Tuesday, October 27, 2015

शोकाची कारणे | Causes of Grief


ज्या ज्या वेळी मनुष्याला शोक किंवा दुःख होते, त्यावेळी मन अस्वस्थ, व्याकूळ होते.  याची अनेक कारणे आहेत.

१.      एखादा अनपेक्षित धक्का देणारा प्रसंग आला तर त्याच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो.  मन अत्यंत अस्वस्थ, शोकाकुल, अगतिक होते.  त्यावेळी शारीरिक आणि इंद्रियांच्या भोगाची इच्छाही राहात नाही.  परंतु काळाच्या ओघात दुःखाचा झालेला परिणाम कमी होतो आणि मनुष्य पुन्हा पूर्ववत होतो.  म्हणजे अशा दुःखांना काळ हेच औषध आहे.

२.      मनुष्याच्या मनात एखाद्या अत्यंत प्रिय विषयाची कामना असेल तर ती विषयकामना त्याला कामनापूर्ति होईपर्यंत सतत अस्वस्थ, व्याकूळ करते आणि खूप परिश्रम करूनही ती वस्तु प्राप्त झाली नाही तर तो अत्यंत दुःखी, निराश होतो.  अस्वस्थ होतो.  जर त्याला इच्छित वस्तु दिली तर सर्व दुःख नाहीसे होते.  तो आनंदी होतो.

९९% लोकांचे दुःख या दोन कारणांमुळेच असते.  म्हणून असे लोक गुह्य ज्ञान प्राप्त करण्याचे अधिकारी होत नाहीत.  त्यांच्यामध्ये खरी जिज्ञासा नसते.

परंतु ऐहिक विषयांची समृद्धि, सत्ता आणि पारलौकिक विषयांची प्राप्ति, सत्ता आणि त्यांचा उपभोग हे अंतरिक शोक नाहीसा करण्याचे साधन नाही.  तीव्र वैराग्य प्राप्त होऊन आत्मज्ञान झाल्याशिवाय अत्यंत शोकनिवृत्ति होत नाही.  ज्याला आचार्य म्हणजेच गुरु प्राप्त झालेले आहेत तोच आत्मस्वरूप जाणतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, October 20, 2015

श्रेयस म्हणजे काय ? | What is ‘Shreyas’ (Propitious)?


एकान्तिकम् आत्यन्तिकम् इति श्रेयः |
जे केव्हाही कधीही एकच फल देते आणि मिळाल्यानंतर जे निरतिशय असते ते श्रेयस होय.  साधना केल्यानंतर निश्चितपणे प्राप्त होते ते एकान्तिकम् आणि प्राप्त झाल्यानंतर नित्य, शाश्वत, निरतिशय स्वरूपाचे असते ते आत्यन्तिकम्.

एखादे विशिष्ट कर्मफळ प्राप्त करण्यासाठी कर्म हे साधन दिले जाते.  कर्मरूपी प्रयत्न केले तरी अमुक इतकेच फळ मिळेल असे निश्चित सांगता येत नाही.  ते फळ एखाद्याला मिळाले तर दुसऱ्याने अनुसरण केल्यानंतर त्याला मिळेलच असेही नाही.  एखाद्या कर्माचे फळ मिळाल्यानंतर तेच कर्म नंतर त्याच मनुष्याने केले तर पूर्वीइतकेच फळ मिळेल याची निश्चिति नाही.  याचे कारण मनुष्य कर्तुम्-अकर्तुम् नाही, तर कर्म आणि कर्मफळावर दृष्ट आणि अदृष्ट अनेक घटक नियमन करीत असतात.  ते मनुष्याच्या हातात नसल्यामुळे कर्माचे फळ अनिश्चित आहे.  ते एकान्तिक होऊ शकत नाही.

अर्जुन श्रीकृष्णाला ‘श्रेयस’ या शब्दामधून तीन्हीही काळामध्ये जे निरतिशय कल्याणकारक आहे ते मागत आहे.  असे ‘फळ’ देश-कालावर तसेच कर्मावर अवलंबून असणार नाही.  ते फळ म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान हे एकच आहे.

आत्मज्ञानाचे फळ आत्मप्राप्ति कोणत्याही साधकाला केव्हाही मिळू शकते.  ते कर्मजन्य नाही तर ज्ञानाचे फळ आहे.  ज्ञान हे अज्ञानाचा ध्वंस करून आत्मस्वरूपाची प्राप्ति करून देते की, जी नित्य आणि शाश्वत प्राप्ति आहे, कारण आत्मस्वरूप हेच नित्य आहे.  त्यानेच जीवनाला तृप्ति मिळेल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
- हरी ॐ

Tuesday, October 13, 2015

श्रीभगवान कोण ? | Who is “Shree Bhagwaan” ?


ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः |
वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णां भग इतीरिणा || (विष्णुपुराण. ६-५-७४)

समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ति, वैराग्य आणि मोक्ष या सहा प्रकारच्या ‘भग’ म्हणजे संपत्ति आहेत.  या सर्व संपत्ति निरतिशय स्वरूपाने ज्याच्या जवळ आहेत त्याला ‘भगवान’ असे म्हणतात.  किंवा अन्य ठिकाणी समग्र ज्ञान, ऐश्वर्य, शक्ति, बल, वीर्य आणि तेज या सहा संपत्ति सांगितलेल्या आहेत.  जो या सर्व सहा गुणांनी निरतिशय स्वरूपाने युक्त आहे तो ‘भगवान’ होय.

प्राणिमात्रांची उत्पत्ति आणि नाश, येणे आणि जाणे या गति आणि ज्ञान व अज्ञान जो जाणतो त्याला ‘भगवान’ असे म्हणतात.  जो सर्वांचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता असून जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे फल देणारा म्हणजे गति देणारा कर्मफलदाता असून ज्ञान आणि अज्ञान जाणणारा सर्वज्ञ आणि ज्ञानस्वरूप आहे तो ‘भगवान’ होय.

श्रुति म्हणते –
मायां तु प्रकृतिं विधान्माविनं तु महेश्वरम् | (श्वेता. उप. ४-१०)

सत्वरजतम या तीन गुणांनी युक्त असलेली माया हीच प्रकृति आहे.  तीच विश्वाचे उत्पत्ति-स्थिति-लयकारण आहे.  ती त्रिगुणांच्या साहाय्याने पंचमहाभूतात्मक विश्वाची रचना करून नानाविविध विषयांची आणि विविध प्राणिमात्रांची प्रकर्षाने निर्मिति करते.  परंतु माया स्वतः अचेतन असल्यामुळे ज्याच्यामुळे प्रकृतीला सत्ता, स्फूर्ति, चेतना मिळून ती कार्यामध्ये प्रवृत्त होते तो मायेचा अधिपति, मायावी – परमेश्वर आहे.  तोच स्वसंकल्पाने विश्वाची उत्पत्तिस्थितिलय करणारा असून सर्वगुणसंपन्न आहे.  म्हणून तोच ‘भगवान’ होय.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, October 6, 2015

विषादयोग | Importance of Depression


‘विषाद’ शब्दाचा अर्थ खिन्नता, खेद, उत्साहाचा अभाव असणे.  ही मनाची अंतरिक अवस्था आहे.  श्रीमद्भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये सांख्ययोग, कर्मयोग, कर्मसंन्यासयोग, ध्यानयोग, विभूतियोग, पुरुषोत्तमयोग या प्रकारचे अनेक योग भगवंतांनी स्पष्ट केलेले आहेत.  प्रत्येक योगाचा निश्चित संबंध आणि हेतु लक्षात ठेऊनच त्यांचा उपदेश केलेला आहे.  कोणताही योग निरर्थक नाही.  त्याचप्रमाणे अज्ञान आणि अज्ञानजन्य अहंकार आणि ममकार तसेच त्यामधून निर्माण होणारा भावनांचा उद्रेक आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे अर्जुनाला मोह आणि शोक निर्माण होऊन विषाद होण्यात व त्याची शक्ति क्षीण होण्यात झाला.

विषादयोगाचे एक विशेष महत्व आहे की, विषाद प्राप्त झाल्याशिवाय शुद्ध निरतिशय आनंदाचे महत्व कळणार नाही.  बंधनात अडकल्याशिवाय स्वातंत्र्याचे महत्व कळत नाही.  दुर्बलतेशिवाय बलाचे महत्व पटत नाही.  तसेच विषाद जरी प्राप्त करणे योग्य नसले तरी त्यानेच आनंद आणि उत्साह याचे महत्व अधिक वाढते, एवढे मात्र खरे !

नैराश्य आणि अंतरिक विषादामुळे अर्जुनाला आत्मशांतीचे खरे महत्व कळते म्हणून आत्मशांति प्राप्त करण्यासाठी ‘विषाद’ ही पहिली अवस्था आहे.  ती मनुष्याला अंतर्मुख बनवून विचार करायला प्रवृत्त करते.  मनुष्यामध्ये असलेला कर्तुम् – अकर्तुम् अहंकार नष्ट होतो.  मनुष्य अत्यंत अगतिक होऊन नम्र होतो.  त्याच वेळी तो आत्मशांतीसाठी अधिकारी होतो.  म्हणून या विषादाला ‘योग’ म्हटले आहे.

प्रत्येक मनुष्याला हा विषाद कोणत्या न कोणत्या प्रसंगामध्ये होतच असतो.  गीतेचा उपदेश प्रत्येक विषादाच्या प्रसंगामध्ये उपयोगी पडणारा आहे हे निश्चित.  भगवद्गीता ही मनुष्याचा खेद, नैराश्य दूर करून जीवनामध्ये आत्मानंद देणारी आहे.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ