असणे म्हणजेच इंद्रियदमन होय.  दमन अनेक प्रकाराने होऊ शकेल –

१) इंद्रिये स्वभावतःच विषयाभिमुख असल्यामुळे ती सतत विषयांच्यामागे रमतात.  परंतु पुष्कळ वेळेला विषय घातक आहेत असे समजले तरी इंद्रिये त्या विषयभोगामध्ये प्रवृत्त होतात.  अशा वेळी घातक किंवा शरीरस्वास्थ्याला हानिकारक असलेल्या विषयांच्यापासून इंद्रियांना आवरणे म्हणजे दमन होय.

२) इंद्रिये विषयाभिमुख झाली म्हणजे विषयांचा हव्यास निर्माण होतो.  या विषयांमुळे हळूहळू इंद्रिये स्वैर, उच्छृंखल होऊन अधर्मामध्ये किंवा पापकर्मामध्ये प्रवृत्त होतात.  हे मनुष्याचे अधःपतन आहे.  म्हणून इंद्रियांना अधर्माचरणामध्ये प्रवृत्त होऊ न देणे हेही इंद्रियदमन आहे.

३) अधर्माचरण किंवा पापकर्मापासून इंद्रिये निवृत्त केली तरी ती फार काळ स्वस्थ बसणार नाहीत.  कर्म करणे हा इंद्रियांचा स्वभाव असल्यामुळे पुन्हा ती कर्मामध्ये प्रवृत्त होणारच !  म्हणून अशा वेळी त्या इंद्रियांना जाणीवपूर्वक अभ्यासाने आणि प्रयत्नाने सतत धर्माचरण, सत्कर्म, सदाचार यामध्ये प्रवृत्त केली पाहिजेत.  यामुळे आपोआपच इंद्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्तीवर नियमन होते.  तेच दमन होय.

४) पुष्कळ वेळेला व्यवहारामध्ये काय करावे आणि काय करू नये ?  तसेच काय खावे आणि काय खाऊ नये ?  तसेच किती खावे ?  वगैरे इंद्रियच ठरवितात.  यामुळे मनुष्य इंद्रियांच्या आहारी जाऊन स्वतःच स्वतःचा नाश करून घेतो.  अशा वेळी मनुष्याचा खरा पुरुषार्थ इंद्रियांच्या आहारी न जाता योग्यायोग्याचा विचार करूनच विवेकाने इंद्रियांना कर्मामध्ये प्रवृत्त व्हावे.  नाहीतर त्यांनी त्यांच्या स्थानामध्ये शांत बसावे.  थोडक्यात इंद्रियांच्या प्रत्येक व्यापारावर विवेकाचा अंकुश असला पाहिजे.  यालाच इंद्रियदमन म्हणतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ


Tuesday, April 2, 2024

विचारमार्गाची व्यवहारिक फळे | Benefits of Path of Thinking

 



हे राघवा !  विचाराने केवळ मोक्षच मिळतो असे नव्हे, तर राज्य - संपत्ति - दिव्य उपभोग - शाश्वत मोक्ष ही सर्वच विचाररूपी कल्पवृक्षाची फळे आहेत.  म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा काही मिळवायचे असेल तर क्षणाक्षणाला विचार जागृत पाहिजे.  कसे वागावे ?  कसे बोलावे ?  कशा प्रतिक्रिया द्याव्यात ?  नियोजन कसे करावे ?  व्यवस्थापन कसे करावे ?  या सर्वांच्यासाठी विचार आवश्यक आहे.

 

आपल्याला साधे दिवसभराचे व्यवस्थित नियोजन करायचे असेल तरी विचार पाहिजे.  दोन दिवस घराच्या बाहेर पडायचे किंवा गावाला जायचे असेल तरीही विचार पाहिजे.  समोरच्याने आपल्याला एखादी समस्या सांगितली, तर त्यावर काय उत्तर द्यावे, यासाठी सुद्धा विचार पाहिजे.  विचार न करता भावनावश होऊन या सर्व गोष्टी केल्या तरी आपल्या हातून चूक होण्याची अधिक शक्यता असते.  म्हणून क्षणाक्षणाला विचार जागृत पाहिजे.  जेथे जेथे आपण बेसावध राहतो व विचार न करता कृति करतो, तेथे प्रमाद घडतात.

 

मात्र जेथे आपण विचार करतो, तेथेच यश प्राप्त होते.  व्यवहारमधील कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसे विचारानेच यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत.  व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थापनासाठी विचाराची नितांत आवश्यकता आहे.  विचारानेच मनुष्याजवळ राज्य, सत्ता येते.  संपत्ति, ऐश्वर्य, उपभोग, प्रतिष्ठा येते.

 

मात्र हे सर्व यश टिकवावे कसे ?   आणि वर्धन कसे करावे ? यासाठी सुद्धा विचारच आवश्यक आहे.   खूप पैसे, संपत्ति मिळाल्यानंतर त्या संपत्तीचे रक्षण कसे करावे ? त्याचा विनियोग कसा करावा ?  संपत्तीचा उपभोग कसा घ्यावा ?   यासाठी सुद्धा विचारच आवश्यक आहे. म्हणून व्यावहारिक प्राप्ति आणि मोक्षप्राप्ति ही दोन्हीही विचाररूपी कल्पवृक्षाची फळे आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ