शंका: दर्पण-नगरी दृष्टांतात
म्हटल्याप्रमाणे आरशामध्ये नगरी भासमान आहे. याचाच अर्थ दर्पणामध्ये नगरीचा भास होण्यासाठी
आरशाच्या बाहेर नगरीची सत्ता असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भास होणार नाही. म्हणजेच दर्पणाच्या बाहेर नगरीची स्वतंत्र सत्ता
आहे. त्यावरून आपोआपच दोन सत्ता मानल्या
पाहिजेत. १) आरशाची सत्ता आणि २) नगरीची
सत्ता. याचप्रमाणे ब्रह्म अद्वय, अखंड, निर्विशेष वगैरे स्वरूपाचे आहे, हे कबूल. परंतु त्याच परब्रह्मामध्ये
द्रष्टादृश्यदर्शनात्मक विश्वाचा भास होत असेल, तर ब्रह्माशिवाय जगताची स्वतंत्र
सत्ता मानली पाहिजे. त्याशिवाय
ब्रह्मामध्ये जगदाभास निर्माण होणारच नाही. म्हणजेच - ब्रह्म सत्य आहे. परंतु जगदपि सत्यम्
| हेच सिद्ध होते.
परंतु ही शंका श्रुतिसंमत नाही. याचे कारण रज्जूच्या दृष्टीने सर्प नाहीच. रज्जूने कधीच सर्प निर्माण केलेला नसल्यामुळे
सर्पाचा सुद्धा भास नाही. मग रज्जूमध्ये सर्पाचा
भास कोण पाहातो ? जो रज्जू पाहात नाही तोच
अज्ञानी पुरुष सर्प पाहातो. त्याच्या
दृष्टीने सर्प आभासात्मक नसून सत्य आहे. म्हणूनच
तो साप, साप असे ओरडतो. त्याला फक्त सर्पच
दिसतो. रज्जू कधीच दिसत नाही. बाकीचे लोक सर्प पाहण्यासाठी येतात तेव्हा त्या
सर्वांना तेथे रज्जूच दिसतो. मग हा
सर्प आहे कोठे ? तो सर्प बाहेर नसून केवळ
सर्पभ्रमिष्ट पुरुषाच्या बुद्धीमध्ये झालेला भास आहे. तो आहे आतच परंतु दिसतो मात्र बाहेर.
थोडक्यात सर्पाचा भास अज्ञानावस्थेमध्येच
अनुभवाला येतो. रज्जुज्ञानामध्ये
प्रचीतीला येत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये
झालेला विश्वाचा भास हा अज्ञानावस्थेमध्येच आहे. परब्रह्माच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने पाहिले तर
विश्व नाहीच. फक्त अखंड, अद्वय परब्रह्मच आहे. ब्रह्म
हे निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विकार, निरुपाधिक असल्यामुळे परब्रह्माने
विश्वाची निर्मितीच केलेली नसल्यामुळे विश्वाचा भास होईलच कसा ? त्यामुळे परब्रह्माव्यतिरिक्त विश्वाचे स्वतंत्र
अस्तित्व सुद्धा कसे असेल ? यामुळे ही
शंकाच योग्य नाही. नव्हे, ही शंका
विश्वाला सत्यत्व देऊन निर्माण केलेली आहे. म्हणून ही शंका अज्ञानावस्थेमध्ये आहे. ज्ञानावस्थेमध्ये नाही. जर विश्व दिसत असेल तर ते कोण पाहातो ? अज्ञानीच आपल्या बुद्धीमध्ये पाहातो.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–