Showing posts with label Sansar. Show all posts
Showing posts with label Sansar. Show all posts

Monday, May 27, 2024

अविचारामधून संसार | Manifestation is Illogical

 



हे रामा !  या विश्वाची निर्मिती अविचारामधून झालेली आहे. भीति, शोक, मोह यांनी युक्त असणारा हा संसार खरे तर रज्जुवरील सर्पाप्रमाणे अस्तित्वातच नाही.  परंतु तरीही अनुभवायला येत असेल तर त्याचे अविचार हेच एकमेव कारण आहे.  जसे दोरीचे अज्ञान असल्यामुळे मनुष्य दिसणाऱ्या सापामध्ये विचार न करताच तो साप खरा आहे, असे गृहीत धरतो.  त्यामुळे अविचारामधून सर्प निर्माण होतो.  तसेच आज आपणास अनुभवायला येणारा हा संसार, सुख-दुःखे, यातना यामध्ये विचार न केल्यामुळे संसाराची उत्पत्ति होते.  संसार सत्य भासतो.

 

या सर्वांना वास्तविक सत्ता नसून भासात्मक असणारी मनाच्या कल्पनेची सत्ता आहे.  जोपर्यंत मन आहे तोपर्यंत संसार आहे.  मनाचा लय झाला की, संसाराचा सुद्धा आपोआप लय होतो.  जसे गाढ निद्रावस्थेमध्ये मन लय पावल्यामुळे आपल्याला सुखदुःखादि संसाराचा लेशमात्रही अनुभव येत नाही.  परंतु मन जागृत झाल्यानंतर पुन्हा संसाराचा अनुभव येतो.  म्हणून संसाराचा नाश करावयाचा असेल तर मनामध्येच विचार करून शोध घेतला पाहिजे.

 

जसजसे आपण या मनाचा विचार करतो, तसतसे मनही नाहीसे होते.  कारण मन सुद्धा निर्मित कार्य असून नाशवान आहे.  'मन' ही एक वृत्ति किंवा कल्पना आहे.  जे मन आपल्याला अनेक विकार निर्माण करून त्रस्त करते, आयुष्यभर नाचविते, त्या मनाला साधकाने प्रश्न विचारावा की, हे मन आले कोठून ?  मनाचे उगमस्थान कोणते आहे ?  ही सर्व सुख-दुःखे, नैराश्य, उद्विग्नता, विक्षेप हे सर्व कोठून निर्माण झाले ?  याचा शोध घेत घेत आपण सखोल विचार करायला लागतो तर हे सर्व जादूसारखे नाहीसे होते.  संसाराचे, या कल्पनांचे अस्तित्व संपते. मन, सुखदुःखादि अनुभव, शोक-मोह या सर्व भ्रमाचा निरास होतो आणि या सर्वांचे अधिष्ठान असणारे आत्मचैतन्यस्वरूप फक्त शिल्लक राहते.

 

जन्मानुजनमे वर्धन केलेल्या संसाराचा नाश क्षणार्धात विचाररूपी शस्त्राने करता येतो.  म्हणून हे राघवा !  मायेपासून संरक्षण करण्यासाठी विचार हे एकमेव साधन आहे.  शास्त्रकार मायेची व्याख्या करतात - विचारं न सहते इति माया |  जिला विचार सहन होत नाही, म्हणजे विचारापुढे जिचे अस्तित्व टिकत नाही, तिला 'माया' असे म्हणतात.  म्हणून संसाररूपी निर्माण केलेली दीर्घ कल्पना, हा संसारवेताळ विचारानेच नष्ट होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–




Tuesday, October 24, 2023

संसाराची दलदल | The Swamp Of Illusion

 



प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्येच निरतिशय आनंदस्वरूप परमात्मा निवास करीत असेल तरी दुर्दैवाने सर्व जीव स्वस्वरूपाचा शुद्ध आनंद न अनुभवता फक्त दुःखकारक संसाराचाच अनुभव घेतात.  याला कारण स्वस्वरूपावर आलेले अज्ञान आणि अज्ञानजन्यकार्याचे आवरण होय.  ज्याप्रमाणे गाईच्या सडामध्ये अमृततुल्य दूध असते;  परंतु त्याच सडावर बसलेली गोचीड अमृततुल्य दूध न पिता रक्तच शोषत असते.  प्रकाशस्वरूप असलेल्या सूर्यावर आवृत्त झालेल्या कृष्णवर्णीय ढगाच्यामुळे सूर्य काळवंडलेला, तेजोहीन दिसतो.  तो ढगाच्या मागे असूनही त्याच्या स्वरूपाने अनुभवायला येत नाही.

 

त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नित्य, शाश्वत, निरतिशय सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृति होते.  नित्य काय ?  आणि अनित्य काय ?  हे कळत नाही.  या अविवेकामुळे सर्व जीव देहाशी तादात्म्य होतात.  यामधून त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्मस्वरूपाच्या विषयांच्याच उपभोगण्याच्या कामना निर्माण होतात.  खरे पाहाता त्यांची निरतिशय आनंद मिळावा हीच मूलभूत कामना असते;  परंतु निरतिशय आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न करता विषयभोगाची इच्छा करतात.  विषयभोगामधून ते निरतिशय आनंद मिळविण्याची इच्छा करतात.  परंतु सर्व विषय उपभोग घेऊनही त्यांना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळत नाही.  त्यांच्या सर्व कामना व्यर्थ, निष्फळच होतात.

 

येथे शंका येईल की आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न होता विषयांच्या इच्छा का निर्माण होतात ?  याचे उत्तर भगवान देतात – त्या सर्व अविवेकी लोकांनी राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो.  त्यांचे कोणतेही कर्म निःस्वार्थ, निष्काम आणि उदात्त भावाने नसल्यामुळे सर्व कर्मे व्यर्थच असल्यासारखी आहेत.  सकाम ज्ञानाने फक्त कामना आणि कर्मफळाची वासना अधिक वृद्धिंगत होते.  म्हणून त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ झाल्यासारखे होते.  रजोगुण आणि तमोगुणात्मक अविद्या मायेच्या प्राधान्यामुळे रज आणि तमोविकारांच्या आहारी जाऊन प्रकृतीचे गुलाम होतात आणि अधःपतित होतात.  ते संसारामध्येच संपूर्ण अडकतात.  यामुळे मी परमात्मा त्याच्या हृदयामध्ये निवास करून सुद्धा ते मला जाणत नाहीत.  ते मला प्राप्त न होता संसाराला प्राप्त होतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–




Tuesday, November 17, 2020

संसार म्हणजे काय ? | Meaning of “Sansaar”

 


सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाने त्या त्या प्रमाणे कर्म घडतात आणि मनुष्याला त्या कर्माप्रमाणेच फळ प्राप्त होते.  याप्रमाणेच तीन गुण, त्यांचे कार्य आणि फळ यांच्या समूहालाच ‘संसार’ असे म्हणतात.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे.  संसार हा प्रत्यक्ष बाहेर नसून आपल्या मनामध्येच आहे.

 

चित्तमेव हि संसारः तत्प्रयत्नेन शोधयेत् |

यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेतत्सनातनम् ||

आपले चित्त म्हणजेच संसार होय, कारण चित्तामधील प्रत्येक वृत्तीशी मर्त्य जीव तादात्म्य पावतो.  चित्तामध्ये जी जी वृत्ति निर्माण होईल, त्यानुरूप मनुष्याची प्रवृत्ति दिसते.  मनुष्य त्या गुणांच्या आहारी जातो.  मनामध्ये कर्तृत्वादि अहंकार निर्माण करून अनेक कर्मे करतो आणि भोक्तृत्व बुद्धीमुळे मी सुखी-मी दु:खी या कल्पना करवून घेतो.  मनानेच मनामध्ये हा रागद्वेषात्मक, सुखदु:खात्मक संसार निर्माण करतो.  श्रुति म्हणते – मनःस्पंदितम् इति |  हा सर्व संसार मनानेच कल्पित केलेला आहे.

 

भगवान गौडपादाचार्य म्हणतात – हे सर्व चराचरात्मक, द्वैतात्मक, दृश्य विश्व मनानेच निर्माण केलेले आहे.  मन आहे तोपर्यंतच संसार आहे.  ज्यावेळी मन अमनीभावाला प्राप्त होते, मनाचा लय होतो त्यावेळी या द्वैतप्रपंचाचाही निरास होतो.  

 

म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाला उपदेश करतात – निस्त्रैगुण्यो भवार्जुन | (गीता अ. २-४५)

हे अर्जुना ! हा सर्व संसार त्रिगुणात्मक असल्यामुळे हे तीन गुण जीवाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे संकल्प निर्माण करून त्याला कर्म-कर्मफळाच्या दुष्ट चक्रामध्ये बद्ध करतात.  म्हणून तू या त्रिगुणांच्याही अतीत हो.  म्हणजेच त्रिगुणांच्या आहारी जाऊ नकोस.  इंद्रियांच्यावर, मनावर संयमन करून त्यांना धर्माचरणामध्ये, ईश्वरचिंतनामध्ये रममाण करावे.  दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष करावा.  जीवन जगत असताना अंतरिक दृष्टि बदलावी.  हीच अंतरंग साधना आहे.  मनानेच मनामध्ये प्रयत्न करावेत आणि मनोकल्पित संसाराचा निरास करण्याचा प्रयत्न करावा.  

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–