Showing posts with label Ignorance. Show all posts
Showing posts with label Ignorance. Show all posts

Tuesday, June 9, 2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी अज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे अज्ञानाच्या सात अवस्था सांगितल्या आहेत.  यामध्ये सर्व जीवांच्या बीजावस्थेला - अव्यक्तावस्थेला 'बीजजाग्रत्' असे म्हटले आहे.  यानंतर जन्माला आल्याबरोबर पूर्वजन्मातील अज्ञानाच्या संस्कारांच्यामुळे जीव देहाशी तादात्म्य पावतो व "मी देह आहे" अशी कल्पना करतो.  यालाच येथे 'जाग्रत्' असे म्हटले आहे.  "मी जन्माला आलो व मी देह आहे" अशी कल्पना दृढ झाली की, स्वतःभोवती तो जीव अनेक कल्पना करतो.  मागील जन्मामधील जो मी होतो, तोच मी आता आहे, तसेच "हा माझा पुत्र, हे माझे घर" याप्रमाणे जड व चेतन विषयांच्यामध्ये तो जीव ममत्व निर्माण करतो.  मागील जन्मामधील अशी स्मृति म्हणजे 'महाजाग्रत्' अवस्था आहे.

 

हा अज्ञानी जीव जागृत असताना मनोराज्ये रंगवितो.  ही अज्ञानाची 'जाग्रत् स्वप्न' भूमिका आहे.  काही वेळेस जागृतावस्थेमध्येच जीवाला भ्रांतीमुळे अनेक भास होतात.  शिंपल्यावर चांदीचा, वाळूवर मृगजळाचा, दोरीवर सापाचा, हे भास पुन्हा पुन्हा होत राहिले की, जीवाच्या चित्ताला भास होण्याची सवय लागते आणि या सवयीमुळे जेव्हा जीवाला झोपेत काही क्षण असे भास होऊन कसलातरी अनुभव येतो, ही अज्ञानाची 'स्वप्न' भूमिका आहे.  एखादी स्वप्नस्थिति दीर्घकाळ टिकली तर ते स्वप्नही जागृतावस्थेप्रमाणे वाटू लागते.  यालाच अज्ञानाची महाजाग्रत् किंवा 'स्वप्नजाग्रत्' भूमिका सुद्धा म्हटले जाते.

 

यानंतर सर्वात शेवटची भूमिका म्हणजे सुषुप्ति आहे.  जेथे चित्त जागृतही नसते. कोणते स्वप्नही अनुभवत नसते.  कोणती मनोराज्येही नसतात. दीर्घस्वप्नही नसते.  अहंकार, ममकारही नसतात. म्हणजेच जेथे अज्ञानाच्या पूर्वीच्या सहाही अवस्था लय पावतात, ती अज्ञानाची सर्वात शेवटची 'सुषुप्ति' नावाची भूमिका आहे.  या अवस्थेत बीजरूपाने सर्व सुखदुःखात्मक अनुभव तसेच, सर्व पदार्थ स्थित असतात.  हीच करणावस्था आहे.

 

अशा या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत.  येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो.  या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत.  या सात अवस्थांच्या एकमेकांच्या परस्परसंयोगामधून अजूनही अज्ञानाच्या असंख्य अवस्था उत्पन्न होतात.  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, याप्रकारे जीव या अज्ञानाच्या अवस्थांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो.  या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत.  विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते.  या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–



Tuesday, October 31, 2023

घृणास्पद अज्ञानाची अवस्था | Despicable State of Ignorance

 



रामा ! या अज्ञानाचे काय वर्णन करावे ?  रामा !  चांडाळाच्या वस्तीमधून हातात घाणेरडे गलिच्छ भिक्षापात्र घेऊन फिरणे एक वेळ बरे !  परंतु अज्ञानामध्ये राहणे, ही त्यापेक्षाही भयंकर अवस्था आहे.  येथे चांडाळ हाच मुळात अपवित्र !  त्याची वस्ती सुद्धा अस्वच्छ !  त्यामधून आपल्या हातात गलिच्छ भिक्षापात्र घेणे व तेथे आपण भिकारी म्हणून जाणे, भिक्षा मागणे आणि त्या चांडाळाने दिलेली भिक्षा खाऊन त्यावर उपजीविका करणे, या सर्वच गोष्टींची कल्पना करणे सुद्धा किळसवाणे आहे.  आपण आपल्या जीवनात या भयंकर गोष्टींची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

 

परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, अज्ञानावस्थेत राहणे यापेक्षाही भयंकर आहे.  कारण अज्ञानाने मनुष्य नाशवंत विषयांच्यामध्ये आसक्त होऊन पशूंच्याप्रमाणे स्वैर उपभोग घेतो.  व्यभिचारी होतो.  जन्मानुजन्मे भोगांच्यामध्ये लोळूनही मनुष्याची तृप्ति होत नाही.  त्याच-त्याच इंद्रियभोगांच्यामध्ये मनुष्य एखाद्या किड्याप्रमाणे पुन्हा पुन्हा प्रवृत्त होतो.  रामा !  या मूर्खपणाला काय म्हणावे ?

 

अज्ञानामधील जीवन अत्यंत भयंकर आहे.  जसे एखादा मनुष्य गडद अंधारामध्ये बसावा आणि त्याने आपल्याच डोक्यावरून गोधडी पांघरून घ्यावी आणि म्हणावे की, "वा ऽऽ काय छान वाटते आहे !"  तसेच अज्ञानी मनुष्य अज्ञानामधून जन्माला येतो, अज्ञानामध्येच जगतो व तेथेच मरतो आणि एवढे करून स्वतःला कृतार्थ समजतो.  हा मूर्खपणाचा कळस आहे.  अज्ञानामुळे मनुष्याला ज्ञानाची, प्रकाशाची पुसटशी सुद्धा जाणीव होत नाही.  त्याला रत्नासारखे मौल्यवान मनुष्यशरीर मिळूनही ते कवडीमोल करून तो स्वतःची प्रतारणा करून, केवळ खाण्यात आणि झोपण्यात व्यर्थ जीवन घालवितो.  हे रामा !  असे भोगासक्त व निकृष्ट पशुतुल्य जीवन जगण्यापेक्षा एखाद्या वेळी चांडाळाच्या घाणेरड्या वस्तीत जाऊन भीक मागण्याची वेळ आली तरी ठीक आहे !

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–




Tuesday, July 18, 2023

विषयासक्त पुरुषाचा अधःपतन क्रम | Fall Sequence of an Ignorant Person

 



अज्ञानी पुरुष सतत सुख-दुःख या द्वंद्वांच्यामध्येच जीवन जगत असतो.  काही वेळेला सुखी तर पुष्कळ वेळेला मनुष्य दुःखीच असतो.  कारण अज्ञानी पुरुषाचे सुख-दुःख हे विषयांच्यावर, भोगांच्यावर तसेच बाह्य प्रसंग व परिस्थितीवर अवलंबून असते.  विषयासक्त, कामुक, भोगी पुरुषाला विषय क्षणाक्षणाला दुःखाच्या गर्तेत लोटून देतात.  एकामागून एक दुःखाचे प्रसंग, संकटांचे आघात झाल्यामुळे अशा अज्ञानी पुरुषाचे मन सतत दुःखी, निराश, उद्विग्न होत असते.  सतत द्वंद्वयुक्त व विक्षेपयुक्त होते.  याचे कारण मनामध्ये रात्रंदिवस विषयांचे चिंतन आहे.  डोळे उघडले तरी विषय दिसतात व डोळे बंद केले तरी विषय व भोगच दिसतात.  असा विषयलंपट व भोगासक्त पुरुष आयुष्यभर अतृप्त, अशांत व दुःखीच राहतो.

 

भगवान विषयासक्त पुरुषाच्या अधःपतनाचा क्रम सांगतात-

            ध्यायतो विषयान्पुसः सङ्स्तेषूपजायते |

            सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ||

            क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः |

            स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति ||           (गीता अ. २-६२, ६३)

 

विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ति निर्माण होते.  आसक्तीमधून विषयाची कामना निर्माण होते.  कामना पूर्ण न झाल्यास कामनेमधून क्रोध निर्माण होतो.  क्रोधामधून संमोह आणि त्यामुळे स्मृति भ्रष्ट होते.  सारासार विवेकबुद्धीचा नाश होतो.  मनुष्य त्याच्या परमपुरुषार्थापासून च्युत होतो.  हेच त्याचे अधःपतन आहे.  असा हा अधःपतित, विषयी, कामुक मनुष्य आपल्याच अंतरंगामध्ये असणाऱ्या शांतीचा व सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही.  मात्र ज्याचे मन सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख, विषयासक्तिरहित होऊन विवेकवैराग्यसंपन्न झालेले आहे, त्यालाच अंतरंगामध्ये निरतिशय शांतीचा व आनंदाचा अनुभव येतो.  त्याची शांतीची अवस्था कोणत्याही प्रसंगामध्ये नाश पावत नाही.  तर उलट जिथे-जिथे त्याचे मन जाते, तिथे तो नित्य आनंदस्वरूपामध्येच स्थित असतो.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st ध्यायतो Edition, April 2015



- हरी ॐ–




Tuesday, August 17, 2021

अविद्या आणि ब्रह्मविद्या | Ignorance & Knowledge

 



अविद्येचे मूळ कारण अध्यास आहे.  म्हणजेच चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास हाच हेतु आहे.  याउलट एषणत्रय संन्यास हा विद्येचा हेतु आहे.  विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति आणि मुमुक्षुत्व हा ब्रह्मविद्येचा हेतु आहे.  याप्रमाणे ब्रह्मविद्या आणि अविद्या यांच्या हेतुमध्ये, यांच्या स्वरूपामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये पूर्णतः भेद आहे.

 

१) अविद्या –       हेतु    – चैतन्यस्वरूपावर अनात्म्याचा अध्यास

स्वरूप – अज्ञानस्वरूप

फळ   – संसारप्राप्ति

श्रुति   - अविद्यायामन्तरे वर्तमानाःस्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः |

        दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः || (कठ. उप. १-२-५)

ज्याप्रमाणे एक अंध पुरुष दुसऱ्या अंध पुरुषाला मार्ग दाखवितो.  त्याप्रमाणे स्वतःला धीर व विद्वान समजणारे, अविद्येमध्येच रत झालेले पुरुष संसारचक्रामध्येच परिभ्रमण करतात.

 

२) ब्रह्मविद्या –     हेतु    - एषणत्रयसंन्यास (पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा यांचा त्याग)

साधनचतुष्टयसंपत्ति (विवेक, वैराग्य, शमादि षटक्संपत्ति, मुमुक्षुत्वम् ) 

स्वरूप – ज्ञानस्वरूप, प्रकाशस्वरूप (यथार्थ, सम्यक्, संशयविपर्ययरहित ज्ञान)

फळ   – अत्यंत दुःखनिवृत्ति निरतिशय आनंदप्राप्तिः मोक्षप्राप्ति

श्रुति   - भिद्यते हृदयग्रन्थििश्छद्यन्ते सर्वसंशयाः |

        क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे || (मुण्ड. उप. २-२-८)

जीवब्रह्मैक्यज्ञानाने अविद्याकामकर्मरूपी हृदयग्रंथीचा उच्छेद होतो आणि सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतात.  तसेच सर्व कर्मांचा क्षय होऊन जीव मुक्त होतो.

 

याप्रमाणे ज्ञान आणि कर्म यांच्या हेतु, स्वरूप आणि फळ यामध्ये भेद असल्यामुळे कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय अजिबात शक्य नाही.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ–




Sunday, June 28, 2020

अपरा प्रकृति | Inferior Existence




अष्टधा प्रकृतीमधुनच या नानाविविध विश्वाची निर्मिति होते.  सूक्ष्म पंचमहाभूते, मन, बुद्धि, अहंकार यांनी युक्त असणारी अशी ही अष्टधा अपरा प्रकृति परमेश्वराच्या परा शक्तीपासून भिन्न स्वरूपाची आहे.  अपरा म्हणजेच निकृष्ट स्वरूपाची आहे.  अपरा प्रकृति ही निकृष्ट स्वरूपाची का आहे ?  आचार्य याचे उत्तर देतात –

१) अनृतत्वात् – अपरा प्रकृति ही निर्मित असल्यामुळे सतत विकारयुक्त असून मिथ्या स्वरूपाची आहे.
२) जडत्वात् – ही प्रकृति अचेतन आहे.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.
३) दुःखात्मकत्वात् – ही प्रकृति दुःखस्वरूप आहे.  म्हणूनच या विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये सुखाची अनुभूति येत नाही.  इंद्रियांच्या माध्यमातून घेतलेले सर्व विषयांचे उपभोगही दुःखालाच कारण होतात.  दुःख दोन प्रकाराने होते.  प्रियवियोगेन – प्रिय विषयांच्या वियोगाने आणि अप्रियसंयोगेन – अप्रिय विषयांच्या संयोगानेही दुःखप्राप्ति होते.  
४) अशुद्धत्वात् – ही अपरा प्रकृति रजोगुण व तमोगुणाच्या प्रभावाने युक्त असल्यामुळेच तिला अशुद्ध अथवा मलिन प्रकृति असे म्हणतात.  
५) पुरुषाधीनत्वात् – ही अपरा प्रकृति जड, अचेतन असल्यामुळे तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.  म्हणून सत्तास्फूर्तीसाठी ती पुरुषावर अवलंबून आहे.  म्हणजे परमात्म्याच्या चेतानात्मक प्रकृतीवर अवलंबून आहे.  
६) वेद्यत्वात् – अशी ही प्रकृति वेद्य म्हणजेच दृश्य, इंद्रियगोचर आहे.  मनाच्या, बुद्धीच्या साहाय्याने तिचे स्वरूप जाणता येते.
७) ज्ञानेन निवर्त्यत्वात् – ही अपरा प्रकृति आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे मिथ्या, जड, दुःखात्मक, अशुद्ध, पुरुषाधीन असेल तरीही ती दृश्य, वेद्य असल्यामुळे तिचे ज्ञान घेता येते.  

ही अपरा प्रकृति बुद्धीवर अज्ञानाचे आवरण घालून जीवाला बहिर्मुख, विषयासक्त करते आणि क्रमाने जीवाचे अधःपतन करते.  ती संसारवर्धन करून जीवाला स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवते.  जीवांना मोहीत करून कठपुतली बाहुल्यांच्याप्रमाणे जन्मानुजन्मे नाचविते.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ–


Tuesday, January 9, 2018

ज्ञान व अज्ञान कुठे असते? | Where Knowledge and Ignorance Lies?



आत्मज्ञान प्राप्त होते याचा अर्थ असा नाही की, आत्म्याला ज्ञान प्राप्त होते.  आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्यामध्ये प्रत्यक्षात ज्ञान नाही किंवा अज्ञानही नाही.  ज्ञान आणि अज्ञान हे बुद्धिनिष्ठ आहे.  त्या बुद्धीच्या अवस्था आहेत.  म्हणूनच ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी आहे, असे म्हटले जाते.  आत्मा अज्ञानाच्या विरोधी नाही.  जर आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे असे म्हटले तर आत्मा नित्य असल्यामुळे अज्ञानाचे अस्तित्वच राहाणार नाही आणि त्यामुळे अज्ञानाचा अभाव झाल्यामुळे जीवाला संसारच येणार नाही.  

प्रत्येक जीव जन्मतःच मुक्त होईल.  शास्त्राची, गुरूंची आणि अध्ययनाची गरजच भासणार नाही.  इतकेच नव्हे तर परमपुरुषार्थ सुद्धा नाही, कारण जीव हा जन्मतःच मुक्त होईल.  परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र प्रत्येक जीव आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी असून संसारी आहे.  याचाच अर्थ आत्मा ज्ञानस्वरूप असूनही जीवाला मात्र अज्ञानाची अनुभूति आहे.  म्हणून हे अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे, हे सिद्ध होते.  तसेच श्रवण, मनन, निदिध्यासनेच्या अभ्यासाने अंतःकरणामध्ये आत्माकार वृत्ति उदयाला येऊन ती वृत्ति अज्ञानविरोधी असल्यामुळे अज्ञानाचा ध्वंस होऊ शकतो.  

समजा, घट समोर असूनही जर दिसत नसेल तर दोष घटामध्ये नाही दृष्टीमध्ये आहे.  मोतीबिंदु काढून टाकल्यानंतर घटाची साक्षात प्रचीति येते.  येथे आवृत्ति आणि अनावृत्ति घटामध्ये नसून डोळ्यामध्ये आहे.  त्याचप्रमाणे आत्मा स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशक असल्यामुळे आत्म्याला ज्ञानाची जरुरी नाही.  तर अज्ञान बुद्धीमध्ये असल्यामुळे बुद्धीला आत्मज्ञानाची जरुरी आहे.  

तसेच जर आत्मा अज्ञानी आहे असे मानले तर “मी आहे” हे ज्ञान होणार नाही, कारण अज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये ज्ञानाची शक्यता नाही.  तसेच अज्ञानाला अज्ञानाची जाणीव किंवा ज्ञान सुद्धा शक्य नाही.  याउलट आत्म्याला अज्ञानाची जाणीव आहे.  यावरून सिद्ध होते की, आत्मा अज्ञानी नसून स्वयंसिद्ध ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान व अज्ञान आत्म्यामध्ये नसून बुद्धीमध्ये आहे.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, April 19, 2016

अविद्यारूपी बालके | Ignorant Babies


मूढ लोकं अविद्येमध्येच अनेक प्रकाराने रममाण होतात. ते स्वतःलाच कृतार्थ मानतात.  “ आम्ही आमच्या जीवनाचे प्रयोजन, इतिकर्तव्य पूर्ण केलेले आहे ”,  असा ते अभिमान निर्माण करतात.  ती सर्व लहान बाळे आहेत.  लहान मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कल्पनाविलासामध्येच रममाण होतात.  स्वतःला हुशार समजतात. पण ते खऱ्या अर्थाने अज्ञानी, अजाण असतात.  त्याचप्रमाणे संसाराला इतिकर्तव्य मानणारे, महान गृहस्थाश्रमी लोक सुद्धा लहान बालकेच आहेत.

याचे कारण त्यांना असे वाटते की, व्यावहारिक असणारी कर्तव्ये पूर्ण केली की, आपण कृतार्थ, परिपूर्ण झालो.  कनक-कांचन-कामिनी यामध्येच इतिकर्तव्यता मानणारे, कर्म-कर्मफळाच्या विषयामध्ये आसक्त झालेले असे हे अज्ञानी लोक तत्त्वस्वरूप जाणत नाहीत.  त्यामुळे ते अत्यंत दुःखी, कष्टी, निराश आणि हताश होतात.

स्वयंभू ब्रह्माजीने जन्मतःच सर्व इंद्रिये बहिर्मुख करून जणु काही नाश केलेला आहे.  आपली सर्व इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख आहेत.  त्यामुळे सर्व जीव बाह्यविषयांनाच पाहतात. स्वस्वरूपाला मात्र जाणत नाहीत.  दुर्दैवाने सर्वच जीव अज्ञानाने आवृत्त होतात. स्वतःविषयीच्या, विषयांबद्दलच्या, अन्य व्यक्तींबद्दलच्या कल्पने करतात आणि त्याच कल्पनाविश्वामध्ये जीवनभर वावरतात.  इतकेच नव्हे, तर त्याच कल्पना, अपेक्षा, महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करतात.  लोकरूढीप्रमाणे भोगमय, स्वैर, उच्छृंखल, वैषयिक जीवन जगतात. त्यांनाच याठिकाणी ‘बालाः’ असे म्हटले आहे.

जशी लहान मुले क्रीडेमध्ये, खेळामध्येच रममाण होतात, तसेच हे सर्व जीव बाह्य प्रवृत्तीमध्येच रममाण झालेले असतात.  कर्मफळाचा क्षय झाला की, कर्मकर्मफळाच्या नियमाप्रमाणे ते मर्त्य लोकामाध्येच किंवा त्याहीपेक्षा नीच, निकृष्ट योनीमध्ये, तिर्यक् योनीमध्ये प्रवेश करतात.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ –