Showing posts with label cause. Show all posts
Showing posts with label cause. Show all posts

Tuesday, March 15, 2022

भासाचे मूळ | The Root of Illusion

 



शंका: दर्पण-नगरी दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे आरशामध्ये नगरी भासमान आहे.  याचाच अर्थ दर्पणामध्ये नगरीचा भास होण्यासाठी आरशाच्या बाहेर नगरीची सत्ता असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय भास होणार नाही.  म्हणजेच दर्पणाच्या बाहेर नगरीची स्वतंत्र सत्ता आहे.  त्यावरून आपोआपच दोन सत्ता मानल्या पाहिजेत.  १) आरशाची सत्ता आणि २) नगरीची सत्ता.  याचप्रमाणे ब्रह्म अद्वय, अखंड, निर्विशेष वगैरे स्वरूपाचे आहे, हे कबूल.  परंतु त्याच परब्रह्मामध्ये द्रष्टादृश्यदर्शनात्मक विश्वाचा भास होत असेल, तर ब्रह्माशिवाय जगताची स्वतंत्र सत्ता मानली पाहिजे.  त्याशिवाय ब्रह्मामध्ये जगदाभास निर्माण होणारच नाही.  म्हणजेच - ब्रह्म सत्य आहे.  परंतु जगदपि सत्यम् |  हेच सिद्ध होते.

 

परंतु ही शंका श्रुतिसंमत नाही.  याचे कारण रज्जूच्या दृष्टीने सर्प नाहीच.  रज्जूने कधीच सर्प निर्माण केलेला नसल्यामुळे सर्पाचा सुद्धा भास नाही.  मग रज्जूमध्ये सर्पाचा भास कोण पाहातो ?  जो रज्जू पाहात नाही तोच अज्ञानी पुरुष सर्प पाहातो.  त्याच्या दृष्टीने सर्प आभासात्मक नसून सत्य आहे.  म्हणूनच तो साप, साप असे ओरडतो.  त्याला फक्त सर्पच दिसतो.  रज्जू कधीच दिसत नाही.  बाकीचे लोक सर्प पाहण्यासाठी येतात तेव्हा त्या सर्वांना तेथे रज्जूच दिसतो.  मग हा सर्प आहे कोठे ?  तो सर्प बाहेर नसून केवळ सर्पभ्रमिष्ट पुरुषाच्या बुद्धीमध्ये झालेला भास आहे.  तो आहे आतच परंतु दिसतो मात्र बाहेर.

 

थोडक्यात सर्पाचा भास अज्ञानावस्थेमध्येच अनुभवाला येतो.  रज्जुज्ञानामध्ये प्रचीतीला येत नाही.  त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये झालेला विश्वाचा भास हा अज्ञानावस्थेमध्येच आहे.  परब्रह्माच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने पाहिले तर विश्व नाहीच.  फक्त अखंड, अद्वय परब्रह्मच आहे.  ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विकार, निरुपाधिक असल्यामुळे परब्रह्माने विश्वाची निर्मितीच केलेली नसल्यामुळे विश्वाचा भास होईलच कसा ?  त्यामुळे परब्रह्माव्यतिरिक्त विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व सुद्धा कसे असेल ?  यामुळे ही शंकाच योग्य नाही.  नव्हे, ही शंका विश्वाला सत्यत्व देऊन निर्माण केलेली आहे.  म्हणून ही शंका अज्ञानावस्थेमध्ये आहे.  ज्ञानावस्थेमध्ये नाही.  जर विश्व दिसत असेल तर ते कोण पाहातो ?  अज्ञानीच आपल्या बुद्धीमध्ये पाहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, December 14, 2021

कार्यकारणाच्या अतीत | Beyond Cause & Effect

 



जे लोक विश्व पाहतात, कार्याला सत्यत्व देतात, तेच लोक कारणाला सत्यत्व देतात.  कार्य आहे म्हणून कारण आहे.  विश्व आहे हे गृहीत धरले म्हणून विश्वाचे कारण ब्रह्म आहे, असे श्रुति प्रतिपादन करते.  विश्वाच्या, नामरूपांच्या, विकारांच्या तुलनेने निर्गुण, परब्रह्मावर हा आरोप केलेला आहे, अध्यास केलेला आहे.  प्रत्यक्ष निर्गुण, निर्विशेष परब्रह्मामध्ये कोणत्याही कारणाने विश्वकर्तृत्व संभवत नाही.  अजूनपर्यंत निर्गुण परब्रह्मामधून कोणतेही कार्य निर्माण झालेले नाही.  अजूनपर्यंत विश्वाची निर्मितीच झालेली नाही.  माया आणि निर्गुण निर्विशेष परब्रह्म यांचा काडीमात्र संबंध नाही.  माया परब्रह्मामध्ये कोणत्याही संबंधाने येऊ शकत नाही.  म्हणून परब्रह्म आणि विश्व यांचा संबंधच नाही.  कार्यकारणसंबंधअभावात् |

 

श्रेष्ठ अक्षरापासून सुद्धा हा पुरुष श्रेष्ठ आहे.  प्रथम सांगतात – अक्षरस्वरूप श्रेष्ठ आहे.  कार्याच्या दृष्टीने कारण श्रेष्ठ आहे.  पण त्या कारणापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारा पुरुष कार्य आणि कारणाच्याही अतीत आहे.  तो कार्य आणि कारणाचे सुद्धा अधिष्ठान आहे.

 

आज आपण कार्यामधून – कार्याच्या दृष्टीने पाहतो.  निर्गुण परब्रह्मस्वरूपाने मी पाहत नाही.  माझा शोध कार्याकडून कारणाकडे आहे.  व्यष्टीमधून मी समष्टि पाहतो.  कार्यामधून मी चैतन्य पाहतो आणि त्याच्यामुळे त्या चैतन्यामध्ये कार्याच्या अनुषंगाने मी गुणधर्म आरोपित करतो.  याठिकाणी सांगतात की, ते कारणब्रह्म निरतिशय स्वरूपाचे, absolute नाही.  तर ते सापेक्ष ब्रह्म म्हणजेच सोपाधिक ब्रह्म, म्हणजे अध्यस्त ब्रह्म आहे. अत्यंत सोप्या भाषेत श्रीसमर्थ सांगतात –

जयासी लटिका आळ आला |  जो माया गौरी पासून जाला |

जाला चि नाही तया अरूपाला |  रूप कैचे ||                  (आत्माराम)

 

म्हणून त्या ब्रह्माचे विश्वकर्तृत्व, सर्वज्ञत्वादि असणारे सर्व गुण, इतकेच नव्हे तर ईशनशीलत्व हा सर्व अध्यास आहे.  नव्हे-नव्हे, श्रुतीनेच मागील मंत्रामध्ये जे सांगितले – अक्षरात् द्विविधा सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापीयन्ति |  विश्व निर्माण होते आणि लय पावते हा सर्व अध्यास आहे.  येथे श्रुतीला कारणब्रह्म सांगावयाचे नाही आणि कार्यब्रह्म सुद्धा सांगण्याची इच्छा नाही.  तर श्रुतीला निराकार, निर्गुण, निर्विशेष स्वरूप सांगण्याची इच्छा आहे आणि ते सांगण्यासाठी श्रुति अध्यारोप-अपवाद या न्यायाने सांगते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, November 16, 2021

प्रत्यगात्मस्वरूप आणि जगत्कारण | Primal Nature & Cause of The World

 



ब्रह्मज्ञानी पुरुष सर्वत्र ‘मी’ ने निर्देशित केलेलेच प्रत्यगात्मस्वरूप पाहात असेल तर प्रत्यागातम्याचा जगत्कारण ब्रह्माशी काय संबंध आहे ?

 

श्रुति म्हणते –

सोSकामयत |  बहुस्यां प्रजायेयेति |  स तपोSतप्यत |

स तपस्तप्त्वा |  इद्ँ सर्वमसृजत |  यदिदं किञ्च |

तत्सृष्ट्वा |  तदेवानुप्राविशत् |                        (तैत्ति. उप. आनंदवल्ली)

परब्रह्माने “अनेक रूपाने मी जन्माला यावे” अशी इच्छा केली.  त्याप्रमाणे त्यावर चिंतन करून हे सर्व नामरूपात्मक विश्व निर्माण केले आणि ते परब्रह्म सर्वांच्यामध्ये प्रत्यगात्मस्वरूपाने उपलब्ध आहे.

 

श्रुति म्हणते –

तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः |  आकाशाद्वायुः |

वायोरग्निः |  अग्नेरापः |  अद्भ्यः पृथिवी |  पृथिव्या ओषधयः |

ओषधीभ्योSन्नम् |  अन्नात्पुरुषः |  स वा एष पुरुषोSन्नरसमयः |

अन्योSन्तर आत्मा प्राणमयः |  अन्योSन्तर आत्मा मनोमयः |

अन्योSन्तर आत्मा विज्ञानमयः |  अन्योSन्तर आत्माSSनन्दमयः |     (तैत्ति. उप. ब्रह्मवल्ली)

 

या जगत्कारण परब्रह्मापासून क्रमाने आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथिवी निर्माण झाली.  त्यानंतर औषधे, वनस्पति आणि धान्य निर्माण झाले.  अन्नापासून पुरुष जन्माला आला.  तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय यांच्या अगदी आत असून सर्वांचा प्रत्यगात्मस्वरूप आहे.  याचा अर्थ जगत्कारण सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म हेच अभेद स्वरूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्यगात्मस्वरूप आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ