Tuesday, July 7, 2026

ज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Knowledge

 



आत्माकार वृत्ति होणे म्हणजेच ज्ञान असून ते ज्ञान सात प्रकारचे आहे.  मुक्ति हीच ज्ञेयवस्तु असून ती मुक्ति या सात भूमिकांच्याही अतीत आहे.  ज्याला सत्यवस्तूचा अवबोध होतो, तो जीव पुन्हा कधीही या संसारचक्रामध्ये बद्ध होत नाही.

 

शुभेच्छा या पहिल्या भूमिकेमध्ये मनुष्य विचारशील असतो.  वैराग्य उत्पन्न होण्यापूर्वी अशी जी शास्त्रश्रवणाची व सत्संगाची इच्छा निर्माण होते, यालाच "शुभेच्छा" असे म्हणतात.

 

यानंतर तो मनुष्य शास्त्राच्या व सज्जनांच्या संगामध्ये जातो.  शास्त्रश्रवण करून शास्त्रावर चिंतन करतो.  सत्संगाच्या प्रभावाने त्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांच्याबद्दल विरक्ति उत्पन्न होते.  मग तो सदाचाराकडे प्रवृत्त होतो.  म्हणजेच श्रवण-मननादि असणाऱ्या सदाचाररूपी साधनेमध्ये त्याची प्रवृत्ति होते.  यालाच "विचारणा" असे म्हणतात.

 

शुभेच्छा आणि विचारणा या दोन भूमिकांच्या दीर्घकाळ केलेल्या अभ्यासामुळे विषयांच्यामधील आसक्ति नाहीशी होते.  यालाच "तनुमानसा" असे म्हणतात.  ज्याने प्रथम दीर्घकाळ नित्यानित्यविवेक केला आहे, सत्संगामध्ये जाऊन श्रवणादि साधना केली आहे, असा साधक ज्ञानाच्या पुढच्या भूमिकेमध्ये प्रवेश करतो.  तनुमानसा भूमिकेत साधकाचे मन विरक्त झाल्यामुळे अत्यंत सूक्ष्म होते.

 

याप्रमाणे शुभेच्छा, विचारणा व तनुमानसा या तीन भूमिकांचा ज्याने दीर्घकाळ अभ्यास केला आहे, त्याच्या चित्तामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न होते.  असे विरक्त चित्तच शुद्ध व सत्यस्वरूप आत्मस्वरूपामध्ये स्थित होते.  यालाच "सत्त्वापत्ति" असे म्हणतात.  हे ज्ञानाची चवथी भूमिका आहे.  

 

यानंतर वरील चार भूमिकांच्या अभ्यासामुळे साधक पूर्णतः निःसंग होतो. त्याचे चित्त सत्त्वगुणावर आरूढ होते.  यालाच "असंसक्ति" असे म्हणतात.  ही ज्ञानाची पाचवी भूमिका आहे.  

 

या पाच भूमिकांच्या अभ्यासाने साधक आत्मस्वरूपामध्ये रममाण होऊन त्याला दृढ आत्मनिष्ठा प्राप्त होते.  त्यावेळी त्याला अंतःकरणामध्ये किंवा बाहेर कोठेही दृश्य पदार्थांचे भान राहत नाही.  या अवस्थेत साधक देहभान, विश्वाचे भान हरपतो.  त्याचे चित्त स्वस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय व तद्रूप होते.  आत्मचैतन्याव्यतिरिक्त अन्य कशाचेही भान किंवा जाणीव राहत नसल्यामुळे या भूमिकेला "पदार्थाभावनी" असे म्हणतात.

 

याप्रमाणे पूर्वोक्त सहा भूमिकांचा जो साधक दृढ अभ्यास करतो, त्याच्या चित्तामधून सर्व भेद पूर्णतः नष्ट होतात.  भेदबुद्धीचा-द्वैतबुद्धीचा पूर्णतः निरास होतो.  जीव-जगत-ईश्वर हे भेद संपतात व चित्त पूर्णतः स्वस्वरूपाशी तन्मय होते.  याप्रमाणे चित्ताला अशी स्वरूपनिष्ठा प्राप्त झाली की, त्या स्थितीला "तुर्यगा" असे म्हणतात.  ही ज्ञानाची सातवी भूमिका आहे.  सर्व जीवन्मुक्त पुरुषांच्यामध्ये ही तुर्यावस्था विद्यमान असते.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ