जसे एखादा कोळी जाळे विणतो, तसेच
प्रत्यक्ष परमात्मा शिव स्वेच्छेने स्वतः बद्ध होण्यासाठीच चित्ताच्या शक्तीने युक्त
होऊन कल्पनांचा विस्तार करतो. हे ब्रह्मन् ! जसे रेशमाचा किडा स्वतः कोष विणतो व स्वतःच त्यामध्ये
बद्ध होतो, त्याचप्रमाणे हे ब्रह्मन् ! शिवरूप
परमात्मा स्वेच्छेने स्वतःच स्वतःच्या स्वरूपाला विसरून बद्ध होतो. मात्र एखाद्या खांबाला बांधलेला हत्ती सुटावा, त्याप्रमाणे
स्वेच्छेने तो परमात्मा या संसारातून मुक्तही होतो.
आत्मा जशी-जशी भावना करतो, तसा तसाच
तो स्वतः होतो. त्याचप्रमाणे क्षणार्धात अतिशय शीघ्रतेने तो महान परमात्मा शक्तीने
युक्त होतो. पर्जन्यकाळी
ज्याप्रमाणे अनंत-अखिल असणारे आकाश मोठ्या धुक्याने व्यापले जाते, त्याचप्रमाणे जी-जी
कल्पनाशक्ति उदयाला येते, त्या शक्तीशी अत्यंत शीघ्रतेने अजस्वरूप आत्मा तन्मय-तद्रूप
होतो. ज्याप्रमाणे जो-जो ऋतु असतो, त्या-त्या
ऋतुनुसार वृक्ष त्या ऋतूशी तन्मय होतो, त्याचप्रमाणे आत्मा अनेक कल्पनाशक्तींशी तद्रूप
होतो.
वस्तुतः सर्वशक्तिमान असणाऱ्या आत्म्याला मोक्षही
नाही व बंधनही नाही. हे मुने ! खरोखरच बंधन
आणि मोक्ष या अत्यंत भ्रामक कल्पना जगामध्ये कोठून उत्पन्न झाल्या ? हेच मला कळत नाही. अज, अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी,
शांत, शिव, अद्वैत, अविकारी, निर्विकल्प, निरतिशय स्वरूपामध्ये 'बंधन' ही कल्पना नाही
व 'मोक्ष' ही सुद्धा कल्पना नाही. म्हणून ना
येथे बंधन आहे, ना येथे मोक्ष आहे ! त्यामुळे
ना येथे कोणी बद्ध आहे ! ना येथे कोणी मुक्त
आहे ! परंतु तरीही बंधन आणि मोक्ष या कल्पनांशी
जीव तादात्म्य पावतो आणि बद्ध होतो. काय हे
आश्चर्य आहे ! केवढा हा मायेचा प्रभाव
आहे. अनित्यने, अशाश्वताने, नित्य आत्मवस्तूला
ग्रस्त आणि त्रस्त करावे ! याला काय म्हणावे
?
हे मुने ! जेव्हा हे चित्त कल्पनांच्या तरंगांनी युक्त होते
त्यावेळी ते स्वतःभोवती असंख्य कल्पनांचे जाळे विणते आणि रेशमी किड्याप्रमाणे स्वतःच
स्वतःने निर्माण केलेल्या या कल्पनाजंजाळामध्ये फसून जाते. असे हे चित्तच खरे तर बंधनाचे मूळ कारण आहे. चित्तामधूनच चित्ताच्या अनेक शक्ति म्हणजे
कोट्यावधी कल्पना उगम पावतात. चित्ताची
शक्तीच अनेक शरीरांची व भिन्न-भिन्न रूपांची कल्पना करते. मगच चित्ताला हे नानाविध दृश्य विश्व दिसू लागते.
खरे तर ते दृश्य म्हणजे कल्पनाच आहे. परंतु चित्तच त्या कल्पनांना सत्यत्व देऊन त्यामध्ये
बद्ध होते.
- "योगवासिष्ठ" (चतुर्थ स्थिति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री
२०२४
- Reference: "Yogavashishtha"
(Part 4 “Sthiti”) by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st
Edition, Mahashivratri 2024
- हरी ॐ–

