Showing posts with label Hindu. Show all posts
Showing posts with label Hindu. Show all posts

Tuesday, March 24, 2020

गुढीपाडवा शार्वरी संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1942)



गुढीपाडवा 
 श्रीशालिवाहन शके १९४२
शार्वरी नाम संवत्सर आरंभ

चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे S हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||

      गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

      श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.

      याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते.पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.

                सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. 

      गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

      गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

      गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

      गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.

      म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा !

      यावरून लक्षात येते की,

सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 




परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, गुढीपाडवा २०२० श्रुतिसागर आश्रम





Sunday, March 30, 2014

गुढीपाडवा जय संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1936)



गुडीपाडव्याच्या शुभेच्छा !!!


गुडीपाडव्याची पारंपारिक  माहिती  व महत्व जाणून घेण्यासाठी  आमचा मागील वर्षीचा ब्लॉग पाहा.

Friday, September 6, 2013

श्रद्धा – आम्ही परमेश्वर जाणतो | Faith - We know God



 श्रद्धा प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्यास शिकविते.  जीवन जगण्याची उमेद, उत्साह, धैर्य, आत्मविश्वास देते.  श्रद्धा मनुष्याला दुबळे बनवीत नाही.  काही लोक श्रद्धेलाच भोंगळ श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असे म्हणतात.  अशा लोकांना श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थच समजला नाही, असे म्हणावे लागेल.

शास्त्रामध्ये, वेदांच्यामध्ये गीतेमध्ये श्रद्धा हाच शब्द आहे.  कोठेही अंधश्रद्धा हा शब्दच नाही. अंधश्रद्धा हा चुकीचा शब्द आहे, कारण श्रद्धा कधीही अंध असू शकत नाही.  अंधश्रद्धेच्या ऐवजी त्यांनी अज्ञान हा शब्द वापरावा.  श्रद्धा ही श्राद्धाच आहे.  श्रद्धा हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे तो ज्ञानवाचक शब्द आहे.  परमेश्वराचे अस्तित्व बुद्धीने जाणणे म्हणजे श्रद्धा आहे.

म्हणूनच हिंदू धर्म आणि अन्य पंथ यांच्या मूळ तत्वप्रणालीमध्ये फार मोठा फरक आहे.  बाकीचे धर्म म्हणजे सांप्रदाय सांगतात की, आम्ही ईश्वरावर विश्वास ठेवतो.  In God we trust.  फक्त हिंदू धर्माचे तत्वज्ञानच, वेद, गीता, उपनिषदे परमेश्वरावर विश्वास ठेवा, असे सांगत नाहीत तर अगदी विज्ञानाच्या युक्तिवादाने परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करतात.  म्हणून हिंदू तत्वज्ञान सांगते – We not only believe in God, but we also know that there is God !

परमेश्वर ही एखादी कल्पना नाही, विषय नाही किंवा तुमच्या-आमच्यामधील एखादी मर्त्य व्यक्ति नाही.  परमेश्वर ही कोण्या एखाद्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना नाही आणि परमेश्वर ही अंधश्रद्धा तर मुळीच नाही.  परमेश्वर हे विश्वामधील त्रिकालाबाधित सत्य आहे.  परमेश्वर ही सत्ता आहे.  अस्तित्व आहे.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011


- हरी ॐ –



Tuesday, June 25, 2013

हिंदू मूल्ये | Hindu Values




आज संपूर्ण विश्वाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल इतकी भव्य आणि दिव्य आपली सनातन हिंदु संस्कृति आहे.  आपली संस्कृति भोगमय नसून त्यागमय आहे. यामुळे आजकाल पाश्चिमात्य लोक सुद्धा आपल्या संस्कृतीकडे, आपल्या आध्यात्मिक तत्वज्ञानाकडे आकर्षित झालेले आहेत.  त्याच्या अभ्यास करून कदाचित अमेरिकन माणसे बदलतील, परंतु दुर्दैवाने आपण मात्र आपल्या या अमूल्य ठेव्यापासून वंचित होत आहोत.

आज आमच्या जीवनाची मूल्ये बदललेली आहेत.  आपले तत्वज्ञान पुरातन आहे म्हणून ते dead आहे, असे म्हणून आपण त्याकडे पाठ फिरवीत आहोत.  उद्या तेच तत्वज्ञान ज्यावेळी अमेरिकन लोक त्यांची मोहर (seal) लावून आपल्याला देतील, कदाचित त्यावेळी आम्ही ते प्रतिष्ठेपायी ग्रहण करू.  परंतु त्यावेळी फार उशीर झालेला असेल.

आपल्या जीवनामध्ये आपण कशाला किंमत देतो, यावरच आपले जीवन अवलंबून आहे.  गेल्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये अर्थ आणि काम यालाच किंमत होती.  यामुळेच ऐहिक व भौतिक  समृद्धीच्या बाबतीत अमेरिका परमोच्च शिखरावर आरूढ झाली.  परंतु त्याचमुळे तेथील प्रत्येक मनुष्याचे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवन उध्वस्त झाले.  बहिरंगाने प्रगति होत असताना मनुष्याचे अंतरंग मात्र कामक्रोधादि विकारांनी पोखरून निघाले.  विषयांची, भोगांची, सुखसोयींची रेलचेल असूनही त्यांना अंतरिक शांतीची मात्र उणीव भासली.  त्यामुळे त्यांची जीवनाची value ही बदलली.

आंतरिक शांतीसाठी व सुखासाठी अमेरिकन लोक हिंदू तत्वज्ञानाकडे आकृष्ट झाले.  परंतु, दुर्दैवाने आम्हाला मात्र अमेरिकेची value आहे.  आमची तरुण पिढी तेथील संस्कृतीचेच अनुकरण करते. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अमेरिका आदर्श वाटते.  आम्ही कसे राहावे?  कसे बोलावे?  कोणते कपडे घालावेत?  काय खावे?  काय प्यावे?  हे अमेरिका ठरविते.  त्यामुळे सद्य समाजामध्ये भ्रष्टाचार, व्यभिचार वाढीस लागला आहे.  

 


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ती,  जुलै २००७
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, July 2007

- हरी ॐ –

Wednesday, April 10, 2013

गुढीपाडवा विजय संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1935)



गुढीपाडवा 
 श्रीशालिवाहन शके १९३५
विजय नाम संवत्सर आरंभ

चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे S हनी |
शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||

      गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

      श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो.

      याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला 'ब्रह्मध्वज' असेही म्हणतात.

                सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -'ब्रह्मध्वजाय नम:|' असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. 

      गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

      गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील 'मी कोणीतरी फार मोठा आहे,' हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

      गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

      गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो.

      म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा !

      यावरून लक्षात येते की,
सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. 

 
परमपूज्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, गुढीपाडवा २०१३, श्रुतिसागर आश्रम

Friday, January 25, 2013

कुंभमेळा २०१३ - भाग १ (Kumbha Mela 2013 - Part I)



- कुंभमहापर्व -

    संपूर्ण विश्वामधील सर्वात श्रेष्ठ, विराट, विशाल मेळावा म्हणजे 'कुंभमेळा' होय.  'कुंभ' म्हणजे घट.  'कुंभ' म्हणजेच ब्रह्मांड होय. ज्या ब्रह्मांडामध्ये सर्व जात-धर्म-वंश-पंथ-परंपरा-संप्रदाय इत्यादींचे लोक समाविष्ट होतात.  त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, वर्णाश्रमाचे, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, गृहस्थी-ब्रह्मचारी-वानप्रस्थी-संन्यासी असे सर्वच लोक समाविष्ट होतात.

    वेद सांगतात - धर्मो विश्वस्य जगत: प्रतिष्ठा | धर्माच्या सहाय्याने संपूर्ण विश्वाची प्रतिष्ठा होते.  धर्म हाच संपूर्ण विश्वाचा आधार आहे.  'धर्म' याचा अर्थ - हिंदू-मुस्लिम-ईसाई असा संकुचित नाही. तर धर्माची व्याख्या केली जाते - धर्मो धारयते प्रजा: |  जो सर्व प्राणिमात्रांना धारण करतो, त्यास धर्म असे म्हणतात.  प्रत्येक धर्माचे विशिष्ठ नियम, आचार, आदर्श असतात. बहिरांगाने सर्व धर्म भिन्न-भिन्न वाटत असतील तरी अखिल मानावजातीच्या दृष्टीने विचार केला तर समजते की, मनुष्याच्या जीवनाला परिपूर्णता देणे, हेच सर्व धर्मांचे अंतिम साध्य आहे.  स्वामी विदयारण्य एके ठिकाणी सांगतात -

अंत:पूर्ण: बही:पूर्ण: पुर्णकुम्भ इवार्णवे | (पंचदशी)

एखाद्या जलाशयातील पाण्याने भरलेला घट त्या पाण्यामध्येच बुडवला तर त्या घटाच्या आत, घटाच्या बाहेर, घटाच्या वर, घटाच्या खाली, घटाच्या सर्व बाजूंनी पाणीच असते. पाणी त्या घटाला अंतर्बाह्य व्याप्त करते. त्यालाच पूर्णकुंभ असे म्हणतात.  याप्रमाणेच मनुष्याला आपल्याच अंतरंगामधील आनंदसागराचा शोध लागला की, त्याचे जीवन पुर्णकुंभाप्रमाणे कृतार्थ व परिपूर्ण होते.  मानवी जीवनाला ही परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी हिंदू संस्कृतीच्या शिरोभागी असणाऱ्या तसेच सर्व ज्ञानाचा सागर असणाऱ्या वेदांच्यामधून ज्ञानसाधना सांगितलेली आहे. वेदांचा उपदेश समाजाच्या एखाद्या विशिष्ठ जातीधर्मापुरता मर्यादित नसून अखिल मानवजातीसाठी आहे.  म्हणूनच सर्व विश्वामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापन करावयाची असेल तर हिंदू धर्माची उदात्त व सर्वसमावेशक मुलतत्त्वे हीच जगाला दीपस्तंभाप्रमाणे अनंत काळपर्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही.

    या हिंदू धर्माचाच एक विशेष भाग म्हणजे हा विराट कुंभमेळा आहे.  अनेक धर्मांचे, पंथांचे लोक एकत्र येवून संपन्न होणारा हा एकमेव विराट मेळा आहे.  यामधील लोकांचे संघटन, विविध परंपरा, विविध भाषा, विविध वेशभूषा, आदी अनेक गोष्टी आपणास विविधतेतून एकतेचे दर्शन घडवतात. कुंभमेळा अतिशय प्राचीन काळापासून चालत आल्याची परंपरा आहे.  कुंभमेळ्याविषयी पुराणातील संदर्भ आपण पुढील भागामध्ये पाहू.

-  परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, २४ जानेवारी २०१३
-  By  P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 24 January 2013



'कुंभमेळा' या विषयावरील इतर लेख कुंभमेळा २०१३ - भाग २' आणि 'कुंभमेळा २०१३ - भाग ३' हेही आपणास आवडतील. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email  वरही कळवू शकता - धन्यवाद.
- हरी ॐ –