Tuesday, September 29, 2026

आत्म्याचे अद्वयत्व | Non-Duality Of Self

 




अरे रामा !  तू स्वतःच अत्यंत शुद्ध, स्वच्छ, सर्वव्यापी व सर्वत्र स्फुरण पावणारा आहेस.  त्यामुळे हे रामा !  तुझ्यामध्ये कुठली आली आहेत सुख-दुःखे ?  किंवा तुझ्यामध्ये जन्म-मरण तरी कसे असू शकेल ?  तुला कोणी बंधूच नसल्यामुळे तुला बांधवांच्यापासून दुःख तरी कसे काय मिळेल ?  दुःखच नसेल तर तुझ्या शोकाचे कारण काय ?

 

आत्म्याव्यतिरिक्त दुसरी वस्तुच अस्तित्वात नसल्यामुळे अशा या अद्वितीय आत्म्यामध्ये तुला कोण बरे बांधव असणार ?  आणि तुला हे देह दिसून त्यांना तू बांधव म्हणत असशील तर रामा !  ते देह म्हणजे केवळ परमाणूंचे रचलेले ढीग आहेत !  ते देशकालांनी बद्ध आहेत.  त्यामुळे देहरूपी परमाणूंचे हे ढीग अनेक वेळेला उत्पन्न होतात व नाश पावतात.

 

परंतु आत्मा मात्र उत्पन्नही होत नाही अथवा नाशही पावत नाही.  याप्रमाणे आत्मा अविनाशी असताना "माझा मृत्यु होईल" असा शोक तू का बरे करतोस ?  मृत्युरहित, स्वच्छ, निर्मल असणाऱ्या आत्म्यामध्ये 'विनाश' ही गोष्टच संभवत नाही.  जसे मातीचा घट फुटला तरी त्याच्या आतील घटाकाश फुटत नाही.  त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही.

 

हे रामा !  जसे मृगजळाची नदी सुकून गेली तरी सूर्यप्रकाश नष्ट होत नाही.  त्याचप्रमाणे देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही.  अरे रामा !  भ्रांतिरूप व अत्यंत निरर्थक असणारी वासना तुझ्यामध्ये उत्पन्नच कशी काय होते ?  कोणतीही इच्छा ही अत्यंत भ्रममूलक आहे.  अद्वय आत्म्याव्यतिरिक्त येथे दुसरी वस्तु अस्तित्वातच नाही.  असे असताना हा अद्वय आत्मा दुसऱ्या कोणत्या वस्तूची इच्छा करू शकेल ?  कारण येथे या जगात आत्म्याव्यतिरिक्त किंचित् सुद्धा वस्तु अस्तित्वात नाही.

 

आत्म्याशिवाय दुसरे काही श्राव्य (ऐकण्यासारखे), स्पृश्य (स्पर्श करण्यासारखे), दृश्य (पाहण्यासारखे), रस्य (चव घेण्यासारखे), घ्रेय (गंधग्रहण करण्यासारखे) नाही.  हे रामा !  जे ऐकावे, ज्याला स्पर्श करावा, जे पाहावे, ज्याचा अस्वाद घ्यावा किंवा ज्याचा गंध ग्रहण करावा, अशी दुसरी वस्तुच येथे नाही.  आकाशामध्ये जशी शून्यता असावी, त्याप्रमाणे सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, अव्यक्त असणाऱ्या आत्म्यामध्येच या सर्व शक्ति स्थित आहेत.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–



Tuesday, September 22, 2026

एकांतवास | Solitude

 




साधकाने एकांतवास करावा.  जे स्थान स्वभावतःच पवित्र, शुद्ध असेल किंवा संस्काराने शुद्ध केलेले असेल, झाडून, पुसून स्वच्छ केलेले असेल तसेच जे स्थान सर्पव्याघ्रादिरहित आहे, अशा शुद्ध, स्वस्थ, निर्भय स्थानी जावे.  अरण्य, नदीकाठ, मंदिर, आश्रम, पर्वत, गुहा वगैरेदि एकांतस्थाने आहेत.  आज आपण बाह्य विषय, व्यक्ति, अन्य जवळचे लोक यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मनामध्ये सतत त्यांचेच विचार येतात.  एकांतवासात गेल्यामुळे प्रथम विषय आणि व्यक्तींचा संपर्क एकदम कमी होतो.  रागद्वेषांचा प्रभाव कमी होतो.  यामुळे मन काही प्रमाणात विषयांच्यामधून, प्रसंगांच्यामधून निवृत्त होण्यास मदत होते.

 

दुसरी गोष्ट म्हणजे एकांतवासात गेल्यामुळे त्या स्थानमाहात्म्याच्या प्रभावाने आपल्या मनामध्येही बदल होऊन मन काही प्रमाणात शुद्ध, पवित्र, सात्त्विक होते.  मनामधील वाईट वृत्ति नाहीशा होऊन मन प्रसन्न, अंतर्मुख होऊन ज्ञानसाधनेमध्ये अधिक एकाग्र होते.  तिसरी गोष्ट म्हणजे - दैनंदिन जीवन जगत असताना आपण सतत आपले मन कोठेतरी गुंतविण्याचा प्रयत्न करीत असतो.  एखादा छंद, काम, व्यक्ति, प्रसंग आणि काहीच नसेल तर, दूरदर्शन (T.V.) यामध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवतो.  परंतु एकांतवासामध्ये मन गुंतविण्यासाठी अन्य साधनच उपलब्ध नसते.  तरीही आपण जगू शकतो, हे एकांतवासातच आपल्याला समजते.  त्यामुळे मनाची 'dependence' ही वृत्ति कमी होते.  त्याचवेळी मन पूर्णतः एकाग्र होते.  साधनेसाठी पूर्णपणे उपलब्ध होते.

 

चवथी गोष्ट एकांतवास म्हणजे आत्मनिरीक्षण करण्याची फार मोठी संधी आहे.  व्यवहारामध्ये राहून आपले मन कधीही उपलब्ध होत नाही.  परंतु एकांतामध्ये अन्य विषय, वस्तु, व्यक्ति नसल्यामुळे आपण एकटे बसलो की, एका क्षणात आपण अस्वस्थ होतो.  आपण आपल्या मनाला सामोरे जाऊ शकत नाही.  आपले मन काय आहे, हे आपणास एकांतवासामध्येच समजते.  You have to face your own mind.  यामुळे एकांतवासामध्येच मनाची ताकद, शक्ति, सामर्थ्य वाढते.  अशा प्रकारे एकांतवासामध्येच आपल्या मनामधील विषयासक्ति, कामना, चिंता, विवंचना, रागद्वेषादि दोष, कामक्रोधादि विकार कमी होऊन आत्मनिरीक्षण केले जाते.  आत्मपरीक्षणाच्या साधनेमुळे मन अत्यंत शांत, प्रगल्भ (mature) विकाररहित, अंतर्मुख होऊन ज्ञानसाधनेसाठी योग्य, अनुकूल, अधिकारी होते.  म्हणून साधकाने एकांतवास करावा.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–



Tuesday, September 15, 2026

ज्ञान आणि सदाचार - परस्पर वर्धन | Knowledge & Virtue Reinforcement

 



सत्पुरुषांच्या सदाचारापासून ज्ञान उत्पन्न होते.  तर ज्ञानापासून सदाचार उत्पन्न होतो.  याप्रमाणे ज्ञान आणि सदाचार हेही शमादि गुणांच्याप्रमाणेच परस्परांना वर्धन करणारे आहेत.  म्हणून बुद्धिमान विवेकी पुरुषाने शमादि गुणांचा अभ्यास करून आपली बुद्धी विकसित करावी आणि सत्पुरुषांचे असणारे सर्व सदाचार म्हणजेच आचारधर्म आत्मसात करावेत.  यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.  साधकाने संकल्प करून सदाचारपरायण व्हावे.  कारण या गुणांच्या अभ्यासाशिवाय साधकाला ज्ञानही प्राप्त होत नाही आणि सद्गुणही प्राप्त होत नाहीत.

 

मनुष्याचे व्यावहारिक जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो, सदाचाराला अतिशय महत्त्व आहे.  सदाचार हा आपल्या जीवनाचा पाया आहे.  ज्याप्रमाणे कोणत्याही सुंदर इमारतीचा पाया हा भक्कम असावा लागतो, तसेच मनुष्याच्या जीवनामध्ये सदाचार, संस्कार, आचारधर्म, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये असतील तर त्याचे जीवन उध्वस्त होऊ शकत नाही.  जीवनाच्या मोठमोठ्या संघर्षामध्येही केवळ सदाचार आणि आचारधर्मच मनुष्याचे रक्षण करतो.  मनुष्याचे जीवन विकसित, सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्हावयाचे असेल तर प्रथम प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदाचाराचे अनुष्ठान नितांत आवश्यक आहे.  एक वेळेस अवघड अवघड शब्दज्ञान समजले नाही तरी चालेल, परंतु सदाचार मात्र आवश्यक आहे, मनुष्याने मनुष्यासारखे वागणे गरजेचे आहे.

 

मनुष्याच्या अंतःकारणामध्ये सदाचार उदयाला आला तरच येथे आत्मज्ञान सुप्रतिष्ठित होऊन सुस्थिर होऊ शकते.  मात्र त्यासाठी साधकाच्या मनामध्ये प्रथम सदाचाराचा संकल्प हवा.  संकल्पाशिवाय साधना घडू शकत नाही.  साधनेला, मनुष्याच्या प्रयत्नांना संकल्पाचे सामर्थ्य मिळाले पाहिजे.  म्हणून वसिष्ठ मुनि येथे अत्यंत तळमळीने सदाचाराचे महत्त्व सांगतात.  हे रामा !  साधकाने आत्मज्ञान तर प्राप्त करावेच पण त्याचबरोबर शमादि गुणही प्राप्त करावेत.  किंवा शमादि गुण प्राप्त करता-करता आत्मज्ञान प्राप्त करावे.  या दोन्हीही गोष्टी सहज शक्य आहेत.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–




Tuesday, September 8, 2026

कल्पित पदार्थांचे कारण | Root Cause Of Imagined Objects

 



स्वप्नामध्ये अपूर्व पदार्थ हे स्थानीचा अपूर्व धर्म आहे.  स्थानी म्हणजेच स्वप्नस्थानामधील स्वप्नद्रष्टा पुरुष होय.  स्वप्नद्रष्टा पुरुष स्वप्नामध्ये जे जे काही अपूर्व पाहतो, ते सर्व त्या स्वप्नद्रष्ट्याचेच धर्म असतात.  ते अपूर्व पदार्थ स्वयंसिद्ध नसून स्वप्नपुरुषाचेच धर्म असतात.  हे समजण्यासाठी आचार्य येथे दृष्टांत देत आहेत.

 

ज्याप्रमाणे, स्वर्गामध्ये राहणाऱ्या इंद्राला हजार डोळे असणे, हा त्याचा धर्म आहे.  स्थानमहात्म्यामुळे इंद्राला सहस्राक्षत्वादि धर्म प्राप्त होतात.  त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्ट्याला सुद्धा कधी-कधी अपूर्व विषय पाहण्याचे अपूर्व सामर्थ्य प्राप्त होते.  यामुळे स्वप्नद्रष्टा काही वेळेला स्वप्नामध्ये आपल्याच मनामधील विकल्पांना, कल्पनांना अपूर्व दृश्याच्या रूपामध्ये पाहतो.  हा अपूर्व धर्म स्वप्नद्रष्ट्याच्या स्वस्वरूपाप्रमाणे स्वतःसिद्ध नाही, तर स्वप्नपुरुष स्वप्नामध्ये आपल्या मनामधील वासनारूपी सूक्ष्मसंस्कार अपूर्व दृश्यरूपाने पाहतो.  हे तर सहज स्पष्ट आहे.  यामध्ये काही आश्चर्य नाही.

 

ज्याप्रमाणे एखादा सुशिक्षित मनुष्य देशदेशांतराचे मार्ग समजावून घेऊन भिन्न-भिन्न देशांना, स्थानांच्यामध्ये जाऊन तेथे विशिष्ट असे पदार्थ पाहतो, त्याचप्रमाणे स्वप्नद्रष्टा पुरुष सुद्धा स्वप्नामध्ये जाऊन तेथे अपूर्व, विशिष्ट पदार्थ पाहतो.  स्वप्नविश्व हे वासनामय विश्व आहे.

 

म्हणूनच विशेष स्थानामध्ये म्हणजेच जागृतावस्थेत रज्जुसर्प, मृगजळ इत्यादि अनेक पदार्थ जागृत पुरुषाला दिसत असूनही ते मिथ्या, असत् असतात.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्नपुरुषाला दिसणारे दृश्य पदार्थही असत् असतात.  जसे जागृतावस्थेत दोरीवर साप दिसतो, वाळूच्या जमिनीवर पाणी दिसते.  यामध्ये साप हा बाहेर कोठे दिसत नसून दोरी या अधिष्ठानामध्येच दिसतो.  पाणी हे जमिनीच्या अधिष्ठानावरच दिसते.  म्हणून येथे अधिष्ठानभूत दोरी किंवा पाणी हेच सत्य असून दिसणारा सर्प व मृगजळ हे मिथ्या आहेत.  त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये दिसणारे सर्व दृश्य पदार्थ हे स्वप्नाचे अधिष्ठान असणाऱ्या स्वप्नद्रष्ट्याचे-स्थानीचे धर्म आहेत.  अधिष्ठानभूत स्वप्नद्रष्टा हा सत्य असून स्वप्नात दिसणारे सर्व स्वप्नदृश्य पदार्थ मात्र अध्यस्त, भासमान, रज्जुसर्पाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे कल्पित-मिथ्या-असत् स्वरूपाचे आहेत.

 

 

- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ–




Tuesday, September 1, 2026

चित्ताच्या अतीत | Beyond Mind And Thought

 



ज्यावेळी हे चित्त एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जात असते, त्यावेळी एक विषयवृत्ति संपून चित्तामध्ये दुसरी विषयवृत्ति उत्पन्न होत असते.  त्या दोन वृत्तींच्यामधील चित्त हे शांत, वृत्तिरहित असते.  ती चित्ताची अवस्था म्हणजेच चैतन्य असून हे राघवा !  त्याच स्थितीमध्ये तू सदैव तन्मय हो.  जेथे जागृतावस्था नाही, स्वप्न नाही अथवा निद्राही नाही, असे जे या अवस्थांच्याही अतीत असणारे सनातन निर्विषयक परमात्मस्वरूप आहे, ते चेतन नाही व जडही नाही, अशा परमात्मस्वरूपाशी तू तन्मय हो.  एखाद्या दगडामध्ये जी जडता असते, त्या जडतेचा त्याग केल्यावर जी निश्चल स्थिति राहते, तशा निश्चल स्थितीमध्ये तू सदैव राहा !  एखाद्या वेळी तू काही व्यवहार करीत असशील किंवा काही वेळेस क्रियारहित होऊन शांत, अक्षुब्ध होऊन बसशील, अशा दोन्हीही क्रिया व अक्रिया यांच्यामध्ये तू अत्यंत स्थिर-निश्चल-कूटस्थ असणाऱ्या परमात्मस्वरूपाशीच तन्मय हो.

 

हे राघवा !  अशी सहजस्थिति प्राप्त झाल्यानंतर तू शरीराने अनेक प्रकारची कर्मे करीत असशील किंवा व्यवहाररहित होऊन शांत बसला असशील, तरीही तू त्या सहजावस्थेमध्ये सुखाने राहा.  कारण याप्रकारे स्वरूपनिष्ठ झालेला ज्ञानी कशाचीही इच्छा करीत नाही.  तो केव्हाही कोणाचाही थोडा देखील द्वेष करीत नाही.  राघवा !  हीच अत्यंत परिपूर्ण व श्रेष्ठ स्थिति आहे.  या आत्मस्थितीमध्ये तू निःशंक होऊन स्वस्थ राहा.  देहबुद्धि धारण करू नकोस.  देहाशी तादात्म्य पावून देहवृत्तींच्यामध्ये पडू नकोस.

 

ज्याप्रमाणे अज्ञानी लोक भविष्याचे चित्रण करून अनेक कार्यांच्यामध्ये प्रवृत्त होतात, त्याप्रमाणे हे रामा !  तू या चित्तवृत्तींच्यामध्ये यत्किंचित् देखील व्यग्र होऊ नकोस.  तेर उलट तू सत्यस्वरूप आत्मचैतन्यामध्ये स्थिर हो.  जसे दूर स्थानामध्ये असलेला मनुष्य आपल्यासाठी लाकूड किंवा दगडाप्रमाणेच असून त्याचा आपल्याला काहीही उपयोग नसतो, तसेच तू या चित्ताकडे पाहा.  एकदा तू आत्मस्वरूपामध्ये स्थिर व दृढ झालास की, तू चित्तरहित होशील.  मग तू चित्ताशी तादात्म्य पावणार नाहीस.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे दगडामध्ये पाणी नसते, पाण्यामध्ये अग्नि नसतो, त्याचप्रमाणे तुझ्यामध्ये - या जीवात्म्यामध्ये चित्ताची वास्तविक सत्ता नसतेच.  मग सांग रामा !  जीवात्म्यामध्येच चित्त नसेल तर परमात्म्यामध्ये कोठून असणार ?  अर्थात परमात्म्यामध्ये चित्त अस्तित्वातच नाही.  त्यामुळे जे चित्त मुळात अस्तित्वातच नाही, त्या चित्ताने काही पाहिले असेल किंवा काही क्रिया केल्या असतील तर त्या सर्व क्रिया करूनही न केल्यासारख्याच आहेत, असा तू सतत विचार कर.  कारण पुन्हा पुन्हा केलेल्या या विचारानेच जीव चित्ताच्या अतीत जाऊ शकतो.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–