Saturday, February 23, 2013

नर्मदामैय्याची कढाई (Narmada Jayanti)




शिवशक्ती आश्रम, त्र्यंबकेश्वर, नाशिक
श्री नर्मदा जयंती उत्सव - २०१३
श्री मार्कंडेय ऋषी राजा युधिष्ठिराला नर्मदेचा महिमा सांगताना म्हणतात -
एषा पवित्रा विपुला नदी त्रैलोक्यविश्रुता | नर्मदा सरितां श्रेष्ठा पुत्री त्र्यम्बकस्य च || (वायुपुराण)
या संपूर्ण पृथ्वीवर त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पुष्कळ नद्या आहेत, परंतु त्यांच्यामध्ये भगवान त्र्यंबकेश्वराची (शिवाची) पुत्री नर्मदा ही सर्व सारितांमध्ये श्रेष्ठ आहे. 

स्मरणाज्जन्मजनितं दर्शनाच्च त्रिजन्मजं | समजन्मकृतं पापं नश्येद्रेवावगाहनात् || (वायुपुराण)
नर्मदेच्या केवळ स्मरणानं, या जन्मातील, दर्शनानं तीन जन्मातील, तर तिच्यामध्ये स्नान केल्यानं सात जन्मातील पापं नष्ट होतात.

अशा या नार्मादामातेचा जन्म माघ शुध्द सप्तमीला साजरा करण्याचा प्रघात आहे. नर्मदाखंडामध्ये या दिवशी नर्मदामातेची पूजा, अर्चना, दुधाने अभिषेक, कन्या (कुमारी) पूजन-भोजन, साधु भोजन, दानधर्म इत्यादी कार्यक्रम दिवसभर चालू असतात. विशेषतः हे कार्यक्रम सायंकाळी अथवा रात्रीही होतात.  या दिवशी कन्यापूजन आणि भोजनाला विशेष महत्व आहे. त्याला नर्मदामैय्याची कढाई म्हटलं जातं. 

शिवशक्ती आश्रमातर्फे नर्मदा जयंतीला गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही १७ फेब्रुवारी २०१३ या दिवशी कन्यापूजन आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी आजूबाजूच्या खेड्यातील ७० लहान गरीब मुलींचं पूजन, भोजन, वस्त्रदान करण्यात आलं. तसेच इतर गोरगरीब अशा १५० लोकांना अन्नदान करण्यात आलं.  हा कार्यक्रम आश्रमातर्फे दरवर्षी मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
                                                                        
                             - नर्मदे हर -



Tuesday, February 19, 2013

मनुष्याचे खरे कर्तव्य (The true duty of Man)

           मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये |
                      यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः || (गीता अ. ७-३ )

हजारो-लाखो मनुष्यांच्यामध्ये एखादाच आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो.  यानंतर मनुष्यत्व, मुमुक्षुत्व प्राप्त झाले तरी आपली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी, आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन मार्गदर्शन करण्यासाठी श्रेष्ठ अशा गुरूंची, म्हणजेच आचार्यांची आवश्यकता आहे.  ही  अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

ज्या जीवाला मनुष्यत्व, मुमुक्षुत्व व श्रेष्ठ आचार्यांची प्राप्ति झालेली आहे, तोच या विश्वामध्ये अत्यंत भाग्यवान, धन्य पुरुष आहे. या तीन्हीही दुर्मिळ गोष्टी प्राप्त झाल्यानंतर त्याचे एकच कर्तव्य आहे. ते म्हणजे – आत्मकल्याणं एव कर्तव्यम् | कर्तव्य म्हणजेच जे करणे योग्य आहे ते केलेच पाहिजे, ते कर्तव्य होय.

व्यवहारामध्ये कर्तव्य या शब्दाचा अर्थ खूप संकुचित केला जातो. व्यावहारिक कर्तव्यांनाच आपण जीवनाचे इतिकर्तव्य मानतो. शाश्त्रामध्ये प्रत्येक मनुष्यास धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ दिलेले आहेत. त्यापैकी अर्थ व काम हे पुरुषार्थ सहजस्वाभाविक आहेत. पशूंच्यामध्ये हे दोनच पुरुषार्थ दिसतात. परंतु मनुष्याला विवेकशक्ति दिल्यामुळे अर्थ आणि कामाबरोबरच मनुष्याने धर्म व मोक्ष हेही पुरुषार्थ पूर्ण केले पाहिजेत. म्हणून धर्म व मोक्ष यांच्यामध्ये अर्थ व काम हे पुरुषार्थ सांगितलेले आहेत. जर मनुष्य अर्थकामनेच प्रेरित होऊन जीवन जगत असेल तर त्याच्यामध्ये व पशूमध्ये काहीच फरक राहाणार नाही.

यामुळे मनुष्याचे खरे कर्तव्य असेल तर ते म्हणजेच स्वतःचे कल्याण करून घेणे. या कर्तव्यामध्ये कधीही तडजोड करता येत नाही.


- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, प्रथम आवृत्ती,  २००१
- Reference: "Divyatwacha Marg" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 1st Edition, 2001



- हरी ॐ

Sunday, February 17, 2013

भक्ताची उन्नती (Development of the Devotee)





प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकारच्या निष्ठा असून कामना सुद्धा भिन्न स्वरूपाच्या असतात.  त्या त्या इच्छेने परमेश्वराला ते भजतात.  परमेश्वर त्यांच्या इच्छेनुरूप व कर्मानुरूप त्यांच्यावर कृपा करतो.   असे चार प्रकारचे लोक आहेत –

१) ऐहिक आणि पारलौकिक फळाच्या इच्छेने कर्म करणारे हे सकाम भक्त आहेत.

२) वेद प्रतिपादित शास्त्रोक्त कर्म करणारे साधक निष्काम मुमुक्षु असून त्यांना ऐहिक किंवा पारलौकिक कोणत्याही फळाची अपेक्षा नसते.  तरी सुद्धा परमेश्वराला प्रसन्न करून, अंतःकरणशुद्धि व ज्ञानवैराग्यप्राप्तीसाठी निस्वार्थ, निष्काम वृत्तीने सेवा करतात.  अशा साधकांना परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे चित्तशुद्धि, ज्ञानवैराग्यसंपन्न करून सद्गुरूंची प्राप्ति करून देतो आणि गुरुमुखामधून ज्ञानाचा उपदेश करून त्यांची ज्ञानाची इच्छा पूर्ण करतो.

३) श्रवण-मनन करून आत्मानात्मविवेकाने ज्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतले आहे आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी सर्वसंगपरित्याग करून संन्यास धारण केलेला आहे, त्यांना मोक्षप्रदान करून मोक्षेच्छा पूर्ण करतो.

४) याव्यतिरिक्त जे अत्यंत आर्त असून सर्व बाजूंनी दुःखाने त्रस्त झालेले, व्याकूळ, अगतिक झालेले परमेश्वराला शरण जाऊन दुःखनिवारण करण्यासाठी प्रार्थना करतात, त्यांच्या दुःखांचा निरास करून त्यांना दुःखमुक्त करतो.

प्रथम भक्त विषयासक्त, सकाम, धार्मिक भक्त असतात.  नंतर हळूहळू धार्मिक भक्त निष्काम होऊन चित्तशुद्धि करतात व वैराग्यसंपन्न होतात.  यामधूनच त्यांच्या मनामध्ये आत्मजिज्ञासा निर्माण होऊन त्यांना सद्गुरूंची प्राप्ति होते.  ते गुरुमुखामधून शास्त्रश्रवण, मनन आणि अखंड निदिध्यासना करून ब्रह्मज्ञान प्राप्त करतात आणि ब्रह्मस्वरूप होऊन परमात्मस्वरूपाला प्राप्त होतात.

(श्रीमद् भगवद्गीता ४-११)

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Sunday, February 10, 2013

पापास कारणीभूत शक्ति (What Invokes Sin?)


वास्तविक पाहता कोणत्याही मनुष्याला वाटत नाही की, आपण पापकर्म करावे.  आपल्या हातून सदाचार घडावा, सत्कर्म घडावे हीच प्रत्येकाची इच्छा असते.  याचे कारण आपला उत्कर्ष व्हावा, आपण अधिक उन्नत व्हावे हीच प्रत्येकाची सहजस्वाभाविक प्रवृत्ति असते.  त्यासाठी सत्कर्म व सदाचार हेच साधन आहे हे सुद्धा प्रत्येक मनुष्य जाणत असतो.   मग हे माहित असताना सुद्धा मनुष्य पापकर्मात प्रवृत्त का होतो ?  खरे पाहता सद्सद्विवेकबुद्धी मनुष्याला पापाचरण करू देत नाही.  परंतु या बुद्धीला गप्प बसवून मनुष्य पापकर्म करतो. ते का?

एखादा सेवक त्याची इच्छा नसतानाही आपल्या राजाकडून किंवा बलवान मालकाकडून पापकर्मात प्रवृत्त केला जातो.  अशा वेळी सेवकाला कोणतेही स्वातंत्र्य नसते.  त्यामुळे तो मालकाकडून पूर्वनियोजित होतो.  त्याला प्रवृत्त करणारी बलवान आणि सामर्थ्यसंपन्न शक्ति असते.  त्याचप्रमाणे मनुष्य सारासार विचार करणारा असूनही इच्छा नसताना सुद्धा कोणत्यातरी बलवान शक्तीच्यामुळे अगतिक होऊन पापकर्मात प्रवृत्त होतो.  तर मग बुद्धिवान मनुष्याला अगतिक, गुलाम बनवून त्याला पापाचरण करायला लावणारी अशी कोणती शक्ति आहे?

भगवान म्हणतात की, पापाचे कारण विश्वामध्ये बाहेर नसून मनुष्याच्या अंतरंगातच आहे.  मनुष्यामध्ये असलेला काम-क्रोध हाच मनुष्याला पापकर्मात प्रवृत्त करतो.  काम आणि क्रोध बाहेर विषयांच्यामध्ये किंवा प्रसंगांमध्ये नसून मनुष्याच्या अंतरंगातच आहे.  बाहेरची शक्ति मनुष्याला पापाचरणामध्ये प्रवृत्त करीत नाही.  यामधून पापाचे कारण बाहेर आहे हा सामान्य मनुष्याचा लोकप्रसिध्द विचार भगवान खंडन करतात.

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्ताकामधून, तृतीय आवृत्ती,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by P.P. Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ