Saturday, February 28, 2015

गृहस्थाश्रम आणि ब्रह्मविद्या | Supreme Knowledge and Mundane Life



गृहस्थाश्रमामध्ये ब्रह्मविद्या अशक्य आहे का ?  असे असेल तर सर्व गृहस्थाश्रमी साधक या विद्येपासून परावृत्त होतील.  म्हणून भाष्यकार सांगतात की, ब्रह्मविद्या आणि गृहस्थाश्रम हे दोन विरोधी नाहीत तर ज्ञान आणि कर्म हे दोन विरुद्ध घटक असून त्यांचा समुच्चय शक्य नाही.  याचा अर्थ गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा ब्रह्मविद्या प्राप्त करणे शक्य आहे.  उलट याच दृष्टांताचा आधार घेऊन भाष्यकार सांगतात की, अंगिरस प्रभृति ऋषींनी गृहस्थाश्रमामध्येच ब्रह्मविद्या प्राप्त केलेली आहे.

संप्रदाय प्रवर्तक असणारा ब्रह्मज्ञानी पुरुष हा दुसऱ्या गृहस्थाश्रमी पुरुषाच्या दृष्टीने गृहस्थाश्रमी आहे.  परंतु ब्रह्मविद्येच्या दृष्टीने पाहिले तर गृहस्थाश्रम हा मिथ्या आहे.  म्हणजेच ब्रह्मविद्येमध्ये गृहस्थाश्रमाचा सुद्धा निरास होतो.  त्याच्या दृष्टीने जरी तो व्यावहारिक गृहस्थाश्रमी असेल, तरी सुद्धा तो सतत तत्त्वाचे चिंतन करीत असल्यामुळे आपोआप क्रमाने त्याच्या सर्व संसाराचा, गृहस्थाश्रमाचा निरास होतो.  ब्रह्मविद्येच्या दृष्टीने तो गृहस्थाश्रमी नसून साक्षात संन्यासीच आहे.

याप्रमाणे, ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने गृहस्थाश्रम व गृहस्थाश्रमाची कर्तव्यकर्मे हा फक्त एक भास आहे.  म्हणून ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने सर्व कर्मे – दग्धबीजवत् इति |  भाजलेल्या बीजामधून ज्याप्रमाणे पुन्हा वृक्षाची निर्मिती होत नाही, त्याप्रमाणेच ब्रह्मविद्येमुळे गृहस्थाश्रमामधील सत्यत्वबुद्धीचा निरास होतो.  त्यामुळे ती कर्मे ज्ञानी पुरुषाला बद्ध करू शकत नाहीत.  उलट ती कर्मे करूनही ज्ञानी पुरुष अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी राहतो.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Saturday, February 21, 2015

ब्रह्मज्ञानाची विस्मृति | Lapse of Supreme Knowledge


आपण आपल्या जीवनात कितीतरी कर्मे करतो, कर्मे संपतात आणि त्याची मला विस्मृति होते.  सगळेच स्मृतीच्या आड जाते.  काळ काय कर्म केले ?  हे सुद्धा आठवत नाही, कारण सर्व कर्मे कालबद्ध असल्यामुळेच आपोआप त्या सर्वांचीच काळाच्या ओघात विस्मृति होते.  व्यावहारिक अपरा – निकृष्ट विद्या ही कालबद्ध आहे.  म्हणून काळाच्या ओघात हे ज्ञान हळुहळू विस्मरण होते.

ब्रह्मज्ञानाची विस्मृति ही शक्यच नाही.  याचे पहिले कारण – ब्रह्मज्ञान हे कालबद्ध असूच शकत नाही.  ब्रह्मज्ञानामध्ये कालविशेषाचा म्हणजे काळाच्या विभागांचा अत्यंत अभाव आहे.  इतकेच नव्हे, तर ब्रह्मविद्येला कोणतेही नियत असणारे निमित्त आवश्यक नाही.  म्हणून ब्रह्मविद्येमध्ये कोणत्याही काळामध्ये संकोच होत नाही.  कोणत्याही काळामध्ये, अवस्थेमध्ये, स्थितीमध्ये ब्रह्मविद्येची विस्मृति संभवत नाही.

आत्मवस्तु काळाने बद्ध नाही, कारण ती वस्तु निर्मित नाही.  त्या वस्तूला जन्मही नाही आणि जन्म नसल्यामुळे मृत्यूही नाही.  ती वस्तु कालबद्ध होऊ शकत नाही.  ब्रह्मविद्येचा प्रतिपाद्य विषयच कालातीत असल्यामुळे ब्रह्मविद्या सुद्धा काळाने बद्ध, मर्यादित होऊ शकत नाही.  नाहीतर आज एखादा साधक ब्रह्मज्ञानी झाला आणि नंतर दोन वर्षांनी पुन्हा संसारी झाला, असे होईल.

परंतु याठिकाणी सांगतात, एकदा जर ज्ञान प्राप्त झाले तर पुन्हा कधीही अज्ञान येऊ शकत नाही.  एकदा ब्रह्मविद्येचा उदय झाला तर त्या विद्येचा कधीही नाश, ध्वंस किंवा विस्मरण होत नाही.  कोणत्याही प्रकाराने या विद्येची हानि होऊ शकत नाही.  ब्रह्मज्ञानी पुरुष कोणत्याही काळामध्ये किंवा अवस्थेमध्ये असेल तरी त्याचे ज्ञान अखंडपणे त्रिकालअबाधित राहते.  सर्व श्रुति आणि स्मृति हेच सिद्ध करतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Saturday, February 14, 2015

भिक्षा आणि ब्रह्मविद्या | Alms and Supreme Knowledge


ब्रह्मविद्या म्हणजे केवळ पुस्तकी, शाब्दिक ज्ञान नव्हे, तर जी ब्रह्मविद्या सर्वसंगपरित्याग करून घेतली जाते, तीच मोक्षाला साधन आहे.  कर्माच्या बरोबर कधीही ही विद्या प्राप्त करता येत नाही.  तर जे जिज्ञासु, मुमुक्षु साधक भिक्षेचे आचरण करतात, त्यांनाच ब्रह्मविद्या प्राप्त होते.

मग कोणी म्हणेल की, भिक्षा मागणे आणि ब्रह्मविद्या यांचा काय संबंध आहे ?  याठिकाणी आचार्य – भैक्ष्यचर्यां चरन्तः |  असा शब्द वापरतात.  हे ज्ञान केवळ बुद्धीने नाही, केवळ विवेकाने किंवा केवळ वैराग्याने आत्मसात होत नाही तर त्यासाठी मनाची प्रचंड मोठी तयारी आवश्यक आहे.  यासाठीच शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या जातात.  त्यामध्ये ‘भिक्षावृत्ति’ ही अत्यंत आवश्यक साधना आहे.  भिक्षा मागणे म्हणजे भीक मागणे नव्हे, तर भिक्षा ही अंतःकरणाची एक वृत्ति आहे.  भिक्षा हे एक व्रत आहे.

भिक्षा मागत असताना दुसऱ्यावर चिडू नये.  ज्याच्याकडून भिक्षा घेतो, त्याला यत्किंचित सुद्धा क्लेश, यातना देऊ नयेत.  भिक्षा मागण्यासाठी दुर्जनांच्या घरी जाऊ नये.  स्वतःला अतिक्लेश न देता म्हणजे चमचमीत मिळविण्यासाठी जास्त न हिंडता, जे काही मिळेल, ते थोडेसे जरी मिळाले तरी त्याच्यामध्ये संतुष्ट व्हावे.  यला ‘भिक्षा’ असे म्हणतात.  दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून – ‘ॐ भवति भिक्षां देहि |’  असे म्हणून भिक्षा मागणे ही इतकी सोपी गोष्ट नाही.  त्यासाठी साधकाचा अहंकार नम्र व्हावा लागतो.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Sunday, February 8, 2015

विज्ञानयुगात वेद का ? | Why Vedas in Scientific Age ?




सद्य समाजामधील फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्या प्राचीन वेदपरंपरा नष्ट होत आहेत.  पूर्वीच्या काळी माणसे एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने जोडलेली होती.  परस्परांच्यामध्ये मतभेद, रागद्वेष, स्वार्थ वगैरेदि वृत्ति असतील तरीही मनुष्यावर वैदिक संस्कृतीचा प्रभाव असल्यामुळे आचारविचारांचे अत्युत्तम संस्कार हा माणसामाणसातील दुवा होता.  त्यामुळे अनेक दुःखे असतील तरी जीवन सुसह्य होते.

याउलट, जसजसे विज्ञानाचे अत्याधुनिक शोध लागले, दळणवळणाची साधने अतिशय गतिमान झाली, मनुष्याच्या संपर्काची साधने वाढली, तसतसे उलट मनुष्य एकमेकांच्यापासून दूर जावू लागला.  सध्या तर मोबाईल फोनमुळे माणसे व्यवहारिक दृष्टीने अतिशय जवळ आली असतील तरी मानाने मात्र फार दूर गेली आहेत.  या सर्व सोयींच्या नावाखाली माणुसकी हरविली गेली. वैदिक संस्कृतीचा, अतिशय लोकोपकारक असणाऱ्या जीवनमूल्यांचाच ऱ्हास झाला.  मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |  अतिथिदेवो भव |  ही विधाने फक्त सर्वांच्या पुस्तकात व प्रवचनातच अडकून राहिली.

आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने मनुष्याच्या बहिरंग समस्या जरी सुटल्या तरी अनेक अंतरंग समस्यांची तीव्रता वाढून जीवन असह्य झालेले आहे.  माणूस व माणुसकी माणसालाच पारखी झाली आहे.  म्हणूनच आज समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.  तरुणांच्यामध्ये, कुटुंबांमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये, वृद्धांच्यामध्ये रोज नवनवीन समस्या निर्माण होत आहेत.


सर्व समस्या मुळापासून संपवायच्या असतील तर आधुनिक विज्ञानयुगातील मानवाला पुन्हा एकदा वैदिक संस्कृतीची पाने उलगडावी लागतील.  त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.  म्हणून वेद हे विज्ञानयुगात तथाकथित विद्वानांच्या मतानुसार कालबाह्य झालेले नाहीत तर वैदिक ज्ञान ही विज्ञानयुगाची गरज आहे.


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011


- हरी ॐ





Monday, February 2, 2015

ब्रह्मविद्येचा ग्रंथ | Book of Supreme Knowledge



उपनिषद् शिकणारे साधक व्यवहारामध्ये म्हणतात की, आम्ही उपनिषद् शिकतो व उपनिषद् शिकविणारे म्हणतात की, आम्ही उपनिषद् शिकवितो.  येथे उपनिषद् याचा अर्थ ग्रंथ असा घेतलेला दिसतो.  ग्रंथ म्हणजे ब्रह्मविद्या होऊ शकत नाही.  म्हणून उपनिषदाला ब्रह्मविद्या कसे काय म्हणावे ?  अशी कोणी शंका घेतली तर आचार्य म्हणतात - नैव दोषः |  यामध्ये कोणताही दोष नाही.

याचे कारण संसाराला कारण असणाऱ्या अविद्याकामकर्मग्रंथीचा नाश करण्याचे सामर्थ्य केवळ ग्रंथामध्ये असू शकत नाही.  विश्वामध्ये अनेक ग्रंथ आहेत.  अनेक विद्वान मंडळी असंख्य ग्रंथांचे वाचन, लेखन, चिंतन, मनन करीत असतात.  परंतु त्या सर्व ग्रंथांच्यामधून, सर्वांनाच ब्रह्मविद्या प्राप्त झालेली आहे, असे दिसत नाही, कारण संसारास कारण असणाऱ्या अविद्येचा नाश करण्याचे सामर्थ्य फक्त ब्रह्मविद्येमध्येच आहे.  मग ही विद्या प्राप्त करण्यासाठी मात्र ग्रंथ हे उपयोगी साधन आहे.  म्हणून या अर्थानेही ग्रंथाला ‘उपनिषद्’ असे म्हणतात. कसे ? आचार्य दृष्टांत देतात – आयुर्वै घृतम् इत्यादिवत् |

जसे शरीर सशक्त धष्टपुष्ट करण्यासाठी तूप हे साधन आहे.  म्हणून आयुवर्धक तुपालाच ‘आयु’ असे म्हटले जाते.  त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येसाठी ग्रंथ उपयोगी साधन असल्यामुळे ग्रंथाला ‘उपनिषद्’ म्हटले आहे.  उपनिषद्’ याचा मुख्य अर्थ ब्रह्मविद्या असाच आहे. ब्रह्मविद्याप्राप्तीसाठी उपयोगी असल्यामुळे ग्रंथाला गौणी वृत्तीने म्हणजे गौण अर्थाने ‘उपनिषद्’ असे म्हटले आहे.  ग्रंथालाच श्रद्धाभक्तीपूर्वक ‘उपनिषद्’ अर्थात् ‘ब्रह्मविद्या’ असे म्हटले आहे.

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "Kathopanishad
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011




- हरी ॐ