Tuesday, August 11, 2026

एकांतवासाचे फायदे | Benefits Of Solitude

 




एकान्तवास कशासाठी करावा ?  त्याचे अनेक फायदे आहेत.

१) आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये बाह्य विषयांचे आकर्षण मनाला सतत भुरळ पाडत असते.  विषय अत्यंत मोहक असल्यामुळे नकळत आपण त्यांना बळी पडत असतो आणि त्याबरोबर वाहात राहातो.  विषयसंगामुळे आपल्या मनात सतत अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प, आशा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्यातुनच कामादि विकार निर्माण होतात.  आपण कितीही चांगले असलो तरी लोकांच्या सान्निध्याने कपटीपणा, द्वेष, मत्सर, कटुता वगैरे आपण शिकतो.  त्यांच्या सवयी आपण उचलतो.  म्हणून काही काळ का होईना प्रत्येकाने सर्व विषयांचा आणि जनसंपर्काचा त्याग करून एकान्तवास करावा.

 

२) जीवन जगत असताना अनेक संकटे, दुःखाचे प्रसंग सतत येत असतात.  हे प्रसंग का येतात ?  याचे कारण शोधताना आपण सर्व दुःखांचे मूळ कारण बाहेर शोधत असतो - मग ते प्रसंगामध्ये, विषयामध्ये किंवा व्यक्तीमध्ये असो.  एकान्तवासात मनुष्य एकटा असतो.  सर्व जनसंपर्क आणि प्रसंगांच्यापासून काही प्रमाणात दूर राहातो.  काही प्रमाणात का होईना तो आत्मपरीक्षण करतो.  अंतर्मुख होण्याची त्याला संधी मिळते.  सर्व दुःखांचे कारण आपल्या मनातच आहे हे एकान्तवासामध्येच समजते.  जर बदल करावयाचा असेल तर आपल्याला आपले मन कसे आहे ?  त्यात काय दोष आहेत ?  आपण कोठे आहोत ?  हे स्पष्टपणे समजले पाहिजे आणि दोष समजण्याची संधी फक्त एकान्तवासातच मिळते.  दोष समजल्यानंतर ते काढून टाकण्याचा जो प्रयत्न करतो तोच खरा साधक आहे.

 

३) आपण आपल्या मनाला सतत कोणत्यातरी विषयात गुंतवीत असतो, कारण थोडे शरीराने शांत बसले की मन उफाळून येते.  ते आपण सहन करू शकत नाही.  या मनाला सामोरे जाणे अत्यंत कठीण जाते.  जो स्वतःच्या मनाला सामोरे जातो तोच विश्वाला, जीवनातील सर्व प्रसंगांना अत्यंत सहजपणे सामोरे जाऊ शकतो.  हे अंतरिक सामर्थ्य येण्यासाठी एकान्तवासाची जरूरी आहे.  एकान्तवासात मनाला बाहेर कोठेही गुंतविता येत नाही.  तसेच विषयांचा, लोकांचा संपर्क नसल्यामुळे मनाने मनाला सामोरे गेले पाहिजे.  या अभ्यासाने मनाची अंतरिक शक्ति वाढते.  मन अंतर्मुख होते.  असे मन ईश्वरचिंतनामध्ये एकाग्र करता येते.  हे चिंतन, उपासना एकान्तवासामध्येच होते.  म्हणून एकान्तवास साधनेला पूरक आणि पोषक आहे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ


Tuesday, August 4, 2026

एकात्मक दृष्टि | Unitive View

 




सर्व तत्त्वज्ञानी पुरुषांच्यामध्येही श्रेष्ठ असणाऱ्या हे रामा !  अरे, हे नानाविध असणारे अनंत, अमर्याद असणारे हे संपूर्ण विश्व सन्मात्रच आहे हे तू जाणून घे.  विश्व म्हणजे चैतन्यच आहे.  विश्व नावाची वेगळी गोष्टच येथे अस्तित्वात नाही.  हीच पारमार्थिक दृष्टि आहे.  जो अज्ञानी जीव या पारमार्थिक दृष्टीने पाहत नाही, त्यालाच हे विश्व शेकडो-लाखो भ्रमांनी युक्त असल्यासारखे दिसते.  परंतु राघवा !  हे विश्व म्हणजे चैतन्याचा केवळ चमत्कार आहे.  याशिवाय अन्य काहीही नाही.  जसे प्रत्येकाला प्रत्येकाच्या संकल्पनगरीमध्ये भिन्न भिन्न नगरी दिसतात, तेथील व्यवहार दिसतात, त्याचप्रमाणे हे दृश्य विश्व म्हणजे केवळ कल्पनाविलास आहे.

 

ज्याप्रमाणे एका मनुष्याच्या मनामधील देशकाळांच्या कल्पनेला दुसऱ्या मनुष्याच्या मनामधील देशकाळ बाधा आणू शकत नाहीत, त्याप्रमाणे जीवांच्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना असल्यामुळे त्या त्या प्रमाणे अनेक सर्ग-सृष्टि उत्पन्न होतात.  त्या एकमेकांना बाधा करीत नाहीत.  प्रत्येकाची सृष्टि ही भिन्न भिन्न आहे.  तसेच हे रामा !  जग भिन्न, जगापासून मी भिन्न, माझ्यापासून ईश्वर भिन्न, या भेदबुद्धीमुळेच "हे जग, हा मी" असे भ्रम उत्पन्न होतात.

 

जसे सोन्याकडे सोन्याच्या दृष्टीने पाहिले नाही, तर त्यामध्ये अलंकारांचा भ्रम उत्पन्न होतो.  तसेच तत्त्वाची दृष्टि प्राप्त झाली नसेल तर अनेक भेद उत्पन्न होतात.  जसे अलंकारादींचे भ्रम हे सोन्यामध्ये होतात व अलंकारांना सत्ता सुद्धा सोन्यामुळेच मिळते.  मात्र भेददृष्टीचा त्याग केला तर तेथे केवळ सोने आणि सोनेच अनुभवायला येते.

 

त्याचप्रमाणे या जगाकडे भेददृष्टीने न पाहता तत्त्वाच्या दृष्टीने पाहिले तर समजते की, अविद्या ही कधीही आत्मतत्त्वापासून भिन्न नसते.  अलंकारादि महाभेद डोळ्यांना दिसले तरी त्यांच्यामध्ये एकच एक शुद्ध सोने आहे.  या ऐक्यबोधामुळे सद्रूप दिसणारे जगही असद्रूप होते.  म्हणजेच ते जग तात्त्विक दृष्टीने चैतन्यमयच होते.  जसे मातीची चित्रे मृण्मय असतात.  लाटा, तरंग वगैरे जलमय असतात.  लाकडाची मूर्ति म्हणजे लाकूडच असते.  घट व तत्सम वस्तु या मृण्मयच असतात.  त्याचप्रमाणे त्रैलोक्याचा हा भ्रम ब्रह्ममयच आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ