Tuesday, December 8, 2020

मायेचे आवरण व विक्षेपशक्ति | Veiling and Distortion by Maya

 



मायेला दोन प्रकारच्या शक्ति आहेत –

 

१) आवरणशक्ति – यामुळे स्वस्वरूपावर अज्ञानाचे आवरण येऊन, असूनही त्याची प्रचीति येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  जसे गडद अंधारात वस्तु असूनही दिसत नाही.  त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचे स्वस्वरूपावर आवरण आलेले आहे.  भगवान म्हणतात -

धूमेनाव्रियते वन्हिः यथादर्शो मलेन च |

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ||          (गीता अ. ३-३८)

ज्याप्रमाणे अग्नि धुराने झाकला जातो, आरसा धुळीने आणि गर्भ वारेने आवृत्त होतो, त्याप्रमाणे मायाशक्तीने स्वस्वरूपला आवृत्त केलेले आहे.  

 

२) विक्षेपशक्ति – यामुळे एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा भास होतो.  यालाच अन्यथाग्रहण अथवा विपरीतग्रहण असे म्हटले जाते.  जसे रज्जूच्या ठिकाणी रज्जू न दिसता सर्पाची प्रचीति येते.  त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची प्रचीति न येता दृश्य शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे देहात्मबुद्धि निर्माण होऊन अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं सुखी, अहं दुःखी, अहं जन्ममृत्युयुक्तः, अहं ब्राह्मणः, अहं वैश्यः या कल्पना निर्माण होतात.  ‘अहं’ भोवतीच्या या सर्व कल्पना मायेमुळेच उदयाला येतात.  वर्णाश्रम, धर्म, जात, सत्ता, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सौंदर्य या सर्वांचाच अभिमान वाटतो.  यालाच विपरीत दर्शन असे म्हणतात.  

 

मायेमुळे, अज्ञानामुळे या अहंकाराचे सतत पोषण होते; परंतु हीच माया जीवनात असे काही आघात करते की, त्यामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे असणाऱ्या या सर्व कल्पनांचा चक्काचूर होतो.  अहंकाराला तडा जातो.  फुगा खूप फुगविल्यावर जसा फुटतो तसेच अहंकार खूप वर्धन पावला तर त्याचा ही नाश होतो.  जीवनात अनेक संकटे, प्रतिबंध येतात.  मनावर आघात होतात.  हा मायेचाच खेळ आहे.  त्याचवेळी मनुष्य नम्र, विनयशील, अगतिक होतो.  त्याची परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होते.  त्यामुळे जीवनामध्ये संकटे अथवा प्रतिकूल परिस्थिति येणे ही मायेची कृपाच आहे, कारण सर्व सुरळीत, व्यवस्थित चालले असेल तर आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ