Showing posts with label Maya. Show all posts
Showing posts with label Maya. Show all posts

Tuesday, December 8, 2020

मायेचे आवरण व विक्षेपशक्ति | Veiling and Distortion by Maya

 



मायेला दोन प्रकारच्या शक्ति आहेत –

 

१) आवरणशक्ति – यामुळे स्वस्वरूपावर अज्ञानाचे आवरण येऊन, असूनही त्याची प्रचीति येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  जसे गडद अंधारात वस्तु असूनही दिसत नाही.  त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचे स्वस्वरूपावर आवरण आलेले आहे.  भगवान म्हणतात -

धूमेनाव्रियते वन्हिः यथादर्शो मलेन च |

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ||          (गीता अ. ३-३८)

ज्याप्रमाणे अग्नि धुराने झाकला जातो, आरसा धुळीने आणि गर्भ वारेने आवृत्त होतो, त्याप्रमाणे मायाशक्तीने स्वस्वरूपला आवृत्त केलेले आहे.  

 

२) विक्षेपशक्ति – यामुळे एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा भास होतो.  यालाच अन्यथाग्रहण अथवा विपरीतग्रहण असे म्हटले जाते.  जसे रज्जूच्या ठिकाणी रज्जू न दिसता सर्पाची प्रचीति येते.  त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची प्रचीति न येता दृश्य शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे देहात्मबुद्धि निर्माण होऊन अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं सुखी, अहं दुःखी, अहं जन्ममृत्युयुक्तः, अहं ब्राह्मणः, अहं वैश्यः या कल्पना निर्माण होतात.  ‘अहं’ भोवतीच्या या सर्व कल्पना मायेमुळेच उदयाला येतात.  वर्णाश्रम, धर्म, जात, सत्ता, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सौंदर्य या सर्वांचाच अभिमान वाटतो.  यालाच विपरीत दर्शन असे म्हणतात.  

 

मायेमुळे, अज्ञानामुळे या अहंकाराचे सतत पोषण होते; परंतु हीच माया जीवनात असे काही आघात करते की, त्यामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे असणाऱ्या या सर्व कल्पनांचा चक्काचूर होतो.  अहंकाराला तडा जातो.  फुगा खूप फुगविल्यावर जसा फुटतो तसेच अहंकार खूप वर्धन पावला तर त्याचा ही नाश होतो.  जीवनात अनेक संकटे, प्रतिबंध येतात.  मनावर आघात होतात.  हा मायेचाच खेळ आहे.  त्याचवेळी मनुष्य नम्र, विनयशील, अगतिक होतो.  त्याची परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होते.  त्यामुळे जीवनामध्ये संकटे अथवा प्रतिकूल परिस्थिति येणे ही मायेची कृपाच आहे, कारण सर्व सुरळीत, व्यवस्थित चालले असेल तर आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Tuesday, December 1, 2020

मायेचे पाच प्रतिबंध | Five Roadblocks to Realization

 


परब्रह्मस्वरूपावर त्रिगुणात्मक मायेचे आवरण आलेले आहे.  अशा या मायेला पार करणे अत्यंत कठीण आहे, कारण ही माया अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण करते.  

 

१) विषय हाच पहिला प्रतिबंध आहे.  मनुष्य सुखासाठी पूर्णतः विषयांच्यावरच अवलंबून राहातो.  विषयांच्यामध्येच आसक्त होऊन तो विषयांचा गुलाम होतो.  विषय त्याला बद्ध करतात.  मनुष्य या विषयांच्या आकर्षणामधून सुटू शकत नाही.

२) विषयांच्या उपभोगांचा त्याग केला तरी इंद्रिये स्वस्थ बसू देत नाहीत.  बुद्धिमान, विवेकी पुरुषांची इंद्रिये सुद्धा त्याच्या मनाला खेचून विशायांच्याकडे नेतात.  त्यावेळी सर्व तत्त्वज्ञान, विवेक संपतो व मनुष्य इंद्रियांच्या स्वभावाप्रमाणे स्वैर, उच्छृंखल वर्तन करतो.  

३) इंद्रियांच्यावर काही प्रमाणात संयमन केले, तरीही मन हा तिसरा प्रतिबंध आहे.  विषयांसाठी मन व्याकूळ होते.  विषय मिळाले नाहीत तर ते चिडखोर, क्रोधाविष्ट होते.  असे मन शास्त्रश्रवणामध्ये एकाग्र, तल्लीन, तन्मय होऊ शकत नाही.  नव्हे शास्त्रश्रवणासाठी मन उपलब्धच होत नाही.  

४) विषयांचे आकर्षण कमी केले, इंद्रिये व मन यांचे काही प्रमाणात नियमन केले, तरीही अंतःकरणामध्ये विषयांच्या सूक्ष्म भोगवासना असतात.  वरवरच्या स्थूल कामना गळून पडल्या की, या सूक्ष्म भोगवासना उफाळून बाहेर येतात.  संकल्प निर्माण करतात.  मनाला अस्वस्थ, व्याकूळ करतात आणि पुन्हा विषयभोगामध्येच प्रवृत्त करतात.  

५) या सर्व प्रतिबंधांना पार केले तरी सर्वात शेवटचा प्रतिबंध म्हणजे ‘अहंकार’ होय.  ज्ञानग्रहण करण्यामध्ये अहंकार आणि अहंकारामधून निर्माण झालेल्या कल्पना हा फार मोठा प्रतिबंध आहे.  त्यामुळे ज्ञान घेत असताना सतत द्वंद्व निर्माण होऊन ज्ञान आत्मसात होत नाही.  अहंकार मनुष्याला समर्पण होऊ देत नाही.

 

मायेने निर्माण केलेल्या अशा प्रतिबंधांच्यामुळे आपल्याजवळच तो आनंदाचा सागर असूनही आपल्याला त्याची प्रचीति येऊ शकत नाही.  अशी योगमाया अत्यंत सामर्थ्यशाली असून ती मोहजाल पसरते.  अनेक युक्त्या करते.  अनेक प्रकारांनी जीवांना भुलविते, खेळविते, नाचविते, नजरबंदी करते.  कोणालाही परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही.  जणु काही ती माया सर्व जीवांची परीक्षा घेते.  परमेश्वरच त्या मायेला परीक्षा घेण्याची आज्ञा देतो.  

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Wednesday, December 18, 2019

मायेची प्रबलता | The Power of ‘Maya’ – Illusion





शास्त्रकार मायेची व्याख्या करतात – अघटितघटना पटीयसी माया |  जे अशक्य आहे, ते शक्य करण्याची शक्ति मायेमध्ये आहे.  जसे जादुगार जादूचे प्रयोग करीत असताना प्रेक्षकांना जे नाही ते काढून दाखवितो व जे खरोखरच आहे, ते डोळ्यांना दिसत नाही.  तशीच मायेची अलौकिक शक्ति आहे.  मायाच विश्वनिर्मिती करते.  मायाच सर्व जीवांची निर्मिती करून जीवांना जन्मानुजन्मे आपल्या चक्रामध्ये बद्ध करते.  

पुराणामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे.  नारदमहर्षि एकदा भगवंतांना मायेविषयी प्रश्न विचारतात. “माया ही अलौकिक, अनाकलनीय, दुस्तर आहे.  मोठमोठे ज्ञानी लोकही मायामोहीत होतात.  मी तर आपला अनन्य भक्त आहे.  त्यामुळे मला माया कधी दिसलीच नाही. पण मला मायेचे स्वरूप समजावून घेण्याची इच्छा आहे.”  यावर भगवान गूढ हसतात.  

एकदा नारदमहर्षि एका नदीमधून पाणी आणण्यास जातात.  पाण्याचा स्पर्श होताक्षणीच त्यांना एकदम सुंदर स्त्रीरूप प्राप्त होते.  तिथे समोर एक सुरूप राजा त्या स्त्रीरूप नारदांना दिसतो.  दोघांचा विवाह होतो.  संसार प्रारंभ होतो.  सर्वसामान्य संसारी माणसाप्रमाणेच त्यांना मुले होतात.  संसार वाढतो.  स्त्रीरूपामधील नारदमहर्षि सर्व गृहोचित कर्मे करण्यात गढून जातात.  पती-मुले-आप्त-भोग-नातू या सर्वांच्यामध्ये आसक्त होऊन रममाण होतात.  यामध्ये किती वर्षांचा काळ लोटला, हेही समजत नाही.  एकदा अचानक त्या राजाच्या राज्यावर शत्रू आक्रमण करतात.  राजाचा पराभव होतो.  राजाची सर्व मुले युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त होतात.  त्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी स्त्रीरूपातील नारदमुनि त्याच नदीच्या काठी येतात.  पाण्याचा स्पर्श होतो.  तत्क्षणी नारदांना पुन्हा पूर्ववत् पुरुषाचे, नारदमुनींचे रूप प्राप्त होते.  इथेच कथा संपते.  

हा सर्व प्रकार पाहून नारदांना आश्चर्य वाटते.  समोर भगवान उभे असतात.  नारदमहर्षि प्रश्न विचारतात – प्रभो !  हे सर्व काय आहे ?  भगवान हसून उत्तर देतात, “नारदा !  ही सर्व माया आहे.  हा सर्व मायेचा प्रभाव आहे.”  नारदांना समजायचे ते समजते.  म्हणुनच आचार्य आदेश देतात – ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा |  हे मूढबुद्धि मनुष्या !  हे सर्व मायाजन्य, मायाकार्य, अनित्य आहे, असे जाणून तू ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश कर.  बाह्य, मायिक विषयांच्या आसक्तीमधून तू पूर्णतः निवृत्त हो, याचे कारण मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Saturday, March 7, 2015

विश्वनिर्मितीचे कारण | Cause of Creation of World


जसे, अग्नीमधून ठिणग्यांची निर्मिती होते, त्याचप्रमाणे अक्षरब्रह्मामधून विश्वाची निर्मिती होते.  कारणं विना कार्यं न सिध्यति |  कारणाशिवाय कार्याची निर्मिती होऊच शकत नाही.  जेथे जेथे कार्य आहे, तेथे तेथे कारण हे असलेच पाहिजे.  तुम्हाला दिसो किंवा न दिसो, समजो किंवा न समजो, कारण हे आहेच.

साधा घट असेल, तर त्याच्यामागे माती आणि कुंभार आहे.  कुंभार जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसेल, तरी आपण मान्य करतो की, घट निर्माण करण्यासाठी कोणीतरी निर्माता-कारण हे असलेच पाहिजे.  तसेच हे जगड्व्याळ विश्व जर निर्माण झाले असेल, तर त्याच्यामागे काहीतरी कारण हे आहेच आणि तेच कारण याठिकाणी श्रुति सांगते की, अक्षरस्वरूप परब्रह्म हेच जगत्कारण आहे.

दृष्टांताप्रमाणे जर क्रमाने पाहिले तर समजते की, अव्यक्त अग्नीमधून निर्मिती होत नाही, तर सविशेष, सोपाधिक अग्नीमधून ठिणग्या निर्माण होतात. तसेच, याठिकाणी अव्यक्त, निर्गुण, निर्विशेष अक्षरामधून एकदम विश्वाची निर्मिती होऊ शकत नाही, कारण – उपादानकारणअभावात्| निर्मितीसाठी दोन करणे आवश्यक आहेत.  निमित्तकारण म्हणजेच कर्ता आणि उपादानकारण म्हणजेच सामग्री होय.  म्हणजेच घटनिर्मितीसाठी माती पाहिजे आणि कुंभार सुद्धा पाहिजे.

तसेच, विश्वनिर्मितीसाठी सचेतन कर्ता तसेच सामग्री म्हणजेच उपादानकारण आवश्यक आहे.  निर्गुण, निर्विशेष परब्रह्म निर्मिती करू शकत नाही, कारण – अविकारीस्वरुपत्वात् |  त्या स्वरूपामध्ये कोणताही विकार, बदल होऊ शकत नाही.  अक्षरस्वरुपापासून विश्व निर्माण व्हावयाचे असेल, तर परब्रह्म सगुण, साकार, सोपाधिक होणे आवश्यक आहे.  निर्गुण, निर्विशेष परब्रह्माला माया ही उपाधि प्राप्त झाल्यावर ते सगुण, सविशेष, सोपाधिक होते.  त्यालाच ‘मायाशबलब्रह्म’ असे म्हणतात. त्या सगुण, सविशेष परब्रह्मामधून संपूर्ण विश्वाची निर्मिती होते.

- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ