Wednesday, April 29, 2020

उपासनेपूर्वीचा संकल्प | Pre-Worship Resolution ?




उपासना करीत असताना प्रत्यक्ष उपासनेला बसल्यावर कोणता संकल्प असावा ?  अन्य सर्व वैदिक कर्मांच्यामध्ये कर्म करण्यापूर्वीच संकल्प सोडले जातात.  परंतु उपासना करत असताना या सर्व संकल्पांचा पूर्णतः त्याग करावा.  भगवान म्हणतात –
सङ्कल्पप्रभावन्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः |
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ||                      (गीता अ. ६-२४)  

सर्वसाधारणपणे मनात ऐहिक व पारलौकिक विषयांची प्राप्ति, ऐश्वर्य, सत्ता, यश, कीर्ति, प्रतिष्ठा, मानसन्मान, स्वर्गादि उपभोग, उर्ध्वलोक प्राप्ति हे संकल्प असतात.  किंवा मला या साधनेमधून निरनिराळ्या सिद्धि प्राप्त व्हाव्यात, अज्ञात भविष्य समजावे, दुसऱ्याच्या मनामधील विचार समजावेत, कोणतातरी दिव्य अनुभव यावा, निरनिराळी दर्शने व्हावीत हा संकल्प असतो.  किंवा माझ्या सर्व शारीरिक व्याधि दूर व्हाव्यात, संकटनिवारण व्हावे, हा संकल्प असतो.  परंतु भगवान सांगतात की, साधकाने उपासना करीत असताना यापैकी कोणताही संकल्प करू नये.  

साधकाचा संकल्प एकच असावा आणि तो म्हणजे –
अंतःकरणशुद्ध्यर्थं इदं अहं करिष्ये |
किंवा
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं इदं अहं करिष्ये |
या सर्व साधनेचे प्रयोजन म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ति होय.  या आत्मशांतीच्या स्वरूपामध्ये स्थिर व्हायचे असेल तर, मन प्रथम बाहेरून आत आले पाहिजे.  ज्ञानसाधनेसाठी मन अनुकूल झाले पाहिजे.  म्हणूनच “भगवंता !  मला काहीही नको, फक्त अंतःकरणाची शुद्धि दे, मला ज्ञान दे, तीव्र वैराग्य दे” हाच एकमेव संकल्प असावा.  जपसाधनेच्या प्रारंभी असा शुद्ध संकल्प केल्यानंतर शास्त्रामध्ये जपसाधनेला पूरक असणाऱ्या अन्य साधना सांगतात.  



- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ


Tuesday, April 21, 2020

आत्मज्ञानाचा उपयोग | Use of Self-Realization




वस्तु अस्तित्वात असेल तर ती शब्दाने सांगता आली पाहिजे.  परंतु आत्मा शब्दाने सांगता येत नसेल तर तो ‘असत्’ होईल.  त्यामुळे या तुरीय आत्मस्वरूपाचे ज्ञानही निरर्थक होईल.  आत्मज्ञानाचे प्रयोजनच राहणार नाही.  मग आत्मज्ञानाचा काय उपयोग आहे ?  अशी कोणी शंका घेईल तर आचार्य यावर म्हणतात - न |  ही शंका घेणे योग्य नाही.

आत्मज्ञान हे निश्चितच सर्व जीवांना अत्यंत उपयुक्त व आवश्यक आहे.  आत्मज्ञानाचे निश्चित असे प्रयोजन आहे.  आचार्य येथे सुंदर दृष्टांत देतात - शुक्तिकारजतवत् |  जसे शिंपल्याच्या अज्ञानामुळे आपणास शिंपल्यावर चांदीचा भास होतो.  तेथे चांदी दिसल्याबरोबर आपल्या मनामध्ये त्या सत्य दिसणाऱ्या चांदीचा लोभ, तृष्णा निर्माण होते.  आपण जवळ जातो, हात लावतो, त्यावेळेस आपणाला एकदम समजते की, ‘अरे, ही तर चांदी नसून शिंपला आहे.’  असे सत्य, अधिष्ठानभूत शिंपल्याचे ज्ञान होताक्षणीच भासमान मिथ्या चांदीचा, चांदीला दिलेल्या सत्यत्वाचा निरास होतो.  त्यामुळे चांदीची तृष्णा, लोभ मनामधून निघून जातो.  मन तृष्णारहित, लोभरहित, विकाररहित झाल्यामुळे शांत व स्वस्थ होते.  हे सर्व शिंपल्याच्या यथार्थ ज्ञानाचे फळ आहे.

त्याचप्रमाणे, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने अनात्मवस्तूंची तृष्णा निवृत्त होते.  आत्मज्ञानामुळे अविद्येचा निरास होतो.  अविद्येचा निरास झाल्यामुळे अविद्येमधून निर्माण होणाऱ्या अनेक कामना निवृत्त होतात.  जीवाला ‘मी स्वतःच आनंदस्वरूप आहे’, असे आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे तो जीव स्वतःच आनंदस्वरूप, तृप्त, परिपूर्ण व कृतकृत्य होतो.  आनंद मिळविण्यासाठी मग तो बाह्य विषय किंवा उपभोग यांच्यामध्ये प्रवृत्त होत नाही.  त्याच्यामधील अविद्याकामकर्मादि दोषांचा नाश होतो.

आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने हृदयग्रंथीचा, अविद्याग्रंथीचा भेद होतो.  सर्व संशय निरास होतात.  तसेच, सर्व कर्मांचा क्षय होऊन जीव या संसारबंधनामधून मुक्त होतो.  हे आत्मविद्येचे फळ आहे.  आत्मज्ञानी पुरुष शोकसागराला पार करतो.  ज्याला जीवब्रह्मैक्य ज्ञान होते, तो आत्मज्ञानी पुरुष शोकमोहरहित होतो.  आत्मज्ञान घेण्यासाठी उपनिषदे म्हणजेच वेदांतशास्त्र हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.  त्यामुळे उपनिषदांच्यामधील श्रुतींच्या आधारे तुरीय आत्म्याचे प्रत्यगात्मस्वरूपाने ज्ञान होणे निश्चित शक्य आहे.  यामध्ये कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही.  


- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ

Tuesday, April 14, 2020

अप्रमेय | One That Cannot be Derived




आधारभूत आत्म्याचा निर्देश शब्दांनी करण्यास काय हरकत आहे ?  दोन सत् वस्तूंच्यामध्ये संबंध येऊ शकतो. परंतु एक सत् व दुसरी असत् अशा वस्तूंच्यामध्ये संबंध येऊ शकत नाही.  कारण असत् वस्तु ही अवस्तुरूप आहे.  म्हणजे रज्जुमधील कल्पित सर्प ही वस्तुच प्रत्यक्ष अस्तित्वात नाही.  त्यामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात नसणाऱ्या असत् वस्तूमध्ये व सत् वस्तूमध्ये संबंध होऊ शकत नाही.  त्यामुळे त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही.  

त्याप्रमाणेच तुरीय आत्मस्वरूप हे ‘गाय’ वगैरेदींच्याप्रमाणे अन्य प्रमाणांचाही विषय होत नाही.  गाय वागैरेदि विषय प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतात.  म्हणजेच ते विषय प्रत्यक्षादि प्रमाणाचे विषय होतात.  परंतु तुरीय आत्मस्वरूप हे निरुपाधिक, निर्विशेष, इंद्रियअगोचर असल्यामुळे ते प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय होत नाही.  आत्मस्वरूप आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही.  इंद्रियांनी अनुभवू शकत नाही.  ते ज्ञानेंद्रियांचा विषय होत नाही.  ते स्वरूप कर्मेंद्रियांनी ग्रहण करता येत नाही.  ते स्वरूप मन-बुद्धीला आकलन होऊ शकत नाही.  आत्मस्वरूपाचे अन्य कोणत्याही गोष्टीवरून अनुमान काढता येत नाही.  तसेच, आत्मस्वरुपाला अन्य कशाचीही उपमा देता येत नाही, कारण आत्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य दुसरी वस्तूच अस्तित्वात नाही.  म्हणुनच आत्मा हा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळे त्याला ‘अप्रमेय’ असे म्हटले जाते.  

थोडक्यात, तुरीय आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध, जाति, क्रिया, गुण, नाम, रूप या सर्वांचा अत्यंत अभाव आहे.  म्हणुनच ते स्वरूप शब्दाने निर्देशित करता येत नाही.  शब्द हे वस्तूचे नामरूप गुणधर्म जातिक्रियासंबंध हे सांगण्यामध्ये प्रवृत्त होतात.  इतकेच शब्दांचे सामर्थ्य आहे.  नामरूपादींच्याही अतीत असणाऱ्या वस्तूंचे वर्णन करण्याची शक्ति शब्दांच्यामध्ये नाही.  म्हणून आत्मस्वरूपाचा निर्देश श्रुति येथे कोणत्याही विशिष्ठ नावाने करीत नसून- नान्तःप्रज्ञम् |  असा निषेधरूपाने करीत आहे.  



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


Tuesday, April 7, 2020

सृष्टि – परमात्म्याचा स्वभाव | Cosmos – Nature of the Supreme Being




आचार्य म्हणतात की, ही सृष्टि म्हणजे देवाचा स्वभाव आहे.  आप्तकाम पुरुषामध्ये इच्छा कशी काय निर्माण होऊ शकेल ?  असे सांगून आचार्यांनी येथे सृष्टिविषयक अन्य सर्वच मतांचे खंडन केले आहे.  ईश्वर हा आप्तकाम म्हणजेच पूर्णकाम आहे.  ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, जो पूर्ण तृप्त आहे.  त्याच्यामध्ये कोणतीही यत्किंचित् इच्छा निर्माण होत नाही.  अतृप्त, अपूर्ण पुरुषामध्येच सतत कामना किंवा इच्छा निर्माण होत असतात.  ईश्वर हा स्वस्वरूपाने परिपूर्ण, तृप्त, आप्तकाम असल्यामुळे त्याच्यामध्ये विश्वनिर्मितीची इच्छा, कामना किंवा संकल्प निर्माण होणे शक्य नाही.  त्यामुळे भोगासाठी किंवा क्रीडा करण्याच्या इच्छेने सुद्धा विश्वनिर्मिती होणे शक्य नाही.

म्हणूनच येथे आचार्यांनी अन्य सर्व मतांचे खंडन करून सांगितले की, विश्वनिर्मिती हा देवाचा स्वभाव आहे.  येथे ‘स्वभाव’ म्हणजेच ‘माया’ होय.  परमात्म्याच्या स्वभावाने म्हणजेच मायेने विश्वाची निर्मिती होते.  म्हणून विश्व हे मायेचे कार्य आहे.  जसे राज्जुमधून निर्माण झालेल्या सर्पाचे कारण केवळ रज्जूचे अज्ञान व सर्पभ्रांति हे आहे.  सर्पनिर्मितीसाठी रज्जूच्या अविद्येशिवाय दुसरे कोणतेही कारण सांगू शकत नाही.  त्याचप्रमाणे केवळ माया हेच विश्वनिर्मितीचे कारण आहे.  

दोरीवर आपणास साप दिसत असेल तर मग त्या सापाच्या उत्पत्तीचे कारण काय आहे ?  साप कोठून निर्माण झाला ?  कसा निर्माण झाला ?  सापाचे स्वरूप काय ?  तो साप कोणत्या जातीचा आहे ?  अशा सर्व विषयांच्यावर उहापोह, सखोल, सर्वांगीण चर्चा केली तरीही “दोरीचे अज्ञान” हेच सर्पभ्रांतीचे एकमेव कारण आहे.  दोरीच्या अज्ञानामुळेच दोरीमधून सर्पभ्रम निर्माण होतो.  हेच एकमेव उत्तर आहे.  यापेक्षा वेगळे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.  

त्याप्रमाणे हे दिसणारे दृश्य विश्व म्हणजेच परमात्मस्वरूपाच्या अधिष्ठानामध्ये मायेमुळे निर्माण झालेला केवळ भ्रम आहे.  विश्व हे देवाचा स्वभाव म्हणजेच देवाची माया आहे.  मायाकार्य आहे.  मायेच्या साहाय्याने हे सृष्टिचक्र (उत्पत्ति-स्थिति-लय) अखंडपणे, अव्याहतपणे चालू आहे.   



- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ