Monday, July 18, 2022

विश्वनिर्मिती – माया प्रतिबिंबरूपेण | Creation – Source-Reflection Illusion

 



येथे आचार्य शब्द वापरतात – मायाप्रतिबिंबरूपेण |  बिंब-प्रतिबिंबवत् इति |  विश्वनिर्मिती ही बिंब आणि प्रतिबिंब याप्रमाणे होते.  बिंबस्थानीय सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  या दृष्टांताचा अभ्यास केला, मीमांसा केली की समजते की, बिंबस्थानीय सूर्य हा एक आहे.  सूर्य स्वतःच्या स्वरूपाने स्वयंप्रकाशस्वरूप असून तो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो.  दुसरा भाग – जोपर्यंत त्याला उपाधि मिळत नाही, तोपर्यंत त्याचे प्रतिबिंब पडत नाही आणि अनेक बादल्या ठेवल्या, भांडी ठेवली की, त्याचे प्रतिबिंब पडते.  बादली, भांडे, नदी, समुद्र, तळे, डबके, या सर्व उपाधींच्यामध्ये प्रतिबिंब पडते.

 

बादली ही एक बाहेरची स्थूल उपाधि आहे.  परंतु केवळ रिकाम्या बादलीमध्ये प्रतिबिंब पडत नाही, तर त्या बादलीमध्ये पाणी पाहिजे.  ज्यावेळी भांडयामध्ये पाणी घातले जाते, तेव्हा ते पाणी त्या त्या उपाधीचा आकार घेते.  नंतरच त्या पाण्यामध्ये बिंबस्थानीय सूर्याचे प्रतिबिंब पडते.  याठिकाणी उपाधि ही कोणाला आहे ?  बिंबाला उपाधि नाही, तर प्रतिबिंबाला उपाधि प्राप्त होऊ शकते.  उपाधि मिळाल्यानंतरच बिंबाचे प्रतिबिंब पडते.

 

नंतर ते प्रतिबिंब त्या उपाधीने मर्यादित, परिच्छिन्न होते.  बादलीचे आकार बदलतात, त्याप्रमाणे प्रतिबिंबांचे आकार सुद्धा बदलतात, म्हणजेच आकारमान, measurements बदलतात.  बादलीमधील पाणी जसजसे विकारयुक्त होईल, तसतसे प्रतिबिंब सुद्धा विकारी, अस्थिर होते.  बादलीमधील पाण्याचा रंग बदलला की, प्रतिबिंबांचा सुद्धा रंग बदलतो.  बादली उचलली आणि एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत हलविली की, प्रतिबिंब सुद्धा आपोआप त्या बादलीबरोबर जणु काही जाते.  म्हणजेच जसजशी उपाधि बदलते, तसतसे प्रतिबिंब सुद्धा बदलते, कारण प्रतिबिंब हे त्या उपाधीशी तादात्म्य पावलेले आहे.

 

म्हणून जोपर्यंत उपाधि आहे, तोपर्यंत प्रतिबिंब असते आणि बादलीमधील पाणी ओतून दिले, की आपण म्हणतो – “प्रतिबिंब गेले”.  वस्तुतः प्रतिबिंब कोठे गेले ?  याचा सूक्ष्म विचार केला, तर समजते की, प्रतिबिंब कोठे आले ही नाही आणि गेलेही नाही.  ‘आले’ हाही औपचारिक शब्द आहे आणि ‘गेले’ हाही औपचारिक शब्द आहे.  उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब आले आणि उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब गेले.


 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ