हे रामा ! जोपर्यंत मी कोण आहे ? हे सर्व काय आहे ? याचा जीव विचार करीत नाही, तोपर्यंत घनदाट अंधाराप्रमाणे
असणारे हे संसाराचे आडंबर अस्तित्वात राहते. यथार्थ विचाराशिवाय संसारभ्रम नष्ट होत नाही. मात्र जो या संसारामध्ये, दृश्यामध्ये
विचार करतो, त्याच्या मनामधील भ्रामक कल्पना क्रमाने नष्ट होऊ लागतात.
हे दिसणारे शरीरही मिथ्या भ्रमामधूनच उत्पन्न
झालेले असून त्या शरीराद्वारे जीवावर कितीतरी संकटे येऊन कोसळतात. शरीराच्या अनुषंगाने
जीव आयुष्यभर अनंत दुःखे अनुभवतो. परंतु जो
ज्ञानी पुरुष ब्रह्मात्मैक्यबोधाने "मी ते ब्रह्मस्वरूप आहे" अशी आत्मभावना
निर्माण करून दृश्य, कल्पित, मिथ्या देहाचा निरास करतो, त्यालाच खऱ्या अर्थाने आत्मदर्शन
होते. तोच खरे तत्त्व पाहतो. इतकेच नव्हे,
तर हे राघवा ! देश, काळ यांना वश होऊन निर्माण
होणारी सर्व सुखदुःखे ही केवळ दृश्य शरीराची आहेत. ती निश्चितच आत्मस्वरूपाची नाहीत, असे ज्याला ज्ञान
होते त्याचा संसारभ्रम पूर्णतः नष्ट होतो. तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
दिशा, काळ, चलनवलनादि क्रिया, यांनी युक्त असणारे
आकाश हे अपार व अनंत आहे. अशा अनंत दिशा,
काळ, क्रियांनी युक्त असणारे आकाश म्हणजेच 'मी' आहे, याप्रमाणे जो स्वतःला निर्लिप्त आकाशाप्रमाणे जाणतो,
तोच उत्तम द्रष्टा आहे. आत्मचैतन्य
हे केसाच्या अग्रभागाच्या लक्षांशाच्या कोट्यांशापेक्षा सूक्ष्म असून 'मी-आत्मा' सर्वव्यापी
आहे, असे जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
म्हणजे "आत्मचैतन्य हे सूक्ष्मातिसूक्ष्म
व सर्वव्यापी असून ते चैतन्य हेच माझे प्रत्यगात्मस्वरूप आहे" असे जो जाणतो तोच
खऱ्या अर्थाने तत्त्व पाहतो. जो स्वतःला व
दुसऱ्यांना सुद्धा नित्य व अभिन्न स्वरूपाने पाहतो, सर्वच जीव चैतन्यज्योतिस्वरूप आहेत,
असे जो पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो. सर्वशक्तिस्वरूप, अनंतस्वरूप, सर्व पदार्थांच्यामध्ये
अंतर्यामी स्वरूपाने राहणारे अद्वितीय चैतन्य जो आपल्या अंतःकरणामध्ये स्वस्वरूपाने
पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
या सर्व श्लोकांच्यामधून श्रीवसिष्ठ मुनींनी
ज्ञाननिष्ठ पुरुषाचे यथार्थ वर्णन केले आहे. सर्वत्र, सदासर्वदा हे दृश्य ब्रह्ममय पाहणे,
हा ज्ञानी पुरुषाचा स्वभावच बनतो. त्यामुळे
या दृश्यापासून ज्ञानी पुरुष अलिप्त, अस्पर्शित राहतो. त्यामुळे तो ज्ञानी पुरुष शांत-शिव-अद्वय-केवल-अत्यंत
निर्लिप्त असणाऱ्या भगवान शिवांशी एकरूप होतो. स्वतः श्रीवसिष्ठ मुनि अशा या शिवरूप महात्म्याला
नम्रतापूर्वक वंदन करीत आहेत.
- "योगवासिष्ठ" (चतुर्थ स्थिति प्रकरण) या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, महाशिवरात्री
२०२४
- Reference: "Yogavashishtha"
(Part 4 “Sthiti”) by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st
Edition, Mahashivratri 2024
- हरी ॐ–

