Saturday, March 25, 2017

आपल्या जीवनातील रामायण | Ramayana – Parallels in Our Life


ज्यावेळी सीता अजाणतेपणाने लक्ष्मणरेषा उल्लंघन करते, त्याचवेळी रावण सीतेचे अपहरण करतो व रामापासून तिचा वियोग होतो.  रावण हा लंकाधीश असून अन्यायी, अधार्मिक, अधर्माचे प्रतीक होता.  रावण म्हणजेच साक्षात अहंकार होय. सीता म्हणजेच मोहवश होणारा अज्ञानी जीव होय.  अहंकारच जीवाला पळवून नेतो, जीवाचे हरण करतो, जीवाला परमेश्वरापासून दूर-दूर घेऊन जातो.

रावण सीतेला पळवून असंख्य राक्षस व राक्षसिणी यांच्या पहाऱ्यात ठेवतो.  राक्षस म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये असलेली सर्व असुरीगुणसंपत्ति होय.  हे सर्व विकार सीतारूपी जीवावर रात्रंदिवस, जीवनभर कडक पहारा देत असतात.  हे राक्षस सतत येऊन सीतेला क्षणाक्षणाला डिवचत असतात.  रावण सुद्धा रोज अशोकवनामध्ये जाऊन सीतेला अनेक प्रकारच्या अभिलाषा, प्रलोभने दाखवून सीतेला वश करण्याचा प्रयत्न करीत असे.  म्हणजेच हा अहंकार जीवाला पुन्हा, पुन्हा डिवचतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे दोष, आसुरीगुणसंपत्ति निर्माण करतो.  अहंकार जीवाला प्रत्येक प्रसंगामध्ये पावलोपावली असह्य करतो.

परंतु सीता रावणाला आणि राक्षसांनी दाखविलेल्या अनेक प्रलोभनांना सुद्धा वश होत नाही.  याचे कारण सीता ही अत्यंत पवित्र, चारित्र्यसंपन्न, शीलवती, एकनिष्ठ पतिव्रता होती.  श्रीरामाच्या विरहामध्ये श्रीरामाचे मूल्य सीतेला समजते.  आपल्या जीवनामध्ये असणारे श्रीरामाचे स्थान सीतेला समजते.  सीता त्या विरहावस्थेमध्ये अत्यंत हीन-दीन, अस्वस्थ, व्याकूळ होते.  याचप्रमाणे, प्रत्येक जीव सुद्धा संसारामध्ये बद्ध झाल्यानंतर अनंत दुःखे अनुभवत असताना अत्यंत व्याकूळ होतो, हीनदीन आणि अगतिक होतो.  भगवंताला अनन्य भावाने शरण जातो.

परमेश्वर हा दैन्यप्रिय आहे.  म्हणजेच भक्तामध्ये ज्यावेळी दीनभाव प्रकर्षाने जागृत होतो, त्याचवेळी तो अनन्य भावाने शरण जातो. भगवंताला नतमस्तक होतो.  यावेळी तो व्रतस्थ राहतो.  म्हणजेच तो जीवनामध्ये धर्माच्या आधारावर असणारे अत्यंत चारित्र्यसंपन्न जीवन जगतो.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007




- हरी ॐ

Tuesday, March 21, 2017

धर्माचरणाचे महत्त्व | Significance of Righteousness


ज्यावेळी स्वतःला बुद्धिमान समजणारा बुद्धिवादी मनुष्य स्वतःच्या वासनांच्याबरोबर, कल्पनांच्याबरोबर, अनियंत्रित भावनांच्याबरोबर वाहत जातो, त्यावेळी त्याचे जीवन अधःपतित होते.  या अधःपतनापासून मनुष्याचे रक्षण व्हावयाचे असेल तर त्याच्या जीवनावर धर्माचा अंकुश हवा.  धर्म म्हणजे उदात्त आचार-विचार-उच्चार होय. या सर्वांनी जर जीवन नियमित झालेले असेल, तरच ते जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी, परिपूर्ण व कृतार्थ होऊ शकेल.  आपल्या जीवनामध्ये धर्माला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

म्हणून तरी वेदांच्यामध्ये सांगतात – धर्मो रक्षति रक्षितः |
जीवनामध्ये जो धर्माचे रक्षण करतो, कोणतीही तडजोड न करता, सातत्याने कितीही संकटे आली, आघात झाले, जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा धर्माचा मार्ग न सोडता, जो धर्माचे अनुसरण करतो, त्या मनुष्याचेच धर्म सर्व बाजूंनी रक्षण करीत असतो.

श्रुति सांगते – तपो दमः कर्मेति प्रतिष्ठा |
तपश्चर्या, इंद्रियांच्यावर निग्रह आणि स्वतःचे नियतकर्म दीर्घकाळ सातत्याने करणे, हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे.

श्रीसमर्थ रामदास स्वामी सोप्या भाषेमध्ये सांगतात –
सदाचार हा थोर सांडू नये तो | जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||
जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये मनुष्याने सदाचार, नीति, नियम, धर्माचा मार्ग कधीही सोडू नये.

श्रुति सांगते - धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा |
संपूर्ण विश्व धर्मामध्येच प्रतिष्ठित होते.  म्हणूनच धर्म हाच प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा, समाजाचा, राष्ट्राचा, इतकेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचा आधारस्तंभ आहे.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



- हरी ॐ

Tuesday, March 14, 2017

लक्ष्मण रेषा | Lakshman Resha – The Limiting Line


प्रभु श्रीराम वनामध्ये गेल्यानंतर श्रीरामाचा बंधू लक्ष्मण हा सीतेचा आधार असतो.  लक्ष्मण हा तर साक्षात धर्मावतार आहे.  लक्ष्मणरेषा म्हणजेच साक्षात धर्माची रेषा होय.  वनामध्ये जात असताना लक्ष्मण झोपडीसमोर रेषा ओढून जातो.  कोणत्याही परिस्थितीमध्ये सीतेने ती रेषा उल्लंघून पुढे जाऊ नये, अशी लक्ष्मण सीतेला सूचनावजा विनंती करतो.

जीवनामध्ये मर्यादा हवी म्हणजे जीवन नियमित हवे.  केवळ पैसा, धन, संपत्ति, ऐश्वर्य, सत्ता मिळवणे, विद्यापिठांच्या पदव्यांची संख्या वाढविणे, येन-केन प्रकारेण प्रसिद्धि मिळविणे, मुले-बाळे, पती-पत्नी, भांडी-कुंडी या संसारामध्येच रममाण होणे म्हणजे जीवन नव्हे !  जीवनाला अनेक अंगे आहेत.  भोगांच्यामध्ये लोळणे, सत्तेने मदांध होणे, अन्याय, भ्रष्टाचार, हिंसात्मक कृत्ये करणे, हे तर जीवनाचे पशुतुल्य असणारे अंग आहे.

या लक्ष्मणरेषेप्रमाणेच जीवनामध्ये धर्माचे स्थान आहे.  धर्म याचा अर्थ हिंदु, मुस्लिम, ईसाई, बौद्ध असा नसून धर्म याचा अर्थच जीवनामधील सदाचार, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये होत.  त्यालाच आपण आजकालच्या भाषेत ‘आचारसंहिता’ असे म्हणतो.  श्रुति म्हणते – आचारो परमो धर्मः | जीवनामध्ये धर्माचे अधिष्ठान असेल, तरच ते जीवन यशस्वी होऊ शकते.  म्हणूनच जीवनामध्ये या लक्ष्मणरेषेची अत्यंत आवशकता आहे.  रेषा म्हणजेच मर्यादा होय.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007

                                                                      

- हरी ॐ

Tuesday, March 7, 2017

मोह – रामायणाचे मूळ | Attraction – The Cause of Ramayana



वनवासापासून प्रारंभ झालेली आणि राज्याभिषेकापर्यंत असणारी ही श्रीरामकथा या भारतवर्षामध्ये जो जो जन्माला आलेला असेल, त्या प्रत्येकाला माहीत आहे.  या संपूर्ण रामकथेचे मूळ जर पाहिले, रामकथेचा थोडासा अभ्यास किंवा मीमांसा जर केली, तर समजेल की, संपूर्ण रामायणाला, सीतेच्या दुःखाला आणि यातनांना जर कारण असेल, तर ते म्हणजेच सीतेला झालेला मोह म्हणजेच आसक्ति !  ज्याक्षणी सीता त्या कांचनमृगाचा मोह करते, त्याक्षणी रामायणास प्रारंभ होतो.

रामायण हे प्राचीन काळामध्ये होऊन गेलेले असेल तरी तेच रामायण आजही प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये चालू असते.  जन्माला आल्यानंतर खरे तर संपूर्ण विश्व, विषय, माणसे, प्रसंग आपल्याला अपरिचित असतात.  परंतु काळाच्या ओघात जसजसे मी जीवन जगायला लागतो, तसतसे माझ्या सान्निध्यामध्ये अनेक विषय, माणसे येतात, त्या अनुषंगाने अनेक चांगले-वाईट प्रसंगही घडतात.  त्यांच्यामध्ये आपण प्रिय-अप्रिय अशा कल्पना निर्माण करतो.  प्रिय विषयांच्यामध्ये, व्यक्तींच्यामध्ये आणि प्रसंगांच्यामध्ये आसक्त होतो.

सर्वांच्यामध्ये संग निर्माण करतो.  विषयांच्याशिवाय मी जगू शकत नाही.  विषय आणि विषयांचे येथेच्छ उपभोग हेच माझे जीवन बनते.  विषय असतील तर मी सुखी व विषय नसतील तर दुःखी, निराश होतो. विषयांच्या सौंदर्याला, आकर्षणाला माझे मन बळी पडते.  पुष्कळ वेळेला बुद्धीला समजून सुद्धा केवळ विषयवश होऊन मी विषयांच्या अधीन होऊन वैषयिक जीवन जगतो.  यालाच ‘मोह’ असे म्हणतात.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "
Dasharathi Ram" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



                                                                      - हरी ॐ –