Tuesday, March 29, 2016

तितिक्षा म्हणजे काय ? | What is Endurance ?आचार्य म्हणतात –
सहनं सर्वदुःखानां अप्रतीकारपूर्वकं |
चिन्ताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते || ( विवेक चूडामणि )

प्रतिकार न करता सर्व दुःखांचे प्रसंग सहन करणे आणि चिंताविलापरहित अशी जी मनाची अवस्था तिला ‘तितिक्षा’ म्हणतात.  यामध्ये तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत.

१) वर्तमानकाळामध्ये येणाऱ्या अनपेक्षित, दुःखदायक प्रसंगांना कसे सामोरे जावे ?  आनंदाने आणि प्रसन्न मनाने सर्व प्रसंगांचे स्वागत करावे.
२) चिंता – प्रत्येक मनुष्याला भविष्यकाळाची चिंता असते.  भविष्यकाळ अज्ञात असल्यामुळे मनात नकळत भीति निर्माण होते.  मन सतत अस्थिर असते.  चिंताग्रस्त होते.  हे मन कधीही सुखी होत नाही.
३) विलाप – मनावर सतत चांगल्या-वाईट, सुखदुःखात्मक प्रसंगांचे संस्कार होत असतात.  ते सर्व सूक्ष्मरूपाने साठविले जातात.  अशा भूतकाळातील घटनांची स्मृति वर्तमानकाळात होत असते.  स्मृति ही वाईट नाही.  नको त्या प्रसंगांची आठवण झाली तर त्या आठवणीने मन अस्वस्थ होते, निराश, उद्विग्न होते.  किंवा वर्तमान प्रसंगांची भूतकाळातील प्रसंगांशी मन सतत तूलना करते त्यामुळे ते क्षुब्ध होते, चिडखोर बनते.

अशा प्रकारे मन केव्हाही कोणत्यातरी कारणाने अस्वस्थ, क्षुब्ध, चिंताग्रस्त, बहिर्मुख होत असते.  म्हणून सहनशीलता अशी एक मनाची अवस्था आहे की, ज्यामध्ये मन भूतकाळाच्या संस्कारांच्या स्मृतीने अस्वस्थ होत नाही.  क्षुब्ध होत नाही.  तसेच भविष्यकाळाबद्दल कोणत्याही प्रकारची चिंता, विवंचना नाही आणि वर्तमानकाळात येणाऱ्या प्रसंगांमध्ये मन प्रसन्न, आनंदी असते.  हेच मन शांत, स्थिर, अंतर्मुख, एकाग्र असून ब्रह्मज्ञानासाठी योग्य अधिकारी आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, March 22, 2016

सुख-दुःखांचे अनुभव का येतात ? | Why We Experience Joy & Grief ?


इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग येतो त्यावेळी इंद्रिये कोणताही विषय असो, त्या विषयाच्या स्वभावप्रमाणे शीत-उष्ण वगैरे अनुभव देतात.  परंतु हे अनुभव आपल्या मनात प्रत्येक वेळी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करतात.  कधी सुखकारक, कधी दुःखकारक, कारण एकच वस्तु स्थानकालभेदाप्रमाणे अनुकूल ठरते तर भिन्न काळात प्रतिकूल ठरते.  थंड पेय उन्हाळ्यामध्ये सुखकारक असते, परंतु थंडीमध्ये मात्र दुःखकारक ठरते.  त्याउलट उष्ण पेय थंडीमध्ये खूप आनंद देणारे होते तर उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणारे होते.

याचाच अर्थ इंद्रियांचा विषयांशी झालेला संयोग प्रत्यक्ष सुखदुःखांचा अनुभव देत नाही.  इंद्रियांचे कार्य फक्त बाह्य विषयांचे जसेच्या तसे ग्रहण करणे होय. सुखदुःखाला आपले मनच कारण आहे.

तो प्रत्येक प्रसंग अनुकूल, प्रतिकूल निर्माण करतो, कारण प्रत्येक प्रसंग, अनुभव हा स्वतःनेच निर्माण केलेल्या कल्पनांच्यामधून तूलानात्मक दृष्टीने पाहातो.  मला ग्रीन लेबलचा चहा आवडत असेल तर त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही चहा मला समाधान देत नाही.  हा प्रत्येकाचा अनुभव आहे.  यामधून तो मनात अनेक प्रकारची द्वंद्वे निर्माण करून दुःखांचा, यातनांचा अनुभव घेतो.  म्हणून हे सर्व अनुभव प्रत्यक्ष विषय देत नसून स्वतःचे राग-द्वेष देत असतात.  विषय फक्त निमित्तमात्र असतात.

म्हणून साधकाने विषयांच्या किंवा प्रसंगांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रागद्वेषात्मक प्रतिक्रिया कमी करण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  रागद्वेषांच्या द्वंद्वांच्या आहारी न जाता मन द्वंद्वरहित करून संतुलित ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे.  म्हणजेच अशा प्रकारचे मन तयार केले पाहिजे की, बाह्य विषय, प्रसंग, अनुभव मनाला विचलित, अस्वस्थ करणार नाहीत.  यामुळे रागद्वेषांचा मनावर होणारा परिणाम कमी होईल.  मन अधिक अंतर्मुख होऊन चिंतनशील होईल.  ही साधना करणे आवश्यक आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, March 15, 2016

जन्म-मृत्यू केवळ शरीराला | Birth & Death Only for The Body


जन्म आणि मृत्यु किंवा उत्पत्ति-स्थिति-लय हे फक्त शरीराला आहेत.  परंतु या तीन्हीही घटनांच्या मध्ये प्रवेश करणारा, वर्तमानकाळात शरीरात राहणारा आणि मृत्यूच्या वेळी शरीर सोडणारा ‘मी’च आहे.  म्हणून या शरीरात येण्यापूर्वी ‘मी’चे अस्तित्व असलेच पाहिजे.  त्यामुळेच या शरीरात ‘मी’ सत्तारूपाने आहे आणि शरीर नाश पावले तरी ‘मी’ची सत्ता आहेच, कारण तीच सत्ता पुढच्या शरीरात सत्तारूपाने प्रवेश करते.

हे जर मानले नाही तर अनेक दोष निर्माण होतील.  १)  सुखदुःखांच्यामधील नानात्व आणि वैचित्र्य अशक्य होईल, कारण कर्माच्या वैचित्र्यामुळे सुखदुःखांमध्ये वैचित्र्य अनुभवास येते.  त्या सर्व कर्मांचा कर्ता अनेक नसून एकच आहे.  नाहीतर कर्त्याची सत्ता संपेल.  २)  जे कर्म केलेले नाही त्याचे फळ जीवाला भोगावे लागेल.  त्यामुळे कर्म आणि कर्मफळ यांच्यात सुसूत्रता, नियमितता राहाणार नाही आणि विश्वात नियम राहाणार नाहीत.  एखाद्याने कर्म करावे आणि त्याचे फळ मिळूच नये किंवा ते दुसऱ्याला मिळावे, असे झाले तर गोंधळ निर्माण होईल.

पूर्वीच्या अनेक जन्मात केलेल्या कर्माचे फळ जीव या जन्मात उपब्भोगतो.  किंवा जो कर्म करतो तोच कर्ता त्या कर्मफलाचा उपभोग घेतो.  जर मागील जन्माची आणि या जन्माची सत्ता यांचा कोणताच संबंध नसेल तर मागील जन्माचे पापपुण्यात्मक फळ व या जन्मात भोगावी लागणारी कर्मफळे यांचा समन्वय, कारणमीमांसा करता येणार नाही.  सुख-दुःख का ?  आणि त्यातील वैचित्र्य का ?  याची संगति लागणार नाही.  म्हणून या जन्मातील कर्माचे फळ आज ना उद्या भोगलेच पाहिजे आणि त्यामध्ये शरीराचा मृत्यु आला तर कर्म संपत नसून ते पुढील जन्मामध्ये भोगलेच पाहिजे.  ज्याने कर्म केले त्यालाच ते भोगले पाहिजे.

जीव शरीरइंद्रियादिपासून भिन्न असून शरीराला जन्ममृत्यु असले तरी जीव मात्र एका शरीरामधून दुसऱ्या शरीरात जातो.  म्हणून तो नित्य आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, March 8, 2016

जन्म-मृत्यू पलीकडे | Beyond Birth & Death


आपण फक्त वर्तमानकाळात इंद्रियगोचर असणारे शारीरिक अस्तित्व पाहतो.  इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे दृष्टि जात नाही.  स्वतःकडे किंवा इतरांकडे पाहताना हीच शारीरक दृष्टि असते आणि जे दिसते तेच सत्य वाटते.  त्यामुळे जन्म आणि मृत्यु या दोन घटनांच्या अलीकडे आणि पलीकडे दृष्टि जातच नाही.  तो फक्त जन्ममृत्युयुक्त शरीर व त्यात राहणारा, शरीराशी तादात्म्य पावणारा शरीरधारी एवढीच संकुचित, मर्यादित, स्थूल दृष्टि असते.

ज्याप्रमाणे एखाद्या हॉलमध्ये एका भिंतीमधून वेगाने बाण आला आणि दुसऱ्या भिंतीमधून नाहीसा झाला, तर एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंतच आपल्याला बाणाचे अस्तित्व दिसते.  प्रवेश करण्यापूर्वी भिंतीच्या अलीकडे आणि नाहीसा झाल्यानंतर भिंतीच्या पलीकडे बाणाचे अस्तित्व दिसत नाही, कारण आपली दृष्टि दोन भिंतींनी मर्यादित होते.  परंतु याचा अर्थ असा नाही की, बाणाचे अस्तित्व दोन भिंतीतच आहे.  प्रवेश करण्यापूर्वी आणि दृष्टीपलीकडे गेला तरीही बाणाची सत्ता आहेच.  परंतु ती सत्ता आपल्या दृष्टीला दिसत नाही.  म्हणून आपल्या दृष्टीची कक्षा वाढविली तर पूर्वीचे आणि नंतरच्या बाणाचे अस्तित्व दिसेल.

त्याचप्रमाणे आम्ही फक्त शरीर पाहतो.  शरीराला सत्यत्व देतो.  त्यामुळे शरीर आणि त्याचे जन्ममृत्यु एवढेच खरे वाटते.  परंतु शरीर हे कार्य असून जन्माच्या वेळी ‘मी’ शरीरामध्ये प्रवेश केला आणि मृत्युच्या वेळी शरीराचा त्याग केला.  जन्म आणि मृत्यु शरीराला आहे.  शरीरात प्रवेश करणारा आणि शरीराचा त्याग करणारा ‘मी’ आहे.  मग ‘मी’ फक्त शरीर आहे का ?  शरीरापासून ‘मी’ भिन्न आहे का ?  आपली आज दृष्टि शरीरावरच आहे.  परंतु भगवान अर्जुनाला शरीराच्या पलीकडे ‘मी’ या शब्दाने सूचित केलेल्या तत्त्वाच्या दृष्टीने पाहायला सांगतात.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, March 1, 2016

पंडित कोण आहेत? | Wisdom of Self-Realization


सामान्य मनुष्य देहालाच महत्व देऊन सत्यत्व देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये देह हाच आत्मा ही देहात्मबुद्धि असल्यामुळे तो विश्वात पाहताना देहाला प्राधान्य देऊन पाहात असतो.  त्याची फक्त शारीरिक दृष्टि असते.  यामुळे अहंकारममकारादि प्रत्यय निर्माण होऊन शोक-मोह निर्माण होतात.  संसाराची निर्मिति होते.  ते गेलेल्याबद्दल सतत शोक करीत असतात.  ते अपंडित, अज्ञानीच आहेत.

अत्यंत मूढ, अज्ञानी लोक हे माझे पुत्र वगैरे मृत झाले म्हणून त्यांच्याबद्दल सतत शोक करीत असतात.  परंतु जिवंत असणाऱ्यामध्ये आसक्त होऊन रमतात.  धार्मिक, शास्त्रपारंगत लोक आपले पुत्र महामूर्ख, अज्ञानी, अविचारी, स्वैर, दुराचारी निघाले म्हणून शोक करतात.  आमचे पुत्र आम्हाला काळीमा फासणारे निघाले, अशा प्रकारचे उद्गार काढून सतत शोकाकुल, दुःखी असतात.

परंतु याउलट पंडित – आत्मज्ञानी पुरुष पुत्रादि गेले किंवा मूर्ख निघाले तरी शोक करीत नाहीत, कारण त्यांची दृष्टि शरीरमनबुद्धीच्या अतीत असलेल्या आत्मस्वरूपाची – पारमार्थिक असते.  त्यांच्यामध्ये देहात्मबुद्धि निरास होऊन आत्मस्वरूपाची बुद्धि उदयाला आलेली असते.  त्यामुळे सर्व विश्वाकडे आणि आपल्याभोवती असलेले सगेसोयरे यांच्याकडे बघण्याची दृष्टीच बदललेली असते.

स्वप्नात पुत्रपौत्रादि जन्माला येतात आणि मृत होतात.  काल्पनिकच अस्तित्व असल्यामुळे त्यांचा जन्म आणि मृत्यु सर्वच काल्पनिक !  म्हणून स्वप्नातून जागृत झालेला पुरुष काल्पनिक पुत्रजन्माने हर्षित होत नाही किंवा काल्पनिक मृत्यूने दुःखी, शोकाकुल होत नाही.  त्याचप्रमाणे अविद्यारूपी निद्रेचा ध्वंस करून आत्मज्ञानाने स्वस्वरूपला जागृत झालेला आत्मज्ञ पुरुष हे सर्व विश्व आणि सगेसोयरे अविद्याकल्पित असून स्वप्नाप्रमाणे भास आहे.  त्यांना खरी वास्तवता नसून परमात्मा, ब्रह्मस्वरूप हेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे पाहतात.  त्यामुळे सर्व असत् नामरूपांचा त्याग करून सर्व ठिकाणी अनुस्यूत असलेले ब्रह्मस्वरूप पाहतात.  ज्यांच्यामध्ये ही आत्मस्वरूपाची बुद्धि निर्माण झालेली आहे ते पंडित होय.  जे आत्मज्ञानी आहेत तेच पंडित आहेत.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ