Friday, January 25, 2019

हिरण्यगर्भ | Hiranyagarbha – The God
हिरण्यगर्भ म्हणजेच समष्टिसूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा होय.  त्यालाच ‘ईश्वर’ असे म्हटले जाते.  तो सर्वज्ञ-सर्वशक्तिमान-सर्वव्यापी स्वरूपाचा आहे.  त्याच्यामध्ये इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति या तीन शक्ति निरतिशय स्वरूपाने आहेत.  तोच देव आहे.  द्योतनात् इति देवः |  तो हिरण्यगर्भ प्रकाशस्वरूप असल्यामुळे त्यास ‘देव’ असे म्हटले जाते.  हिरण्यगर्भ हा सुवर्णाप्रमाणे तेजस्वी, प्रकाशस्वरूप, ऐश्वर्य-वीर्य-कीर्ति-संपत्ति-वैराग्य-मोक्ष-ज्ञान वगैरेदि निरतिशय गुणांनी संपन्न आहे.  म्हणून तो वंदनीय व स्तवनीय आहे.  

म्हणून मनुष्य या स्तवनीय नाही, तर मनुष्यामध्ये असणारे श्रेष्ठ गुण स्तुत्य आहेत.  ते गुण ईश्वराचेच आहेत.  त्यालाच आम्ही वंदन करतो.  दिव्यत्वाची जेथ प्रचीति |  तेथे कर माझे जुळती ||  अशा या ईश्वराच्या स्वरूपाचे गुरूंच्या मुखामधून शास्त्राच्या आधारे ज्ञान घ्यावे.  इतकेच नव्हे तर स्वतःच्याच बुद्धीगुहेमध्ये आत्मभावाने ते स्वरूप पाहावे.  

अशा प्रकारच्या उपासनेने तो उपासक आत्यन्तिक शांति प्राप्त करतो.  त्यालाच शास्त्रामध्ये ‘हिरण्यगर्भ उपासना’ किंवा ‘अहंग्रहउपासना’ असे शब्द वापरले जातात.  यामध्ये त्या उपास्य देवतेची एकच एक वृत्ति निर्माण करून त्याव्यतिरिक्त वृत्तींचा निरास होतो.  विजातीय वृत्तिप्रवाहाचा निरास करून सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण करावा व उपास्य देवतेशी एकरूप व्हावे.  यालाच ‘उपासना’ असे म्हणतात.  

हिरण्यगर्भउपासना म्हणजेच “मी जीव नसून ईश्वरस्वरूप हिरण्यगर्भ आहे”, अशी वृत्ति निर्माण करणे होय.  त्यामुळे जीवभाव नाहीसा होऊन हिरण्यगर्भाची वृत्ति निर्माण होऊन उपासक स्वतःच हिरण्यगर्भस्वरूप होतो.  त्याला आत्यंतिक शांति प्राप्त होते. शांति याचा अर्थच उपासकाचे अंतःकरण अत्यंत सत्वगुणप्रमाण, शुद्ध, अंतर्मुख होऊन त्यास वैराज पद म्हणजेच वैराग्याची प्राप्ति होते.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ

Tuesday, January 22, 2019

वेदांत आणि तथाकथित आधुनिकता | Vedanta and So-called Modernity
वेदांच्यामधील, उपनिषदांच्यामधील ज्ञान हे केवळ समाजाच्या ठराविक वर्गासाठी नाही किंवा केवळ सर्वसंगपरित्याग केलेल्या जिज्ञासूला सांगितलेले नाही किंवा आयुष्यात उतारवयात श्रवण करावयाचे नसून वेदांनी आपले ज्ञानभांडार विश्वामधील मनुष्य म्हणून जीवन जगणाऱ्या माणसांच्यासाठी खुले केलेले आहे.  वेदांत हा रुक्ष विषय नसून आपल्या जीवनाशी अत्यंत निगडित असे हे ज्ञान आहे.  मानवी जीवनाशी घनिष्ट संबंध असणारे वेदांताइतके दुसरे कोणतेही शास्त्र असूच शकत नाही.  

वेदांतशास्त्र म्हणजे पलायनवाद नसून उलट जीवनाला आनंदाने सामोरे कसे जावे, जीवन परिपूर्ण कसे करावे, याचे practical ज्ञान देणारे वेदांतशास्त्र आहे.  आजच्या शिक्षणक्रमामध्ये जर हे शास्त्र समाविष्ट होऊन तरुण पिढीच्या वाचनात हे शास्त्र येऊन काही प्रमाणात आचरणात आले तर समाजामधील कितीतरी समस्या सुटण्याची शक्यता आहे.  आध्यात्मिक ज्ञान ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञानाची हाक आहे.  याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा.  

आपण आधुनिकतेच्या नावावर आपली थोर जीवनमूल्येच पायदळी तुडविलेली आहेत.  वेदांना कालबाह्य ठरवून वेदांना जीवनातून काढून टाकलेले आहे.  वेद आपल्या जीवनात स्थित असले असते, तर आज लहान मुलांच्या मुखांमध्ये अश्लील गाण्यांऐवजी – मातृदेवो भव !  पितृदेवो भव !  असे वेदध्वनि उमटले असते.  त्यावेळी त्यांना – तू आईला नमस्कार कर, असे सांगण्याची वेळच आली नसती.  

संस्कार म्हणजेच – सम्यक् क्रियन्ते इति |  जे मनुष्यावर प्रयत्नपूर्वक, यथार्थपणे केले जातात, त्यांना ‘संस्कार’ असे म्हणतात.  आपले जीवन ज्ञानाबरोबर आचार-उच्चारांनीही सुसंस्कृत, सुसंपन्न व्हावे, यासाठी श्रुतीने आई-वडिल-आचार्य असे तीन संबंध सांगितले आहेत.  जीवनामध्ये हे तिन्हीही संबंध असावेत.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ

Wednesday, January 16, 2019

शिक्षकांचे संस्कार | Role of Teachers’ Impressions
आधुनिक काळामध्ये विद्यार्थी अधिकाधिक वेळ शिक्षकांच्या सान्निध्यात असतात.  त्यामुळे विद्यार्थीदशेमध्ये असताना विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षकांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे.  शिक्षक हा उगवत्या तरुण पिढीचा आधारस्तंभ व मार्गदर्शक आहे.  संपूर्ण समाजाचा महत्वाचा घटक आहे.  मागची पिढी व तरुण पिढी यामधील शिक्षक हा दुवा आहे.  यामुळे पुस्तकी विद्येबरोबरच शिक्षकाने विद्यार्थ्याला व्यवहारज्ञान, जीवनाचे ज्ञान देणे आवश्यक ठरते.  

विद्यार्थ्याच्या मनावर आईवडिलांनी जे सुसंस्कारांचे बीज पेरले, त्याला खतपाणी घालून रक्षण, संगोपन करून त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर करणे, हे शिक्षकाचे कर्तव्य आहे.  परंतु त्यासाठी प्रथम आजचा शिक्षक सुसंस्कारसंपन्न हवा.  शिक्षकाने आपल्या स्वतःच्याच आचारांच्यामधून, चारित्र्यसंपन्न जीवानामधून विद्यार्थ्याला संस्कारक्षम बनविले पाहिजे.  

ज्या मनुष्यावर आई-वडिल आणि आचार्य यांचे योग्य वेळी योग्य संस्कार होतात, तोच मनुष्य अंतरंगामधून विकसित, परिपक्व, सुसंस्कृत व चारित्र्यसंपन्न होतो.  त्याचे आचार-विचार-उच्चार उदात्त होतात.  श्रुति म्हणते – मातृमान् पितृमान् आचार्यवान् पुरुषो वेद |  ज्याच्यावर माता-पिता-आचार्य यांचे संस्कार होतात, त्याचेच जीवन परिपूर्ण होते.  याउलट संस्कारहीन पुरुष स्वैर, उच्छृंखल, भोगासक्त होऊन पशुतुल्य जीवन जगतो.  तो पुरुष कामनांच्या, वासनांच्या व विकाराच्या आहारी जाऊन अधःपतित होतो.  

वस्तुतः आईवडिल व गुरूंचे चांगले संस्कार झाले असतील तर त्या मनुष्याला – तू चांगले वाग, असे शिकविण्याची आवश्यकताच नाही.  परंतु सद्य समाजात सतत – संस्कार करा, संस्कार करा, असा डांगोरा पिटविला जातो.  आईवडिल व आचार्य (शिक्षक) यांनी आपल्या स्वतःच्याच आचरणामधून हे संस्कार पुढच्या पिढीमध्ये हळूवारपणे, कोणत्याही प्रकारची लेक्चरबाजी न करता, उपदेशाचे मोठमोठे डोस न पाजता उतरविले पाहिजेत.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ
Tuesday, January 8, 2019

पहिला संस्कार – माता | First Teacher – Motherमनुष्य जीवनामध्ये पहिले सर्व संस्कार आई करते.  आई हीच आपल्यासाठी प्रथम शिक्षक, प्रथम गुरु आहे. मातेसारखे दुसरे दैवत नाही.  न मातुः परमदैवतम् |  माता हे साक्षात ईश्वराचे स्वरूप आहे.  ईश्वराची साकार झालेली प्रेममयी मूर्ति आहे.  

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||      (श्री दुर्गासप्तशती)

मातेच्या पाठशाळेत कपट-असूया-द्वेष-मत्सर नाही, दंड नाही – असेल तर फक्त प्रेमासाठी मुलाच्या हितासाठी अनुशासन आहे.  आचार्य सुंदर वर्णन करतात –

कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति |       (देव्यपराधक्षमापन स्तोत्र)
मुलगा कितीही वाईट असेल, तरी कोणतीही माता कधीही कुमाता होत नाही.  असे हे मातेचे जगातील सर्वात मोठे, अभिजात ज्ञानसंपन्न, अनुभवसमृद्ध विद्यापीठ आहे.  तेथे नावनोंदणी नाही, पैसे नाहीत, भेद नाहीत, व्यवहार नाही – आई म्हणजे फक्त शुद्ध प्रेम, निष्कपट प्रेम, प्रेम आणि प्रेम !  आणि त्याबरोबर संस्कारांचे शुद्ध बीज !  माणसाला माणूस घडविण्यासाठी असणारी सर्वोच्च विद्या की, जी आजपर्यंत शिक्षणाचा ज्ञानाचा डांगोरा पिटणाऱ्या कित्येक विद्यापीठांमध्ये लाखो रुपये दिले तरी उपलब्ध होऊ शकत नाही.  

म्हणूनच जग कितीही प्रगत झाले, काळ बदलला, शिक्षणसाधने बदलली तरीही खऱ्या अर्थाने जीवन विकसित व ज्ञानाधीष्टित करावयाचे असेल तर मातेने आपल्या विद्यापीठामध्ये मुलाला सुसंस्कारांचे धडे दिलेच पाहिजेत.  याचा सूक्ष्म विचार अनादि काळापासून आपल्या वेदांनी करून ठेवला आहे.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ


Tuesday, January 1, 2019

अक्षुद्रबुद्धि | Magnanimous Mind
क्षुद्र बुद्धि म्हणजे संकुचित बुद्धि होय.  अक्षुद्रबुद्धि म्हणजे विशाल मन होय.  शिष्याच्या अधिकारित्वामुळे गुरूंचे मन प्रसन्न होऊन ते शिष्यावर अहैतुक कृपा करून आपले सर्वस्व शिष्याला बहाल करतात.  वस्तुतः गुरु कधीच क्षुद्र बुद्धीचे नसतात.  गुरु एकच आहेत.  परंतु ज्ञान ग्रहण करणारा शिष्य क्षुद्र बुद्धीचा असेल तर गुरूंच्या ज्ञान देण्यासही आपोआप मर्यादा येतात.  

शास्त्राचे ज्ञान, शास्त्राची दिव्यता, भव्यता, गांभीर्य, प्रगल्भता, सखोलता प्राप्त होऊन ज्ञानाची विशाल दृष्टि प्राप्त करायची असेल तर शिष्याचे मन सुद्धा तितकेच अनुकूल, सामर्थ्यसंपन्न, प्रगल्भ, एकाग्र असले पाहिजे.  शिष्यच अनधिकारी असेल, त्याच्यामध्ये नम्रता, विनयशीलता, ज्ञानाविषयी तळमळ नसेल, तर त्याला ज्ञानही अर्धवटच प्राप्त होईल.  त्याच्या ज्ञानामध्ये संशय, शंका, विकल्प, संदिग्धता राहते.  केवळ ऐकायचे म्हणून तो ऐकतो.  गुरूंना कितीही इच्छा असेल तरीही शिष्याचे मन ज्ञान घेण्यास अनुकूल नसते.  

परंतु, एखादा शिष्य नचिकेतासारखा शिष्योत्तम असेल, नम्रता, विनयशीलता, अंतर्मुख, चिंतनशील वृत्ति, श्रद्धा, गुरुभक्ति, ज्ञानजिज्ञासा, वैराग्यवृत्ति इत्यादी गुणांनी संपन्न असेल तर गुरु त्यास भरभरून ज्ञान देतात.  त्याला काय शिकवावे आणि काय नको, असे त्यांना होऊन जाते.  आपले सर्व ज्ञानभांडार त्याच्यासाठी खुले करतात.  इतके त्यांचे मन उदार होते.  असे गुरु व असा शिष्य हे विश्वामधील महदाश्चर्य आहे.  असे गुरुही भाग्यवान आणि शिष्यही भाग्यवान आहे.  - "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ